Login

गावाकडच्या गोष्टी : श्री. सरस्वती वि.मं. सरोळी शाळेतून शिक्षक येजरेसरांना सन्मानपूर्वक निरोप

प्रज्ञावान शिक्षक हेच समाजाचे मानबिंदू असतात.

श्री सरस्वती वि.मं. शाळेतून आदरणीय शिक्षक श्री. विश्वास नारायण येजरेसरांना सन्मानपूर्वक निरोप..!!

संस्कार , आपलेपणा , जिव्हाळा , माणुसकी आणि सांस्कृतिक जपणूक असलेल्या सरोळी गावाने नेहमीच कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेतली आहे. गावात आलेली कोणतीही व्यक्ती गावाशी एकरुप होते आणि घनिष्ठ ऋणानुबंधात बांधली जाते.त्यांचे गावाशी जोडलेली नाते कायमचे आपले होते त्यामुळे अशी व्यक्ती ज्यावेळी गावातून बाहेर जाते त्यावेळी सरोळी ग्रामस्थ तिच्या कार्याचा गौरव , सन्मान मोठ्या दिमाखात करतात.असेच आपल्या शाळेतून शिक्षक श्री. विश्वास नारायण येजरेसर यांची भादवण येथे बदली झाली त्यावेळी त्यांचा सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.त्यांच्या शैक्षणिक कार्याचा केलेला सन्मान नेहमीच त्यांना उर्जा देईल.

श्री सरस्वती वि.म. सरोळी ही शाळा आपल्या गावचे वैभव आहे. माळरानावर निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्यात नटलेल्या या शाळेने ज्ञानार्जन क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. या शाळेत संस्कार व नितिमुल्यांची शिकवण हा आधारभूत पाया आहे. येथील शिक्षकवृंद हा शाळेचा आत्मा आहे. येथे येणारा प्रत्येक शिक्षक हा शाळेतील वातावरणात पटकन समरस होतो त्यामुळे मुलांचे व शिक्षकांचे नाते सहृयतेने जोडले जाते. मुलांच्यातील योग्य गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करण्यात इथला शिक्षक नेहमी अग्रेसर आहे. शाळेच्या इतिहासात शैक्षणिक प्रगतीची नवी दालने उभा करण्यात या शाळेतील शिक्षक नेहमीच झटत आहेत. अनेक शिक्षक या शाळेत आले आपल्या अनुभवातून शाळेला वैभव प्राप्त करुन दिले त्यापैकी आदरणीय विश्वास येजरेसर यांचे नाव हक्काने घ्यावे लागेल.

येजरे सरांनी शाळेत येताच खूप बदल घडवून आणले. यासाठी ते आणि मुले स्वतः शाळेत लवकर येवून शाळेची स्वच्छता करत असत. शाळेतील बागबगीचा व क्रिडांगण यामध्ये विविध सुधारणा करुन शाळेला साजेस रुप प्राप्त करुन दिले आहे. याबरोबरच मुलांना जादा वर्ग घेवून मोलाचे मार्गदर्शन केले आहे.शाळा सुशोभिकरण यामध्ये सहभागी शिक्षकांसह शाळेचे रुपडे पालटण्यात महत्वाचे योगदान आहे. यामुळे शाळेला ' मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ' यामध्ये पुरस्कार मिळाला आहे. या शाळेतील परिसरात सुंदर बागबगीचा याबरोबर विविध भाजीपाल्याची परसबाग निर्माण केली आहे यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धेत शाळेला धवल यश मिळाले आहे. मुलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी शाळेत योगशिबीराचे आयोजन करुन मुलांना मार्गदर्शन केले आहे.

कित्येक वर्ष शाळेला शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळत नव्हते ही खंत येजरे सरांना सतत सतावित होती यासाठी त्यांनी मुलांना शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन केले व अखेर त्यांना यश मिळाले. अनेक वर्षानंतर कु. त्रिशाली आनंदा पाटील ही ग्रामीण भागातून राज्यात ८ वी आली. याबद्दल येजरेसर व त्रिशाली यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली व सत्कार करण्यात आला.

गेली सहा वर्ष येजरेसर आपल्या शाळेत निष्ठेने शैक्षणिक मार्गदर्शन करत आहेत.आपल्या प्रेमळ स्वभावाने शाळेतील सर्वांची मने त्यांनी जिंकली आहेत.शाळेच्या विविध यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.शासकीय नियमानुसार त्यांची बदली सरोळीहून भादवण येथे झाली त्याचा निरोप समारंभ सरस्वती शाळेत पार पडला.

अत्यंत भावनाप्रधान झालेला हा समारंभ येजरे सरांच्या बहुमुल्य कार्याची संस्मरणीय आठवण होती. अनेकांनी मनोगते व्यक्त केली त्यावेळी कोणत्या शब्दांत सरांना निरोप द्यायचा या हेतुमुळे मुलांना आपल्या भावनाही व्यक्त करता आल्या नाहीत. सर शाळेतून जाणार म्हटल्यावर सर्व मुले ओक्साबक्षी रडत होती.कांहीना हुंदके अनावर झाले होते.अंगणवाडी सेविकाही सरांच्याबद्दल भावनावश झाल्या होत्या. एक शिक्षक म्हणून त्यांनी सर्वांच्यावर लावलेला लळा खूपच प्रभावी वाटला. सरांनी शाळेतल्या मातीतील कणाकणात स्पर्श केला होता. त्या स्पर्शाला इथली माती असुरलेली होती ..! शाळेच्या बागेतील फुलांचे ताटवेही आज हिरमुसलेले दिसत होते,परसबागेतील भाजीपाल्याच्या रोपांशी केलेले हितगुज क्षणाक्षणाला आठवणार ..! प्रार्थनेच्यावेळी मिळणारी माहिती , फळ्यावरील कोरीव अक्षरे, सांस्कृतिक कार्यक्रमात मिळणारे प्रोत्साहन, शाळेतील वर्गातून घुमणारा आवाज , मुलांच्याबरोबर व शिक्षकवृंद यांचेसोबत झालेला मनमोकळा संवाद हे सारं आत्ता थांबणार आहे..!या सगळ्याचं स्थलांतर एका नवीन ज्ञानमंदिरात होणार आहे ..! हा सगळा नजारा आपली शाळा निस्तःब्ध होऊन पहात होती. एका निरपेक्ष भावनेन बहरलेलं हे मंदिर सगळ्या क्षेत्रात समृद्ध झालं होतं याचा सर्वांना अभिमान होता.
मनाला भारावून टाकणारा हा निरोप समारंभ येजरे सरांच्या मनाच्या गाभाऱ्यात चिरंतन आठवणीत राहिल. केवळ शिक्षक म्हणून चांगले होते असे नव्हे तर माणुसकी ,आदर , सन्मान,ज्ञानतपस्वी ,प्रेमळ व सोज्वळ स्वभाव असे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यात एक दर्जेदार साहित्यिक दडलेला आहे.भाषेवर ज्ञानाची मजबूत पकड आहे. अशा शिस्तप्रिय शिक्षकाला सरोळी शाळेतून निरोप देताना मन उचंबळून आले. त्यांचा हा शैक्षणिक प्रवास असाच चालू रहावा , त्यांना उत्तम आरोग्य लाभावे व उर्वरीत जीवन आनंददायक व सुखकर जावे ही सरोळीकर ग्रामस्थाकडून प्रार्थना आहे.एका संस्कारशील शिक्षकाला पुढील शैक्षणिक कार्याला शुभेच्छा ..!!

शिक्षणाच्या ज्ञानमंदिरातील
थोर गाढ विश्वास
संस्कारक्षम मुल्यांची जोपासना
हाच केवळ ध्यास

✍️नामदेव पाटील
0