चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(लघुकथा फेरी)
(लघुकथा फेरी)
शीर्षक : शिकून काय करायचं?
"अगं शालिनी, किती कमी गुण मिळाले तुला यंदा. तू अभ्यास करत नाहीयेस का? तिसरी सराव परीक्षा आणि तरीही असे गुण? दोन महिन्यांनी बारावी बोर्डची परीक्षा आहे तुझी आणि तू अशी करतेय!" स्नेहा तिच्या विद्यार्थिनीला म्हणाली.
"आकृती तुझं काय गं? उत्तरे लिहिताना तू किती क्षुल्लक चुका केल्या आहेत! नक्की काय कळत नाहीये? तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं आहे ना? की बसायचंय परत इथेच?" स्नेहा भुवया उंचावून पाहत दुसऱ्या विद्यार्थिनीला म्हणाली. आकृती लगेच हिरमुसून बसली.
तेवढ्यात केतकी त्या दोघींना ओरडा मिळताना पाहून हळूच हसली.
"तू काय गं हसतेस? तू पण दिवे नाही लावलेस. तूसुद्धा तुझ्या उत्तरांनी उत्तरपत्रिकेची आणि गुणांची कत्तलच केलीयेस." स्नेहा केतकीकडे मोर्चा वळवून म्हणाली.
"ह्म्म." केतकीने दुर्लक्ष करत हुंकार भरला.
"ह्म्म काय?" स्नेहाने बारीक डोळे करून पाहिले.
"बाई, शाळा सुटून एक तास झाला तरी आम्ही तिघी इथे तुम्हाला सोबत व्हावी, तुम्हाला एकटं वाटू नये म्हणून बसलो आहोत आणि तुम्ही काय आमच्याच उत्तरपत्रिका तपासून आमच्या कमी गुणांसाठी ओरडत आहात?" केतकी गाल फुगवत म्हणाली.
"जरा म्हणून गांभीर्य नाही ना तुम्हाला?" स्नेहा त्या तिघींकडे पाहत म्हणाली.
"काय करू बाई विषयाचं गांभीर्य समजून? शेवटी लग्नच तर होणार आहे आमचं. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालो काय आणि नाही झालो काय, एकसारखंच!" केतकी खांदे उडवत म्हणाली.
"हो बरोबर बाई." आकृती आणि शालिनीही तिच्या वाक्याला दुजोरा देत होत्या.
"म्हणजे? मला कळलं नाही." स्नेहा भुवया आकसून त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.
"म्हणजे घरी सगळे म्हणतात की एवढं शिकून काही होणार नाही, घरातली कामं शिका. सासरी तुमचं शिक्षण कामी येणार नाही. सासरी गेलं की रांधा, वाढा, उष्टी काढा एवढंच बाईचं जगणं असतं." केतकीने पोपटासारखी घरी ऐकीवात असणारी वाक्ये बोलून दाखवली.
"माझ्या घरी तर म्हणतात की मी अठरा वर्षांची झालीये तर येत्या उन्हाळ्यात लगेच बार उडवून टाकू, कारण मुलीचं लग्न तरण्या वयात केलेलं बरं असतं." शालिनीने तिला रोज ऐकावे लागणारे वाक्य सांगितले.
"माझ्या घरी तर स्पष्ट सांगितलंय, सासरी गेल्यावर तुझी गाऱ्हाणी आमच्या कानावर येण्यापेक्षा आताच सगळं शिकून घे, म्हणजे घरकाम बरं का, शिक्षण नाही हं!" आकृती केविलवाणा चेहरा करत म्हणाली.
"बाप रे! मला बोलावं लागेल तुमच्या पालकांशी..." स्नेहाला ऐकूनच धडकी भरली.
"काही उपयोग नाही. आधी तर १६ वर्षांत, कधी १३-१४ वर्षांत लग्न व्हायची आता कायद्यामुळे जरा दडपण बाळगून कसेबसे १८ वर्षं होईपर्यंत थांबतात." केतकी म्हणाली.
"हो ना आणि तुम्ही बोलायला गेल्या ना तर चुकीचा अर्थ काढून उन्हाळ्यात होणारं लग्न सरळ ऐन परीक्षा असताना उरकून घेतील." आकृती रडवेल्या स्वरात म्हणाली.
"थोडक्यात काय तर एवढं शिकून उपयोग नाही, कारण एकदा लग्न झालं की आमचंही आयुष्य तथाकथित संसार करण्यातच जाईल." केतकी नाक मुरडत म्हणाली.
"हो ना, संसाराला लागल्यावर कोण विचारणार आपलं शिक्षण? सगळे म्हणतील पोळी नीट नाही झाली, भांडी लवकर घास, लादी नीट पूस वगैरे..." शालिनी वाकडे तोंड करत म्हणाली.
"तुमचं एक बरं आहे बाई! तुम्ही शहरात शिकल्या आणि इकडे बदली झाली म्हणून इथे आल्या; पण इथेच जन्म घेऊन इथेच वाढणाऱ्या आमच्यासारख्या मुलींचं आयुष्य हे असंच." केतकी तुलना करत म्हणाली.
"बरं, मी एक गोष्ट सांगते मग तुमचं तुम्ही ठरवा. शिकून काय करायचं ते..." स्नेहा काहीसा विचार करत म्हणाली.
"बाई, आधीच उशीर झालाय, तुमची गोष्ट ऐकत बसलो तर आणखी उशीर होईल आणि घरी ओरडा पडेल तो वेगळा..." केतकी पटकन म्हणाली.
"थोडक्यात सांगते गं आणि आपल्या निवळी गावातलीच आहे बरं का!" स्नेहा आग्रह करत म्हणाली.
"काय सांगता बाई? खरंच?" आकृती औत्सुक्याने म्हणाली.
"हो तर! मग ऐकताय ना?" तिघींकडे पाहत स्नेहाने विचारले. त्यांनी होकारार्थी मान डोलावली.
"ही गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. एक शारदा नावाची मुलगी होती. खूप हुशार, चपळ आणि बोलकी; पण घरी फार असे लाड होत नसायचे तिचे. सतत तिला तिच्याच घरी हे घर तुझं नाही, इथे तुझी मनमर्जी चालणार नाही. जे करायचंय ते सासरी कर, कारण मुलीचं खरं घर हे तिचं सासर असतं. मुलगी परकं धन असते. मुलींनी हद्दीत वागायचं असतं, मुलीच्या जातीने शिष्टाचार पाळायचे असतात, जास्त हसू नये, शिकण्याचा अट्टाहास करू नये, हेच शब्द तिच्या कानावर घातले जायचे; त्यामुळे ती कधी तिच्याच घरात परकी झाली, हे तिलाही कळलं नाही." स्नेहा सांगत होती. तेवढेच ऐकून तिघी म्हणाल्या...
"बिचारी..."
"जेमतेम सातव्या वर्गातून आठव्या वर्गात गेली होती, नुकतीच पाळी आली होती; म्हणून लगेच तिचं लग्न लावून दिलं. साधारण पंधरा वर्षांची होती असेल; पण ती त्या लग्नाने आनंदी होती, कारण तिला सांगितलं जायचं ना की तिचं हक्काचं घर तिचं सासर असेल. तिथे ती मनमोकळेपणाने वागू शकते; म्हणून लग्नाला फार असा काही विरोध केला नाही तिने. तिचा नवरा मात्र तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. तो काहीसा नाराज होता. त्याला शारदाचं एवढ्या कमी वयात लग्न होणं नामंजूर होतं; पण पालकांच्या आज्ञेपुढे त्याचा नाईलाज झाला. इकडे शारदाचं लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशीच तिला कळून चुकलं की सासरचं घरही तिचं स्वतःचं नाही. म्हणजे काय झालं, ती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत खेळत होती आणि तिच्या सासूने तिला ऐकवलं की हे तिचं घर नाही. हे सासर आहे, इथे नीट वागावं लागतं. मग मात्र तिला गहन प्रश्न पडला की तिचं घर कोणतं?" स्नेहा एक क्षण थांबून तिघींच्या प्रतिक्रिया पाहू लागली.
"मग काय ती आपली कर्तव्ये पार पाडत राहिली असेल आणि असंच तिचं आयुष्य संसारात झटत निघून गेलं असेल." केतकी खिन्न स्वरात म्हणाली. स्नेहा किंचित ओठांचा कोपरा उंचावून हसली व पुढे बोलू लागली.
"एके दिवशी ती तिच्या नवऱ्याच्या खोलीत बसून होती आणि तिचे लक्ष कपाटात असणाऱ्या पुस्तकांकडे गेले. तिला एक कादंबरी दिसली, कादंबरी वाचण्याचा मोह तिला आवरला नाही आणि ती वाचतच सुटली. अर्ध्या तासात तिने पन्नास पाने वाचलीसुद्धा! ती कादंबरीत पुरती गुंतली होती; म्हणून तिचा नवरा तिच्या खोलीत कधी आला, तिला कळलंच नाही. त्याने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या हातातून कादंबरी घेतली, तेव्हा तिची नजर त्याच्यावर गेली आणि भीतीने तिचा कंठ दाटून आला. ती पटकन पलंगावरून उठून उभी राहिली. पाणी कधीच डोळ्यांत साचलं होतं. तिच्या नवऱ्याने तिला विचारलं की तिला वाचायला आवडतं का? ती मात्र रडतच गयावया करू लागली की ती परत कधी वाचणार नाही. त्याच्या साहित्याला हात लावणार नाही. ती का एवढं रडतेय त्याला कळेना; पण तिला शांत करायचं होतं. त्याने तिला आधी थोडं रडू दिलं आणि नंतर तिची पाठ थोपटून सांत्वन करू लागला. हळूहळू ती शांत झाली. त्याने तिला परत विश्वासात घेत विचारलं की तिला वाचायला आवडतं का? तिने होकारार्थी मान डोलावली. त्याने तिला तिचं शिक्षण विचारलं. तिने सांगितलं, मग त्याने विचारलं की ती लग्नात एवढी आनंदी का होती? तिने सांगितलं की तिचं माहेरचं घर तिचं स्वतःचं नव्हतं आणि वडीलधाऱ्यांचं म्हणणं होतं की सासरच तिचं खरं घर आहे; पण इथे आल्यावर कळलं की हेही तिचं स्वतःचं घर नाही, कारण इथेही तिला मोकळीक नाही. मग त्याने विचारलं की तिला पुढे शिकायला आवडेल का? तिने होकारार्थी मान हलवली. मग त्याने विचारलं की शिकून काय करणार? ती म्हणाली की ती स्वतःचं घर घेणार." स्नेहाने शारदाचे विचार सांगताच त्या तिघीही हलक्या हसल्या.
"शारदाचं उत्तर ऐकून त्यालाही हसू आलं; म्हणून मग त्याने जरा तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं तो म्हणाला की घर तर तो पण घेऊ शकतो तिच्या नावे आणि तिला मोकळीकही देऊ शकतो, खेळण्याची, बागडण्याची, हवं ते करण्याची; पण त्यावर ती उत्तरली की ते घर त्याचं असेल तिचं नाही. तिच्या त्या उत्तराने त्याला कळून चुकलं की तिला स्वतःचं घर घेण्यापेक्षा तिचं अस्तित्त्व निर्माण करायचंय, फक्त तिला ती जाणीव नाही; त्यामुळे त्याने तिचं अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याचा विचार केला. तिला शालेय शिक्षण शिकवणं त्याला गरजेचं वाटलं. त्याने आधी शारदाला विश्वासात घेत सांगितलं की तो त्याच्या कुटुंबियांपुढे तिला हिणवणार, तिच्याविषयी खूप चुकीच्या गोष्टी बोलणार; पण तिने मनाला लावून घेऊ नये, कारण ते केल्यावरच तिला नाईलाजाने का होईना पण वडीलधाऱ्यांकडून पुढे शिकण्याची परवानगी मिळेल. तिने नवरा म्हणेल ती पूर्व दिशा, असा विचार करत होकार दिला." स्नेहाच्या कथेतल्या त्या वळणामुळे त्या तिघी थक्क झाल्या होत्या.
"आई शपथ! शारदाचा नवरा किती समंजस आहे बाई!" केतकी नवल व्यक्त करत म्हणाली.
"तू मध्ये बोलू नको बरं. लय भंगते. बाई, तुम्ही सांगा, शारदाच्या नवऱ्याने कोणती शक्कल लढवली होती?" शालिनी केतकीला गप्प बसवून स्नेहाला पुढे कथा सांगण्याचा आग्रह करू लागली.
"तो सगळ्यांना म्हणाला की शारदा कमी शिकली आहे, ते त्याला आवडत नाही. ती त्याच्यापेक्षा वयाने लहान असल्याने आधीच तो चारचौघात मान उंचावून बसू शकत नाही. त्यात कमी शिक्षण असल्याने त्याच्या सहकाऱ्यांच्या बायकांच्या तुलनेत शारदा अडाणी ठरते. अडाणी बायको केली म्हणून त्याचे मित्र त्याची थट्टा करतात. एकतर शारदाला पुढे शिकू द्या, नाहीतर तो घटस्फोट घेऊन एखादी शिकलेली बायको करेल. आता पंचक्रोशीत नावाजलेल्या घराण्यात कधीच घटस्फोट घेतला नव्हता. त्यात शारदाचा नवरा एकुलता एक मुलगा! जर शारदा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला तर घराण्याची नाचक्की होईल; म्हणून नाईलाजाने दुसरा पर्याय निवडून शारदाला पुढे शिकण्याची परवानगी मिळाली. सासूबाईंना ते फारसे काही पटले नाही; म्हणून त्या कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शारदाला घरकामात गुंतवून ठेवत असायच्या. शारदाने मात्र माघार घेतली नाही. ती घरकाम सांभाळून आवडीने शिकत होती. शारदाचा नवरा ज्या शाळेत शिक्षक होता, त्याच शाळेत ती शिकत होती; पण तो इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच तिला वागणूक देत असायचा. रात्री जागरण करून तिला गृहपाठ करायला सांगायचा. खूप कमी दिवसांत तिला स्वावलंबी बनवलं होतं त्याने. तिला अवांतर वाचनही करायला सांगायचा, जेणेकरून शैक्षणिक ज्ञानासह अवांतर ज्ञानाचीही भर पडेल." स्नेहा एक क्षण थांबली. थोडे पाणी प्यायले.
"किती भारी!" तेवढ्यात केतकी म्हणाली आणि शालिनी व आकृतीने तिच्याकडे वैतागून पाहून गप्प बसण्याचा इशारा केला.
"सगळं सुरळीत सुरू होतं. घरून बाळासाठी आग्रह होत होता; पण शारदाच्या नवऱ्याने परत धमकी दिली की एकतर तिला अठरा वर्षांची होऊ द्या नि मग बाळासाठी हट्ट करा, नाहीतर मी दुसरं लग्न करतो. तिच्या नवऱ्याला त्याच्या कुटुंबाची दुखरी नस कळली होती; म्हणून तो मुद्दाम ती धमकी द्यायचा. ती दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिचा नवरा सोडला तर घरी कोणालाही फारसा आनंद नव्हताच, उलट आता ती अठरा वर्षांची झाली तर पाळणा हलवण्याचं बघा, असं फर्मान सोडण्यात आलं. प्रेम तर एव्हाना त्या दोघांनाही एकमेकांवर जडलं होतं; पण ती गरोदर राहिली तर परत तिच्या शिक्षणावर परिणाम होईल, ही भीती होती म्हणून तो बाळाचा विचार करत नव्हता. घरी मात्र वेगळीच घाई होती. शारदाचा छळ होऊ लागला, शेजाऱ्यांकडून वांझ म्हणून हिणवलं जाऊ लागलं. तिचा तो जाच त्याला पाहावला गेला नाही. अकरावीची सहामाही परीक्षा संपली आणि तिला दिवस गेले; पण तिने तिचं शिक्षण थांबवलं नाही. तिची जिद्द पाहून तिच्या नवऱ्याला तिचा अभिमान वाटला. तो तिच्या गरोदरपणात तिची विशेष काळजी घेऊन तिला अभ्यासात मदत करत होता. अकरावीही उत्तीर्ण झाली. बारावीचं वर्ष म्हणजे त्याकाळी शिक्षण क्षेत्रातलं महत्त्वाचं वळण. बारावी उत्तीर्ण केली की कोणत्याही क्षेत्रात सहज नोकरी मिळायची; म्हणून फार गुण मिळवले नाही तरी निदान तिने बारावी उत्तीर्ण व्हावं, अशी तिच्या नवऱ्याची इच्छा होती, मात्र ऐन बारावीच्या सहामाही परीक्षेच्या एक महिन्याआधी ती बाळंतीण झाली. बाळंतपणाने अशक्त झाली होती. थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. बाळामुळे कामं वाढली होती. बाळाचा सांभाळ घरातली वडीलधारी माणसं करू शकत होती; पण ती आई आहे, तिलाच बाळाचा सांभाळ करायला हवा, असंच हेकेखोर सासूबाई म्हणायच्या. शारदाचा नवरा जमेल तसा वेळ काढून बाळाचा सांभाळ करण्यात हातभार लावून तेवढ्या वेळात तिला अभ्यास करायला सांगायचा, मात्र कितीही म्हटलं तरी आई झाल्यावर तिचं लक्ष बाळाकडे जास्त असायचं. याच कारणामुळे बारावीच्या सहामाही परीक्षेत तिचा निकाल घसरला. शारदाचा नवरा तिची अडचण समजत होता; पण तरीही तिच्यावर रुसला." कथेत त्या विद्यार्थिनी इतक्या गुंतल्या होत्या की प्रसंगानुरूप त्यांचे हावभाव बदलत होते.
"नवऱ्याचा अबोला शारदाला सहन झाला नाही आणि त्याच्यासाठी तिने उर्वरित सहा महिने मन लावून अभ्यास करण्याचं ठरवलं. सासूबाई निमित्त शोधत असल्या वा बाळ काम वाढवत असलं तरी ती सगळं सांभाळून चोवीस तासांतले दोन तास अभ्यास करायचीच. अभ्यासात आधीच हुशार होती म्हणून कमी वेळात तिने अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वतःच स्वतःची सराव परीक्षा घ्यायची आणि उत्तरपत्रिका नवऱ्याला तपासायला सांगायची. नवऱ्याला तिचे कष्ट दिसून येत होते; पण तिची जिद्द कायम ठेवण्यासाठी त्याने मौन सोडले नाही. बारावीच्या परीक्षेचा दिवस उगवला, त्या दिवशी तिचा नवरा तिच्याशी बोलला. तिला शुभेच्छा दिल्या आणि तिला दही साखर दिली. तिचा आत्मविश्वास वाढला, दही साखरेमुळे नव्हे, तर नवऱ्याच्या शुभेच्छांमुळे! तिने परीक्षा दिली, सर्व विषयांचा अभ्यास झाला होता; म्हणून ती निश्चिंत होती. परीक्षा संपली आणि परत घरून घाई झाली दुसऱ्या अपत्यासाठी. यावेळी शारदाच्या नवऱ्याने स्पष्ट बजावले की, जेव्हा शारदा नोकरीवर रुजू होईल तेव्हा तो विचार करेल, सगळे गप्प झाले. कालांतराने निकाल आला आणि ती लातूर जिल्ह्यातून पहिली आली. शारदाच्या नवऱ्याला तिचा खूप अभिमान वाटला. त्यानंतर तिला सहज त्याच शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली, मात्र तिचा प्रवास तिथेच थांबला नाही. तिने पदवी शिक्षण घेण्याचा निर्णय केला. तिच्या निर्णयाला तिच्या नवऱ्याची संमती होतीच. तिला परत दिवस गेले; पण यंदा गरोदरपणातही ना तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले, ना नोकरीकडे. दमछाक होत असायची तिची; म्हणून सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिच्या नवऱ्याने घरी दोन मोलकरणी ठेवल्या, तरीही शारदा घरकाम करायची आणि बाळाचं संगोपन करायची. परीक्षेदरम्यानच ती बाळंतीण झाली; पण तिने ती परीक्षा दिली व उत्तीर्ण झाली. पुढेही असेच सुरू राहिले. पदव्युत्तर शिक्षण घेऊन पी.एच.डी. केली." स्नेहाने बोलता बोलता परत एकदा त्या तिघींकडे पाहिले. त्या तिघींच्या चेहऱ्यावर पुढे जाणून घेण्याची जिज्ञासा झळकली.
"कालांतराने ती त्याच शाळेची मुख्याध्यापिका झाली. तिच्या नवऱ्यासह तिच्या लेकरांनाही तिचा अभिमान वाटला. तिने स्वकष्टाने कमावलेले पैसे घर खर्चाला दिलेले; पण त्यातून बचतही केली होती. त्याच बचतीच्या पैशांतून तिने एक एकर जमीन घेतली आणि त्यावर शाळा उभारली. स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न कधी शाळा उभारण्याच्या स्वप्नात रुपांतरित झालं तिलाही कळलं नाही, मात्र तिच्या नवऱ्याने शारदाने घर खर्चासाठी दिलेले पैसे कधी खर्च केले नव्हते. त्याच पैशाने थोडीशी जमीन तिच्या नावे घेतली, घर बांधलं आणि तिला सांगितलं की हे तिचं हक्काचं घर आहे, तिच्या कष्टाने कमावलेल्या उत्पन्नाद्वारे खरेदी केलेलं. ते घर, तिथलं अंगण आणि घरातली प्रत्येक भांडी सगळं तिचंच आहे. ते ऐकून तिचा आनंद द्विगुणित झाला. पुढे त्या दोघांनी त्यांचं उर्वरित आयुष्य आपल्या मुलांसाठी आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी वेचलं. आज त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या कैक पटीने जास्त आहे आणि शैक्षणिक प्रबोधन अविरत सुरू आहे." एवढे बोलून स्नेहा हाताची घडी घालून ताठ बसली.
"कसलं भारी! पण हे सगळं गोष्टीत घडतं प्रत्यक्षात नाही." केतकी आधी आनंदात आणि नंतर केविलवाण्या स्वरात म्हणाली. शालिनी आणि आकृतीनेही दुजोरा दिला.
"अगं वेड्यांनो, मी म्हटलं होतं ना ही कथा आपल्या निवळी गावातलीच आहे. ही सत्यकथा आहे, आपल्या शाळेच्या संचालक बाईंची अर्थात तुमच्या माईंची आणि आबांची! आता मला सांगा, यावरून तुम्हाला काय कळलं?" स्नेहाने खुलासा केला आणि त्या तिघी आ वासून पाहत राहिल्या.
"लग्न झालं तर नवरा आपल्या माईंच्या नवऱ्यासारखा अर्थात आबांसारखा असावा." केतकी म्हणाली आणि शालिनी व केतकीने मान डोलावली.
"झालं कल्याण! मी कशासाठी ही गोष्ट सांगितली आणि तुम्ही काय बोध घेतलात!" स्नेहाने डोक्यावर हात मारून घेतला आणि त्या तिघी खुदूखुदू हसू लागल्या.
"माहिती आहे ओ बाई, आम्ही मस्करी करत होतो." केतकी म्हणाली.
"ह्म्म. मग काय कळलं?" स्नेहाने परत विचारले.
"हेच की कितीही अडथळे आले तरी परिस्थितीवर पश्चात्ताप व्यक्त न करता, गाऱ्हाणी न गाता आपलं ध्येय पूर्ण करायचं आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी शिक्षणाची कास धरायची."
"स्वतःचं अस्तित्त्व स्वतः निर्माण करायचं, शिकून काय करायचं? हा विचार न करता आपण सावित्रीच्या लेकी आहोत, हे कायम लक्षात ठेवायचं."
"आपल्याला अधिकार मिळत नाही, याचा कांगावा न करता आपला अधिकार आपल्याला मिळेल, यासाठी धडपड करावी." तिघींनीही त्यांना कथेतून झालेला अर्थबोध सांगितला.
"शाब्बास! आता चला, उशीर झालाय घरी जाऊ." स्नेहा तिघींची पाठ थोपटत म्हणाली.
सर्व आवरून त्या चौघी शाळेतून बाहेर पडल्या. स्नेहाला आपल्या आई-बाबांचा (विद्यार्थ्यांच्या माई आणि आबांचा) आज परत एकदा अभिमान वाटत होता. त्यांचाच विचार करत ती घरी जात होती, तर विद्यार्थिनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द उराशी बाळगून आपल्या घरी जात होत्या.
समाप्त.
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा