शिक्षा (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Marathi Story
शिक्षा

रामा अगदी थाटात पालखीत बसून विजयनगर राज्यात यायला निघाला होता. तेनाली गावातील लोक त्याच्या पालखीवर फुले उधळत होती. सगळीकडे त्याच्याच नावाचा जयघोष सुरू होता. पालखीच्या एका बाजूने गावाचे पंडित आणि दुसऱ्या बाजूने सावकार चालत होते. तेही रामाची स्तुती करताना थकत नव्हते.

“मला वाटलं नव्हतं रामा तुझ्यासारख्या आळशी आणि कामचुकार माणसाचं एवढं भाग्य उजळेल. चक्क राजगुरुंनी स्वतःची पालखी तुझ्यासाठी पाठवली. विजयनगरला गेल्यावर या पंडितला विसरू नकोस. मीच तुला या हातांनी लहानाचे मोठे केले आहे.”

त्याचं बोलणं ऐकून रामाने फळ खाता खाता फक्त मान हलवली. तर दुसरीकडून सावकार बोलू लागला; “मला माहित होतं पंडित जी आपला रामा काहीतरी मोठं काम करून दाखवणार म्हणून तर मी त्याला कसलीच काळजी न करता कर्जावर कर्ज देत गेलो ना! आता रामा राज दरबारात मोठ्या पदावर असेल तर तो ते दुपटीने मला परत करेलच.”

“उम्म?” रामाने त्याच्याकडे आश्चर्याने बघत भुवया उंचावून विचारलं.

“ते काय आहे ना मी पुन्हा स्नान गृहात पडलो तेव्हा माझी स्मृती पुन्हा आली.” सावकार म्हणाला.
*****************************
इथे विजयनगरमध्ये राजा कृष्णदेवराय समोर पुन्हा कोतवाल उभा होता.

“कोतवाल! काय झालं त्या चोराचं? तुम्हाला दिलेल्या ४८ तासातले १२ तास संपलेत.” राजा म्हणाला.

“हो महाराज! मी सगळ्या धनिक आणि श्रीमंत लोकांच्या घराबाहेर पहारा लावला आहे. आज रात्री तो निसटून जाणार नाही.” कोतवाल म्हणाला.

“काय बोलतोय? महाराज! मला वाटतंय याला कोतवाल पदावरून काढणं उचित ठरेल. जो चोर राजमहालात शिरून महाराणी तिरूअलम्मा यांचा देश किमती हार चोरू शकतो तो तुमच्या या सापळ्यात अडकेल? खूप चलाख चोर आहे तो.” राजपुरोहित तथाचार्य म्हणाले.

“मग तुम्हीच यावर काही उपाय का सुचवत नाही राजगुरू?” मंत्री म्हणाले.

मंत्र्याचं बोलणं ऐकून त्याचा चेहराच पडला पण राजासमोर काहीतरी सारवा सारव करणं भाग होतं.

“म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी माझी इतक्या वर्षांची साधना एका शुल्लक चोराला पकडण्यासाठी वाया घालवू? माझं शिव शंकरांशी बोलणं होईल तेव्हा मी त्यांना असं सांगू का? की, आमच्या राज्यातील कोतवाल आता एक साधा चोर पकडू शकत नाहीयेत. तुम्हीच यात मदत करा. या शुल्लक कारणासाठी मी देवाला त्रास देऊ?” तो संतापून म्हणाला.

“मग मला माझं काम करू दे आचार्य! अजून वेळ संपली नाहीये.” कोतवाल म्हणाला.

“ही तुमची शेवटची संधी असेल. तो चोर जर आमच्या समोर हजर करू शकला नाहीत तर… जा लवकर आणि कामाला लागा.” राजा म्हणाला आणि कोतवाल राजाला प्रमाण करून निघून गेला.

दरबार संपल्यावर कोतवाल आणि त्याचा सहाय्यक राजगुरूच्या मागे गेले.

“आचार्य! असं काय करताय? या दरबारात जे काही पाप पुण्य तुम्ही केलंत त्या सगळ्यात मी सहभागी होतो आता काय झालं? कृपया मला सहाय्य करा.” कोतवाल हात जोडून त्याच्या मागे मागे जात म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून तथाचार्य थांबला.

“कसं आहे ना कोतवाल तू आता आमच्या घरी भेट, उपहार पाठवणं बंद केलं आहेस. नात्यात कसं घेणं देणं सुरू असलं पाहिजे. नाहीतर कोण तू आणि कोण मी!” तो म्हणाला.

“माफ करा. पुन्हा अशी चूक होणार नाही. आज तुम्ही घरी पोहोचायच्या आधी तुमच्या भेटी घरी पोहोचलेल्या असतील.” कोतवाल हात जोडून म्हणाला.

राजगुरू त्याच्याकडे पाठ करुन उभा राहिला. महालाच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या वऱ्हांड्यात ते लोक उभे होते आणि तो स्वतःच्या टकल्यावर हात फिरवत कुत्सित हसत होता.
************************************
इथे रामा आणि त्याचे कुटुंबीय विजयनगरमध्ये पोहोचले होते.

“अजून किती वेळ लागेल आपल्याला?” रामाने विचारलं.

“विजयनगर मध्ये आलो आपण.” मणी म्हणाला.

धनी आणि मणीच्या मनात अजून कितीवेळ हे वजन उचलायचं म्हणून प्रश्न होता. एवढे चालून ते दमलेच होते.

“राजवाड्यात घेऊन चला.” रामा म्हणाला.

थोड्या दूरवरूनच राजवाडा स्पष्ट दिसत होता आणि राजवाड्याच्या वऱ्हांड्यात मध्ये उभ्या असलेल्या राजगुरूने देखील पालखी पाहिली.

“बघितलं कोतवाल आम्ही किती लोकप्रिय आहोत. लोक आता आमच्या पालखी सारखी पालखी बनवून घेऊ लागलेत. एवढंच काय ते सेवक पाहिले? तेही धनी मणी सारखे…” तो बोलता बोलता थांबला.

कोतवाल एकदम आश्चर्याने त्याच्याकडे बघत होता.

“हा उद्धट पंडित इथे!” तो रामाला बघून स्वतःशीच दातओठ खात म्हणाला.

“अरे धनी मणीसारखे काय? ते धनी मणीच आहेत आणि ती पालखी पण माझीच आहे.” तथाचार्य म्हणाला आणि ते तिघे तिथून घाईत बाहेर पडले.

इथे रामाने तथाचार्यला बघितले होते आणि म्हणूनच त्याने घाईत पालखी तिथच उतरवायला सांगितली.

“राजवाडा तर पुढे आहे.” धनी मणी म्हणाले.

“हो पण आधी तुमच्या गुरूंना भेटणार तर रिकाम्या हाती कसं जाणार? आधी आम्ही बाजारात जातो थोडी खरेदी करतो आणि मग येतो. धन्यवाद.” रामा म्हणाला आणि मागे जाऊन त्याने शारदा आणि अम्माला लवकर तिथून निघायला सांगितले. ते चौघेजण पट्कन तिथून निघाले.

“आज गुरू जी खुश होतील. इनाम देतील.” धनी म्हणाला.

“हो. त्यांचं एवढं मोठं काम आपण केलंय.” मणी पण खुश होत म्हणाला.

“ए! धनी, मणी तो दुष्ट पंडित कुठे आहे? कुठे गेला तो” आचार्य रागाने रामाला शोधत म्हणाला.

“हा काय इथेच आहे.” मणी म्हणाला.

“कुठे आहे?” त्याने पुन्हा विचारलं.

“हा काय आमच्या समोर. तुम्ही गुरू जी!” तो पुन्हा म्हणाला.

या त्याच्या वाक्या बरोबर आचार्यने त्याच्या एक कानाखाली लगावली आणि म्हणाला; “मी आत्ता जो इथून पळून गेला त्याच्याबद्दल बोलतोय. कुठे गेला तो?”

“अच्छा तो? तो तुमच्यासाठी भेट आणायला गेला आहे.” धनी म्हणाला.

“पण तो इथे आमच्या पालखीत काय करत होता?” त्याने विचारलं.

“तुम्हीच तर त्याला निमंत्रण देऊन बोलवलं होतं.” मणी म्हणाला.

“आम्ही? कधी दिलं निमंत्रण? मुर्खांनो आम्ही त्याला कधी बोलावलं?” त्याने गोंधळून विचारलं.

“विसरला म्हातारा!” धनी मणीच्या कानाशी पुटपुटला.

“काय बोललास?”

“विसरलात का गुरुजी? तुम्ही त्या चिखलात पडला होतात….” मणी बोलत होता पण त्याला मध्येच तोडत आचार्य पुन्हा बोलू लागला; “मूर्ख! गप्प बस. काहीतरी बोलतोय.”

त्या दोघांना गप्प करून आचार्य थोडा पुढे आला आणि म्हणाला; “कोतवाल इथे ये! चोर हवाय ना तुला?”

“हो आचार्य!” कोतवाल म्हणाला.

“मग आता समज चोर मिळाला.” आचार्य टकलावर हात फिरवत म्हणाला.

“चोर! सापडला?” कोतवालने गोंधळून विचारलं.

“चला माझ्या सोबत.” आचार्य म्हणाला.

इथे रामाने तोवर त्याच्या कुटुंबीयांना देवळात आणलं होतं. बाहेरूनच दर्शन घेऊन तो त्यांना तिथेच थांबायला सांगत होता.

“तुम्ही सगळे इथेच थांबा मी राजा कृष्णदेवराय यांची भेट होते का बघून येतो म्हणजे आपली राहायची सोय होईल.” रामा म्हणाला.

अम्माने त्याला लवकर ये म्हणून खुणेने सांगितले.

“तल लामा मी पन येतो.” गुंडप्पा म्हणाला.

“कसा पुरुष आहेस तू गुंडपप्पा? तू दोन स्त्रियांना एकटा सोडून माझ्यासोबत येणार.” रामा म्हणाला.

“मी पुलुष? तिक ए तिक ए. मी इथेच तामतो यांता अंगलक्षक बनून.” गुंडप्पा म्हणाला.

“व्वा रे माझ्या पुलूष! मी येतो लगेच जाऊन.” रामा म्हणाला आणि निघू लागला तर शारदाने त्याला अडवले.

“शपथ घ्या लवकर परत याल आणि कोणत्याही अडचणीत अडकणार नाही अशी.” ती त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत म्हणाली.

रामाने शपथ घेतली आणि तो निघाला. बाजारात तो विविध वस्तू बघत बघत चौकशी करत चालला होता. त्याच्या मागावर आचार्य आणि बाकी सगळे होतेच.

“मी आत्ताच जाऊन त्याला पकडतो.” कोतवाल घाई करत म्हणाला.

“अरे थांब! जरा डोक्याने विचार कर. आत्ता जाऊन काय उपयोग? आधी पुरावा लागेल.” आचार्य म्हणाला.

त्याच्या बोलण्याने तो थांबला आणि सगळे रामाचा पाठलाग करू लागले. एका ठिकाणी या टोळक्याला एक माणूस काहीतरी गहाण ठेवून सोन्याच्या नाण्यांची पिशवी घेतना दिसला. त्याने ती पिशवी स्वतःच्या कमरेला लावली आणि तिथेच त्यांनी स्वतःचा कट शिजवला. कोतवाला बरोबर असलेल्या माणसाला म्हणजेच गोपण्णाला आचार्यने इशारा केला आणि तो माणूस जाऊन हळूच त्या माणसाची पिशवी चोरून घेऊन आला. रामा मात्र आता दरबाराच्या बाहेर पोहोचला होता आणि बाहेरून दरबार बघत होता.

“काय बघतोयस?” आचार्यने मागून येऊन विचारलं.

“हेच दरबारच इतका सुंदर आणि विशाल आहे तर इथले राजा कृष्णदेवराय यांचं व्यक्तिमत्त्व किती विशाल असेल.” रामा बोलून गेला.

“आणि विचार कसला करतोयस?” त्याने पुन्हा विचारलं.

“किती छान असेल आपल्या राजा कृष्णदेवराय यांच्या सोबत काम करणं, त्यांच्या दरबारात एक अष्टपैलू म्हणून राहणं.” रामा म्हणाला.

“मूर्ख पंडित! मागे वळून तर बघ. तुझं भविष्य आणि वर्तमान तुझ्या मागे आहे. तुझ्या सारखा मूर्ख पंडितच असे दिवा स्वप्न पाहू शकतो.” तो म्हणाला आणि रामाने मागे वळून पाहिलं.

आचार्यला पाहून त्याला धक्काच बसला. रामाला तो खरी खोटी सूनवत होता तोवर त्या माणसाने रामाच्या कंबरेला ती नाण्यांची पिशवी लटकवली होती. तिथे बाजारात चोरी झालेल्या माणसाने माझे पैसे चोरीला गेलेत म्हणून कांगावा केलाच होता.

“तुला मी सांगितलं होतं विजयनगरच्या धरतीवर पाऊल ठेवण्याची हिम्मत देखील करू नकोस नाहीतर तुझं असं स्वागत करेन की तुझ्या सात पिढ्या ते लक्षात ठेवतील.” तथाचार्य रागात म्हणाला.

रामा काहीही बोलत नव्हता आणि अचानक आचार्य म्हणाला; “हाच आहे तो चोर. कोतवाल हा राजगुरू सांगतोय याला अटक करा.”

“काय चोर? मी एक सामान्य पंडित आहे; चोर नाही.” रामाने गोंधळून म्हणाला.

राजगुरूचा आवाज ऐकून तिथे शिपाई देखील आलेलेच होते.

“तू एक चोर आहेस.” आचार्य म्हणाला.

“मला वाटलं नव्हतं आचार्य तुम्हाला माझा बदला घ्यायला हे असं काही करावं लागेल. तुमच्यापेक्षा चांगलं कोणालाच माहित नाहीये मी चोर नाही.” रामा शांतपणे म्हणाला.

“हातच्या कंकणाला आरसा कशाला?” कोतवाल म्हणाला आणि त्याने रामाच्या कंबरेवर असलेली पिशवी काढली.

रामा गोंधळून हे सर्व बघत होता. ज्याची ती पिशवी होती तो माणूस “ही माझीच पिशवी आहे. थोड्या वेळापूर्वी चोरीला गेली होती” असं सांगू लागला.

“पकडा या चोराला. हा तोच दुष्ट चोर आहे.” राजगुरू म्हणाला.

“धन्यवाद राजगुरू. आज तुमच्यामुळे हा चोर कायद्याच्या तावडीत सापडला.” कोतवाल म्हणाला.

“हो हो हा चोर आहे. आम्ही सर्व साक्षी आहोत.” सर्व जमलेले गावकरी त्याच्याकडे सापडलेली पिशवी बघून बोलू लागले.

“याला आत्ताच्या आत्ता बंदीवासात टाका. मी जाऊन महाराजांकडून याची शिक्षा निश्चित करून येतो.” आचार्य म्हणाला.

क्रमशः….

Credit:- Sony SAB “Tenali Rama serial”

🎭 Series Post

View all