शिक्षक विद्यार्थी आणि हद्दपार झालेली छडी.

विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते म्हणजे कच्च्या मातीला आकार देऊन मडके घडविणारा कुंभार.
शिक्षक,विद्यार्थी आणि हद्दपार झालेली छडी.
©®सौ.दिपमाला अहिरे.

"छडी लागे छम छम.. विद्या येई घम घम." बालपणी ऐकलेले आणि गायलेले हे गीत आता गायब झाले आहे.आंम्ही विद्यार्थी दशेत असतांना
गृहपाठ केला नाही,पाढे पाठ केले नाही, शाळेत दंगामस्ती केली की हातावर छमछम छड्या पडायच्या.हात अगदी लालबुंद होऊन जायचे. पण ते फक्त विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठीच असायचे. मुख्य म्हणजे त्यावेळी तर जे मास्तर मारकुटे तेच चांगले शिक्षक असे पालकही म्हणत असत. आणि गुरुजींने आणि बाईंनी केलेल्या या शिक्षेमुळे कधी विद्यार्थ्यांचे शाळेसाठी चे प्रेम कमी झालेले मला तरी आठवत नाही.
जे शिक्षक जास्त शिक्षा करत त्याच शिक्षकांचे आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेमही तेवढेच असायचे."छडी लागे छमछम विद्या येई घमघम " यावर पालक आणि समाजाचाही विश्वास होता.कालांतराने विद्यार्थ्यांना शिक्षा करणे हे शिक्षण विभागाने बंद केले.
आणि शाळेतुन छडी गायब झाली. छडी गायब झाल्याने विद्यार्थ्यांमधील शिक्षकांचा धाक कमी झाला आहे.

शिक्षकांना दुसरे पालक म्हटले जाते. चांगले व्यक्तिमत्व घडवणे, चांगले संस्कार करणे, शिस्तीत राहणे, योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. शिक्षक एकाच बागेत विविध रंगाचे फुल सजवणाऱ्या माळयाप्रमाणे असतो. आजही आपले प्राथमिक शिक्षक आठवतात. ज्यांनी आपल्याला घडवले .जीवनाला दिशा दिली, आपली जडणघडण केली.प्राथमिक शिक्षक ते पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षक आज देखील आठवतात. मनाला भावनिक स्पर्श करून जातात.
शिक्षक म्हणजे विशाल वृक्ष सारखे व्यक्तिमत्व असतात. त्यांच्याच छायेखाली सौख्य लाभते
मातीच्या गोळ्याला आकार देणारा कुंभार तर तो असतोच. तो समाजसुधारक ही असतो.
शिक्षकाला समर्थ तत्वज्ञान जपावी लागतात. उद्दिष्टेच्या वाटेवर त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार आणि फळ्याची ढाल असते पाठीशी.
पहिले विद्यार्थी व शिक्षक यांचं नातं वेगळं होतं. मनाला भावणारे होते.आजचा विद्यार्थी तसा राहिला नाही. कालच्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढे वैविध्य होते, तेवढेच वैविध्य आजच्या विद्यार्थ्यातही नाही. आजचा विद्यार्थी तंत्रज्ञानाद्वारे माहिती संपन्न झाला आहे .आजचे विद्यार्थी टेक्नोलॉजी वर डिपेंड आहेत. गुगल वरून ‘रेफरन्सेस’ चटकन शोधतात. पूर्वी काही माहिती मिळवायची असेल तर लायब्ररीत जावं लागायचं. पुस्तकं शोधावी लागायची. आता हीच माहिती ‘गुगल’वर लगेच मिळत असल्याने विद्यार्थ्यांना शिकवताना निव्वळ माहिती देऊन चालत नाही. माहितीच्या पलीकडे जाऊन शिकवण्याची खरी गरज आहे. त्यामुळे शिक्षकासमोरील आव्हान वाढले आहे
तंत्रयुगातही विद्यार्थ्यांना अगदी मुळापासून शिकवावं लागतं. विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, घरातील वातावरण आणि बुद्धिमत्ता आदि घटक विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. अतिशय स्मार्ट आहे. आजच्या विद्यार्थ्याला काहीही येत नाही. अशी विधाने देखील करता येत नाहीत.

या विद्यार्थ्यांना ज्ञानाची कक्षा रुंदावण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे. उथळ ज्ञानातून झालेले आकलन दूर करून विषय सुस्पष्ट करण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे. पारंपारिक शिक्षणाच्या चौकटी बाहेर जाऊन हे संस्कार करावे लागणार आहेत.
माहिती आणि ज्ञान यातील फरक उलगडून दाखवून विद्यार्थ्यांना ज्ञान संपन्न करण्याचे आव्हान आजच्या शिक्षकांसमोर आहे. शिक्षकाबद्दलची आदर युक्त भीती कमी झाली आहे. आता विद्यार्थ्याला शिस्त लावताना शिक्षकाची दमछाक होते. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी शाळेत शिक्षक छडी वापरत होते. त्या छडीच्या धाकाने विद्यार्थ्याला शिस्त लागे. अभ्यास करीत. शाळेतून छडी हद्दपार झाली. यांचे चांगले, वाईट परिणाम सध्या दिसत आहेत.
आपल्या मुलाने सर्वाधिक गुण मिळावेत, अशी पालकांची इच्छा असते. परंतु, त्यासाठी शिक्षकांनी मुलांना शिक्षा करायची नाही असेही पालकांना वाटते. पहिले पालकच शाळेत येऊन माझ्या मुलाला शिक्षा करा आणि त्याच्यात सुधारणा करा, असे सांगायचे. मात्र, आता हे चित्र राहिले नाही. आज विद्यार्थ्याला घडवताना शिक्षकाला आणि पालकांनाही कसरत करावी लागत आहे.
शिक्षकांनी मुलांना शिक्षा करणे सोडून दिले. विद्यार्थी बिनधास्त झाला. शिक्षकांचा जो पूर्वी आदर असायचा तो आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. विद्यार्थ्यां कडुन शिक्षकांना आदर, सन्मान आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षे बरोबरच प्रेम आणि काळजी मिळणे गरजेचे आहे.शिक्षकी पेशात पाय ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ज्ञानार्जन,विद्यार्थ्यांचे भविष्य आणि देशाचे नागरिक घडविण्याचा विडा उचललेला असतो.त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात शिक्षकांसाठी आदरयुक्त भिती असणे आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक शिक्षेतुन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थाने शिक्षक दिनाचे महत्त्व साध्य होईल असे मला वाटते...