चांदण्यांचा बहर - भाग १

प्रणयाच्या संकल्पनेची प्रेमगाथा
“किती सुंदर दिसतोय ना हा चांदण्यांचा बहर?”काव्या

“ हो,अगदी तुझ्यासारखा..” अधिक

“ म्हणजे?” काव्या

“ माझ्या भावना मी तुला अशा नाही सांगणार!”अधिक

“ मग?काय करणार आहेस?”अधिकच्या इशाऱ्याने उद्युक्त झालेली काव्या कामुक भावनेने म्हणाली.

बाल्कनीत उभा असलेला अधिक आत गेला आणि त्याने आपल्या कपाटातून एक वही काढली.त्यात त्याने स्वरचित अशा काही कथा,कविता लिहिलेल्या होत्या.एव्हाना उशीर झाल्याने सारेच झोपलेले होते.

मधुचंद्राच्या दिवशी आपली छंदबद्ध कविता बाल्कनीतच काव्यापुढे सादर करतांना अधिक चांगलाच भांबावलेला होता.तरीही धीर एकवटत आपली कविता त्याने काव्यापुढे वाचली,

“शीर्षक: चांदण्यांचा बहर

चांदण्यांचा बहर अन्
गंधाळलेली रजनी,
बाहूपाशांनी तुझ्या
घातली मज मोहिनी||१||

चांदण्यांचा बहर अन्
शीतल मधुर चंद्रमा,
देती साद प्रणयाची
आतुर जणू समागमा||२||

चांदण्यांचा बहर अन्
ऋतू प्रेमरंगाचा,
रंगवू आज यामिनी
आल्हाद खेळ कुंचल्यांचा||३||

चांदण्यांचा बहर अन्
एकांत हळूवार हा,
एक होऊ कायांपरी
हृदयाचा हुंकार हा||४||

चांदण्यांचा बहर अन्
भाळलेली मोहमाया,
प्रहर नूतन सजला
अलंकृत भासे काया||५||

चांदण्यांचा बहर अन्
उकललेले नाजूक बंध,
आज आपुल्या प्रीतीचा
दरवळू दे मृदगंध||६||

चांदण्यांचा बहर अन्
एक झालेल्या सावल्या,
स्पर्शाने उद्युक्त,मदमस्त
भावना या वेडावल्या||७||”

“ वाह! छान कविता केली आहेस तू!”काव्या

“ थँक्यू..”अधिक

अधिक आणि काव्या बाल्कनीतून आत गेले.

“कवितेच्या शेवटच्या कडव्यावरून आधी आपण मनाने एक व्हावे की शरीराने एक व्हावे? तुला काय वाटतं?” काव्या बिनधास्तपणे बोलली.

अधिक मात्र हलकेसे लाजून दुसरीकडे पाहू लागला.

“ अधिक,आपण नवरा बायको आहोत की नाही आता?मग आपल्यात या लाजरेबुजरेपणाला थारा का?”काव्या

“ माझी पहिलीच वेळ आहे ना म्हणून!”अधिक

“कविता सादर करण्याची की आणखी कशाची?”काव्या

“ काव्या? काहीही काय बोलतेस?ही माझी पहिली मधुचंद्राची रात्र आहे असे मी म्हणत होतो.”अधिक

“ अस्स!माझी कदाचित चौथी किंवा पाचवी असेल..”काव्या

“आ?..”अधिक

अधिकला हलकेच पाठमोरी आलिंगन देत काव्या म्हणाली,
“ मी तुला विचारलं काय आणि तू बोलतोयस काय..”

आता अधिक थोडासा बिनधास्त झाला.
काव्याचा हात हातात घेत,अगदी लडिवाळपणे हलकेच त्याने तिला आपल्यासमोर खेचले आणि आलिंगन दिले.

“खरं सांगू?मलाही तुला हेच विचारायचं होतं..”अधिक

“मग,आधी तू सांग.. ”काव्या त्याच्या मिठीतुन दूर होत म्हणाली.

“ मला काय वाटतं काव्या,प्रेमामध्ये प्रणय हा आधी विचारांचा व्हायला हवा आणि मग शरीराचा.”अधिक

“ अस्स..म्हणजे तुला म्हणायचं आहे की आधी विचार जुळायला हवेत एकमेकांचे..”काव्या

“हो,बरोबर..”अधिक

“ कमाल करतोस तू अधिक! आपलं लव्ह कम अरेंज मॅरेज आहे ना? म्हणजे आपण आधी एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मग आपलं लग्न अरेंज झालं..” काव्या

“अरे हो! पण डार्लिंग लग्नाच्या आधीची तू आणि लग्नानंतरची तू यात खुप फरक असू शकतो..”अधिक

(आपले केस आणि पोशाख नीट करत)
“ तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे मी खरंच छान दिसत नाही का आता?( आपला आवाज अचानक तीव्र करत आणि डोक्याला हात लावत) हे देवा,याच्याशी लग्न करून मला कुरूप का केलंस?”काव्या

“ अगं हो हो,किती हा कांगावा? शांततेत बोल ना जरा!”अधिक

“ म्हणजे? हे बरंय तुझं! मला नाव ठेवायचं आणि मी काही म्हणायला गेले की लगेच तुला कांगावा वाटतो!” काव्या

( काव्याला जवळ घेत)“ राणी…”अधिक

( लाजून हळूच मिठीत शिरत)“ ह..( मध्येच मिठीतुन स्वतःला विलग करत) “आता ही राणी कोण?”काव्या

“ अगं बाई तूच..तुलाच म्हणालो मी राणी!” अधिक

“ हा..मग चालेल!”काव्या

“ हेच सांगत होतो मी तुला..” अधिक

“ काय?”काव्या

“ अगं राणी ऐक.लग्न झाल्यावर आपल्या जबाबदाऱ्या वाढतात,त्यामुळे पदोपदी सामंजस्य दाखवायला लागते.जसे की आजारी पडल्यावर एकमेकांना समजून घेत काळजी घेणे,मूलबाळ झालं की त्याची काळजी दोघांनी मिळून घ्यायची,आपल्या दोघांच्याही आई वडिलांना आधार द्यायचा..”अधिक

“ काय घे अधिक? लग्नाच्या पहिल्याच रात्री तू मला कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील याचा पाढा वाचतोयस?हाच का तुझा परस्पर विचारांचा प्रणय?”काव्या

“ काव्या,प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस.म्हणजे मला असं म्हणायचं होतं मी लग्न म्हणजे पोरखेळ नसतो गं! त्यात नवरा आणि बायको दोन्हीही सारखेच गुंतलेले हवेत.मगच तुला ज्या आता मी जबाबदाऱ्या सांगितल्या ना,त्या व्यवस्थित पार पडतील.त्यामुळे कोणाचीही चिडचिड होणार नाही आणि संसार सुखाचा होईल.” अधिक

(अधिकचे गालगुच्चे धरत) “ माझ्या सोनुल्या, मोनुल्या इतकं सोपं असं घुमुन फिरवून का सांगितलंस? समजलं मला तुला काय म्हणायचे आहे ते!”काव्या

“अगं हे सोपं नाही.खरं सांगू? पहिल्यापासून मला लग्न म्हणजे एक बंधन वाटत आलंय! लग्नानंतर स्वैराचार नसतोच, असते ती फक्त कर्तव्यदक्षता..”अधिक

“अरे बाळा,एवढा अतिवीचार बरा नव्हे.हे बघ आधी तू एकटा होतास आता आपण दोघे आहोत,हाच तर मूळ फरक आहे लग्नाआधीचा आणि लग्नानंतरचा!”काव्या

काव्या आणि अधिक एकमेकांचे बोलणे गंभीरपणे घेत ही विचारांची प्रणयकथा रंगवू शकतील? यातून त्यांचं लग्नानंतरचं प्रेम फुलेल? पाहूया पुढील भागात…

🎭 Series Post

View all