चांदण्यांचा बहर - भाग २

प्रणयाच्या संकल्पनेची प्रेमगाथा
“ सॉरी काव्या,मी जरा गंभीर होऊन तुझ्यावर अविश्वास दाखवतो आहे असे कदाचित तुला वाटेल,पण राणी
मी ना या साऱ्याला खूप घाबरतो आहे गं!”अधिक

“ एवढंच होतं तर लग्न कशाला केलंस माझ्याशी? घाबरट कुठला!” काव्या अधिकला चिडूनच बोलली.

( काव्याच्या समोर बसत,चिंताग्रस्त होऊन) “हे काय गं? रागावलीस का तू माझ्यावर?” अधिक

“ नाही रे!आता तूच सांग मला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं कोणी बोलतं का बायकोशी? तू ना एकदम बोअर करतोयस् मला;म्हणून मग डोक्यात तिडीक
येते आहे.” काव्या

“ बरं बरं.. चल मी तुझा मूड ठीक करतो..” अधिक

“ आता काय करणार आहेस?” काव्या वैतागून म्हणाली.

अधिक बाल्कनीत गेला.त्याच्या मागोमाग काव्या देखील गेली.

“ ए तुला आपली प्रेमभेट आठवते?” अधिक चंद्राकडे नजर लावत म्हणाला.

“ म्हणजे? लग्नाआधी तर आपण रोजच प्रेमाने भेटायचो; म्हणजे प्रेम होतं म्हणून भेटायचो.बरोबर?”

" हो ग् पण मी आपल्या प्रपोज डे बद्दल बोलतोय!" अधिक

“ अच्छा! ते होय..हो मग!( शरमेने लाजत, अधिकला प्रतिसाद देत,हलकेसे स्मितहास्य करत)
प्रपोज डेच्या पर्वावर बागेत युगुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वलय मी व्हीलचेयरमध्ये बसून एकटीच निरखत बसलेली होती.मला मैदानी खेळ खेळताना पायाला अपघात झालेला होता तेव्हा.तू मला चक्क लपून बघत होतास.अनपेक्षितपणे तू तिथे आलास आणि मला म्हणालास,
'प्रेमरूपी किनाऱ्यावर गवसलेली हे जलपरी,आयुष्याच्या या अथांग समुद्रात माझ्यासोबत तू विहार करशील?'
माझ्या मनात घर करून गेलेल्या तुला हर्षोल्हासित होत मी क्षणात होकार दिला आणि आपली प्रेमाची गाथा तेव्हापासून सुरू झाली.अगदी नकळतपणे सर्व घडलं त्या दिवशी!"काव्या

"हो आणि आज हीच प्रेमगाथा एक वेगळं वळण घेत लग्नबंधनात गुंतली गेली आहे."अधिक

अधिकच्या मनात उसळून आलेले लग्न,बंधन,प्रेम,जबाबदाऱ्या,वैचारिक प्रणय या सर्व गोष्टींचे कंगोरे थांबवणे खूप गरजेचे होते; किंवा त्याला वेगळे वळण देणे गरजेचे होते,हे एव्हाना काव्याने ओळखले होते.त्यानुसार तिने चर्चा करण्यास सुरुवात केली.

" अधिक त्यावेळी तर मी व्हीलचेयरमध्ये होते; तरीही कशी आवडली होते तुला?"काव्या

" मी तुला पाहताक्षणी प्रेमात पडलो होतो म्हणून! मग मी काही मागचा पुढचा विचार केला नाही."अधिक

" अस्स! मग तू काय केलं पुढे?"काव्या

" कमाल करतेस काव्या! तुझा पाय आधी बरा करण्यासाठी योग्य फिजीओथेरपिस्ट शोधून ट्रीटमेंट घेतली.मग तू ओके झालीस." अधिक

" मी एकटी कधीच ओके होऊ शकले नसते अधिक.तू होतास म्हणून मी ठीक झाले.डॉक्टरांनी माझा पाय अधिकच नाजूक अवस्थेत गेल्याचे सांगितले आणि मला खूप रडू कोसळले होते पण तू मला धीर दिलास.माझ्याकडून नियमित फिजीओथेरपी करवून घेतलीस.त्या काळात कधीही माझा आत्मविश्वास डळमळीत होऊ दिला नाहीस."काव्या

" राणी ते माझं कर्तव्य होतं.तुला दुःखी पाहून मला खूप वाईट वाटायचे.यातून बाहेर काढून तुला तुझा निरोगी पाय आणि आत्मविश्वास मिळवून देणे हे माझ्या दृष्टीने खूप गरजेचे होते."अधिक

" अधिक इथेच तर आपल्या विचारांचा प्रणय पहिल्यांदा झाला होता." काव्या
अधिकने आश्चर्याने काव्याकडे पाहिले.

"त्यानंतर थोड्या दिवसांनी मी खूप आजारी पडलो होतो.शरीर अशक्त झाले होते तसेच जेवण देखील जात नव्हते.त्यावेळी तू मला रोज तुझ्या हातांनी जेवण भरवले होते.आई असतानाही तुझ्या हातचे जेवण जणू माझ्यासाठी अमृत ठरले होते आणि त्याचाच सार्थ परिणाम म्हणून मी पूर्ववत निरोगी झालो."अधिक झपाटल्यागत बोलत होता.

"माझी आई आजारी पडली होती तेव्हा माझे संपूर्ण घर सैरभैर झाले होते.माझ्या संपूर्ण घराची आणि विशेषतः माझ्या मानसिक स्वास्थ्याची विस्कटलेली घडी कोणी सावरली?तू,अधिक तू!"काव्या

इतका वेळ अनाकलनीय असणारे अधिकच्या मनातील विचारांचे काहूर आता हळूहळू शांत होत चालले होते.

" मी फॉरेन टूरला असताना,कोरोना काळात माझ्या आई-वडिलांची आणि सोबतच स्वतःच्या घराची संपूर्ण काळजी यशस्वीपणे तूच घेतली होतीस काव्या!"अधिक

" माझा भाऊ यश,अचानक शाळेतून बेपत्ता झालेला असताना खंडणी मागणाऱ्या गुंडांना पोलिसांच्या मदतीने पोलिसी खाक्या दाखवणारा तूच होतास रे माझ्या पठ्ठ्या!"काव्या अधिकची पाठ थोपटत म्हणाली.

" माझी पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय बिझनेस डील फायनल करताना मी खूप नर्व्हस फील करत होतो.त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवून,मला हिंमत देऊन उभारी देणारी तूच होतीस काव्या!"अधिक

जणू काही रात्रीचा चांदण्यांचा बहर साक्ष म्हणून काव्या आणि अधिकची चर्चा टिपून घेत होता कारण रात्रीचा सुंदर प्रहर संपता संपत नव्हता आणि अधिक व काव्याचा वैचारिक प्रणय आता खऱ्या अर्थाने बहरत चालला होता.खरंच प्रणय ही भावना केवळ शरीराशी निगडित हवी की विचारांशीसुद्धा? प्रश्न अनाकलनीय किंवा थट्टा वाटत असला तरीही अधिकच्या लेखी त्याच्या आजच्या मधुचंद्राच्या रात्री खूप महत्वाचा होता.मग? अधिक आणि काव्या करू शकतील या गुंत्याची उकल? त्यांचे प्रेम लग्नानंतरही असेच निरंतर राहील? पाहूया पुढील भागात..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all