चांदण्यांचा बहर-भाग ३(अंतिम)

प्रणयाच्या संकल्पनेची प्रेमगाथा
" ऑफिसमध्ये माझ्याकडे पहिल्यांदाच एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट सोपवण्यात आला होता त्यावेळी किती घाबरले होते मी!वाटलं होतं एक जरी चूक झाली तर गेलं सगळं आपलं ऑफिसमधील प्रेस्टिज!त्यावेळी बॉसने देखील खूप दबाव आणला होता कामाचा! त्या प्रचंड मानसिक स्ट्रेसच्या परिस्थितीत तूच मला सावरलंस अधिक..तू दिलेली हिंमत मला हा प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी जणू काही एक उमेदीचा प्याला ठरली आणि मी हा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला."काव्या अधिकचा हात हातात घेत म्हणाली.

" आणि त्या मोनाच्या जाळ्यातून सुखरूपपणे तूच सोडवलेस राणी मला.कसली हात धुवून मागे लागली होती ती माझ्या!जगणं कठीण होऊन बसलं होतं,वाटलं होतं संपलं आता सगळं पण तू तिला छान धडा शिकवला आणि तिच्या धमकी वजा आर्जवांना वेळीच लगाम बसला."अधिक भरभरून बोलला.

" त्या दिवशी ऑफिसमधून घरी निघताना ती गुंड टोळी माझ्या पाठीमागे लागली अन् माझ्या काळजात धस्स झाले.माझी अब्रू वाचवण्यासाठी मी मनातून तुला साद दिली आणि काय आश्चर्य! तू अचानक तिथे आलास आणि मी त्या गुंडांच्या तावडीतून सुटले.तो प्रसंग खरंच अंगावर शहारे आणणारा होता.त्या दिवशी केवळ तुझ्यामुळे मी वाचले. खुप खुप थँक्यू अधिक." काव्या

" अगं थँक्यू काय त्यात? तू माझी बायको कम प्रेयसी आहेस.माझी अत्यंत प्रिय व्यक्ती.मग मी असा कसा तुला संकटात सोडेल? तू कुठेही असली तरीही तुझ्या फक्त एका हाकेवर मी तिथे प्रकट होईल आणि तुला सुखरूप घरी घेऊन जाईन."अधिक

" खरंच?इतका कॉन्फिडन्स?" काव्या

" मग ! खरं सांगू का काव्या? तू मला खूप आवडतेस. आय लव्ह यू.." अधिक काव्याला जवळ घेत डोक्याचे चुंबन घेत म्हणाला.

" ए, ए.. एक मिनिट.आता का घाई करतोयस?"काव्या

" कसली?" अधिक

" शारीरिक प्रणयाची!"काव्या

" कारण या सर्व चर्चेतून मला असं समजलं आहे की आपण मनाने एक झालेलो आहोत,आपला वैचारिक प्रणय या सर्वांतून केव्हाच तावून सुलाखून निघाला आहे. आपल्या लग्नानंतरच्या संसारात देखील तू मला अशीच साथ देशील यावर आता मला पूर्ण विश्वास बसला आहे.आता नको दूर राहू,ये अशी जवळी.."अधिक

" अच्छा! हे बरं आहे,तुझं!तुला वाटलं तेव्हा तू मला जज करत आलास,त्यावर मी खरी उतरले आणि म्हणून आता थेट प्रणयाची भाषा करतोयस ?"काव्या

" म्हणजे? काव्या मला खरंच माफ कर.मी ना तुला ओळखायला कमी पडलो होतो त्यामुळे मी असे बोललो आणि ही सारी चर्चा घडली.." अधिक शरमुन म्हणाला

" नाही,म्हणजे सुरुवात तर मीच केली होती पण चर्चेला तू वेगळे वळण दिलेस.अविश्वासाचे!मी तुला आता माफ करणार नाही.तूझ्या चुकीची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच!माझीही एक परीक्षा तुला द्यावी लागेल." काव्या

अधिक चिंताग्रस्त झाला.
" परीक्षा?"अधिक

" हो." काव्या

" कुठली?" अधिक

" प्रेमाची परिभाषा सांगण्याची!" काव्या

" मग आता काय चर्चा केली आपण?" अधिक

" त्यात केवळ समर्पण होतं, त्यापोटी असलेली काळजी होती." काव्या

" बरं.तर मग ऐक,प्रेम म्हणजे काय असतं? समर्पण, आपुलकी, जिव्हाळा यांसोबत, यांच्याही पलीकडे जाऊन जोडीदाराचा आदर,सन्मान करत या आयुष्याच्या डावात जोडीदारासोबत मांडलेला एक दिमाखदार आनंदाचा झोपाळाच नाही का?" अधिक

" हम्म..अजून?" काव्या अधिककडे डोळे भरून पाहत म्हणाली.

" प्रेम म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन नव्हे तर दोन आत्म्यांचे एकमेकांप्रती असलेली एक निरागस ओढ,एकमेकांप्रती असलेलं एक पवित्र अढळ असे स्थान.प्रेम म्हणजे मोहमाया,प्रेम म्हणजे चैतन्य,प्रेम म्हणजे उत्साह,प्रेम म्हणजे खळाळता झरा,प्रेम म्हणजे आशा,प्रेम म्हणजे एक पालवी,प्रेम म्हणजे दोन जीवांचा संगम,प्रेम म्हणजे.."अधिक

" थांब,थांब..आता मीही सांगते. प्रेम म्हणजे निरपेक्ष कर्तव्य,निरपेक्ष जबाबदारी." काव्या अधिकला बिलगत म्हणाली.

" हो,काव्या हो. माझ्या प्रेमाच्या परिभाषेत तू आज कणाकणाने निखरून निघाली आहेस.त्यामुळे मला आता तू हवी आहेस." अधिक काव्याला आपल्या बाहूपाशांमध्ये घट्ट आवळत म्हणाला.

" बरं असे काय,ठीक आहे. मलाही आता तूच हवा आहेस कारण तू माझ्या परीक्षेत अव्वल स्थानी आला आहेस."काव्या देखील त्याला प्रतिसाद देत म्हणाली.

दोघेही एकमेकांच्या मिठीत सुखावले होते.

" ए,तू एक नोटीस केलं का?" काव्या अधिकच्या मिठीतुन स्वतःला विलग करत म्हणाली.

" काय?" अधिक

काव्या खुश होऊन नभाकडे,वर पाहू लागली.

" काय काव्या?सांग ना पटकन?" अधिक वैतागत म्हणाला.

" हे बघ,हा चांदण्याचा बहर अजून तसूभर देखील कमी झालेला नाही.."काव्या

" हो कारण त्यांना साक्ष ठेवायची होती." अधिक

" कसली साक्ष?" काव्या.

"आपल्या वैचारिक प्रणयाची.." अधिक

" ओह! बरं मग या साक्षीदारावर एखादी चारोळी होऊन जाऊ दे!" काव्या

" बरं.तुझी फर्माईश आहे म्हणून बरं! मग त्यानंतर?" अधिक उतावीळ होत म्हणाला.

" त्यानंतर तू जे म्हणशील ते मी करेन."काव्या लाडिक स्वरात म्हणाली.

" बरं.तर मग ऐक,

चांदण्याचा बहर देई साक्ष
तुझ्या माझ्या निखळ प्रेमाची,
सौंदर्याची खाण तू हृदयस्वामीनी
होशील राणी माझ्या संसाराची?"

अधिक काव्याला गुलाबपुष्प देत प्रपोज करत म्हणाला.

क्षणात काव्याने होकार दिला आणि दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन आत गेले.

अशा रीतीने काव्या आणि अधिकला,त्यांच्या मधुचंद्राच्या रात्री,वैचारिक आणि शारीरिक प्रणयाची स्वर्गीय अनुभूती मिळाली.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे




🎭 Series Post

View all