Login

शिवबाच्या राज्यात भाग १

शिवकालीन कथा
शिवबाच्या राज्यात
भाग १ : स्वराज्याची भाषा
स्पर्धा

“तलवारी स्वराज्य जिंकतात… पण भाषा स्वराज्य टिकवते.”

राजगडाच्या दरबारात सकाळचा दरवळ दरवळत होता. सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान होते. दरबारात मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, रामचंद्रपंत अमात्य यांसारखे सरदार उपस्थित होते.
महाराजांनी आजचा दरबार विशेष कारणासाठी भरवला होता.
“आपल्या स्वराज्याचा कारभार परकीय भाषेत का चालावा?” महाराजांचा आवाज दरबारात घुमला.
मोरोपंत नम्रपणे म्हणाले,
“महाराज, मुघल दरबाराची पद्धत असल्याने फारशी भाषेचा वापर होतो.”
महाराजांनी ठाम स्वरात उत्तर दिले,
“स्वराज्य परकीय पद्धतीवर चालणार नाही. राज्यकारभार जनतेला समजला पाहिजे. म्हणून पुढे सर्व आज्ञापत्रे मराठीत लिहिली जातील.”
दरबारात कुजबुज सुरू झाली.


शिवबाच्या राज्यकारभारात भाषा आणि साहित्य यांना मोठे महत्त्व होते. स्वराज्य उभे करताना शिवबांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत, तर लोकांच्या मनांवरही अधिराज्य गाजवले. त्या काळात दरबारातील प्रत्येक व्यवहार शक्य तितका मराठीत व्हावा, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे सामान्य प्रजेलाही शासनाची भाषा समजू लागली आणि स्वराज्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली.
गोविंद दरबारात उभा राहून हे सगळे निरीक्षण करत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. तो विद्वान कुटुंबातून आलेला असल्यामुळे त्याला संस्कृत आणि फारसी दोन्ही भाषांचे ज्ञान होते. पण शिवबांच्या राज्यात मराठीला मिळणारे स्थान पाहून तो प्रभावित झाला होता. दरबारात कवी, इतिहासकार आणि विद्वान यांचा सन्मान केला जात होता. युद्ध जितके महत्त्वाचे होते, तितकेच ज्ञानाचे शस्त्रही महत्त्वाचे मानले जात होते.
दरबारात बसलेल्या सरदारांमध्ये साहित्याविषयी चर्चा सुरू झाली होती. त्या वेळी शिवबा म्हणाले,

“स्वराज्य टिकवायचं असेल तर तलवारीसोबत लेखणीही सक्षम असली पाहिजे.” त्यांच्या या वाक्याने गोविंद भारावून गेला. त्याला जाणवले की हे राज्य केवळ युद्धकौशल्यावर नव्हे तर संस्कृती आणि ज्ञानावर उभे आहे.
गोविंदने नम्रपणे पुढे येत शिवबांना वंदन केले आणि म्हणाला,

“महाराज, मला फारशी भाषेत लेखन अवगत आहे. पण मराठीत लेखन करण्याचा सराव कमी आहे.महाराज, मला स्वराज्याच्या इतिहासाची नोंद शब्दांत करायची आहे. पुढील पिढ्यांना हे वैभव कळावे, ही माझी इच्छा आहे.”
शिवबा स्मितहास्य करत म्हणाले, “इतिहास लिहिणं म्हणजे केवळ घटना नोंदवणं नव्हे, तर स्वराज्याची आत्मा जपणं आहे. जर तू हे कार्य प्रामाणिकपणे केलंस, तर ते स्वराज्याला बळ देईल.”
शिवबांच्या या शब्दांनी गोविंदच्या आयुष्याला नवे ध्येय मिळाले. त्याला कळले की स्वराज्याचा खरा वारसा तलवारीत नाही, तर संस्कृती, भाषा आणि इतिहासाच्या जतनात आहे. आणि याच ध्येयाने त्याच्या जीवनाचा नवा प्रवास सुरू झाला.
महाराजांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले.
“गोविंदा, स्वराज्य म्हणजे जनतेचा अधिकार. भाषा त्यांचा श्वास आहे. प्रयत्न कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.”
गोविंदने नम्रपणे मस्तक झुकवले.
त्या क्षणी त्याच्या आयुष्याला नवे ध्येय मिळाले होते.
संध्याकाळी तो राजगडाच्या तटावर उभा राहून गावांकडे पाहत होता. शेतात कष्ट करणारे शेतकरी, कीर्तन करणारे वारकरी आणि ओव्या म्हणणाऱ्या स्त्रिया त्याला दिसत होत्या.
“हीच खरी स्वराज्याची भाषा,” तो स्वतःशी पुटपुटला.
पण स्वराज्याची भाषा रुजवण्याचा प्र जरवास सोपा नव्हता…

ऐतिहासिक नोंद
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनात मराठी भाषेला महत्त्व दिले. राजव्यवहार कोश (रामचंद्रपंत अमात्य यांच्या कार्याशी संबंधित ग्रंथ) हा प्रशासनासाठी मराठी शब्दसंपदा विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न मानला जातो.
—----------------------------------
©® मीनाक्षी वैद्य

0

🎭 Series Post

View all