शिवाजी महाराज भाषण

शिवाजी महाराज भाषण
भाषण क्रमांक 1

व्यासपीठावर बसलेले आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती त्या निमित्ताने मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती.

“ सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला
भगवा टीका चंदनाचा शिवनेरी वर प्रगटला
हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला
महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला”

19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण याच दिवशी पुणे जिह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जिजामाता यांच्या पोटी जन्म झाला. शिवाजी महाराजांची आई जिजामाता तर वडील शहाजीराजे भोसले होते. त्यांचे नाव जिजामाता यांनी शिवनेरी गडावर असलेल्या शिवाई देवीवरून शिवाजी असे ठेवले होते.

शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिचे होते. त्यांची जडण घडण जिजाऊंनी अत्यंत चांगल्या प्रकारे केली. त्यांना शौर्याचा वारसा वडील शहाजी राजांकडून मिळाला होता. जिजामाता बाल शिवाजींना घेऊन पुणे जिह्यातील त्यांच्या जहागीरी सांभाळत. तेंव्हा बाल शिवरायांनी दादोजी कोंडदेव यांच्याकडून युद्धकलेचे धडे गिरवले. मराठी लोकांवर होणारा अन्याय आणि अत्याचार पाहतच शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले त्यांच्या मनात लहानपणापासून मुघल सत्ते विरुद्ध आग धगधगत होती. त्यांना स्वराज्य स्थापन करायचे होते आणि त्यांनी 26 एप्रिल 1645 रोजी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी सह्याद्री पर्वत रांगेत असलेल्या भोर येथील स्वयंभू रायरेश्वराच्या मंदिरात त्यांच्या अवघ्या बारा सवंगड्या/मावळ्यांबरोबर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

इतक्या कमी वयात पाहिलेले हे स्वराज्य स्थापनेचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केले. कधी बुद्धीचा, कधी शौर्याचा तर कधी गनिमी काव्याचा वापर करून त्यांनी एक एक गड-किल्ले काबीज करत स्वराज्याची मोट बांधली त्यासाठी अनेक मावळे आणि सरदारांनी त्यांना साथ दिली.

स्वराज्य निर्मिती करणे तशी सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरीचा अंधकार होता. आणि समोर बलाढ्य शत्रू त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे,मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, कोंडाजी फर्जंद अशा अनेक शूरवीरांची महाराजांना साथ लाभली.

शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्यासमोर असलेल्या बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजलखान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंना धूळ चारली. जिजामातानी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न महाराजांनी सत्यात उतरवले. शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रूंचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढ्या दिवस अंधारात असलेल्या रयतेच्या आयुष्याला प्रकाशमान केले.

6 जून 1674 रोजी रायगडावर राजा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज झाले. आणि सुमारे साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या अन्यायाने ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी, न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपात मिळाला.

शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता.मुस्लिम राज्यकर्त्यांच्या अन्यायकारक राजवटी विरुद्ध होता.तरी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्वधर्म समभाव होता.

शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. राजांच्या स्वराज्यात स्त्रियांना आदर आणि सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधूसंतांचा आदर होता. आणि शिव छत्रपती आपले राजे आहेत याचा अभिमान होता.छत्रपती शिवाजी महाराज नुसते राजे नव्हते तर नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे ते एक शिल्पकार होते.

“ राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न झाला
गर्व ज्याच्या असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवबा झाला”

जय भवानी! जय शिवाजी!

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद! छत्रपती शिवाजी महाराज की जय!
★★★

भाषण क्रमांक 2

सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो आज महाराष्ट्रातील एका महान व्यक्तिमत्त्व आणि स्वराज्याचे संस्थापक आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे.

छत्रपती शिवाजी राजा

असा एकच होऊन गेला

इतिहासाच्या पानांमध्ये

नाव आपले कोरून गेला.

शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे शिवाजी हे नाव किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून ठेवले होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते.

त्याकाळात महाराष्ट्रातील रयत मुघल राज्यकर्त्यांच्या जुलूमांनी गांजली होती. तेंव्हा स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य सारख्या बलाढ्य शत्रूला लढा दिला.मराठी लोकांवर होणारा अन्याय आणि अत्याचार पाहताच शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले त्यांच्या मनात लहानपणापासून मुघल सत्ते विरुद्ध आग धगधगत होती.त्यांना स्वराज्य स्थापन करायचे होते आणि त्यांनी 26 एप्रिल 1645 रोजी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी सह्याद्री पर्वत रांगेत असलेल्या भोर येथील स्वयंभू रायरेश्वराच्या मंदिरात त्यांच्या अवघ्या बारा सवंगड्या/मावळ्यांबरोबर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.


6 जून 1674 रोजी आपल्या राजा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज झाले. आणि सुमारे साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या अन्यायाने ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी, न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपात मिळाला.

“शब्दही पडले अपुरे

अशी शिवरायांची कीर्ती

राजा शोभून दिसते जगती

अवघ्या जगाचा शिव छत्रपती”

अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य, साहस जनतेविषयी भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात.

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर

मातीच्या कणावर आन विश्वासाच्या प्रमाणावर

राज्य करणारा राजा म्हणजे

राजा शिवछत्रपती

अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम!

जय शिवाजी! जय भवानी!