Login

शिवांगी (एक प्रेमकथा)

विकलांग मुलीची प्रेमगाथा (तिच्याच शब्दांत..)
शिवांगी (एक प्रेमकथा)


प्रपोज डेच्या पर्वावर बागेत युगुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वलय ती अपंग मुलगी एकटीच निरखत बसलेली होती.
तो तिला लपून बघत होता.अचानक तिच्यासमोर येऊन तो म्हणाला,
“ प्रेमरूपी किनाऱ्यावर गवसलेली हे जलपरी,आयुष्याच्या या अथांग समुद्रात माझ्यासोबत तू विहार करशील?”
तिच्या मनात घर करून गेलेल्या त्याला हर्षोल्हासित होत तिने क्षणात होकार दिला.

आज एवढ्या वर्षांनंतर ती मीच होते यावर माझाच विश्वास बसत नाहीये..खरंच!तो दिवस माझ्यासाठी फार मोठा होता म्हणूनच तो मी कधीही विसरू शकणार नाही.खरं सांगू? माझं भाग्य असं एकाएकी बदलणारा तो होता.प्रकाश..देवाने माझ्यासाठी पाठवलेला माझ्या स्वप्नातील देखणा राजकुमार.परंतु माझ्या पदरात हे सौभाग्य मिळण्याआधी मी एक अभागी मुलगी म्हणून जन्माला आले होते.

“ काय उपयोग या मुलीचा? कोण करेल हिच्याशी लग्न? आमचं आयुष्य हिच्यासाठी झुरवायचं आम्ही?”
पप्पा आजोबांना मोठ्या आवाजात बोलले. पप्पांच्या या शब्दांनी आई मात्र पुरती हादरून गेली.
पदरात पडलेलं पहिलवहिलं मातृत्व साजरं करावं की शाप म्हणून त्याचं दुःख करावं हेच तिला समजत नव्हतं कारण तिच्या पोटी एक विकलांग मुलगी जन्मलेली होती.त्या मातेच्या बाजूला त्या मऊसर गोधडीच्या बाजेवर एवढ्या गोंगाटातही अत्यंत शांत पहुडलेली तान्हुली मी माझ्याबद्दलच चाललेल्या या गदारोळाला संपूर्णपणे अनभिज्ञ होते.पण म्हणतात ना,कोणाचे नशिबाचे पासे कसे पलटतील हे सांगता येत नाही.तसेच काहीसे माझे झाले,जेव्हा मला प्रकाश भेटला.

प्रकाश,आमच्या शेजारीच राहायचा.त्याची बहिण देखील माझ्यासारखीच विकलांग होती.तिची अवस्था माझ्यापेक्षा बिकट होती.तिच्याकडे बघून वडिलांचे माझ्याबद्दल असणारे खोचक बोलणे हळूहळू बंद झाले.
माझ्याविषयी अचानक त्यांना दया वाटू लागली.
आईला आपले लेकरू कसेही असले तरीही अत्यंत प्रिय असते,हेच मला माझ्या आईच्या सान्निध्यातून कायम जाणवत गेले.तिने आजवर हवे नको ते माझे सगळे केले.अगदी पाळीतील त्या दिवसांत पॅड बदलण्यापासून ते हाताने एक एक घास जेवू घालण्यापर्यंत अगदी सगळं म्हणजे सगळं..

प्रकाश माझ्याशी खेळायला म्हणून त्याच्या बहिणीला, स्नेहाला व्हीलचेअरवर घेऊन कधी कधी यायचा कारण त्याच्याही आई वडिलांना समदुःखी म्हणून आमच्या घराविषयी करुणा वाटत असे.एवढीच काय ती माझी आणि त्याची सुरुवातीची भेट व्हायची.पुढे मला माझ्या आईवडिलांनी विशेष मुलांच्या शाळेत टाकले आणि मी वेगवेगळ्या गोष्टी शिकू लागले.

हातांनी कागदावर पानांचे वाकडेतिकडे ठसे उमटवणे मला मजेशीर खेळ वाटू लागला.आम्हा विशेष मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळेतील शिक्षक आमच्यावर मेहनत घेत होते.शाळेतून घरी आल्यावर देखील मी अशा अनेक ॲक्टिव्हिटी करत असे. माझ्यातील जिद्द आणि चिकाटी पाहून प्रकाश थक्क होऊन जायचा.तो त्याच्या लहान बहिणीला देखील यातील काही गोष्टी माझ्यासोबत बसून शिकवू लागला.

कालांतराने त्याच्या बहिणीची अवस्था बिघडत गेली आणि एक दिवस ती गतप्राण झाली.प्रकाशवर दुःखाचा डोंगर कोसळला.त्या दिवशी तो खूप वेळ शांतच होता.कदाचित त्याला त्या दिवशी खूप रडायचे होते पण अश्रुंच्या कोंडीची कडी त्याने त्या विधात्याच्या हाती सोपवली होती त्यामुळे केविलवाणा देह घेऊन तो फक्त उभा होता.तेवढ्यात माझ्या आईवडिलांसोबत मी तिथे आले आणि तो मला पाहून तो ओक्साबोक्सी रडू लागला.माझी आणि त्याची तार विधात्याने तेव्हाच पक्की केली असावी.

पुढे दिवस भराभर जात होते.बहिणीच्या आठवणीत दुःखी होऊन प्रकाश आजारी पडू लागला.माझी आणि प्रकाशची मैत्रीच आता त्याची अवस्था सुधारू शकेल असे त्याच्या आईवडिलांना वाटले.तो माझ्यासोबत खेळायला,अँक्टिव्हिटी करायला येऊ लागला.त्याचे मन रमू लागले.

शिक्षण पूर्ण होताच त्याला शहरातून नोकरीचा कॉल आला.तो मला न भेटताच निघून गेला.मला फार वाईट वाटले.गरज होती तोवर मैत्री केली आणि असे एकाएकी माझ्यापासून लांब जाऊन काहीही कॉन्टॅक्ट न ठेवणे हे त्याचे वागणे पाहून मी व्यथित झाले. त्यावेळी पहिल्यांदाच मला माझ्या विकलांगतेची खूप घृणा वाटली.शेवटी मला माझे अस्तित्व असेच स्वीकारावे लागेल याची मला तीव्र जाणीव झाली.

प्रकाश घरी आला तरीही मला भेटायला येत नसे.प्रपोज डे आला आणि माझी बागेत जाण्याची इच्छा झाली.बाबा मला बागेत,त्या निवांत जागेत सोडून जरा वेळ काही कामासाठी म्हणून निघून गेले आणि तेवढ्यात प्रकाशने मला विहंगम दृश्य वाटावे तसे प्रपोज केले.अशी माझी प्रेमकथा सुफळसंपूर्ण..

तुमचीच,
शिवांगी..