रात्रीचा प्रहर चालू होता. दिवाळीचे दिवस होते. रायगड दिव्यांनी सजला होता. छत्रपती शंभूराजे मात्र अस्वस्थ होते. सूर्यासम तेजस्वी मुखचंद्रमा , धिप्पाड देहयष्टी , कपाळावर शिवगंध , मस्तकावर जिरेटोप , गळ्यात कवड्यांची माळ असे ते रूप होते. त्यांचे क्षात्रतेज ते काय वर्णावे ? जणू कैलासावरचा महादेव खलनिर्दालन करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहे असेच भासत. तेवढ्यात महाराणी येसूबाईंनी कक्षात प्रवेश केला. त्यांनी नारंगी रंगाची साडी घातली होती. अंगावर बरीच आभूषणे होती.
" महाराज , आपल्यासाठी दूध आणले आहे. " येसूबाई म्हणाल्या.
महाराजांच्या कानापर्यंत तो स्वर पोहोचला नाही.
" महाराज , कोणत्या विचारात हरवले आहात ?" येसूबाईंनी विचारले.
" येसू , दिवाळी आली की आम्हाला राणूअक्काची फार फार आठवण येते. "
" आम्ही समजू शकतो. दिलेरखानाच्या छावणीतून तुम्ही सुटून आलात. परंतु राणूबाई आणि राणी दुर्गाबाई तिथेच अडकल्या. त्यांना कैद झाली. "
" आमच्या मातोश्री सईबाईसाहेब आम्ही लहान असतानाच देवाघरी गेल्या. पण जाताना त्यांची सावली सोडून गेल्या. राणूअक्का म्हणजे मातोश्रींची सावली. दुसऱ्या आईच आमच्या. खूप जीव होता त्यांचा आमच्यावर. त्या दिसल्या नाहीत तर आम्ही कासावीस व्हायचो. एकदा आम्ही लहानपणी घोडेस्वारीचा हट्ट धरला तेव्हा अक्कासाहेब आमच्यासाठी घोडा बनल्या होत्या. दिवाळीच्या दिवसात त्या पहाटे उठून आम्हाला प्रेमाने उटणे लावायच्या. अभ्यंगस्नान घालायच्या. भाऊबीजेला ओवळत. कधी मातोश्रीना नाही बघितले पण अक्कासाहेबांच्या मुखचंद्रमेत आम्हाला मातोश्रीच गवसल्या. दिलेरखानाच्या छावणीतही त्यांनी कधीच आम्हाला एकटेपणा जाणवू दिला नाही. सतत आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहील्या. आम्हाला आवडायचे म्हणून पुरणपोळी बनवायच्या. खूप काळजी घ्यायच्या आमची. आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना सोडवायचे पण अपयशी ठरलो. कधी कधी भाऊ म्हणून घ्यायचीही लाज वाटते. " शंभूराजे म्हणाले.
शंभूराजांचे तेजस्वी नेत्रे पाणावली. येसूबाईंच्याही नेत्रातून आसवे गळू लागली. तरीही धीर धरून त्यांनी छत्रपतींच्या हातावर हात ठेवला.
" महाराजांनी धीर धरावा. राणूअक्का लवकरच रायगडावर असतील. आपल्या समोर. भाऊबीज दिवशी आपली ओवाळणी करतील आणि नारळी पौर्णिमेला राखीही बांधतील. अजून भोसले घराण्याची पुण्याई संपली नाही. " येसूबाई महाराजांना म्हणाल्या.
***
दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी दरबारातील कामे लवकरच आटोपली. रयतेत निर्माण झालेले काही तंटे सोडवले. काही इनाम सरकारतर्फे मंजूर केले गेले. नंतर दुपारच्या प्रहरी ते आपल्या महालात आले. अस्वस्थ होऊन इकडेतिकडे फेऱ्या मारू लागले. नंतर स्वतःच बैठकीवर विराजमान झाले. नंतर एक सेवक मुजरा करत आत आला. त्याच्या हातात खलिता होता. महाराज त्या सेवकाजवळ लहान बालकासम पळाले. हातातला खलिता घेतला. मजकूर वाचताच नेत्रातील खारट अश्रू खलित्यावर पडले. गिरजोजी यादव यांनाही अपयश आले. इतक्यांदा राणूअक्कासाहेब आणि राणी दुर्गाबाई यांना सोडवण्याचे वारंवार प्रयत्न करूनही पुन्हा पुन्हा अपयश येत होते. नगरचा किल्ला , दौलताबाद आणि आता कबिल्याची रवानगी बहादूरगडावर होणार होती. महाराजांच्या मनात विचारांचे काहूर माजले. त्यांनी एकांत मागितला. जिरेटोप बैठकीवर ठेवली आणि ते कोसळले.
" अक्कासाहेब , धिक्कार असो या भावाचा जो आपल्या बहिणीला सोडवू शकला नाही. " महाराज रडू लागले.
" बाळमहाराज. " एक आवाज घुमू लागला.
महाराजांनी मुख वर करून पाहिले तर समोर राणूबाई उभ्या होत्या.
" अक्कासाहेब तुम्ही. " महाराजांच्या मुखावर हास्य उमटले आणि नेत्रातून आनंदाश्रू गळत होती.
राणूबाई महाराजांच्या जवळ आल्या. त्यांनी महाराजांची आसवे पुसली. डोक्यावरून मायेने हात फिरवला.
" छत्रपतींना आसवे नसतात. छत्रपतींनी रयतेची आसवे पुसायची असतात आणि शत्रूंची काढायची असतात. भूतकाळ आपल्या हातात नाही. पण वर्तमान आणि भविष्य हातात आहे. आमची काळजी करू नका. आम्ही शिवकन्या आहोत. आमच्या केसांनाही धक्का लावायची कुणाची हिंमत नाही. आम्हाला तुमची दुर्बलता नाही तर सामर्थ्य बनायचे आहे. एक राणूबाई कैदेत आहे परंतु लाखो गोरगरीब स्त्रिया मुघलांच्या जनान्यात जाण्यापासून वाचवा. औरंग्या आपल्या भूमीच्या , संस्कृतीच्या मुळावर उठलाय. त्याला संपवा. राष्ट्रात चहुबाजूंनी मंदिरे तोडली जाताय. आपली अस्मिता , संस्कृती पायदळी तुडवली जात आहे. या काळ्याकुट्ट कालखंडात देशात एकच दिवा तेवत आहे तो म्हणजे स्वराज्याचा. तुम्ही या स्वराज्याचे छत्रपती. उठा बाळमहाराज. ही वेळ शोक करण्याची नाही. तुम्ही शूर आबासाहेबांचे शूर छावे आहात. गर्जना करा. स्वराज्याच्या मंगलमय मूर्तीवर वैभवाचे उटणे लावा आणि दारिद्र्याचा मळ काढा. स्वातंत्र्याच्या दिव्याने ओवाळणी करून स्वाभिमानाचा टिळा मस्तकी लावा. बहिणीला ओवाळणी म्हणून आपल्या स्वराज्यावर वाकडी नजर ठेवणाऱ्या खलांचे निर्दालन करा. आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे सप्तसिंधुचा प्रदेश , काशीविश्वेश्वर मुक्त करा. स्वराज्य केवळ भूमीचा तुकडा नाही तर एक क्रांतिकारी विचारांची ठिणगी आहे. या ठिणगीने देशभर वणवा पेटू द्या. बाकी भोसले कुटूंबियांच्या नशिबात आगीत जळणे असतेच. पण त्यानेच ते उजळूनही निघतात. आमची कैद स्वातंत्र्याच्या यज्ञात पडलेली लहानशी आहुती समजा. काळजी घ्या बाळमहाराज. " राणूबाई म्हणाल्या.
" होय अक्कासाहेब. आम्ही त्या औरंग्याची कबर दख्खनमध्येच खणू. " महाराज म्हणाले.
ते स्वर ऐकताच राणूबाई लुप्त झाल्या.
©® पार्थ धवन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा