Login

शिवकाव्य कौस्तुभ -भाग १७

Shivkavya Kaustubh Part 17
आधीच्या भागात पाहिले की विजापूरच्या बादशहाने, त्याच्या काही सरदारांना विश्वासात घेऊन, कट रचला.आणि शहाजी राजांना बेसावध असताना कैद केले.विजापुरी आणुन त्यांच्या भोवती अखंड पहारा बसवला.
कारण असे..की यांना कैद केल्यामुळे, उच्छाद मांडणाऱ्या शिवाला वचक बसेल आणि स्वराज्यासाठीचे त्याने जे उद्योग चालवलेले आहेत, ते तो थांबवेलं.
या घटनेनंतर बादशहाने फत्तेखानास फौज घेऊन पुण्याकडे पाठवले.कश्यासाठी…?
तर.. शिवाजीस कैद करण्यासाठी..

इकडे शिवबाचे, नवे नवे मनसुबे आखणे चालु होते.नुसते आखणेच नाही तर, त्यावर कामही ते करत होते. या स्वराज्यासाठी झटणारे 'मजबूत हात' त्यांना हवे होते.'विश्वासु साथ' त्यांना हवी होती.त्यांची 'प्रामाणिक निष्ठा' त्यांना हवी होती.मग तो कुणीही असो.अश्या या रत्नांचा शोधा ते बारा मावळात ते घेत होते.त्याच बरोबर किल्ल्याविषयी माहिती ही ते मिळवत होते.या कामात व्यस्त असताना..
एक खबर राजगडावर येऊन धडकली.या खबरीने राजांचे आणि जिजाऊचे अवसान गळाले. जणू अवसेची रात उगवली. खबर कोणती?वाचा या पुढील काव्यात..


*वैशाख वणवा* (अ)

थरारली वात दिव्यात,
कडाडली विज ढगात,
शहाजी राजास करून नेले विजापुरी।।
आले संकट हात पसरून राजगडावरी।।ध्।।

जिजाऊ चे सौभाग्य आले धोक्यात, स्वराज्याची लगाम धरली हातात,
'हवे स्वराज्य'
तर वडिलांना कैद आयुष्यभरी।।
आले संकट हात पसरून राजगडावरी।।१।।

गडावरील जनता काळजीत पडली,
ऐन पावसाळ्यात ग्रीष्माची काहिली,
जणू अवसेची रात उगवली सर्व गडावरी।।
आले संकट हात पसरून राजगडावरी।।२।।

ही बातमी समजल्यावर महाराजांनी काय अंदाज बांधला? काय तर्कवितर्क लावण्यात आले?मग नेमके काय करावे आता?असे प्रश्न त्यांच्या भोवती पिंगा घालू लागले.
कोणते आहेत?पहा या पुढील काव्यात..
खालील काव्य हे शिवबांनी वदलेले आहे.

*वैशाख वणवा* (ब)

'स्वराज्य' आहे प्राण मावळ्यांचे,
'पिताश्री' हे प्राण माससाहेबांचे,
काय धरावे, काय सोडावे,
गुंताच आम्हा समोरी ।।
आले संकट हात पसरून राजगडावरी।।३।।

'जावे शरण' सांगावे बादशहाला,
थांबवु, आमच्या उपदव्यापाला,
विचारांची झाली कोंडी, सोडुन सारे करावे हरी हरी।।
आले संकट हात पसरून राजगडावरी।।४।।

सर्व स्वप्नांचे मनोरे ढासळले
बेत सारे स्वराज्याचे विरले,
अनपेक्षित कसे आले? हे अरिष्ठ अघोरी।।
आले संकट हात पसरून राजगडावरी।।५।।

शेवटी मागणे एक भवानीला,
अंतकरणातील तळमळीला,
शक्ती दे, युक्ती दे, राज्याचा अवघाभार तुझ्या वरी।।६।।
शुभांगी सुहास जुजगर.