Login

शिवकाव्य कौस्तुभ भाग - भाग ३१

Shivkavya Kaustubh Part 31
शिवाजी महाराज हे इकडुन तिकडे सारखेच फिरत होते.माता भवानी च्यापुढे..
असे फिरत फिरत असताना,
महाराजांनी माता भवानी समोर मस्तक टेकवुन एक मनिषा व्यक्त केली.आणि निर्धास्त झाले.
"शक्ती दे, युक्ती दे." असे सांगुन.

दुसऱ्या दिवशी एक विलक्षण कल्पना त्यांच्या डोक्यात घोळत होती. आणि ती अमलात आणणे ही तीतकेच धोक्याचे होते. पण हे करावेच लागणार होते. कारण वेढा हा हटत नव्हता. आणि हटवूही शकत नव्हते. प्रयत्न सफल होत नव्हते. आणि आता काहीही करून बाहेर पडावेच लागणार होते. नाहीतर…??

असा काहीसा मनसुबा महाराजांच्या मनात घोळत होता. रचला होता. म्हणून त्यांनी गडावरच्या, आपल्या मातब्बर अशा जिवलगांना, शिलेदारांना सदरेवर बोलावले. आणि त्यांच्यासमोर मनातली योजना ठेवली. आणि म्हणाले,
"मी आता येथे जास्त दिवस बंदिस्त राहणेही घातक होईल. जोहरचा वेढा आपण जरा सुद्धा उठवू शकत नाही. आणि लढाई तर नकोच आहे.त्यांची फौज अफाट, मातब्बर आहे. त्याचे मोडणे आज तरी दुरापास्त आहे. तिकडे बाहेरही शाहीस्तेखान पुण्यात तळ ठोकून बसला आहे. त्यामुळे मी आता येथून गेलेच पाहिजे."
महाराजांचे हे बोलणे ऐकून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. उत्सुकता वाढली. की 'यांनी आता नेमके काय ठरवले आहे? याची.
त्यांनी आपला सगळा मनसुबा व्यवस्थित सांगितला. अद्भुत, धाडसी बेत होता. तो तडीस जाणेही अतिशय धोक्याची होते.पण तरीही निवडक लोक तयार झाली. काय करायचं? कसं करायचं? सगळं ठरलं. व्यवस्थितपणे. सर्वांनी थोडाही बाहेर सुगावा लागू न देता कामगिरी फत्ते करायची.
झाले सगळेजण तयारीला लागले आपापल्या.

हेरांनी अगदी गुपचूप गडाखाली, गडातून बाहेर पडून, शत्रूच्या पहाऱ्यावरील सैनिकांचा डोळा चुकवून जाऊन टेहेळणी करत, अगदी अचूक अशी नाजूक वाट शोधून काढली.

एक निसटती जागा, झुडपाच्या घळीच्या पसरलेल्या पटावर दिसली.तिथे मोर्चे नव्हते.गस्तही जरा ढीलीच होती.ही वाट म्हणजे गडाच्या वायव्येस, म्हणजेच विशाळगडाकडे जाण्यासाठी एकदम अनुकूल होती.
हे हे हेरांचे सर्व ऐकून झाल्यावर, महाराजांनी हाच उजवा कौल समजुन, पुढील बेत आखला. आणि हे पुढचे पाऊल उचलण्याचे धाडस महाराजांनी केले. या वाटेने एकदम सही सलामत निसटुन जाण्यासाठी, अगदीच कडक असलेला पहारा शिथिल झाला पाहिजे. ढीला पडला पाहिजे, छावणी बेफिकीर होऊन बिनधास्त झाली पाहिजे. तेव्हाच आपले काम फत्ते होईल. असेही वाटले.
या सर्व गोष्टी घडण्यासाठी ही परत एक शक्कल लढवली.आणि अमलात ही आणायची .ठरले!ठरले!

आषाढी पौर्णिमेचा तो दिवस. काही घटका दिवस वर आला.म्हणजे वर चढला. त्यानंतर महाराजांच्या महालातून वकील म्हणजे गंगाधर पंत.
तर हे गंगाधर पंत पत्राची थैली घेऊन, आणि योग्य असे उत्तम नजराने घेऊन बाहेर पडले.
पत्रात काय होते? तर ते पत्र म्हणजे शरण,नव्हे शरणागतीचेच ते पत्र होते. Iकोणासाठी होते तर सिद्धी जोहर साठी ते होते.

सिद्धी जोहर पुढे महाराजांच्या शरणागतीचे पत्र.आज गंगाधर पंत ठेवणार होते.
आणि पुढील बोलणी,"प्रत्यक्ष आमचे महाराज छावणीत येऊन करतील."
असा निरोप देखिल देणार होते.
बघुया पुढील काव्यात.. काय आहे नेमके?

*सिद्दीस निरोप*
'गड तुमच्या करतो स्वाधीन'
असा निरोप दिला पाठवून.
आयोजिले एका धाडसी बेताला,
घेऊन थोडे सैनिक, सोडावे पन्हाळ्याला।।धृ।।

ऐकून निरोप शिवाजीचा
चेहरा फुलला सिद्धीचा.
झाला प्रसार आनंदवार्तेचा,
जसा झरा दिसावा, तहानलेल्या जीवाला।।
घेऊन थोडे सैनिक, सोडावे पन्हाळ्याला।।१।।

हेरून एक जागा मोक्याची,
उणीव होती तिथे पहाऱ्याची,
दिशा होती विशाळगडाची ,
जावे निघून अलगद, रात्रीच्या प्रहराला।।
घेऊन थोडे सैनिक, सोडावे पन्हाळ्याला।।२।।

असाच मजकुर पत्रात लिहिला की,जोहर नरमेल.आणि म्हणुन वेढा शिथिल होईल.

शिवाजी कडून आलेले पत्र.
या पत्राने, सिद्धी जोहर सगट सगळेजणांनी सुटकेस निःश्वास सोडला.शरणागतीच्या या पत्राने, जोहरला मनापासून आनंद झाला. पण तरीही मनात धास्ती शिवाबद्दलची होतीच. असे असूनही सिद्धीने विश्वास ठेवला. अगदी जबाबदारपणे, सावधपणे त्याने सर्वांगीण विचार केला.
आपल्या या चार महिन्याची मेहनत सफल होताना बघून, म्हणजे 'शिवाजी सारखा पटाईत वाघ आपण होऊन शरण येतो आहे.' या कल्पनेमुळे त्याला स्वतःचा अभिमान वाटला.
त्याच बरोबर सगळ्या छावणीतही ही बातमी पसरली. आनंदी आनंद झाला.
ही बातमी म्हणजेच एक हुल दाखवून शत्रुच्या सैन्यासहित सर्वांना गाफिल बनवण्यासाठी, केलेली साखर पेरणीच होती.

आपल्या या अफाट सैन्याच्या गराड्यात तो सापडला आहे. दुसरा काहीच पर्याय नाही. त्यामुळे कुठलीही दगाबाजी तो नाही करू शकणार. ही खात्रीच पटली.
याच कारणामुळे आलेल्या पत्राला मंजुरी दिली. जौहरचा निरोप घेऊन गंगाधर पंत, डोळ्यात मिष्कील आनंद लपवत गडावर परतले.

पंत परतेपर्यंत महाराजांची पुढील तयारी जोमात चालू होती. गडावरून रात्रीच्या प्रहरात दहाच्या सुमारास, सुमारे सहाशे हत्यार बंद पायदळ घेऊन, गुपचूप शत्रूला च्या सैन्याला चाहूलही न लागू देता विशाळगडाकडे निघायचे. अगदी बिन बोभाट.
हे असेच ठरलेले होते.
या योजलेल्या सगळ्या डावात महाराजांच्या जीवाला भयंकर धोका होता. यशाची ही खात्री नव्हती. शत्रूचा डोळा चुकवून जाणे.. सोपे नव्हतेच. बेत फसला तर…जगदंब! जगदंब!

सगळी तयारी झाली. गडावरून निघण्याची. गडावरील सर्व वातावरण गंभीर होते. महाराज एक महादिव्य करण्यासाठी निघत होते. प्रयाण करत होते. त्यांच्यात जणू यावेळी धैर्य लक्ष्मीच उभी होती.
या सर्वांबरोबर एक रिकामी पालखी ही जाणार होती. वेळ प्रसंग आलास तर ऐनवेळी, लागलीच हिचा उपयोग करणार होते..
आषाढ महिन्यातील,१२ जुलै १६६० ची ही रात्र होती.
बघुया पुढील काव्यात..

*प्रयाण पन्हाळ्या वरून*

काळजात होते धक धक जरी,
तरीही पालखीत बसली स्वारी ।।धृ।।

आषाढी पौर्णिमेची ती रात्र,
वीज वादळाचे चालू होते सत्र,
पावसाच्याही येत होत्या सरीवर सरी।।
तरीही पालखीत बसली स्वारी ।।१।।

रात्रीच्या पहिल्या प्रहरी,
निघे पालखी खांद्यावरी,
बाजीप्रभू वीर होता बरोबरी।।
तरीही पालखीत बसली स्वारी ।।२।।

घेऊन बालकृष्ण टोपलीत,
निघे वसुदेव रात्रीच्या प्रहरात,
सुखरूप रहावा, 'हा जीव भुवरी'।।
तरीही पालखीत बसली स्वारी ।।३।।

वेढा होता सारा गाफील,
नाच गाण्याची रंगली मैफिल,
नशेत झिंकली होती फौज सारी ।।
तरीही पालखीत बसली स्वारी ।।४।।

मावळे चालत होते भराभर,
घेऊन स्वराज्याचा शिल्पकार,
भवानीचे नाव त्यांच्या जिभेवरी।।
तरीही पालखीत बसली स्वारी ।।५।।

@सौ.शुभांगी जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)

🎭 Series Post

View all