Login

शोध नात्यांचा भाग १०

Mission of searching relatives

     मागील भागाचा सारांश: आता पर्यंत आपण बघितले की राघवला त्याचे सर्वच नातेवाईक शोधण्यात यश आले आहे, नातेवाईक सापडल्याबरोबरच प्रत्येकाच्या आयुष्यातील समस्याही कळाल्या जसे की सुजाता आत्त्याचे कोमात जाणे, वाडा सावकाराच्या ताब्यात असणे, सुशीला आत्त्याचे संघर्षमय जीवन. सुजाता आत्त्यासोबत तिचे बहीण भाऊ व्हिडिओ कॉल द्वारे बोलायला लागल्याने तिच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली होती. राघवला त्याची जुनी मैत्रीण श्रेयाही परत मिळाली होती. आता राघवच्या पुढे दोन प्रश्न उभे होते एक वाडा सोडवणे आणि दुसरा म्हणजे राघवच्या आजोबांनी त्यांच्या सर्व मुलांना दिलेल्या गणपतीच्या मुर्त्या. राघव ह्या विचारात असतानाच मंजिरीचा फोन आला,

मंजिरी--- हॅलो राघव बिजी आहेस का?

राघव--- नाही ग, बोल ना काय म्हणतेस?

मंजिरी--- आत्ताच बाबांचा फोन आला होता, बाबा बोलले की आईच्या तब्येतीत खूप झपाट्याने सुधारणा होत आहे, आई डॉक्टरांच्या उपचाराला उत्तम प्रतिसाद देत आहे, डॉक्टरांचे म्हणणे आहे की आई जर अशीच प्रतिसाद देत राहिली तर ती लवकरच कोमातून बाहेर पडेल. मी जाम खुश आहे.

राघव--- मस्तच ना, आपण देवाकडे प्रार्थना करूया की सुजाता आत्या लवकर शुद्दीत येवो.

मंजिरी--- मी आईच्या आजारपणातून एक गोष्ट शिकली आहे.

राघव--- कुठली?

मंजिरी--- मी पहिले विचार करायचे की आपल्याकडे पैसे, संपत्ती असेल तर आपल्याला कधीच कसली कमी पडणार नाही, पैसे असले की आपण कुठल्याही संकटातून बाहेर पडू शकतो, पण तसं नाहीये, आम्ही आईसाठी पुण्यातील बेस्ट हॉस्पिटल, बेस्ट डॉक्टर्स शोधलेत तरी पण आई ट्रीटमेंटला काहीच प्रतिसाद देत नव्हती, मी व बाबा आम्ही दोघेही हताश झालो होतो, आता कळलंय की आपली माणसं किती महत्त्वाची असतात, आईचे सगळे बहीण भाऊच घे ना, त्यांच्यात खूप वितुष्ट आले होते पण आई आजारी आहे आणि तिला त्यांची गरज आहे म्हटल्यावर झालं गेलं सगळं विसरून ते मदतीला धावून आलेत आणि त्यांच्यामुळेच आई बरी व्हायला मदत होत आहे, 

राघव--- खरं आहे तुझं, आपल्या माणसांची किंमत ते नसतानाच कळते, मला लहानपणापासून वाटायचं की मला बहीण भाऊ असावेत, बहिणीने मला राखी बांधावी, भावांसोबत क्रिकेट खेळावे, भावंडांसोबत मजा मस्ती करावी, आता कुठे जाऊन ते स्वप्न पूर्ण होतंय, रक्षाबंधनाला तु मला राखी बांधशील ना.

मंजिरी--- हो बांधेल ना पण एका अटीवर

राघव--- कुठल्या?

मंजिरी--- मला मोठं गिफ्ट द्यावं लागेल

राघव--- अगं देईल ना, तु फक्त सांग काय पाहिजे ते.

मंजिरी--- राजेंद्र मामा, संजय मामा, सुशीला मावशी यांच्या मुलांशी तुझं बोलण झालं का?

राघव--- माझं फक्त श्रेयासोबत बोलण झालंय, बाकी सर्वांचे फोन नंबर मिळालेत पण बोलण कोणाशीच नाही झालं.

मंजिरी--- व्हाट्सअप्प ला ग्रुप बनव ना, मॅसेज मधून बोलता बोलता सर्वांशी ओळखही वाढेल आणि कंफरटेबल वाटेल.

राघव--- हो ग्रुप ओपन करतो आणि त्यावर आपली फॅमिलीची ट्री डायग्राम टाकतो म्हणजे सर्वांना कळेल की कोण कोणाचे मुलं आहेत व आपल्यात काय नात आहे.

मंजिरी--- गुड आयडिया

     मंजिरीने सुचवल्याप्रमाणे राघवने व्हाट्सअप्प वर देशमुख न्यू जनरेशन या नावाने ग्रुप ओपन केला त्यात सर्वांना ऍड केलं आणि त्याने बनवलेली देशमुख फॅमिलीची ट्री डायग्राम ग्रुपवर टाकली,

विनायक देशमुख + मंदा देशमुख

                        |

1) आनंद देशमुख + सरिता देशमुख

                         |

                 राघव देशमुख

2) राजेंद्र देशमुख + संजना देशमुख

                        |

   शर्वरी देशमुख, नचिकेत देशमुख

3) संजय देशमुख + सविता देशमुख

                        |

 सारंग देशमुख, क्षितिजा देशमुख

4) सुशीला देशमुख + अरविंद मोहिते

                          |

   श्रेया मोहिते, श्रीजय मोहिते

 5) सुजाता देशमुख + रमाकांत देशपांडे

                          |

                  मंजिरी देशपांडे

     

हाय मी राघव, सगळ्यांचे ग्रुपमध्ये स्वागत आहे. तुमच्यापैकी कुणालाही ग्रुपचे नाव व आयकॉन आवडला नसेल तर ती बदलू शकता. मी ग्रुपचा आयकॉन गणपतीच्या मूर्तीचा फोटो ठेवला आहे जी मूर्ती आपणा सर्वांच्या घरात असेलच, त्या मूर्तीमुळेच आपण सर्व बांधले गेले आहोत. आपण सर्वच एकमेकांशी अनोळखी आहोत तर सर्वप्रथम आपण कॉलेज मध्ये जसा इन्ट्रो द्यायचो तसा प्रत्येकजण आपापली ओळख करून देऊयात, मी माझ्यापासून सुरुवात करतो.

माझे नाव- राघव देशमुख, मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे, मी मुंबईतच एका कंपनीत चांगल्या पदावर आणि पगारावर नोकरी करतो.

त्यानंतर मंजिरीने लगेच मॅसेज केला, हाय मी मंजिरी देशपांडे, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, मी बंगलोरला सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करते. आई बाबा आणि माझे फ्रेंड्स मला मंजू म्हणतात सो तुम्हीही मला मंजू म्हणू शकतात.

पुढील मॅसेज श्रेयाचा असतो, हाय मी श्रेया मोहिते, मी डॉक्टर आहे, माझे MBBS पूर्ण झाले असून सध्या मी एन्ट्रान्स एक्सामची तयारी करत आहे, आणि तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सांगते राघव आणि मी अकरावी व बारावीत असताना एकमेकांचे चांगले मित्र होतो.

शर्वरी-- हाय मी शर्वरी देशमुख, मी सिव्हिल इंजिनिअर आहे, मी गव्हर्नमेंट जॉबसाठी एक्साम देत आहे, एका पोस्टसाठी निवडही झालेली आहे पण कोरोनामुळे पोस्टींग झाले नाही,त्यामुळे सध्या मी मुंबईत असते, मला सर्व जण शरु म्हणतात.

सारंग-- हाय मी सारंग देशमुख, मी BAMS च्या शेवटच्या वर्षात आहे, मी नाशिकच्या कॉलेज मध्ये शिकतोय.

श्रीजय-- हाय मी श्रीजय मोहिते, मी MBBS च्या फर्स्ट इअर ला आहे, माझं कॉलेज पुण्यात आहे, मला सर्वजण श्री म्हणतात.

क्षितिजा--- हाय मी क्षितिजा देशमुख, मी बी फार्मसी फर्स्ट इअर ला आहे, माझं कॉलेज नगरला आहे.

नचिकेत-- हाय मी नचिकेत देशमुख, मी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इअर ला आहे, माझं कॉलेज पुण्यात आहे.

राघव--- सगळ्यांशी बोलून खरच खूप छान वाटलंय, आपण इथून पुढे अश्याच गप्पा मारू शकतो, लॉक डाउन उघडलं की आपण सर्वजण आपल्या वाड्यावर भेटुयात.

सारंग--- राघव दादा आपला वाडा सावकाऱ्याच्या ताब्यात आहे.

राघव--- हो मला माहित आहे, तु काळजी करू नकोस मी काही झालं तरी वाडा सावकाराकडुन सोडवेल. आपल्या सर्वांच्या घरात जी गणपतीची मूर्ती आहे ती अण्णा आजोबांनी त्यांच्या पाचही मुलांना दिली होती, यात काहीतरी रहस्य असल्यासारखे मला वाटत आहे, ते रहस्य मला शोधायचे आहे.

श्रेया--- राघव पण यात काय रहस्य असू शकते, साधी सरळ गणपतीची मूर्ती आहे, एवढंच आहे की त्यांनी मुलांमध्ये भांडण नको म्हणून एकसारखी मूर्ती सर्वांना दिली, आता आमच्याकडेच बघ ना माझ्यात आणि श्री मध्ये वाद नको व्हायला म्हणून आई सर्व गोष्टी आम्हाला एक सारख्याच घेऊन देते.

राघव--- श्रेया गणपतीची मूर्ती म्हणजे फक्त वस्तू किंवा खेळणी नाहीये, मला बाबांनी सांगितलं होतं की अण्णा आजोबांनी मूर्ती देताना त्यांना सांगितलं होतं की ही गणपतीची मूर्ती म्हणजे तुझं अस्तित्व, तुझा उगम. आता मला एक सांगा याचा नक्कीच काहीतरी अर्थ असेल ना.

क्षितिजा--- राघव दादा वाड्यात खाली तळघर आहे, त्यात जुनेपूराणे सामान ठेवलेले आहे, आमच्यासाठी ती अडगळीची खोलीच आहे, आमच्यापैकी कोणीही त्या खोलीत जात नाही, एकट्याला तिथे जायला खूप भीती वाटते, मागच्या उन्हाळ्यात कुरडयाचा सोऱ्या शोधण्यासाठी मी आईसोबत त्या खोलीत गेले होते तेव्हा तिथे मला एक मोठी लाकडी पेटी दिसली होती त्याला एक मोठी चावी लावलेली होती आणि त्याच सोबत तिथे गणपती लावण्यासाठी साचा बनवलेला होता.

राघव--- क्षितिजा तु आणि सारंग त्या खोलीत जाऊन परत एकदा चेक करता का? मला त्या पेटीचा फोटो पाठवाल का?

सारंग--- दादा सावकाराने त्या खोलीला कुलूप लावलेले आहे.

राघव--- अरे पण सावकाराचा काय संबंध?

सारंग--- सावकाराला अस वाटतंय की त्या खोलीत खजिना दडलेला आहे.

राघव--- अरे बापरे, हे लॉकडाउन कधी उघडेल आणि मी तिकडे येऊन हा सावकाराचा chaptar बंद करेल अस झालंय. सारंग आणि क्षितिजा तिकडे येऊन सावकाराने काहीही हालचाल केली तरी मला कळवा, आता तुम्ही एकटे नाही आहात आपण सगळे एकत्र आहोत.

©®Dr Supriya Dighe