मागील भागाचा सारांश: राघवने त्याच्या परिवारातील आधुनिक पिढीचा एक व्हाट्सअप्प ग्रुप तयार केला, त्यात सर्वजण एकमेकांशी बोलले, सर्वांनी एकमेकांना एकमेकांची ओळख करून दिली. राघवला क्षितीजा कडून अस समजलं की वाडयात अडगळीच्या खोलीत एक लाकडी पेटी आहे, तिला एक मोठी चावी असून गणपती बसवण्यासाठी एक साचा तयार केलेला आहे. यावर राघव क्षितिजा व सारंगला सांगतो की तुम्ही अडगळीच्या खोलीत जाऊन त्या लाकडी पेटीचा फोटो काढून मला पाठवा, यावर सारंग राघवला सांगतो की अडगळीच्या खोलीला सावकाराने कुलूप लावलेले असते कारण सावकाराला असे वाटत असते की त्या खोलीत खजिना दडलेला असेल.
देशमुख न्यू जनरेशन या व्हाट्सअप्प ग्रुपवर सर्वांच्या रोजच चांगल्या रीतीने गप्पा होऊ लागल्या. दिवसामागून दिवस जात होते, देशमुख परिवारातील सर्वच जण मनाने एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. मंजिरीची आई म्हणजेच सुजाताच्या तब्येतीतही हळूहळू सुधारणा होऊ लागली होती. एके दिवशी सकाळी सकाळी सारंगने राघवला फोन लावला,
सारंग--- हॅलो राघव दादा( सारंगच्या आवाजावरून तो घाबरल्यासारखा वाटत होता)
राघव--- बोल सारंग, काय झालं? एवढ्या सकाळी फोन का केलास? आणि तु घाबरल्यासारखा का वाटत आहेस?
सारंग--- दादा इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, सावकार व त्याचे लोक घरी येऊन तमाशा घालून गेले आहे, दोन दिवसांत वाडा खाली करायला लावला आहे आणि नाही केला तर घरातील सामान बाहेर फेकून द्यायची धमकी दिली आहे.
राघव--- सारंग तु घाबरू नकोस, मी e pass काढून तिकडे यायचा प्रयत्न करतो.
सारंग--- दादा पण त्याला खूप वेळ लागेल.
राघव--- एक काम कर तु मला सावकाराचा फोन नंबर दे, मी त्याच्याशी बोलून बघतो.
सारंग--- ठीक आहे, मी तुला त्याचा फोन नंबर देतो पण मला नाही वाटत की त्याने काही फरक पडेल. बाबा खूप चिडलेले आहेत.
राघव--- आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. संजय काकांना शांतता घ्यायला लाव, घाईघाईत काहीच पाऊल उचलू नका म्हणावं.
सारंग--- हो सांगतो.
सारंग राघवला सावकाराचा फोन नंबर देतो, तोपर्यंत राघव घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या बाबांना आणि राजेंद्र काकांना देतो. राघव सावकाराला फोन लावतो.
सावकार--- हॅलो कोण बोलतंय?
राघव--- हॅलो मी राघव देशमुख बोलतोय.
सावकार--- कोण राघव देशमुख?
राघव--- मी विनायक देशमुखांचा नातू आहे, त्यांच्या मोठ्या मुलाचा मुलगा.
सावकार--- म्हणजे तु आनंद देशमुखचा मुलगा आहेस का?
राघव--- हो, तुम्ही माझ्या बाबांना ओळखतात का?
सावकार--- हो, शाळेत असताना आम्ही दोघ एकाच वर्गात होतो, ते राहुदेत तु फोन कशाला केला होतास?
राघव--- काका मला कळलंय की आमचा वाडा तुमच्याकडे गहाण आहे आणि तुम्ही संजय काका व त्याच्या परिवाराला वाड्यातून निघून जायला सांगितले आहे, त्याबद्दल बोलायच होतं.
सावकार--- हो तु ऐकलंय ते खरं आहे, तुझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे तुमचा वाडा गहाण ठेवला होता, आजपर्यंत कोणीच वाडा सोडवण्यासाठी किंवा कर्ज फेडायला आलेले नाही, एवढी वर्षे होऊन गेली तुमचा वाडा आमच्याकडे गहाण आहे, तुझ्या संजय काकाकडे दारू प्यायला पैसे आहेत पण माझ्या पैशांचे व्याज द्यायला नाही, मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना.
राघव--- काका मी तुमचे सर्व पैसे व्याजासकट परत करेन पण तुम्ही कोणालाही वाड्यातून बाहेर काढू नका. एवढी वर्षे तुम्ही थांबलात अजून थोडे दिवस म्हणजे लॉकडाउन उघडेपर्यंत थांबा, मी हात जोडून कळकळीची विनंती करतो.
सावकार--- मी थांबेल पण त्यासाठी आधी तु थोडेफार पैसे मला ऑनलाईन पाठव मगच मी तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि हो मी जास्तीत जास्त आठ दिवस थांबेल त्यापुढे नाही.
राघव--- ठीक आहे काका, तुम्ही मला तुमचा अकाउंट नंबर पाठवा मग मी तुम्हाला पैसे पाठवतो.
राघवने चालू वेळ पुढे ढकलून नेली होती, राघवने सावकारासोबत झालेली चर्चा त्याच्या बाबांना आणि राजेंद्र काकाला सांगितली यावर राजेंद्र काका राघवला म्हणाला की तु सावकाराला पैसे देऊन चुक करत आहेस, त्याने त्याचा शब्द पाळला नाही तर तुझे पैसेही जातील आणि वाडाही. राघवने राजेंद्र काकाला सांगितले की मी सावकाराचा फोन रेकॉर्ड करून ठेवला आहे आणि शिवाय ऑनलाईन पैसे पाठवल्याने आपल्याकडे पैसे पाठवल्याचा पुरावाही असेल. राजेंद्र काकाने राघवच्या हुशारीचे कौतुक केले.
राघवने सावकारात आणि त्याच्यात झालेल्या संभाषणाची कल्पना सारंगला दिली. राघवने आता तर ही वेळ मारून नेली होती पण आठ दिवसांनी जर लॉकडाउन नाही उघडले तर काय करायचे ही चिंता राघवला सतावत होती.
तीन ते चार दिवसांतच लॉकडाउन उघडल्याची बातमी आल्याने राघव प्रचंड खुश झाला. मंजिरी फ्लाईटने पुण्याला पोहोचली. राघव व त्याचे आई बाबा, सुशीला, श्रेया व श्रीजय आणि राजेंद्र काका व त्याचा परिवार सुजाताला भेटण्यासाठी पुण्याला गेले तिथे सर्वांची एकमेकांशी भेट झाली. सुजाता शुद्दीत आली होती पण तिला अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार होते. सुजाताला भेटून सर्वच जण गावी जाणार होते, त्यांच्या सोबत मंजिरीही गावी जाणार होती.
ठरल्याप्रमाणे सर्वजण गावी पोहोचले. गाव खूप बदललेले होते, जुनी पडकी मातीची घरे जाऊन त्याजागी नवीन मोठं मोठ्या सिमेंट काँक्रीटच्या इमारती उभ्या झालेल्या होत्या. आनंद, राजेंद्र व सुशीलाला वाटतच नव्हते की हे आपले गाव आहे, त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, वाटेत त्यांना त्यांची शाळा दिसली, शाळेची इमारतही खूप मोठी आणि भव्य बांधण्यात आलेली होती. ज्यावेळी आनंद, राजेंद्र व सुशीला शाळेत होते तेव्हा शाळेच्या भिंती मातीच्या होत्या व त्या शेणाने सारवलेल्या असायच्या. कितीतरी वर्षांनी सर्वजण गावी परतत होते. अखेर सर्वजण वाड्यापर्यंत येऊन पोहोचले, आनंद, राजेंद्र व सुशीलाच्या डोळ्यात वाड्याला बघून पाणी तरळले तर राघव आणि इतर मंडळी वाड्याकडे कुतूहलाने बघत होते, गाडीचा आवाज आल्याने संजय, सारंग व क्षितिजा वाड्याबाहेर आले, सर्वांनाच एकमेकांना बघून खूप भरून आले होते. संजयलाही खूप आनंद झाला होता, शेजारपाजारचे लोक यांच्या मोठ्या गाड्यांकडे बघून आश्चर्य व्यक्त करत होते, संजय सर्वांना वाड्यात घेऊन गेला, क्षितिजाने सर्वांना पाणी दिले, सविता काकूने सर्वांसाठी चहा टाकला. एवढ्या वर्षांतून वाडा गजबजला होता. संजयने सर्वांना अण्णांच्या फोटो जवळ घेऊन गेला व म्हणाला, अण्णा बघा सर्व जण कसे राजबिंडे होऊन गावी परत आले आहेत, अण्णा तुम्ही मला नेहमी म्हणायचात ना की संजय एक दिवस नक्कीच सर्व जण परत येतील, अण्णा तो दिवस आलाय पण हा दिवस बघायला तुम्ही आमच्यात नाही आहात, अण्णा तुमचे नात नातू बघा सर्वजण सुशिक्षित आणि दिसायला एकसे बढकर एक आहेत. अण्णा तुमचा आशिर्वाद सर्वांनवर असुद्यात.
संजयने सर्व मुलांना अण्णा व ताईच्या फोटोच्या पाया पडून आशिर्वाद घ्यायला सांगितला. आनंद, राजेंद्र, संजय व सुशीला लहानपणीच्या आठवणी ताजा करत होते, आपल्या मुलांना लहानपणीचे किस्से सांगत होते, वाड्यातल्या तिघी सुनांनी मिळून स्वयंपाक बनवला होता, सर्वांनी व्हिडिओ कॉल करून सुजाताशी गप्पाही मारल्या.
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा