Login

शोध नात्यांचा भाग १२ अंतिम भाग

Mission of searching relatives

      मागील भागाचा सारांश: आपण मागच्या भागात बघितलं, आनंद, राजेंद्र, सुशीला व त्यांचा परिवार आणि मंजिरी हे सर्व गावी पोहोचले. आनंद, राजेंद्र व सुशीलाला गाव बदलल्याचे आढळून आले. खूप वर्षांनी सर्व भावंडे एकत्र आली होती, वाडा गजबजून निघाला होता.

        दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सावकार त्याच्या माणसांसोबत वाड्यावर येऊन पोहोचला. रात्री उशिरापर्यंत जागे असल्याने वाडयातील मुले अजून उठायची बाकी होती तर वडीलधारी मंडळी उठून सकाळच्या विधी आटोपण्यात व्यस्त होते. वाडयातील महिला मंडळ स्वयंपाक घरात चहा नाश्त्याची तयारी करत होत्या. हे सर्व चालू असतानाच सावकार वाड्याच्या दरवाजावर येऊन ठेपला.

सावकार--- संज्या मी तुला वाडा खाली करायला सांगितला होता आणि तु तर तुझ्या भावंडांना गोळा करून इथे तळ ठोकून बसण्याच्या विचारात दिसतो आहेस, पुढच्या तासाभरात तुझं चंबू गबाळ गुंडाळायचे आणि वाड्यातून निघायचे.

संजय--- ( चिडून) शिरप्या तोंड सांभाळून बोलायच, वाडा तुझ्या बापाचा नाहीये, पुढच्या तासाभरात काय मी कधीच हा वाडा सोडून जाणार नाही.

सावकार--- संज्या बऱ्या बोलाणं इथून निघायचे नाहीतर मी पोलिसांना बोलावले.

आनंद--- श्रीपाद शांततेत बसून चर्चा करूया, तु वाद का घालत आहेस?

सावकार--- आनंद तु याच्यात पडू नकोस, हा वाद माझ्यात व संजय मध्ये आहे.

आनंद--- श्रीपाद वाडा हा आमच्या सर्वांचा आहे, त्यामुळे आम्हाला मधे पडावच लागेल. कायद्याने तु आम्हाला वाड्यातून बाहेर काढू शकत नाही.

सावकार--- म्हणजे तुम्हाला कायद्याचा इंगा दाखवावाच लागेल, थांब मी आत्ताच पोलिसांना बोलावतो.

आनंद--- बोलावंच, आम्ही पण बघतो तु काय काय करू शकतो.

      सावकाराने स्थानिक पोलिसांना फोन लावून वाड्यावर येण्यास सांगितले. गोंधळ ऐकून राघवला झोपेतून जागा झाला व उठून बाहेर आला, त्याच्यासोबत घरातील मुलेही बाहेर आली.

राघव--- बाबा काय झालं? हे कोण लोक आहेत आणि इथे का आले आहेत?

आनंद--- हा श्रीपाद आहे, सावकारकीचा वारसा हक्क मिळाला आहे म्हणून माज चढलेला आहे, आपल्याला घरातून काढून देण्यासाठी पोलिसांना बोलावले आहे.

    राघव आणि त्याच्या बाबांमध्ये बोलणं चालू असतानाच पोलिस तिथे येऊन धडकतात.

सावकार--- या इन्स्पेक्टर साहेब, मी तुमचीच वाट बघत आहे.

पोलीस--- सावकार काय झालंय?

सावकार--- हा वाडा आमच्या वडिलांकडे गहाण होता, मुद्दल तर सोडा पण ह्या घरातील लोकांनी व्याज सुद्धा भरले नाही म्हणून नियमाप्रमाणे हा वाडा माझ्या मालकीचा झालेला आहे तर हे लोक वाड्यातून निघायला तयार नाहीये.

राघव--- साहेब हा माणूस खोट बोलत आहे, मागच्या आठवड्यात आमच्या दोघांच फोनवर बोलण झालं होतं त्यावेळी मी ह्याचे पूर्ण व्याज भरून टाकले, बाकीचे पैसे भरण्यासाठी ह्यांनी आम्हाला काही मुदत दिली होती.

सावकार--- नाही साहेब हा मुलगा खोटं बोलत आहे, माझ्यात आणि ह्या मुलात कधीच आणि काहीच बोलण झालं नाहीये.

पोलीस--- तुमच्याकडे काही पुरावा आहे का?

राघव--- हो साहेब, मी फोन कॉल रेकॉर्ड करून ठेवला होता आणि मी पैसे पाठवल्याचे बँक स्टेटमेंट वरून कळेलच.

राघव पोलीसांना रेकॉर्ड केलेला कॉल ऐकवतो व बँक स्टेटमेंट दाखवतो, कॉल ऐकल्यावर सावकाराच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.

पोलीस--- सावकार ह्या कॉल नुसार आणि बँक स्टेटमेंट नुसार ह्यांनी तुम्हाला काही पैसे दिलेले आहेत तसेच बाकीचे पैसे देण्यासाठी तुम्ही काही मुदत दिलेली आहे.

राजेंद्र--- इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला सावकार खाद नक्कीच देत असेल म्हणून तुम्ही याने फोन केल्या केल्या इथे आलात.

पोलीस--- तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही चुकीचे आरोप करत आहात.

राजेंद्र--- कस आहे ना, मीही आपल्याच सिस्टिम मध्ये जॉब करतो, मला या सर्व गोष्टीची कल्पना आहे, सावकारकी करणे हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे हे माहीत असूनही तुम्ही या सावकारावर गुन्हा दाखल न करता सामान्य नागरिकांना वेठीस धरत आहात. तुमच्या साहेबांना फोन लावून विचारा, राजेंद्र देशमुख कोण आहेत म्हणून, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कोण आहे? श्रीपाद आम्ही तुझे सर्व पैसे द्यायला तयार आहोत, आम्ही सर्वजण खूप सामंजस्याने वागत आहोत, आमच्या चांगुलपणाचा फायदा उठवू नकोस.

पोलीस--- सॉरी साहेब, मला माझ्या साहेबांना फोन करून विचारण्याची गरज नाहीये, मी तुमचं नाव ऐकून आहे फक्त तुम्हाला प्रत्यक्षात कधी बघितलं नसल्याने ओळखण्यात गफलत झाली, इथून पुढे सावकार तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. सावकार हे साहेब मंत्रालयात खूप मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत, तुम्ही यांच्या नादाला लागू नका नाहीतर तुमचं काही खरं नाही.

पोलीस राजेंद्रचा निरोप घेऊन तेथून निघून जातात, सावकार सगळं काही आ वासून बघत असतो, त्याचा डाव त्याच्यावरच उलटला.

सावकार--- राजू मी तुमचा वाडा तुम्हाला देऊन टाकतो फक्त माझे पैसे परत द्या.

राजेंद्र--- अरे आम्हाला तुझे पैसे द्यायचेच आहेत फक्त दोन तीन दिवस थांब. 

सावकार--- हो चालेल, संजय मी तुझ्याशी खूप वाईट वागलो यासाठी मला माफ कर, मी निघतो.

      सावकार वाडयातील अडगळीच्या खोलीची चावी राघवकडे सोपवून तेथून निघून जातो. सावकाराचे सावट सहजासहजी दूर झाल्याने सर्वच जण खूप खुश होतात. राघव चावी घेऊन लगेच अडगळीची खोली उघडतो, सारंग व क्षितीजाच्या मदतीने ती लाकडी पेटी शोधतो आणि ती पेटी बाहेर काढतो. पेटीभोवती घरातील सर्वजण जमा होतात. राघव सर्वांकडून गणपतीची मूर्ती घेतो, पेटीला गणपतीच्या मूर्ती बसवण्यासाठी खाचा केलेल्या असतात, राघव त्यात हळूहळू एकेक करून गणपतीची मूर्ती बसवतो. पाचही मूर्ती बसवुन झाल्यावर आपोआप पेटीचे झाकण उघडते, सगळेजण आश्चर्यचकित होतात, पेटीमध्ये काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागते. राघव पेटीत डोकावून बघतो तर त्यात एक वही आणि एक छोटा बटवा असतो, राघव ती वही आणि बटवा बाहेर काढतो, बटवा जड असतो. 

      राघव बटवा उचकतो तर त्यात आठ सोन्याच्या गणपतीच्या मुर्त्या असतात, मुर्त्या अतिशय सुंदर, रेखीव घडवलेल्या असतात. राघव वही उघडतो, त्यातील पहिल्या पानावर श्री गणेशाय नमः लिहिलेले असते व गणपतीचे चित्र काढलेले असते हुबेहूब लाकडी मूर्ती सारखे असते. दुसऱ्या पानावर तुझे अस्तित्व आणि तुझा उगम असे लिहिलेले असते. तिसऱ्या पानावर अण्णांनी त्यांच्या अक्षरात काही मुद्दे लिहिलेले असतात. नमस्कार मुलांनो मी विनायक देशमुख म्हणजेच तुमचा अण्णा, तुम्ही हा लेख कधी वाचाल ह्याची मला बिलकुल कल्पना नाही, वाचताना तुम्ही कोणकोण असाल, कसे असाल? याचीही मला कल्पना नाही. तुम्ही विचार करत असाल की अण्णांनी हा लेख ह्या वहीत का लिहिला असेल? ह्या सोन्याच्या गणपतीच्या मुर्ती कशासाठी? तुमच्या मनात भरपूर प्रश्न असतील, सर्व प्रश्नांची उत्तरे हळूहळू तुम्हाला मिळतील. माझे आजोबा एक मोठे ज्योतिषी होते, त्यांनी ज्योतिष विषयाचा सखोल अभ्यास केलेला होता, वयाच्या पंधराव्या वर्षी माझे लग्न झाले त्याकाळात लग्न कमी वयातच व्हायची, लग्न झाल्यावर माझ्या आजोबांनी मला त्यांच्याजवळ बोलवून काही गोष्टी सांगितल्या की विनायक तुझं जीवन खूप हाल अपेष्टांचे जाणार आहे, नशिबाचे भोग सगळ्यांच्या वाट्याला असतात तसे ते तुझ्याही वाट्याला असणार आहेत, तुला तीन मुले व दोन मुली असणार आहेत, तुझ्याजवळ एकच मुलगा राहील बाकी दोघे तुझ्यापासून दूर निघून जातील आणि ते दूर गेल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही म्हणून तु त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नको, तुझ्या मुली चांगल्या रीतीने शिकतील, एका मुलीचे तु थाटामाटात लग्न करशील पण त्यामुळे तुझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढेल, तुझ्या मुलीही तुझ्यापासून दूर निघून जातील, तुझ्या पत्नीची तब्येत नेहमीच नरम गरम राहील, तुझी मुले मनाने व शरीराने एकमेकांपासून खूप दूर जातील, तु मृत्यू पावलास तरी ते तुझ्यापर्यंत पोहचणार नाहीत, तुझ्या मृत्यूनंतर ते एकत्र येऊ शकतील, तुझ्या दुसऱ्या पिढीतील म्हणजेच तुझ्या नात नातूपैकी कोणीतरी सर्वांना एकत्र आणण्यासाठी धडपड करेल आणि त्याला यश येईल. तुला आठ नात नातू असतील.

 माझ्या आजोबांनी अस सांगितल्यावर माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता, पण मला बरोबर तीन मुलं आणि दोन मुली झाल्या मग हळूहळू माझा त्यांच्यावर विश्वास बसू लागला, पहिल्यांदा आनंद घरातून निघून गेला, त्यावेळी आजोबांच्या बोलण्यामुळेच मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही, त्याच्यानंतर राजुही बायकोसोबत निघून गेला, सुशीलाचा माझ्यावर खूप राग असेल पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या प्राक्तनात जे असत तेच घडतं, हे कोणीही बदलू शकत नाही, जमलं तर मला माफ कर, आपला वाडा सावकाऱ्याच्या ताब्यातून सोडवला असेलच त्यासाठी धन्यवाद. आता राहील ते गणपतीच्या मूर्ती बद्दल, माझ्या नात नातूसाठी ह्या मूर्ती आहेत, माझ्या आजोबांनी संगीतल्याप्रमाणे तुम्ही जर आठ जण असाल तर या वाटून घ्या, तुमचे आई वडील एकत्र येऊ शकले ते गणपती बाप्पा मुळेच, मी दिलेली मूर्ती तुम्हाला एकत्र बांधून ठेवेल आणि माझा आशिर्वाद म्हणून ही मूर्ती कायम तुमच्यासोबत ठेवा आणि आपले मूळ विसरू नका, यापेक्षा हा विनायक देशमुख तुम्हाला काहीच देऊ शकत नाही.

       वहीतील लेख वाचुन संपला होता, सर्वांचे डोळे पाणावले होते, अण्णांच्या आजोबांनी केलेले भाकीत आज खरे ठरले होते. राघवच्या प्रयत्नामुळे व अण्णांच्या आशिर्वादामुळे सर्व देशमुख कुटुंबीय एकत्र आले होते. राघवला सर्व नात्यांचा शोध घेण्यात यश आले होते .

©®Dr Supriya Dighe