मागील भागाचा सारांश: मंजिरीची आई राघवची आत्या निघते. राघव खूप खुश होतो कारण एकतरी नातेवाईक शोधण्यात त्याला यश मिळालेले असते.
राघव सुजाता आत्त्याचा शोध लागल्याची बातमी त्याच्या आई बाबांना देतो. राघवच्या आई बाबांनाही खूप आनंद होतो.
बाबा--- राघव तुझं तर काम सोपं झालं आहे, सुजाता सर्वात लहान आहे त्यामुळे तिच्याकडे बाकीच्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतीलच. जरी पूर्ण माहिती नसेल तरी माझ्या पेक्षा जास्तच माहीत असेल.
राघव--- बाबा हा प्रवास इतका साधा सरळ नाहीये, सुजाता आत्या गेल्या दोन महिन्यांपासून कोमात आहे. तिच्या मुलीला म्हणजेच मंजिरीला आजी आजोबांच्या नावाखेरीज काहीच माहिती नाहीये. मंजिरीही आपणा सर्वांना शोधत आहे, डॉक्टरांनी सांगितलंय की सुजाता आत्त्याचा लहानपणीच्या आठवणी सांगितल्या तर ती लवकर शुद्दीत येऊ शकेल. मी मंजिरीकडून तिच्या बाबांचा फोन नंबर घेतला आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या.
बाबा--- अरे बापरे, कोरोनामुळे सुजाताला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटताही येणार नाही. सुजाताला माझी गरज आहे रे, काही झालं तरी मी तिला मदत करेल.( राघवच्या बाबांच्या डोळ्यात पाणी येते)
आई--- अस खचून जाऊ नका, तुम्ही मंजिरीच्या बाबांना फोन करून सुजाता ताईंच्या तब्येतीची चौकशी करा, डॉक्टर नक्की काय म्हणत आहेत ते बघा, मग पुढे काय करायच ते आपण ठरवू.
राघवचे बाबा लगेच मंजिरीच्या बाबांशी फोनवर बोलतात, ते त्यांना सुजाताच्या तब्येतीची पूर्ण कल्पना देतात. कोरोनामुळे सुजाताला कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला भेटता येणार नव्हते, मंजिरीचे बाबा राघवच्या बाबांना सांगतात की मी सुजाता जवळ गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो, तुम्ही सुजाताशी बोलून बघा, आपलं नशीब चांगलं असेल तर सुजाताच्या तब्येतीत थोडीफार तरी सुधारणा होईल.
मंजिरीचे बाबा सुजाता जवळ गेल्यावर राघवच्या बाबांना व्हिडिओ कॉल करतात, सुजाताला अस हॉस्पिटलमध्ये बेडवर बघून राघवच्या बाबांना अश्रू अनावर होतात, ते कसेबसे स्वतःला सावरतात आणि सुजाताला लहानपणीच्या गोष्टी, त्यांनी केलेल्या गमती जमती सांगतात. जवळजवळ एक तास त्यांचा व्हिडिओ कॉल सुरू असतो, शेवटचे पाच मिनिटं असताना सुजाता आपल्या ओठांची हालचाल करून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते म्हणून मंजिरीचे बाबा तिच्या जवळ जाऊन ती काय बोलण्याचा प्रयत्न करतेय हे ऐकतात तर ती दादा म्हणत होती आणि सुजाताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, हा चमत्कार बघून मंजिरीचे बाबा तसेच राघव आणि त्याचे आई बाबाही खूप खुश होतात. गेल्या दोन महिन्यांत सुजाता मध्ये पहिल्यांदा काहीतरी बदल जाणवला होता. डॉक्टरांनी सांगितले की रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही व्हिडिओ कॉल करत जा.
सुजाताच्या तब्येतीत झालेल्या सुधारणेमुळे मंजिरीलाही खूप आनंद होतो. राघवने काढलेल्या ट्री डायग्राम मध्ये राघव सुजाताच्या नावापुढे देशमुख च्या पुढे डॅश करून देशपांडे लिहितो, तसेच तिच्या खाली रमाकांत देशपांडे व त्याखाली मंजिरी देशपांडे लिहितो. हळूहळू देशमुखांची ट्री डायग्राम भरत चालली होती. राघवपुढे आता हे चॅलेंज होते की आता राहिलेल्या आत्या आणि काकांना कसे शोधायचे?
राघव मंजिरीला फोन करतो,
राघव--- हाय मंजिरी, तुझ्याकडे बोलण्यासाठी थोडा वेळ आहे का?
मंजिरी--- अरे बोल की, एवढी फॉर्मलिटी का करत आहेस. नातेवाईकांमध्ये एवढी फॉर्मलिटी करायची काहीच गरज नाहीये.
राघव--- मी आई बाबा आणि माझे काही फ्रेंड्स शिवाय दुसऱ्या कोणाशी बोललो नाहीये म्हणून थोड अवघडल्यासारखे वाटतेय.
मंजिरी--- माझ्यासोबत तु बिनधास्त बोलूच शकतो, बर काय म्हणत होतास?
राघव--- तुला सुजाता आत्याने तिच्या भाऊ बहीण किंवा आजी आजोबांबद्दल काही सांगितलंय का?
मंजिरी--- कधीच नाही, त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला मला आठवतही नाही.
राघव--- सुजाता आत्याला डायरी लिहायची सवय होती का?
मंजिरी--- नाही, आईला वाचनाची आवड होती, पण ती डायरी कधी लिहायची नाही.
राघव--- वाचनाची आवड माझ्या बाबांना सुद्धा आहे. बाकी सगळ्यांना कस शोधायचे?
मंजिरी--- आजोबांच्या गावी गेलं तर काही माहिती मिळू शकेल.
राघव--- हो पण त्यासाठी लॉक डाउन उघडण्याची वाट बघावी लागेल.
मंजिरी--- अरे हो मी विसरलेच होते, जसा मी गणपतीच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर बघितला होता तसच कोणीतरी बघेल आणि तुला कॉन्टॅक्ट करेल.
राघव--- पण याची गॅरंटी काय की कोणी तो फोटो बघेलच म्हणून.
मंजिरी--- त्या गावातल्या कोणाचा फोन नंबर मिळाला तर बरीच मदत होऊ शकते.
राघव--- हो पण तो मिळणार कसा? आणि शिवाय पहिले सगळ्यांच्या घरी लँडलाईन फोन रहायचे तेव्हा फोन डिरेक्टरी मधून फोन नंबर सापडायचे पण आता तर खूप क्वचित घरांमध्ये लँडलाईन आढळून येतात, आपल्याला कोणाचीच पूर्ण माहिती नाहीये मग कॉन्टॅक्ट नंबर कसा मिळवायचा?
मंजिरी--- माझं तर डोकच बंद झालंय, आई शुद्दीत आल्यावरच काही माहिती मिळाली तर मिळेल.
राघव--- मंजिरी सुजाता आत्त्याची लग्नाच्या आधीची कोणी मैत्रीण तुला माहीत आहे का? जिच्याकडून आपल्याला थोडीफार माहिती मिळू शकेल.
मंजिरी--- अरे हो हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं, संजना मावशीला थोडी फार माहिती असू शकेल.
राघव--- आता ही कोण संजना मावशी?
मंजिरी--- आईची बेस्ट फ्रेंड आहे.
राघव--- ती कुठे असते? तुझ्याकडे तिचा फोन नंबर आहे का?
मंजिरी--- संजना मावशी नाशिकला राहते आणि आजोबांचे गाव तिच्यापासून नव्वद किलोमीटरवर आहे असं मी कधीतरी ऐकलेलं आठवतंय. माझ्याकडे तिचा फोन नंबर आहे, मी तिला लगेच कॉल करते आणि तुला कळवते, बाय.
राघवने काही बोलायच्या आतच मंजिरीने फोन कट केला, राघव मंजिरीच्या फोनची वाट पाहत बसतो. साधारणतः दहा मिनिटांने मंजिरीचा फोन येतो.
राघव--- मंजिरी काय म्हणाली संजना मावशी? संजना मावशी सर्वांना ओळखते का? तिला काही माहीत आहे का?
मंजिरी--- राघव मला बोलायला देशील का? मी संजना मावशीला फोन केला होता, तर फोन तिच्या मुलाने उचलला आणि सांगितले की संजना मावशीला कोरोना झाला असल्याने ती हॉस्पिटलमध्ये आहे.
राघव--- मग आता, संजना मावशी घरी कधी येणार आहे?
मंजिरी--- तिचा मुलगा म्हणाला की साधारणतः आठ दिवस तरी लागतील.
राघव--- संजना मावशी बरी झाल्याशिवाय आपल्याला काहीच समजणार नाही.
मंजिरी--- हो ना, आपल्या हातात वाट बघण्यासोडून काहीच नाहीये.
राघव--- मी अजून काहीतरी विचार करतो, तुलाही काही आठवलं तर सांग.
मंजिरी--- हो, बाय.
राघव त्याचा मित्र अमोलला फोन करतो, आणि त्याने दिलेल्या कल्पनेमुळे सुजाता आत्त्याचा शोध लागल्याचे सांगतो पण बाकीच्यांचा शोध कसा लावायचा याबद्दल विचारतो. अमोलला आठवते की त्याच्या एका चुलत भावाचे मामाचे गाव नगर जिल्ह्यात आहे, त्या गावी एक देशमुखांचा प्राचीन कालीन वाडा आहे. अमोल राघवला सांगतो की मी त्याला विचारून तुला व्यवस्थित माहिती देतो.
अमोलचा चुलत भाऊ ज्या वाड्याबद्दल बोलतो तो वाडा राघवच्या आजोबांचाच असेल का? बघूया पुढील भागात
©®Dr Supriya Dighe
