कथा : शोकांतिका
रात्रीचा प्रहर होता. कुरुक्षेत्रावर गार वारा सुटला होता. गंगानंदन भीष्म बाणांच्या शय्येवर झोपी गेले होते. वृद्ध तरीही मुखावर तेज. लोचनात दुःख. एक खंत. कुरुवंशाचा विनाश टाळू शकले नाहीत याची. अंगावर श्वेत वस्त्रे आणि तसेच श्वेत व्यक्तिमत्त्व. कसलाच भेद न करता सर्वाना समान छाया देणारा एखादा वटवृक्ष वादळवाऱ्याने भूमीवर पडावा तसेच शंतनूसुताकडे पाहून वाटत होते. तेवढ्यात एक इसम धीमी पावले टाकत महामहीम भीष्माच्या जवळ आला.
" प्रणाम महामहीम भीष्म. " शिखंडी म्हणाला.
" प्रणाम देवी अंबा. "
गतजन्मातील आपले नाव ऐकून शिखंडीचे नेत्रे पाणावले.
" ते नाव घेऊन उगाच जखमांवरच्या खपल्या काढू नका."
" विश्वासाठी तुम्ही पांचालचे युवराज शिखंडी असले तरी माझ्यासाठी काशीची राजकुमारी अंबाच आहात. " आपल्या भारदस्त आवाजात भीष्म म्हणाले.
" तुमचा विनाश व्हावा म्हणून मी जन्मोजन्मी संघर्ष करत राहिलो. कधी समाजाशी , कधी स्वतःशी. पण आज तुमची ही अवस्था पाहून मलाच वाईट वाटत आहे. गंगात्मजा , तुमची ही अवस्था पाहवत नाही. तुमचे पुनीत रक्त शोषणारे ही कुंतीनंदन पार्थची बाणे तुम्हाला जरी भूषणावह वाटत असली तरी आम्हा सर्वांना वेदना देत आहेत. "
भीष्म हसले.
" मला माझ्या कर्माचीच फळे मिळत आहेत. बरे झाले तुम्ही इथे आलात. मला क्षमा करा. माता सत्यवतीची इच्छा होती की माझ्या लहान बंधूचा म्हणजे विचित्रवीर्य याचा विवाह व्हावा. म्हणून त्यांनी मला काशीला पाठवले. काशीच्या तीन राजकन्येचे स्वयंवर जिंकून त्यांना हस्तिनापूराला आणण्याचे कार्य मला सोपविण्यात आले होते. "
" परंतु स्वयंवर जिंकण्यासाठी वर होण्यासाठी इच्छुक असलेला प्रत्यक्ष स्पर्धक येतो."
" हो. पण तेवढे सामर्थ्य विचित्रवीर्यच्या अंगी नव्हते. त्यासमयी कुरुवंश वाढवण्यासाठी सुयोग्य राजकन्या फक्त काशीतच होत्या. म्हणून राजमाता सत्यवती यांनी साम दाम दंड भेद सर्व वापरून मला राजकन्यांना हस्तिनापूरात आणायला सांगितले होते. "
" परंतु मी मनोमन राजा शाल्वचा आपले पती म्हणून स्वीकार केला होता. तुम्ही राजा शाल्वचा पराभव केला. हस्तिनापूरला येऊन जेव्हा मी माझी इच्छा सांगितली तेव्हा राजमाता सत्यवतीने आदराने मला परत नृप शाल्वकडे पाठवले. "
" काशीच्या राजदरबारात आर्यावर्तच्या इतर राजांनी माझी थट्टा उडवली. त्यांना वाटले मी स्वतःसाठी स्वयंवरात आलो आहे. काशीनरेशनेही हस्तिनापूरला मुद्दाम आमंत्रित केले नाही. तेव्हा मला क्रोध आला. कदाचित अहंकारही. म्हणून मी सामोपचाराने न घेता तिन्ही राजकन्येचे हरण करून आलो. "
" राजा शाल्वने मला नाकारले. कारण त्यांच्यामते मी एक दान केलेली " वस्तू " बनले होते. माझी इच्छा होती की तुम्ही माझ्याशी विवाह करावा. तुम्ही तुमची प्रतिज्ञा तोडायला तयार नव्हते. माझ्या दुर्भाग्यला मी तुम्हालाच जबाबदार ठरवले. भगवान परशुराम यांनाही तुम्ही पराभूत केले. तेव्हा मला कळून चुकले की मला स्वतःलाच न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अश्याप्रकारे एका नाजूक पुष्पासम असलेल्या राजकन्येचे विषवल्लीत रूपांतर झाले. मी घनघोर तपश्चर्या केली. अर्धा देह अंबा नदीत परिवर्तीत झाला. अखेरीस मला तुमच्या मृत्यूचे कारण बनण्याचे वरदान प्राप्त झाले. अर्थातच मी धर्माच्या बाजूने असेल तरच तो वरदान खरा ठरणार होता. नंतर पांचालच्या राजवंशात स्त्रीदेहात जन्म घेऊनही माझी जडणघडण पुरुषाप्रमाणे झाली. मी पुरुषत्व मिळवले. "
" देवी , आज तुमचे उद्दिष्ट पूर्ण झाले. पहा , तुमचा सर्वात मोठा शत्रू आज असहाय अवस्थेत पडला आहे. "
" भागीरथीसुता देवव्रता , तुम्हाला जरी मी माझे शत्रू मानले असले तरी तुमचे मोठे शत्रू तुमचे स्वतःचे कुटुंबच ठरले. तुम्ही सदा राजा धृतराष्ट्रमध्ये आपले पिता राजा शंतनू शोधत राहिले. परंतु राजा धृतराष्ट्र पुत्रमोहात अडकलेले होते. माझ्या बहिणीचे वस्त्रहरण होताना जो नरेश काहीच करू शकला नाही त्याला नरेश म्हणावे का ? जो आपल्या स्नुषेचे वस्त्रहरण थांबवू शकला नाही तो राज्यातील इतर नारीजातीचे अब्रूरक्षण कसे करेल ? तुम्ही तेव्हाच प्रतिज्ञा तोडून त्या दुशासनाचे हात तोडायला पाहिजे होते आणि मांडी आपटणाऱ्या दुर्योधनाचे मस्तक धडावेगळे करायला हवे होते. दुर्योधन लहानपणीपासून षड्यंत्र करत राहिला तुम्ही दुर्लक्ष करत राहिले. भीमच्या जेवणात विष मिसळणे , लाक्षागृह जाळणे , हस्तिनापूर राज्याची विभागणी असो वा द्रौपदीवस्त्रहरण तुम्ही कधीच पांडवांची बाजू घेतली नाही. प्रतिज्ञा नावाची ढाल पुढं करून स्वतःचा बचाव केला. आज त्याची काय फलश्रुती झाली ? संपूर्ण भरतभूमीतील वीर योद्धे यमसदनी जात आहेत. रक्ताची सरिता वाहत आहे. कुरुक्षेत्रावरची माती लाल झाली आहे. हस्तिनापूर राज्यातील विधवा स्त्रिया विलाप करत आहेत. जर तुम्ही वेळीच स्वतःचे सामर्थ्य वापरून धृतराष्ट्रला पदच्युत करून युधिष्ठिरला नरेश बनवले असते तर हा प्रसंग ओढावला नसता. पित्याच्या सुखासाठी घेतलेली प्रतिज्ञा तुम्ही कधीच तोडली नाही. राजमाता सत्यवतीने जेव्हा वैधव्य प्राप्त झालेल्या अंबिका आणि अंबालिकेशी विवाह करायला सांगितला तेव्हाही तुम्ही प्रतिज्ञा तोडली नाही. निश्चितच एक पुत्र म्हणून तुम्ही जिंकले परंतु हस्तिनापूरच्या दृष्टीने तुम्ही अपराधी ठरले. हस्तिनापूरच्या हितापेक्षा तुम्हाला प्रतिज्ञा टिकवण्याचा वैयक्तिक अभिमान जास्त गरजेचा वाटला. ज्या कुटुंबासाठी एवढं केलं त्यांना तुम्ही अडगळ वाटत होते. धड पांडवांना पराभूत करत नव्हते आणि कौरवांचेही रक्षण करायचे. या बाणांपेक्षा जास्त घाव तुम्हाला एकमेकांच्या छातीवर घाव करणारे पांडव-कौरव देत आहेत. "
" खर आहे. इतिहास मला कधीच क्षमा करणार नाही. कधी कधी नकळतपणे आपल्या हातून अधर्म घडतो. आपला हेतू कितीही शुद्ध असला तरीही एखादे कृत्य पापच ठरते. मी गांधार देशात सेना घेऊन गांधारीची मागणी घालायला गेलो परंतु शकुनीला मी शक्तिप्रदर्शन करून त्याच्या प्रिय बहिणीला अंध युवराजाच्या गळ्याला बांधतोय असे वाटले. आपण कितीही चांगले वागलो तरी कुणाच्या तरी कथेत "खलनायक' ठरतोच. माझ्यामुळे तुमच्याही आयुष्यात संघर्ष आला. पारंब्याप्रमाणे जगावे लागले. "
" खरे बोललात. विवाह झाला. पुरुषत्व प्राप्त केले. पुत्ररत्नही प्राप्त झाले. प्रतिशोधाच्या आगीत जळताना आतली स्त्री मनाच्या कोपऱ्यात रडत होती. तिची आसवे कोरडी झाली. तिला कधी कुणाचे प्रेम मिळाले नाही. या जन्मात माझा विवाह फक्त समाजमान्यता मिळवण्यासाठी झाला. तो पांचाल राज्याची अब्रू वाचवण्यासाठी झाला होता. मला गतजन्मात आणि या जन्मात मनासारखे कुणाचे प्रेम मिळाले नाही. प्रेमाचा विचार करण्याचा वेळही मिळाला नाही. "
" मलादेखील यावेळी फार एकटे वाटत आहे. आयुष्यात पहिल्यांदाच खंत वाटत आहे की विवाह केला असता तर आज माझेही स्वतःचे कुटुंब असते. इतका एकटेपणा जाणवला नसता. असो. संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला आहे. प्रत्येकजण आपापल्या कुरुक्षेत्रावर लढतोय. पांडव कौरवांशी , धृतराष्ट्र पुत्रमोह-राजधर्म या द्वंद्वाशी , कर्णाला स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करायचे आहे , द्रोणाचार्याचा आपल्या प्रिय पुत्राला सर्व सुखे देण्यासाठी व सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरु आहे. पांचालीचा न्याय मिळवण्यासाठी तर केशवचा धर्मस्थापनेसाठी संघर्ष सुरू आहे. परंतु देवी अंबा , तुमच्या संघर्षाचा सदैव आदर केला जाईल. भविष्यात तुम्ही तृतीयपंथी आणि न्यायासाठी लढणाऱ्या नारीजातीसाठी प्रेरणास्थान बनाल. इतिहास साक्षी आहे की नारायणाच्या रथावर पार्थ सोडून फक्त एक व्यक्ती उभा होता. असे सौभाग्य तर फार कमी लोकांना लाभते. तुम्ही धन्य आहात. तुमची दोन जन्मे शत्रुत्वात गेली मात्र पुढच्या जन्मात माझी अर्धांगिनी बना. "
" मला क्षमा करा. तुम्हाला समजण्यात चूक झाली. तुम्ही श्रेष्ठ आहात. महापुरुष आहात. स्वतः नारायणही तुमचा आदर करतो. चुका सर्वांकडून होतात. पण तुम्ही धर्मात्मा आहात. स्वर्गात देवही तुमच्या स्वागतासाठी उत्सुक असतील. तुम्ही आर्यावर्तचे रत्न आहात. गंगेचे पुत्र म्हणून शोभतात. गंगा नदी जसे सर्वाना पापमुक्त करते तसच तुमच्या मुक्तीला कारणीभूत झाल्यामुळे मीदेखील पवित्र झाले. प्रतिशोधाच्या आगीत जळण्यापेक्षा मी काहीतरी चांगले कार्य करू शकले असते. सुख याच गोष्टीचे वाटते की धर्माच्या स्थापनेसाठी मधुसूदनाने जो यज्ञ मांडला आहे त्यात मलादेखील खारीचा वाटा उचलता आला. कुरुवंशभूषण , मी नक्कीच तुमची अर्धांगिनी बनेल पुढच्या जन्मी. फक्त आपला राजवंशात जन्म व्हायला नको हीच महादेवचरणी प्रार्थना. सर्वसामान्य घरात जन्म होऊन सर्वसामान्य माणसाप्रमाणे संसार करू. कसलेच बंधन नको. " इतके बोलून शिखंडीने भीष्माला नमस्कार केला आणि शत्रूच्या या अवस्थेने आनंदी होण्याजागी आपण दुःखी का होतोय हा विचार करत व लोचनात आसवांची गर्दी करून तो निघून गेला.
