Login

कितीदा समजावले तरी

कितीदा समजावले तरी
कुरियरने आलेले पार्सल मानसीने घेतले, आणि कार्डने पेमेंट केले ,उघडून बघितले तर त्यात तिने ऑर्डर केलेली पर्स होती. बघून ती मनोमन खुश झाली .ऑनलाइन तिने पाहिली, त्याच वेळेला तिला ती मनात भरलेली होती. आता उद्याला ह्याच्यावर मॅचिंग होईल अशी कुरती घेतली आहे त्याचीही डिलिव्हरी येईलच ते दोन्ही घालून किती छान दिसू आपण, या विचाराने मानसी मनोमन प्रसन्न झाली. तिच्या कलेक्शन मधली ही 75 रावी पर्स होती .आता या 75 पर्सेस तिने किती वेळा वापरल्या होत्या हा भाग अलाहिदा .
मानसीला ऑनलाइन खरेदीचे गेल्या काही दिवसांमध्ये खूपच वेड लागले होते. फेसबुक वर येता-जाता जाहिराती पहायच्या आणि जे आवडते ते विकत घेत राहायचे.स्वतः नोकरी करत असल्यामुळे स्वतःचे चांगले इन्कम होते आणि पैशांचे काय होते हे विचारणार घरात कोणी नव्हतं. तिचा नवरा मानव चांगल्या ठिकाणी काम करत होता, त्यामुळे पैसा मुबलक होताच आणि ही साठवणूक करण्यासाठी कपाटे आणि इतरही अनेक गोष्टींचा घरात तिने किती पसारा केला होता ,याचे तिचे तिलाच भान नव्हते अशा वेळेला तिच्या घरी तिची बहीण केतकी आली दरवेळी नवीन केलेली खरेदी ती तिला आपुलकीने दाखवत असे त्याच प्रमाणे तिने ती पर्सही दाखवली आणि नेहमीप्रमाणेच केतकीने तिला ऐकवायला सुरुवात केली.
ती म्हणाली "अगं किती विकत घेत असतेस आणि घेतेस तर घेतेस आणि जुने टाकूनही देत नाहीस किती पसारा करत असतेस तू घरामध्ये "
"ताई किती बोलत असतेस ग मला आहे माझ्याकडे पैसे घेत असते मी आणि कमावते ना मी त्याच्यासाठी कष्ट करून आणि ठेवायला जागा आहे घरात, तरीपण तू सारखी ऐकवत असतेस "
"हे बघ मानसी तू चुकीचं वागत असलीस तर तुझी मोठी बहीण म्हणून तुला समजावून माझं कामच आहे म्हणून मी नेहमी तुला सांगत असते पण बघावं तेव्हा "पालथ्या घड्यावर पाणी" तुझी आपलं खरेदी चालूच असते अगं मानसी कुठेतरी आपला आपल्या मनावर संयम हवा न. इच्छा आणि गरज याच्यामध्ये आपल्याला वेगळं करता यायला हवं ना .उगाचच आहे म्हणून घेत सुटायचं याला काही अर्थ आहे का ?त्यापेक्षा ते पैसे साठव ,बचत कर कुठेतरी गुंतवून ठेव म्हणजे ते वाढतील आणि पुढे कामी पडतील.आहेत पैसे म्हणून खर्च करत सुटायचं याला काही अर्थ आहे का आयुष्यात येणाऱ्या अडचणी साठी पैसे बचत करून ठेवले पाहिजे तुझ्याकडे पैसे आहेत तर खरेदी करायला मी नाही म्हणत नाही पण त्याला काही लिमिट हवी की नाही ,मर्यादा हवी की नाही ,उगाच आपलं घेत सुटायचं, आता तुझ्याकडे तूच सांगतेस 75 वर्सेस आहे त्यापैकी किती नेहमी वापरण्यात असतात विचार कर बरं आयुष्यात अडचणी सांगून येत नसतात, त्यामुळे त्याच्यासाठी आपण तयार असावे लागते "
"अग पण ताई आपल्यावर अडचणी येतील असा नकारात्मक विचार करायचाच कशाला चालू आहे ना सगळं चांगलं ,कुठे काय वाईट होणार आहे "मानसी
"तुला कसे समजावे तेच कळत नाही बरं तू नवीन घेत असते, पण जुने टाकून देत नाही तुला फेंगशुईचा नियम माहित आहे ना की सहा महिने वापरात नसलेली गोष्ट आपण काढून टाकायला पाहिजे आता तुझ्या कडच्या या पर्सेस मधल्या जुन्या कुठेतरी देऊन टाक, कपडेही असेच साठवून ठेवतेस, ज्यांना गरज आहे त्यांना ते वापरता येतील अशा ठिकाणी दे अनाथाश्रमात दे महिला आश्रमामध्ये दे " केतकी
"अग पण मला कळतच नाही कुठले कपडे देऊन टाकावेत कुठल्या पर्सेस देऊन टाकाव्यात खूप कन्फ्युज असते बाई मी "मानसी
"चल मी तुला मदत करते आपण तुझे कपाटावर आवरुया आणि तू वापरात नसलेल्या पर्सेस आणि कुर्तीज, कपडे सगळं काढून टाकू या ,आणि मला माहित आहे येथे गावाजवळ जो अनाथ आश्रम आणि महिला आश्रम आहे तिथे नेऊन देऊया किमान ते लोक वापरतील आणि तुला दुवा तरी देतील "
नाहीतरी मानसीला आवराआवर करायचं होतं आणायचे ताई आहे सोबत तर चला करून टाकूया असं म्हणून तिने आवरायला घेतलं आणि ती स्वतः चकित झाली, कितीतरी पर्सेस बिनकामाच्या होत्या, त्याच प्रमाणे कुर्तीज कपडेही जे गेले दीड-दीड दोन-दोन वर्ष वापरले नाही,असे कपड्याच्या कपाटात कुठेतरी कोपऱ्यात पडलेले होते. ताई च्या मदतीने जवळपास तीन तास आवराआवर करून मानसीने चार-पाच पोती न वापरलेल्या आणि टाकाऊ गोष्टी गोळा केल्या आणि त्या नेऊन देण्याचे ठरवले. निघताना ताईने तिला आणखीन एक गोष्ट सांगितली "आता किमान सहा महिने तरी तू काहीच खरेदी करण्याची आवश्यकता नाही हे तुला कपा आवरल्याने त् कळलेच असेल, त्यामुळे आता या पुढे सहा महिने मानसी खरेदी करायची नाही "
"हो ग ताई आता हा पसारा आवरता ना खरंच मला पटले आहे तुझे की आपण उगाचच काही गोष्टी जमवून ठेवतो आणि नंतर त्या वापरातही येत नाही त्यामुळे खरंच याच्यापुढे काही खरेदी करणे थांबवायचे बरं का हे मी मनाला पक्के समजावले आहे "
ताई गेल्यावर मानसी फेसबुक बघायला बसली आणि त्याच्यामध्ये तिला पुन्हा जाहिराती दिसायला लागल्या पण तिने मनामध्ये "कंट्रोल कंट्रोल "असं म्हणत म्हणत पुढे जात होती .आता तिला फेसबुक आणि व्हाट्सअप वर स्टेटस ही अपडेट करायचे होते ना ,की मी जुन्या बऱ्याच गोष्टी काढून टाकल्या आहेत .
तिने मनाप्रमाणे स्टेटस टाकले आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनी ही लाईक ,कमेंट करायला सुरुवात केली .आणि त्यातल्या एका मैत्रिणीची कॉमेंट्री भारी होती" अग मानसी काढलंच म्हणजे नवीन आणण्यासाठी भरपूर जागा केलीस बरं का "
आणि मानसीला एकदमच "युरेका युरेका" असे वाटले म्हणजे आपण आता नवीन घेऊ शकतो की .
आणि तितक्यातच तिला एक छानशा कुर्ती ची जाहिरात डोळ्यासमोर आली ती घेतल्याशिवाय तिला ते फेसबुक वरच पुढे जाववेना.
शेवटी एका डकुरतीने काय मोठा फरक पडणार आहे असा विचार करून तिने त्याची ऑर्डर दिली आणि तो फोटो आपल्या ताईला पाठवला ताईने त्याच्यावर एकच कॉमेंट पाठवली "पालथ्या घड्यावर पाणी "

भाग्यश्री मुधोळकर
0