Login

शॉर्ट कट भाग १

शॉर्टकट भाग १
भाग १

"बाबा! बाबा! बघा... मी वर्गात पहिला आलोय! गणितात तर पैकीच्या पैकी गुण मिळालेत!" सक्षमचा आवाज संपूर्ण घरात घुमला.

पुण्यातील एका मध्यम वर्गीय घरात संध्याकाळची वेळ होती. विवेक आपल्या बाल्कनी मध्ये आरामखुर्चीत बसून चहाचा आस्वाद घेत टॅबलेट वाचत होता. तेवढ्यात घराच्या उंबरठ्यावर सक्षम आनंदाने ओरडतच आत आला. त्याचा चेहरा उत्साहाने लाल गुलाबी झाला होता. तो हातातील कागद हवेत फडकवत होता.

विवेकनी चष्मा नीट केला आणि सक्षमच्या हातातील सहामाही परीक्षेची गुणपत्रिका घेतली. गणितात ९८, विज्ञानात ९५, इंग्रजीत ९४. गुणांचा आकडा खरोखरच थक्क करणारा होता. सक्षमला वाटले होते की बाबा त्याला उचलून धरतील, शाबासकी देतील. पण विवेकच्या चेहऱ्यावर एक  शांतता होती. त्यांच्या तीक्ष्ण नजरेत कौतुका ऐवजी एक प्रकारची शंका डोकावत होती.

" अभिनंदन सक्षम ! मार्क तर खूपच छान आहेत." विवेक संथ आवाजात म्हणाले.

" पण एक विचारू का ? तुझा मित्र अद्वैत सांगत होता की गणिताचा पेपर खूपच फिरवून विचारला होता. तुला ट्रिगनोमेट्रीचे काही अवघड प्रश्न इतक्या सहज कसे सुटले रे ? तु तर त्या लेसानच्या प्रॅक्टीस मध्ये कच्चा होता ना ? "

सक्षमचा चेहरा क्षणार्धात पांढरा पडला. त्याचे हसणे ओसरले. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. तो अडखळत म्हणाला,

" ते... ते... हो बाबा, मी शेवटच्या दोन दिवसात खूप मेहनत घेतली, म्हणून सोपे गेले."

विवेकनी समोरचा एक कोरा कागद आणि पेन सक्षमच्या दिशेने सरकवले.

"बरं, मग मला 'पायथागोरस थियरम' या कागदावर सिद्ध करून दाखव बरं. नऊ मार्कांचा प्रश्न होता ना हा?"

सक्षमच्या हाताला कंप सुटला. सत्य हे होतं की त्याने गणिताचा कोणताही सराव केला नव्हता. परीक्षेच्या आदल्या रात्री त्याच्या एका मित्राने त्याला 'लीक' झालेली प्रश्नपत्रिका दिली होती. सक्षमने फक्त उत्तरे पाठ केली होती, त्याला त्यामागचे सूत्र किंवा तर्क माहीतच नव्हता. तो कागदाकडे टक लावून पाहत उभा राहिला, पण पेन कागदाला स्पर्श करू शकले नाही.

" काय झालं सक्षम ? ज्या मुलाला ९८ गुण मिळालेत, त्याला साधी डेफीनेशन लिहिता येत नाहीये ? " विवेकचा आवाज आता गंभीर आणि कठोर झाला होता.

सक्षमने मान खाली घातली. त्याला जाणीव झाली की त्याने मिळवलेले हे यश 'मिळवलेले' नसून 'चोरलेले' आहे. त्याच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागले.

विवेक खुर्चीतून उठले. त्याने सक्षमच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय शांतपणे म्हणाले,

" सक्षम, तुला वाटतंय तू मला फसवतोयस ? नाही बाळा, तू स्वतःला फसवतोयस. हे जे गुण तुला मिळालेत ना, ते वाळूच्या किल्ल्यासारखे आहेत. संकटाचा एक वारा आला की ते कोसळून पडतील. न लढता लढाई जिंकल्याचा भास होतोय तुला, पण ही तुझी सर्वात मोठी हार आहे."

सक्षम रडत म्हणाला,
"बाबा, मला माफ कर. मला वाटलं होतं मार्क महत्त्वाचे असतात."

विवेक खिडकीबाहेर पाहू लागला , जिथे काळोख दाटून आला होता. तो म्हणाला ,

" सक्षम, उद्या सकाळी आपण एका ठिकाणी जाणार आहोत. तिथे तुला समजेल की 'खरा विजय' कशाला म्हणतात. उद्या पहाटे ५ वाजता तयार राहा. ही तुझी शिक्षा नाही, तर तुझी खरी परीक्षा आहे."

सक्षम चक्रावून गेला. कुठे नेणार होते बाबा त्याला? आणि त्या एका प्रवासाने त्याचे आयुष्य कसे बदलणार होते? ही तर फक्त सुरुवात होती.