ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
टीम श्रावणी
" मग... माझ्या चुकीमुळे बाकी सगळ्यांना नुकसान होईल. त्यांना देखील त्यांचे पैसे भेटणार नाही असं सांगितले हो त्यांनी. मला खूप गिल्ट आले त्या गोष्टीचे. बाकीच्या चार जणांनी अर्ध्या तासात त्यांचे पैसे भरले. मग तर मी अजूनच घाबरले. कारण आता फक्त माझ्या एकटी मुळे कोणालाच पैसे भेटणार नाही. काय करू काहीच समजत नव्हते मला तेव्हा. घरात मिस्टरांनी मला घर खर्चासाठी जे पैसे दिले होते ते मी पटकन जाऊन बँकेत भरले आणि ऑनलाईन त्यांना पाठवून दिले. तेवढे पैसे भरून झाल्यावर मला वाटलं सगळे पैसे परत भेटतील आणि मी लगेच एटीएम मधून पैसे काढून घरात ठेवीन. असाच विचार करून मी थोडी रिलॅक्स झालेच होते की त्यांनी पैसे पाठवण्याऐवजी अजून एक मेसेज पाठवला. अजून पैसे लागतील असे म्हणाले. तो आकडा ऐकून मी गारच पडले साहेब. माझे हातपाय गळाले. समजलंच नाही मी आता काय करू ते. एवढे पैसे नव्हते हो साहेब माझ्याकडे. त्यात मिस्टरांना कळालं तर... ते जीवच घेतील माझा... मी खूप विनवणी केली त्यांना की किमान आधी जे भरले होते तेवढे तरी पैसे परत द्या मला. बाकी मला काही प्रॉफिट नको. मला हे काम देखील नको. पण त्यांनी पुन्हा तेच सांगितले. 'आता हे पैसे भरा. तुम्हाला आधीचे पैसे, तुमच्या प्रॉफिट सकट हे पैसे देखील मिळतील. जो पर्यंत पुढची रक्कम भरत नाही तोपर्यंत आधीचे पैसे देखील भेटणार नाहीत. काळजी करू नका तुम्हाला तुमचे सगळे पैसे भेटतील तुम्ही आता एवढी रक्कम भरा' असा मेसेज पाठवला त्यांनी मला. मी त्यांना सांगितले माझ्याकडे खरंच पैसे नाहीत परंतु, त्यानी माझं काहीच ऐकले नाही. मी निराश झाले. मी माझ्या बहिणीला फोन केला तेव्हा तिने मला इथे यायला सांगितले. साहेब, प्लिज... मला माझे पैसे मिळवून द्या..." राधिका हात जोडून त्यांच्या समोर रडू लागली.
" तुम्ही शांत व्हा मॅडम. हे बघा, आम्ही आमचे सगळे प्रयत्न करणार या केसमध्ये. तुम्ही आम्हाला ते ऑनलाईन ट्रान्झेक्शन झाले ते दाखवा जरा." इन्स्पेक्टरच्या सांगण्यावर राधिकाने त्यांना मोबाईल दाखवला. त्यांनी सगळं नोट करून घेतले.
" साहेब..." त्यांनी मोबाईल परत दिल्यावर राधिकाने त्यांच्याकडे आशेने पाहिले.
" हे बघा मॅडम. आम्ही तुम्हाला खोटी आश्वासने देणार नाही. हा ऑनलाइन फ्रॉड आहे. ह्यात एकच व्यक्ती जोडलेला नसतो. यांची पूर्ण एक टीम असते. तुमच्या सोबत असलेले ते चार जण... ते देखील त्यांचीच माणसे असतात. तुम्ही पाठवलेले पैसे त्यांच्या खात्यावर न जाता त्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पाठवायला सांगितले होते तुम्हाला. त्या व्यक्तीने ते पैसे काढले तर आम्ही काहीच करू शकणार नाही. जर अकाउंटवर असतील तर आम्ही पुन्हा ते तुमच्या अकाउंटवर पाठवू शकतो. परंतु, त्याचे चान्सेस खूप कमी असतात. तुम्ही आता जा... पुढच्या आठवड्यात या. तोपर्यत बघू अजून काही हाती लागतंय का. या आता..." इन्स्पेक्टरने तिला जायला सांगितले तसं ती त्यांना नमस्कार करून तिथून निघाली.
" हा बोल... का बोलले पोलीस?" बाहेर आल्यावर राधिकाने मोनिकाला कॉल केला. मोनिका देखील तिच्याच फोनची वाट बघत होती.
" सांगितले मी त्यांना सगळं. त्यांनी..." राधिकाने पोलीस काय म्हणाले ते सविस्तर सांगितले.
" बरं... ठीक आहे. तक्रार केली आहेस ना मग आता टेन्शन घेऊ नकोस. सगळं ठीक होईल. आणि आता असं पुन्हा शॉटकट मारायला जाऊ नकोस." मोनिका तिला समजावू लागली.
" हम्म... कोणाला हौस असते मोनी. तू जॉब करतेस. मी घरातच असते. घरात असलेल्या बाईला सगळ्या समाजासोबत घरच्यांचे देखील बोल ऐकावे लागतात. घरात असणाऱ्या बायकांना काय काम असते. त्यांना कुठे स्वतः कमवायला जायचे असते. पैसे खर्च करायला पाहिजे असेल तर नवऱ्याकडे मागावे लागतात. त्यातही मी एकटाच कमवतो. कुठे कुठे लक्ष देऊ मी तुला काय मागायला जातेय. इथे घर कसं चालवतोय हे मलाच माहित असे टोमणे ऐकावे लागतात. मी फक्त घरात आर्थिक मदत करायला गेले गं. मला काय माहित असं काही होईल. आता घरच्या पैशाचे टेन्शन आले आहे मला."
" डोन्ट वरी. मी माझ्या कामातल्या मॅडम सोबत बोलले आहे. त्यांनी व्याजावर पैसे द्यायचे कबूल केले आहे. उद्या पर्यंत तुझ्या अकाउंटवर पैसे पाठवते."
राधिका बोलत होती की मोनिकाने तिला सांगितले. ते ऐकून राधिकाला बरे वाटले.
" थँक्यू मोनी. मी पैसे लवकरच परत करेल." राधिका कापऱ्या आवाजात बोलली.
" वेडी आहेस का? थँक्यू काय त्यात. आणि पैसे द्यायचे काही गडबड नाही. फक्त व्याज महिन्याला द्यावे लागेल. आणि तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे तुझ्या सोबत. आपण करू मॅनेज सगळं." मोनिकाच्या शब्दांनी राधिकाला धीर आला.
घरी आल्यावर राधिका थोडावेळ हॉलमध्येच सोफ्यावर बसली. थोडं पाणी पिल्यावर तिला बरं वाटलं. सकाळी मरणाचा विचार करणारी ती आता शांत झाली होती.
" का रे देवा. थोडं सुख पदरात देऊन आयुष्यभराचं दुःख दिलेस तू मला. माझं ठीक आहे माझ्या पाठीशी माझी बहीण आहे खंबीरपणे उभी. परंतु, ज्या महिला घराला आर्थिक मदत करण्यासाठी घरातून काम शोधत असतील त्यांना असे जर फसवे लोक मिळाले आणि त्यांनी त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतला तर. आधीच तंगी आणि त्यात हा असा फ्रॉड... कसं जगणार रे त्या बायका सांग देवा. नशीब माझं म्हणून थोडक्यातच मी वाचले. नाहीतर..." राधिका भरल्या डोळ्यांनी भिंतीवरील देवाच्या फोटोकडे पाहत होती.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा