ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
टीम श्रावणी
" हो... ते सगळं खोटं आहे. तुला अडकवले आहे त्यांनी. तुझा फायदा घेत तुझ्याकडून पैसे काढले आहेत त्यांनी. राधिका, तू आता जास्त वेळ वाया घालवू नकोस. पटकन पोलीस स्टेशनला जा आणि तक्रार कर." मोनिका बोलली तसं राधिकाने अश्रू पुसत विचार केला.
" नमस्कार साहेब. मला तक्रार करायची होती." मोनिकाच्या सांगण्यावरून राधिका लगेचच पोलीस स्टेशनला आली.
" हा बोला ना." तिथल्या इन्स्पेक्टर साहेबांनी एफआयआरची बुक हातात घेतली.
" साहेब. माझ्यासोबत फ्रॉड झाला आहे. ऑनलाईन काम करत होते तिथे पैसे भरले मी."
" अच्छा. ऑनलाईन का... अहो मग हा सायबर गुन्हा झाला. त्याची एफआयआर आमच्याकडे नाही होत. ती सायबर डिपार्टमेंटची केस आहे. तुम्ही तिथे जा. बाहेर गेल्यावर डाव्या बाजूची तिसरी केबिन आहे सायबर क्राईम वाल्यांची." इन्स्पेक्टरने सांगितल्यावर राधिका त्यांचे आभार मानून तिथून निघाली.
दुसऱ्या केबिनच्या बाहेर आली असता तिला तिथे काही माणसे बाहेर वाट बघताना दिसली. ते देखील तिथे तक्रार नोंदवायलाच आले होते. राधिका देखील रांगेत बसली. तिचा नंबर आल्यावर ती आत मध्ये गेली.
" हा बोला मॅडम. काय तक्रार आहे?" समोर खुर्चीवर बसलेला इन्स्पेक्टर अदबीने बोलला.
" सर... माझ्या सोबत फ्रॉड झाला आहे." राधिका काकुळतीने बोलली.
" किती पैसे गेले?" त्या इन्स्पेक्टरने लगेच पुढचा प्रश्न विचारला.
" ते... छत्तीस हजार दोनशे साठ रुपये." राधिकाने कचरत उत्तर दिले.
" नेमकं काय झालं ते सांगता का?" इन्स्पेक्टरने तिच्याकडे पाहिले.
" हो साहेब. दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच मंगळवारी बघा मला एक व्हाट्सअप मेसेज आला होता. घरबसल्या काम आहे तुम्ही करू इच्छित आहात का म्हणून त्यांनी विचारले. मी देखील हो म्हणून सांगितले. त्यानंतर त्यांनी कामाचे स्वरूप मला शिकवले. एक लिंक देणार ते त्यावर फक्त क्लिक करायचे. ती ओपन होताच समोर एक साईट येते. त्याला फक्त लाईक आणि कंमेंट करायची त्याचे जे काही चार्जेस होतील ते ती लोक माझी कमाई म्हणून मला देतील. डेमोसाठी त्यांनी दोन टास्क दिले होते मला. मी ते पूर्ण केले. व्हेरिफाय करून त्यांनी लगेच माझ्या अकाउंटवर पैसे पाठवले. आणि पुढे काम करणार का म्हणून देखील विचारले. साहेब, मला वाटलं सोपं काम आहे घरबसल्या थोडे पैसे मिळतील म्हणून... म्हणून मी देखील तयार झाले. नंतर त्यांनी मला टेलेग्रामवर अकाउंट चालू करायला सांगितले. तिथेच तुम्हाला पुढचे सगळे टास्क करायचे आहेत असे सांगितले. मी लगेच ते चालू केले. तिथे मला एक ट्रेनर देण्यात आला. त्यांनीच पुढचे टास्क मला दिले. प्रत्येक टास्कमागे मला दीडशे ते दोनशे रुपये मिळाले. दहा टास्क पूर्ण झाल्यावर मला दीड हजार रुपये मिळाले. माझे बँक डिटेल्स घेऊन त्यांनी लगेच माझ्या बँक अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले. पहिल्यांदा माझ्या अकाउंटवर माझी स्वकमाई आलेली पाहून मला खूप आनंद झाला. मग त्यांनी पुढे काम करणार का असं विचारले. मी त्यांना आज नको म्हणून सांगितले. त्याक्षणी जास्त होतंय असं वाटले मला म्हणून मी तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी मला पुन्हा मेसेज केला आणि पुन्हा काम करण्यासाठी विचारले. मी हो म्हणून सांगितले. मग त्यांनी मला दुसऱ्या एका माणसाचा टेलेग्रामचा अकाउंट दिला. तिथे जॉईन व्हायला सांगितले. तसं मी तिथे जॉईन केले. त्यांनी मला स्टेप बाय स्टेप काही टास्क करायला दिले. त्यांनी सांगितले तसं मी करत गेले. त्यात आधी स्वतः कडील पैसे ऍड करायला सांगितले त्यांनी मला. ते देखील मी केले. या भरवश्यावर की ते पैसे प्रॉफिट सोबत परत मलाच मिळणार आहेत. तो देखील टास्क मी सहज काहीच मिनिटांत पूर्ण केला. आणि त्याचा मोबदला म्हणून पाच हजार रुपये मला लगेचच मिळाले. मला त्यांच्या कामावर विश्वास बसला. मी खूप खुश झाले. त्यातच अजून एक टास्क करण्यासाठी त्यांनी मला पाच हजार इन्व्हेस्ट करायला सांगितले. त्याबदल्यात मला प्रॉफिटसह सात हजार मिळणार होते. आतापर्यंत केलेल्या कामाच्या अनुभवावरून मी लगेच तयार झाले टास्क करण्यासाठी. त्यानंतर त्यांनी मला एका दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड केले. तिथे अजून चार जण होते. तिथल्या ट्रेनरने सांगितल्याप्रमाणे आम्ही पाच जणांनी टास्क करायला सुरुवात केली. पहिली पायरी पूर्ण केल्यावर त्यांनी सांगितले की मी आणि त्या ग्रुप मधील अजून एकाने चुकीचा टास्क केला. त्यामुळे त्यांच्या कंपनीला फ्रीझ करण्यात आले. सगळे अकाउंट फ्रीझ झाल्यामुळे त्यांनी पेनल्टी लावली. पैसे भरल्यानंतरच आम्हाला आमचे पैसे मिळतील असे त्यांनी सांगितले. पेनल्टी म्हणून जे पैसे भरू ते देखील परत मिळतील असं म्हणाले हो ते..." राधिका रडू लागली.
" मग पुढे? पुढे काय झाले?" इन्स्पेक्टरने तिला पाणी देत विचारले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा