ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
झपाझप पाय टाकत ती रस्त्याने सैराभैरा चालत होती. विस्कटलेले केस होते, डोळ्यांतून अश्रूंच्या धारा गालावरून ओघळून जात होत्या. टेन्शनने हातपाय थरथर कापत होते तिचे. काय करू, कुठे जाऊ या संभ्रमात ती फक्त वाट दिसेल तिकडे जात होती. असंच... निरंतर चालत होती. अचानक तिच्या बॅगमधला मोबाईल वाजला.
" ह... हॅ... लो... हॅलो..." ती रडक्या आवाजात बोलली.
" हॅलो... राधिका... काय गं? काय झाले? तुझा आवाज का असा येतोय? तू ठीक आहेस ना?" पलीकडून तिची बहीण मोनिका काळजीच्या सुरात बोलली.
" नाही ना... मोनी... अगं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. काय करू मी? मी चुकले गं. मला ना काहीच समजत नाही मोनी. जीवच द्यावासा वाटतोय मोनी मला..." राधिका एकाएकी ओक्साबोक्सी रडू लागली.
" तू... तू आधी शांत हो बरं राधिका. आणि... नेमकं काय झालंय ते मला नीट सांग जरा?" तिचा आवाज आणि रडणं ऐकून मोनिका देखील टेन्शनमध्ये आली.
" काय सांगू मोनी... मी फसले गं. त्यांनी मला फसवले." राधिका अजूनच रडू लागली.
" राधिका राधिका... तू शांत हो आधी. रडणं बंद कर पहिलं तर ते. तू... तू बाहेर आहेस का कुठे? कुठे निघाली आहेस?" आजूबाजूच्या गाड्यांचा आवाज येताच मोनिका घाबरली.
" मी... मी आहे इथेच... मला काहीच समजत नाही." राधिका भांबावून इकडे तिकडे बघू लागली.
"राधिका तू आधी तर एका जाग्यावर नीट थांब. आणि मला नीट सांग काय झाल आहे ते?" मोनिका आता तिच्यावर चिडून बोलली.
" मोनी. मी ऑनलाईन काम करत होते. चार दिवस झाले. सुरुवातीला छान प्रॉफिट झाला. म्हणून मी माझा पूर्ण वेळ ते काम करू लागले. आणि आज... आज एक चूक झाली माझ्याकडून. माझ्यामुळे त्यांना नुकसान झाले त्यांनी मला काही पैसे भरायला सांगितले. ते भरलेले पैसे आणि माझे प्रॉफिट मला परत मिळणार असं सांगितले. म्हणून मग मी पैसे भरले गं. पण... पण त्यांनी अजून पैसे भरायचे आहे असं मला सांगितले. एवढी मोठी रक्कम ऐकूनच मी घाबरले मोनी. आणि आता ते पैसे नाही भरले तर आता पर्यंत भरलेले सगळे पैसे आणि मला मिळालेलं माझं प्रॉफिट यापैकी काहीच मिळणार नाही मला. माझ्यामुळे बाकीच्या लोकांचे देखील पैसे मिळणार नाही असं म्हणाले गं ते मला. मला काहीच समजत नाही मोनी मी काय करू? माझं देखील नुकसान होईल आणि माझ्यामुळे बाकीच्या लोकांचे देखील नुकसान होईल. पण मोनी माझ्याकडे आता परत भरायला खरंच पैसे नाहीत गं. आधी जे पैसे मागितले ते मी तुझ्या भावजीने जे घरात खर्चाला दिले होते त्यातले दिले. ते पैसे मी तिथे भरले. आता जर तुझ्या भावजीला हे समजले तर तो जीवच घेईल माझा. त्यापेक्षा मीच जीव देते आता." राधिका पुन्हा रडू लागली.
" वेडी झालीस का तू राधिका. आधी तर ते रडणं थांबव. तू एक काम कर. मला स्क्रीनशॉट पाठव त्याचे. तुमच्यात काय बोलणं झालं ते." मोनिका असं म्हणताच राधिकाने तिला सगळे स्क्रीनशॉट पाठवले.
" आधी जे आहेत ते आमच्या ग्रुपचे मेसेज आहेत. आणि नंतरचे मेसेज आहेत ते त्या ग्रुपचे सर आहेत. त्यांना पर्सनल मेसेज केले होते मी. त्यांना सांगितले माझ्याकडे पैसे नाहीत. तर ते म्हणाले तुम्ही कुठून तरी अरेंज करा. हवा तर वेळ घ्या. एका तासांत पैसे भरा. तुमच्या अकाउंटवर लगेच ते पैसे आणि तुमचं प्रॉफिट परत पाठवले जातील. आता कामात चूक झाली आहे तर सगळ्यांचेच अकाउंट फ्रीझ झाले आहेत. तुमच्यामुळे त्यांना देखील त्यांचे पैसे भेटणार नाहीत. एकट्या तुमच्यामुळे तुमच्या सगळ्या ग्रुपला नुकसान होईल. म्हणून मला टेन्शन आले."
" एक मिनिट राधिका... अगं... हा ऑनलाईन फ्रॉड आहे. तुला ट्रॅप केलं आहे त्यांनी. तू आधी एक काम कर. आताच्या आता पोलीस स्टेशनला जा आणि तक्रार दे. लवकर देशील तर काहीतरी हाताला लागेल. अशी रडत बसू नकोस." राधिका बोलत होती तोपर्यंत मोनिकाने स्क्रीनशॉट वाचले.
" काय? म्हणजे ते सगळं खोटं आहे. म्हणजे ती माणसे... ते..." राधिकाला काहीच समजत नव्हते. ती पुरती गोंधळून गेली होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा