Login

शौर्याचा शब्द

सैनिक म्हणजे केवळ बंदूकधारी माणूस नाही. तो त्याग, शिस्त, कर्तव्य आणि प्रेमाचा जिवंत अर्थ आहे.
शौर्याचा शब्द


पहाटेचे धूसर वातावरण. कॅम्पच्या पूर्वेकडून येणारा हलका सूर्यप्रकाश अजून जमिनीला उब देत नव्हता. धुक्याच्या थरातून दिसणारे हिरवेगार पर्वत आणि त्याच्या पोटात दडलेला सैनिकी तळ, इथूनच सुरू होत होती कॅप्टन अर्जुन नाईक यांची आणखी एक दिवसाची धडपड.

अर्जुन आज नेहमीपेक्षा जास्त शांत होता. त्याच्या मनात मात्र वादळ उसळत होतं. आज त्याच्या घरी मुलीचा वाढदिवस होता. प्रत्येकी वर्षी तो या दिवशी जिथे असेल तिथून किमान व्हिडिओ कॉल तरी करत असे. पण यावर्षी कॉल करण्याचीही सोय नव्हती. सीमेवरील ‘ऑपरेशन कवच’ सुरू होतं, आणि फोन, इंटरनेट, सगळं बंद.

त्याच्या जॅकेटच्या आतील खिशात छोटी गुलाबी रिबन होती. त्याच्या मुलीने दिलेली. “बाबा, हे कायम सोबत ठेव. तुला माझी आठवण येईल,” ती म्हणाली होती.
तेच रिबन तो हलकेच स्पर्शून घेत होता.

सीमेवर हलती हवा आली की सैनिक लगेच सावध होत. कारण शत्रूची कोणतीही हालचाल या भागात क्षणात बदल घडवू शकत होती. अर्जुन आपल्या पथकाचा नेता होता, त्याच्या पथकात १० जवान. सगळ्यांच्या डोळ्यांत विश्वास होता, “कॅप्टनसोबत असताना आम्ही कधी पडणार नाही.”

अचानक वायरलेस सेटवर बातमी आली,
“इंटेलिजन्स रिपोर्ट: दोन गटांनी LOC जवळ घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.”
अर्जुनने नकाशा पसरवला. “आपण पूर्वेकडचा दरडा पकडू. ते हाच रस्ता निवडतील,” तो ठाम आवाजात म्हणाला.

रात्री १ वाजता पथक निघाले. चंद्र हलका होता, अंधार जाड. डोंगराच्या उतारात पाय ठेवताना आवाजही झाला नाही पाहिजे. सैनिकी शिस्त ही फक्त ट्रेनिंग नसते, ती अंगात भिनलेली जीवनशैली असते. चढताना अर्जुनला मुलीचा हसरा चेहरा आठवला.“बाबा, तू सुट्टीला कधी येणार?” तो तिला नेहमी सांगत असे, “देशाचं कर्तव्य आधी, मुली. पण बाबा परत येईलच.”

डोंगराच्या टोकावर पोहोचताच मशीनगनचा आवाज कानावर पडला. शत्रू पथकाने आधीच स्थान घेतलेले दिसत होते. गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. अर्जुनने पथकाला जपून मागे घेतलं आणि झाडांच्या आडोशाला बसवलं. “आपण त्यांना समोरून उत्तर देणार नाही. डाव्या बाजूच्या दरीतून वळसा घ्यायचा. रात्रीचा अंधार आपल्याला मदत करेल,” त्याने निर्देश दिले.
पथक हालचाल करत असतानाच, अचानक एका जवानावर स्नायपरचा गोळीबार झाला. जवान खाली कोसळला. अर्जुन धावत त्याच्याकडे गेला. “काही नाही, मी आहे!” जवान वेदनेने तडफडत म्हणाला, “साहेब… पुढे जा… माझ्याकडे लक्ष देऊ नका…”

अर्जुनचे मन हेलावले पण चेहऱ्यावर बदल नाही.
“तू जिवंत राहशील, आणि त्या मुलाला परत त्याच्या आईकडे पाठविणं हे माझं काम आहे,” त्याने स्वतःला बजावलं. जखमी जवानाला सुरक्षित स्थळी हलवून पथक पुन्हा पुढे निघाले. आता अर्जुनच्या पथकाने शत्रूला मागून वेढा घातला होता. “तीन… दोन… एक, फायर!” अर्जुनने संकेत दिला. क्षणभरात परिस्थिती उलटी झाली. शत्रू गोंधळला. काही वेळात त्यांना मागे हटावे लागले आणि उरलेल्यांना पकडण्यात आले. ऑपरेशन यशस्वी झालं.

पण अर्जुन समाधानी नव्हता. जखमी जवान त्याच्या मनात सतत येत होता. तो हॉस्पिटल तंबूत धावला.
डॉक्टर म्हणाले, “कॅप्टन, त्याची प्रकृती आता स्थिर आहे.”
अर्जुन हसला. जवानने हात धरत म्हटलं, “साहेब… तुम्ही असाल तोपर्यंत आम्हाला काही होणार नाही.”

त्या क्षणी अर्जुनला जाणवले, हि आहे त्याची खरी संपत्ती, जवानांचा विश्वास.

ऑपरेशननंतर सर्वांना एक दिवस विश्रांती मिळाली. अर्जुनने जॅकेटमधील गुलाबी रिबन बाहेर काढून टेबलावर ठेवली. अचानक त्याला पोस्टमनसारख्या जवानाने एक पत्र दिलं. ते त्याच्या मुलीकडून होतं.
“बाबा, तू माझा सुपरहीरो आहेस. तू माझ्यासाठी नसला तरी देशासाठी आहेस. मी रडणार नाही. पण वचन दे, परत येशील.”, अवनी

अर्जुन वाचताच त्याचे डोळे पाणावले. रणांगणात रक्ताच्या थेंबानेही न हारणारा कॅप्टन, आज मुलीच्या दोन शब्दाने भावुक झाला.

त्यानंतर काही दिवसांनी अचानक अलर्ट वाजला,
“शत्रूने पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला!”
यावेळी स्थिती गंभीर होती. घुसखोरांची संख्या दुप्पट होती. पण अर्जुन मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता.
तो पथकासोबत पुढे गेला. गोळीबाराचा आवाज पर्वताला फाडत होता. एक क्षणी अर्जुनवर हातगोळी फेकली गेली, त्याने ती बाजूला ढकलली पण स्फोटाचा धक्का बसून तो जखमी झाला. रक्त वाहत होतं, पण त्याच्या डोळ्यांत अजूनही जिद्द होती.

“कॅप्टन, तुम्ही मागे या!” “मी मागे गेलो तर तुम्हाला कोण नेतं? चालू द्या… आपण जवळपास पोहोचलो आहोत.”

जखमी अवस्थेतही तो पुढे सरकत राहिला. त्याच्या पथकाने जबरदस्त लढाई दिली.शेवटी घुसखोर परतले.

ऑपरेशन संपल्यावर अर्जुन जमिनीवर बसला. डॉक्टर धावले. पण अर्जुन हसत म्हणाला, “मी ठीक आहे. मला फक्त मुलीची रिबन द्या.” त्याने ते रिबन हातात धरले आणि स्वतःशीच म्हणाला, “अवनी… बाबा लढला. देशासाठी, तुझ्यासाठी.”

दोन आठवड्यांनंतर अर्जुनला सुट्टी मिळाली. तो घरी पोहोचताच त्याची मुलगी धावत बाहेर आली, “बाबा!!!”

अर्जुनने तिला उचलून धरलं. “मी परत आलो, प्रिन्सेस मी वचन पाळलं.”

पत्नीने हसत विचारलं, “किती साहस केलंस यावेळी?”
अर्जुन शांतपणे म्हणाला, “मी काही नाही केलं. माझ्या जवानांनी केलं. मी फक्त त्यांच्यासोबत उभा राहिलो.”

त्या संध्याकाळी गावभर त्याचं स्वागत झालं, फुलांची उधळण, टाळ्या, सन्मानपत्र… पण अर्जुनसाठी सर्वात मोठा सन्मान कोणता होता माहीत आहे का?
मुलीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन म्हटलेले तीन शब्द,
“माझे हिरो बाबा.”