Login

श्रद्धेचा विषय -श्राद्ध भाग १

श्रद्धेचा विषय म्हणजे श्राद्ध, बाकी सगळेच सोपस्कार
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम - वनिता

श्रद्धेचा विषय -श्राद्ध
भाग १

"आई! अगं काय ऐकतेय मी.. बाबांचं श्राद्ध नाही करणार म्हणताय या पितृपक्षात?" समीक्षा फोनवर देवकी ताईंसोबत बोलत होती.

"कदाचित हो!" देवकी ताई बोलल्या.

"काय कमी काय आहे तुमच्या घरात? अविनाश असं कसं करू शकतो? एवढा मोठा निर्णय त्याने एकट्याने कसा घेतला? काही कारण तर असेल की नाही असं वागण्याला? तू काहीच बोलली नाहीस का त्याला? मुळात, तू मान्य तरी का केलंस? मला विचारावं सुद्धा वाटलं नाही का त्याला!" समीक्षाची एका मागे एक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

"समू, तू शांत हो पहिले. नको एवढी चिडचिड करूस. किती ते प्रश्न? आणि आता तसंही, मी संसारातून लक्ष काढून घ्यायचं ठरवलंय. माझ्या आयुष्याचे तरी असे कितीसे दिवस राहिलेत? आजवर सांभाळलं, पुढे कुठवर सांभाळायचं मी. या माझ्या संसाराची दोर आज ना उद्या रेखा आणि अविनाशच्या हाती सोपवावीच लागणार होती. उद्या सोपवायची ती आजचं का नाही?" देवकीताईंनी समजवण्याचा सूर धरला होता.

"खुंटीला टांगलेल्या वर्ष संपलेल्या कॅलेंडरसारखी असतात म्हातारी माणसं, तसं ही घरात म्हाताऱ्यांच ऐकतंय कोण? आयुष्यभर ताठ मानेने जगतात मात्र म्हातारपणात त्यांच्या वाट्याला येतं उपेक्षित जगणं. हल्ली इकडे तिकडे समाजात सगळीकडे घराघरात तेच बघतेय. फार वाईट परिस्थिती आहे घरातल्या म्हाताऱ्या माणसांची. अविनाश आणि रेखा तसे चांगले आहेत. मी तर म्हणेन, इतरांपेक्षा चारपट बरे आहेत दोघेही. काय करायचं आणि काय नाही? निदान मला विचारतात तरी?" देवकीताई बोलताना समाधानी जाणवल्या.

"अगं काय बोलतेस तू आई? अविनाशने तुला विचारलं होतं? त्यावर तू काय म्हणालीस? हो म्हणालीस की काय तू? पटलं का तुला त्याचं म्हणणं!" संतापभरल्या शब्दात समीक्षाने पुन्हा विचारलं.

"होय, पितृपंधरवडा सुरू झाला. परवा अविनाश अचानक माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, आई यावर्षी बाबांचं श्राद्ध नाही केलं, पान नाही वाढलं तर चालणार आहे का तुला? म्हणजे पितरांना जेवण वगैरे, त्याच्या मनाला काही ते फार पटत नाही, असं तो म्हणाला. हे ऐकून सुरवातीला मला धक्काच बसला गं." देवकीताई बोलत होत्या आणि समू त्यांचं ऐकून घेत होती.

"आणखी बरेच काही बोलत होता अविनाश म्हणाला, आज तुझ्याकडून आणि हिच्याकडून होतंय; उद्या होईलच कशावरून? त्यात एवढी महागाई, सुट्ट्या पण नसतात. रूढी, प्रथा, परंपरा वगैरेचे दाखले देत आपण उगाच आपल्या मागे चालीरीती लावून घेतो. बाबांचं श्राद्ध न घालण्यासाठी त्याच्याजवळ एक ना अनेक कारणं होती, मग मीच म्हटलं जशी तुमची मर्जी.. नाही तर नाही. देवाघरी गेल्यावर जेवायला येतात.. हे बघितलंय तरी कोणी?" देवकीताईं मात्र बोलताना हळव्या झालेल्या जाणवल्या.

"पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टी करायच्या म्हणून कराव्या लागतात. मनाला पटतात न पटतात त्याचे संदर्भ जोडत बसायचे नसतात. श्राद्ध हा श्रद्धेचा विषय.. मी सांगितलं आहे त्याला." देवकीताईं समीक्षाला सांगत होत्या.

"बायकोने सांगितलं असणार त्याला, तिनेच कान भरवले असणार त्याचे?" समीक्षा खुसपटपणे बोलली.

"काय माहिती बाई, नवरा बायकोच गुळपीठ? तसंही सून घरात आल्यावर आपलं म्हणून, आपलं कुठे उरतं?" देवकीताई बोलता बोलता थांबल्या.

"तसंही आजकाल तुम्हा मुलींना, जबाबदाऱ्या नकोच असतात. खोटं वाटेल, राग येईल, पण कर्तव्य करताना चुकता तुम्ही मुली. तू काय आणि ती काय? राग आला तर येऊ दे पण मी स्पष्ट बोलते. तुम्हाला फक्त हम दो हमारे दो शी मतलब." बोलताना देवकीताईंनी चांगलीच कानउघडणी केली होती.

"मीच बघ ना, तुला चार काका मोठा परिवार आपला. तुझे आजी आजोबा शेवटपर्यंत आपल्याकडेच राहिले? आपल्याकडेच राहिले म्हणण्यापेक्षा, आम्हीच त्यांच्याकडे राहिलो. ते असेपर्यंत मी एकटीनेच तुमचं का करायचं? हा प्रश्न मला पडला नाही कधी? सासूबाईंच्या हाताखाली एवढी वर्ष राहिले. त्यांच्यापद्धतीने सगळं करण्याची सवयच झाली होती मला. सण समारंभ असो की पितरपूजन मी सगळं व्यवस्थित केलं. तुझे आजी आजोबा गेल्यानंतर, श्राद्धाचा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक करण्यात माझा पूर्ण दिवस जायचा. घटकेची सुद्धा फुरसत नसायची. आले गेले सगळेच त्या निमित्ताने जेवायला असायचे." देवकीताई जुन्या आठवणीत रमल्या होत्या.

"थांब उद्या येतेच तिकडे.. उद्या कशाला? आजच फोन करून खडसावते दोघांना. जुन्या चालत आलेल्या रूढी, प्रथा, परंपरांच्या विरोधात जाता म्हणजे काय?" समीक्षा परखडपणे बोलली

"वडील गेल्यावर, त्यांच श्राद्ध घालू शकत नसतील. त्यांच्या शांतीसाठी कावळ्याला घास खाऊ घालू शकत नसतील तर मुलगा असल्याचा फायदा तरी काय?" समीक्षा चिडली होती.

"अगं बाई तू चिडून तुझं रक्त आटवू नको. उगाच इकडचा राग तू तिकडे तुझ्या घरी काढशील. शांत रहा. एवढ्या घाईत तू येऊ वगैरे नको आणि फोन तर अजिबातच करू नको. खरं सांगू का, अविनाशने मला विचारलं आणि मला त्याचा विचार पटला. सारासार विचार करून नंतरच मीच त्याला म्हणाले, तुला हवं तसं कर म्हणत संमती दिली." देवकीताईंनी शांतपणे सांगितले.

"आई अगं काय बोलतेस तू, वेडबीड लागलं की काय तुला?" आईचं ऐकून समीक्षा आणखीनच चिडून बोलली.

"बाबांचं श्राद्ध याला पर्याय कसा असू शकतो? आणि तू संमती पण दिली. कसं शक्य आहे?" समीक्षाला आईच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. तिला आश्चर्य वाटलं होतं.

"त्या दोघांबद्दल तर मला बोलायचंच नाहीये काही? पण तू सुद्धा या सगळ्यात सामील झालीस म्हणजे?" समीक्षाला काय बोलावं कळेना. बोलायला उरलंच नव्हतं काही.

"मी फोन ठेवते."
समीक्षा असे म्हणून फोन ठेवणार तोच पलीकडून देवकीताई बोलल्या.

क्रमशः
शुभांगी मस्के...
0

🎭 Series Post

View all