चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम - वनिता
टीम - वनिता
श्रद्धेचा विषय -श्राद्ध
भाग २
भाग २
समीक्षाला प्रचंड राग आला होता. ती रागात फोन ठेवणारच होती तर पलीकडून देवकीताई बोलल्या.
"समू अगं ऐक तरी, परवा अविनाश मला म्हणाला.. आई हा मृत्युलोक, आलेला जाणार हे त्रिकालाबाधित सत्य. तू मला एक सांग, तुला जिवंतपणी हवं ते खायला प्यायला दिले आणि तुझी व्यवस्थित काळजी घेतली, तुझं मन जपलेलं आवडेल तुला, की गेल्यानंतर साग्रसंगीत स्वयंपाकाच बनवून श्राद्धाचे सोपस्कार केलेले आवडतील?"
देवकी ताई बोलत होत्या आणि पलीकडून समू शांतपणे ऐकत होती.
देवकी ताई बोलत होत्या आणि पलीकडून समू शांतपणे ऐकत होती.
"मीच त्याला म्हणाले, बाबारे! मेल्यावर कशाला? जिवंतपणी हवं ते आणि हवं तसं खायला प्यायला घाल. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस तेव्हा. आईचं कोणी करायचं? तू किंवा मी असा पर्याय नाहीये तुझ्याकडे. जे करशील ते एकट्याने करशील. तेव्हा आम्हाला अंतर देऊ नको?" देवकीताईंनी सांगितलं.
"आई अगं, मी पण आहेचं ना गं. तू असं कशाला बोलली?" समीक्षा पुढे बोलणार तोच, देवकीताई बोलल्या.
"हे बघ पोरी, आजकाल मुलींना सगळे अधिकारी दिलेत. आम्हाला सुद्धा ते मान्य आहेत, पण तुझ्याकडे तुझे सासू सासरे आहेत. त्यांची जबाबदारी आहे तुझ्या खांद्यावर आणि त्यांचा सांभाळ करणं हे तुझं पहिलं कर्तव्य. सासू सासऱ्यांचं करायला तर तुला जीवावर येतं. जड झाल्यासारखं वागतेस तू कधी कधी, मग उगाच त्यात माझी जबाबदारी कशाला?" देवकी ताई स्पष्टच बोलल्या.
"आई अगं, अशी काय बोलतेस?" समीक्षा उत्तरली.
"अगं ते जड झाले नसते तर त्यांच मीच का एकटीने करायचं? हा प्रश्न तुला पडला असता का? नाही ना!" देवकीताई बोलल्या.
"आई अगं, माझ्याकडची गोष्ट सहाणेवर चंदन उगाळल्यासारखी का गं उगाळतेस." समीक्षा पुटपुटली
"अगं बाई सहाणेवर चंदन उगाळल्याशिवाय चंदनाचा सुगंध पसरत नाही. अगदी तसेच आईवडिलांनी चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्याशिवाय अक्कल पण येत नाही." देवकीताई हळूच म्हणाल्या.
"बघ बेटा, तुझ्या घरी तुझ्या सासऱ्यांची पेन्शन आहे तरी जड झालेत ते सर्वांना." पुढे देवकीताई बोलता बोलता थांबल्या.
"आमचं या घराशिवाय काहीच नव्हतं. ना आम्हाला पेन्शन आहे. तुझ्या दादाच्या भरवशावर भारदस्त सगळी. उगाच कशाला त्याच्यावर भार; म्हणून मग मी मान्य केलं. असू दे.. नाही तर नाही. उगाच आपण नाही आपलं रक्त आटवायचं." एवढं बोलून देवकीताईंनी फोन ठेवला.
समीक्षाला चार नणंदा आणि दोन दीर. समीक्षा लग्न करून सासरी गेली. मोठ कुटुंब मिळालं. लग्न करून सासरी गेल्यापासून सासू सासऱ्यांसोबत राहणारी समीक्षा. हळूहळू सासू सासरे थकले तसे त्याचं म्हातारपण तिला जड होत गेलं.
'आम्हीच एकट्याने करावं का सासू सासऱ्यांचं?' असे प्रश्न समीक्षाला पडायला लागले होते. सासरी या वरून दोन चार वेळा वादावादी सुद्धा झाली होती. माहेरी आली, की ती तसं बोलून सुद्धा दाखवायची.
"अगं करावं गं, म्हाताऱ्यांच केल्याने पुण्य लाभतं." वगैरे चार समजुतीच्या गोष्टी देवकीताई समीक्षाला समजावून सांगत.
"म्हाताऱ्यांची सेवा म्हणजे मेवा असं काही नसतं. ज्याच्यावर पडते त्यालाच कळते. तुम्ही या आणि करून दाखवा. प्रॉपर्टीवर हक्क दाखवायला सगळे हजर, करायला मात्र कुणी नाही." आजकाल त्यावरून समीक्षाच्या घरी वाद सुद्धा वाढले होते.
"समू बाळा, सासू सासरे घरात असणं म्हणजे दुवा असतो एक प्रकारचा. त्यांची सेवा करण्याची संधी आहे असं समज." देवकीताई अनेकदा समजवायच्या
"करणाऱ्याला कळतं, संधी आहे की अजून काही." समीक्षा संतप्त व्हायची. समजावून ही पालथ्या घड्यावर पाणी अशी गत होती समीक्षाची.
असो.. घरचे सगळे व्याप बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी समीक्षा काहीच माहिती नसल्याचा आव आणत सकाळी सकाळी माहेरी पोहचली. घरात वातावरण अगदी शांत होतं. मुलं शाळेत गेली होती. आई आणि अविनाश कुठेच दिसत नव्हते. समीक्षाची वहिनी रेखा स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होती.
"काय गं, काय करतेस?" समीक्षाने विचारलं.
"ताई, अहो तुम्ही.. आणि एवढ्या सकाळी सकाळी." समीक्षाला असं अचानक इकडे बघून रेखाला धक्काच बसला.
हातातलं काम बाजूला ठेवून तिने समीक्षाला प्यायला पाणी दिलं.
"काय सुरू आहे?" समीक्षाने विचारलं.
"स्वयंपाक करतेय." रेखा म्हणाली आणि पुन्हा आपल्या कामाला लागली.
"काय गं! काय ऐकतेय मी? यावर्षी बाबांच श्राद्ध करणार नाही म्हणे तुम्ही? आई म्हणाली मला." समीक्षाने सांगितलं.
"अरे ताई! आईंच्या पोटात न काहीच राहत नाही. इकडच्या गोष्टी तिकडे करायला बरं जमतं आईंना." रेखा पुटपुटली.
"अगं, मी काय परकी आहे का? इकडच्या गोष्टी तिकडे म्हणजे काय?" समीक्षाला राग आला होता.
"ताई अहो, आता तुम्ही एकट्या म्हणून ठीके, पण तुमच्या सासूबाई त्यांच्या तीन मुलींना काही सांगतात तर तुम्हीच म्हणता गावभर सांगत फिरते म्हणून. ह्या म्हाताऱ्या लोकांना कोण सांगणार? त्यांच्यासाठी परकी नसली तरी नणंद आपल्यासाठी परकीच." रेखाने हसण्यावारी उत्तर दिलं.
"अगं पण, अविनाश एकुलता एक मुलगा, मग मुलाचं ते कर्तव्यच नाही का? निदान कर्तव्यपूर्ती म्हणून तरी.. वर्षात एकदा तर श्राध्द घालायचं असतं, तेवढं सुद्धा करू शकत नाही का तुम्ही? महत्वाचं म्हणजे पितरांच व्यवस्थित केलं नाही तर घराण्याला पितृदोष लागतो म्हणतात." समीक्षाने सांगितलं.
"अहो ताई, हे काय घेऊन बसलात. मरणोपरांती आठवण रहावी, म्हणून हे दिवस साजरे केले जातात. पण खरं सांगू, आईवडिलांची आठवण विसरता येणं शक्य आहे का? पावलोपावली त्यांची आठवण आपल्याला येतच असते. आता बाबा गेले पण अगणित आठवणी मागे ठेवून गेले. त्यांची आठवण आल्याशिवाय एक दिवसही जात नाही. मग कशाला हवेत हे एक दिवसाचे सोपस्कार." रेखाने तिच्याच भाषेत समीक्षाला उत्तर दिलं.
"असो.. काय घेणार?" रेखाने विचारलं.
"काही नको!" समीक्षाला राग आलायं, चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत तिच्या.
क्रमशः
शुभांगी मस्के...
शुभांगी मस्के...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा