Login

श्रद्धेचा विषय -श्राद्ध भाग ३

श्रद्धेचा विषय म्हणजेच श्राद्ध बाकी सगळेच सोपस्कार फक्त
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम - वनिता

श्रद्धेचा विषय -श्राद्ध
भाग ३

समीक्षाला रेखाच्या बोलण्याचा राग आलायं, हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

"माझी आजी, नव्वदी पार होऊन गेली. मनसोक्त आणि मनाप्रमाणे जगली. जाताना म्हणाली, खूप सेवा केली माझी, आता गेल्यानंतर उगाच कोणते सोपस्कार नको. तृप्त होऊन गेली होती ती." समीक्षा आजींच्या आठवणीत रमली.

"दात नव्हते आजीच्या तोंडात, दिवाळीचा फराळ तिला प्रचंड आवडायचा. चिवडा, चकली, शंकरपाळी खलबत्त्यात कुटून मागायची ती आम्हाला. आम्हाला फार मजा वाटायची. आम्ही पण आजीबरोबर फराळ कुटून खायचो."

ती म्हणायची, "दात आहे तोवर काटर कुटर खावून घ्या. नंतर चणे आहेत पण दात नाहीत अशी गत होते."


"आयुष्यभर चवीने, खाल्लेल्या पदार्थाची चव म्हातारपणात कुटून खाल्ल्याने ही रेंगाळत होती तिच्या जीभेवर बहुतेक." आजीच्या आठवणीत रेखा हळवी झाली.

"मी ठरवलंय, आपल्या आई नव्वदी पार जातील, त्यांना दात नसतील तेव्हा त्यांना असाच चिवडा चकल्या खलबत्त्यात कुटून खायला देणार आहे. म्हणजे त्या सुद्धा अनुभवरुपी शिदोरी आपल्याशी शेअर करतील. या पदार्थांची चव त्या जगतील आणि आपल्याला मिळेल अगणित आठवणींचा ठेवा." रेखा उत्सुफूर्तपणे बोलत होती.

"ताई आता आल्याच आहात तर जेवूनच जा आणि हा चिवडा घेऊन जा तुमच्या सासऱ्यांसाठी. त्यांना पोह्यांचा चिवडा पचत नाही ना! म्हणून मुद्दाम काढून ठेवला त्यांच्यासाठी मुरमुऱ्याचा चिवडा." रेखाने चिवड्याचा डब्बा समीक्षाच्या हातात दिला.


"काल मूग मटकीची उसळ बनवली होती. आईना मुरमुऱ्याचा चिवडा आणि उसळ आवडते म्हणून मुद्दाम आईसाठी बनवला. जरा जास्तीच बनवला, तुमच्या सासऱ्यांना आवडतो म्हणून." रेखाने स्पष्टीकरण दिलं.

"मागच्या दिवाळीत सासूबाई म्हणाल्या, समीक्षा थोडा मुरमुऱ्याचा चिवडा बनवून दे गं बाबांना! पोह्यांचा चिवडा त्यांना पचत नाही. दिवाळी निघून गेली, पण मुरमुऱ्याचा चिवडा बनवला नाही मी." समीक्षाला आठवून गेलं.


'अनेकदा आल्या गेल्या सर्वांसाठी, बाहेरून नाश्त्याला समोसे बोलवतो. सासूबाई, समोसे खात नाही मैदा असतो म्हणून, पण त्यांना आवडतो म्हणून बटाटा वडा किंवा डाळीचा वडा आणूच शकते, पण त्यांच्यासाठी वेगळा नाश्ता बोलवायचा मला कंटाळा येतो. मध्यंतरी सर्वांसाठी घरी छान जेवणाचा बेत ठरवला होता. सासूबाई पुऱ्या खात नाही. त्यांना श्रीखंडासोबत तेलाची पोळी आवडते. मी मात्र सकाळचे फुलके आहेत म्हणून, कंटाळा केला होता तेलाची पोळी बनवायचा. सकाळचा फुलका वाढला होता त्यांना ताटात. उलट पुऱ्या खायला काय होतं? म्हणून चिडचिड केली होती मी. त्या दिवशी मी सर्वांसाठी बटाट्याची भजी बनवली होती. तुमच्या सासूबाईंना कांदे भजी आवडतात, म्हणून दोन कांदे कापून भजी बनवून देण्याबद्दल रेखा सहज बोलून गेली. कांदा भजी बनवण्यासाठी, मी किती आढेवेढे घेतले होते. किंचित ही तसदी घेतली नव्हती कांदा भजी बनवण्याची.' समीक्षाला आठवलं तेव्हा तिला कसंस झालं. शरमेने तोंड कुठे लपवू असं झालं होतं तिला.

"ताई, अहो कुठे हरवलात?" रेखाने विचारलं.

"कुठे नाही." समीक्षाचा चेहरा पडला होता.

"ताई, मला कल्पना आहे. बाबा आहेत तुमचे.. श्राद्ध करणार नाही म्हटल्यावर तुम्हाला वाईट वाटणं अगदीच साहजिक आहे. जिवंतपणी आपण त्यांची सेवा केली, त्याचं पथ्यपाणी सांभाळलं, त्यांची काळजी घेतली. ज्या समाधानाने बाबा गेले, तुम्हाला वाटतं की श्राद्ध केल्याने बाबा खूश होतील आणि नाही केलं तर ते दुःखी होतील म्हणून. मला अजिबात तसं वाटतं नाही. उलट ते तिथून आईची होणारी सेवा, त्यांच्या मागे आपण त्यांची घेत असलेली काळजी बघून क्षणोक्षणी आशीर्वादाचा वर्षाव करत असतील. अशा वेळी पितृदोष कसा लागेल बरं! म्हणून आम्ही ठरवलंय, या जगातून गेल्यानंतर त्यांच्यासाठी साग्रसंगीत जेवणाचं पान टाकून श्राद्ध घालण्यापेक्षा आपल्यासोबत आहेत तोवर त्यांना आवडतं ते, अगदी त्यांना हवं तसं करून खाऊ घालायचं." रेखा बोलत होती.


"आपल्या आईना गुळ घातलेली पुरणपोळी आवडते तर आम्हा सर्वांना पुरणाची डाळ साखरेच्या पाकात शिजवलेली पुरणपोळी.. साखरेच्या पुरणपोळीची डिमांड जास्ती; त्यामुळे प्रत्येकवेळी मी साखरेची पुरणपोळी घरी बनवायचे, पण आता मात्र मी आवर्जून आईंसाठी गुळाची पुरणपोळी बनवते. एवढी वर्ष आईंना गृहीत धरत आले होते. वेळेत चूक उमगली म्हणून सुधारता आली. चुका आपल्याच हातून होतात, पण त्या सुधारण्यात खरं शहाणपण." रेखाने तिची चूक कबूल केली. रेखाच्या बोलण्यात तथ्य होतं. समीक्षा काळजीपूर्वक ऐकत होती.