Login

श्रद्धेचा विषय -श्राद्ध भाग ४ अंतिम

श्रद्धेचा विषय म्हणजे श्राद्ध बाकी सगळेच सोपस्कार फक्त
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम - वनिता

श्रद्धेचा विषय -श्राद्ध
भाग ४

रेखाचा स्वयंपाक झाला होता. खीर पुरी आणि भज्यांचा घमघमाट घरभर पसरला होता. आईला अचानक कालपासून सर्दी झाली होती. घाईघाईत का होईना पण अविनाश आईला दवाखान्यात घेऊन गेला होता. तेवढ्यातच, आई आणि अविनाश घरी आले.

रेखाने भिंतीवर टांगलेला सासऱ्यांचा फोटो खाली उतरवला. फोटो समोर रांगोळी काढली आणि दिवा उदबत्ती लावली. अविनाशने बाबांच्या फोटोला ताज्या फुलांचा हार घातला.

रेखाने जेवणाच ताट वाढून आणलं. वरण भात, पुरी भाजी, चटण्या, खीर, भजे, पापड.. खीरीवर तुपाची धार सोडली. गुलकंद घातलेलं पान अविनाश सोबत घेऊन आला होता. त्याने ते वडिलांच्या फोटोसमोर वाढलेल्या पात्रावर ठेवलं.

'बाबांना गुलकंद घातलेलं, टपरीवरचं पान खूप आवडायचं.' समीक्षाला आठवलं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

देवकीताईंना आल्या आल्या रेखाने पाणी प्यायला दिलं. त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.
"अगं हे काय? तुम्ही श्राद्ध घालायचं नाही म्हटलं होतं ना!" देवकीताईं सगळी तयारी बघून म्हणाल्या.

"श्राद्ध म्हटलं तर, सगळा साग्रसंगीत स्वयंपाक बनवताना दमछाक व्हायची माझी, सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवायच्या, वेगवेगळ्या चटण्या, पंचामृत.. त्यात ऑफिसला सुट्टी नसते; त्यामुळेच असा विचार आमच्या मनात डोकावला होता." रेखा सांगायला लागली.


"आई, सुखाचे क्षण आपल्याला नेहमी लक्षात राहतात, हवेहवेसे वाटतात आणि दुःखाचे क्षण नको नकोसे होऊन जातात. जीवाभावाच्या लोकांचं अवतीभोवती असणं आनंद देऊन जातं.. तसं त्यांचं या जगातून जाणं दुःख देऊन जातं.
आपल्यातून निघून गेलेल्यांना लक्षात ठेवण्यासाठी श्रद्धेने केलं जातं ते कार्य म्हणजे श्राद्ध." रेखाला गहिवरून आलं.

"आपण घातलेलं श्राद्ध तेव्हाच सफल होतं, आपल्याला आशीर्वादित करतं जेव्हा जिवंतपणी आपण त्यांना सुख, आनंद देतो त्याच्या आवडीनिवडी पुरवतो. पितरांना भोजनदान त्यामागे सुद्धा उदात्त विचार असणारच ना! उगाच कशाला फाटे फोडत.. परंपरांच्या आड यायचं." रेखा वैचारिक दृष्टिकोनातून बोलताना दिसली.


"आई, आजकाल आमच्या व्यस्त आयुष्यात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे साग्रसंगीत सगळं जमेल का माहिती नाही? पण जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन." रेखाच म्हणणं सगळे शांतपणे ऐकून घेत होते.

सगळ्या भाज्या एकत्र करून रेखाने छान मिक्स भाजी बनवली होती. खीर पुरी होती आणि चटण्या होत्या.

"अगं एवढं पुरेसं आहे गं!" यजमानांच्या फोटोसमोर वाढलेलं जेवनाचं पात्र बघून देवकीताई भरून पावल्या होत्या.


समीक्षाचे सुद्धा डोळे भरून आले होते. तिने डोळ्यातलं पाणी हळूच पुसून घेतलं. बाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि घाईघाईतच बाहेर पडली. पायात चपला सरकवल्या.

"अहो ताई कुठे निघाल्या? जेवून तरी जा!" समीक्षाला जाताना बघून रेखाने तिला आवाज दिला.

रेखाने पुढे काही विचारायच्या आत,"मी येते गं." असे म्हणत गाडीला किक मारली आणि समीक्षा निघून गेली होती.

मुरमुऱ्याच्या चिवड्याचा डब्बा न्यायला समीक्षा मात्र विसरली होती. कदाचित, रेखाला अपेक्षित जे म्हणायचं ते समीक्षाला कळलं होतं.

"अरे, ताई चिवड्याचा डब्बा विसरल्या वाटतं इथेच." टेबल वरचा चिवड्याचा डब्बा बघून रेखा पुटपुटली.

'आता या दिवाळीत किंवा कधीही, ताई जेव्हा जेव्हा पोह्यांचा चिवडा बनवतील तेव्हा सासऱ्यांसाठी आठवणीने मुरमुऱ्याचा चिवडा नक्कीच बनवतील. सासू सासऱ्यांना आवडीचं खाऊ घालायला आता त्या मुळीच मागेपुढे बघणार नाही. सासू सासऱ्यांची काळजी, त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पेलताना, मी एकटीनेच का? असे प्रश्न त्यांना न पडो. एवढा प्रकाश तर पडलाच असेल त्यांच्या डोक्यात. देव त्यांना सद्बुद्धी देवो आणि तसं झालं तर देवाची कृपाच झाली म्हणायची.' रेखा स्वतःशीच पुटपुटली.

हाफ डे टाकलेल्या रेखाला आता पटापटा आवरून ऑफिसला पळायचं होतं. "जेवायला घेऊ का?" म्हणत तिने सर्वांसाठी जेवणाची ताट वाढली. सर्वांनी एकत्र मिळून जेवणं केलं. समीक्षाताई जेवून गेल्या नसल्याची रुखरुख मात्र अविनाशने समीक्षाच्या घरी डबा पोहचवून पूर्ण केली होती.