श्रद्धेचे वारकरी_भाग ३
आतापर्यंत सुरक्षा रक्षकांनी बरीचशी गर्दी पांगवली होती. तरुण स्वयंसेवक गरजूंना मदत करत होते, वृद्धांना आधार देत होते. मिहिरच्या खिशातला फोन सतत वाजत होता. त्याने फोन बाहेर काढून पाहिलं तर पुन्हा अनोळखी नंबर होता. त्याने तो फोन घेतला. समोरून थरथरत्या आवाजात,
"मिs हि sss र" अशी साद आली. त्या क्षणी मिहिरचा आवाज पण दाटून आला.
"मिनू तू आता कुठे आहेस तू ठीक आहेस ना. मला तू कुठेच दिसत नाहीयेस."
"मिहिर तू असशील तिथून मेन गेटला ये. मी तिथेच उभी आहे."
मिहिर क्षणाचाही विलंब न करता धावतच मेन गेटला गेला. त्याने मिनूला पाहिल्याबरोबर तिला मिठीच मारली. काही क्षण ते दोघं त्याच अवस्थेत होते.
"इथून कुठेतरी स्वच्छ मोकळी हवा असेल तिथे मला घेऊन चल."
"हो माझा पण जीव कासावीस झाला आहे."
दोघे स्टेशन पासून दूर आले. दोघांचेही डोळे लाल झाले होते. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही.
"अगं मिनू तुझी ट्रेन आज मिस झाली का! तू मला काहीच कळवलं नाहीस. आणि तुझा फोन कुठे आहे. नुसतीच रिंग वाजत होती."
"मिहिर शांत हो. मी तुला सगळं सांगते. अरे आज मला ऑफिसमधून निघायला उशीर झाला. आपली ट्रेन कोणत्याही परिस्थितीत मला मिळणार नव्हती. मग मी सिद्धिविनायक मंदिरात गेले. तिथे थोडी रांग होती. मी विचार केला दर्शन घेऊन झाल्यावर स्टेशनवर चालत जाताना तुला फोन करून सांगेन. म्हणून मी चालताना पर्समधून फोन काढायला गेले तर माझ्या लक्षात आलं की फोन ड्रॉवर मध्येच राहिला. तू माझी वाट बघशील म्हणून मी पब्लिक फोन कुठे आहे ते शोधू लागले. इतक्यात दादर स्टेशन आलं आणि मला प्रचंड गर्दी दिसली. आधी वाटलं की ट्रेनचा काही गोंधळ असेल. इतक्यात कोणीतरी बोलताना ऐकलं की आपल्याच गाडीत मिडल लेडीज डब्यात वांद्र्याला बॉम्बस्फोट झाला. तू नक्कीच माझी काळजी करत असशील असं मला वाटलं. प्रत्येक जण आपल्या मोबाईल वर बोलत होते. मी स्टॉलवरच्या मुलाला विनंती केली आणि त्याच्या फोनवरून तुला कॉल केला. पण तू तो घेतलास नाहीस. काय करावं काहीच सुचत नव्हतं. इतक्यात एक बाई तिची कार स्टार्ट करत होती. तिला मी रडत रडत सांगितलं काहीही करून मला वांद्र्याला सोड. तिला माझी दया आली. मी इथे आले पण गर्दीत तुला कोठे शोधणार. मी एक दोघांना मोबाईल करता विचारत होते ते एक मुलीने पाहिलं आणि तिने स्वतःहून तिचा मोबाईल मला दिला. नशीब माझं तुझा नंबर मला पाठ आहे. आता तरी तू फोन उचलावास म्हणून मी प्रार्थना करत होते."
"अगं जेव्हा मी ऐकलं की आपल्याच ट्रेनमधील मिडल लेडीजमध्ये बॉम्बस्फोट झाला माझ्या काळजाचे पाणी पाणी झालं. मी त्या गर्दीत वेड्यासारखा पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि पुन्हा मागे रेटला जात होतो. जर तू आधीच मला फोन करून सांगितलं असतंस तर माझ्या जीवाची काहीली झाली नसती. ते जाऊदे नशीब तू आजच सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला गेलीस."
" मिहिर 'तो ' आहे यावर माझा गाढ विश्वास आहे.
हल्ली नंबर आपण सेव्ह करून ठेवतो म्हणून कोणाचे नंबर आपल्याला पाठ नसतात. म्हणून कधीकधी पूर्वीची फोनची छोटी डायरी वापरणे योग्यच होते असे वाटते."
हल्ली नंबर आपण सेव्ह करून ठेवतो म्हणून कोणाचे नंबर आपल्याला पाठ नसतात. म्हणून कधीकधी पूर्वीची फोनची छोटी डायरी वापरणे योग्यच होते असे वाटते."
"हो जेव्हा सगळी यंत्र बंद पडतं तेव्हा पूर्वीच्या पद्धती कामी येतात."
"मिहिर मी सुखरूप आहे. त्या डब्यात माझ्या मैत्रिणी नव्हत्या तरी रोजच्या पाहण्यातले चेहरे होते. ज्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यातल्या कोणाची लहान मुलं आईची वाट पाहत असतील, कोणाची तरणी पोर अजून आली नाही म्हणून आईबाबा काळजीत असतील, निवृत्तीला आलेली एखादी स्त्री असेल. जेव्हा त्यांच्या घरी हे भयाण सत्य कळेल तेव्हा काय होईल."
"आपलं रोजचं जीवन धकाधकीचे आहे हे मान्य आहे. पण काहीही चूक नसताना निष्पाप लोकांचे बळी जातात तेव्हा खूप वाईट वाटतं. देवा असं मरण कोणालाही नको येऊदे. ह्या उलट्या काळजाच्या लोकांना मृत्यूचे थैमान घालताना काहीच कसं वाटत नाही."
"माणसाने अंधश्रद्धा बाळगू नये पण ' त्या ' शक्तीवर श्रद्धा जरूर ठेवावी. मी एका प्रसिद्ध डॉक्टरच्या केबिनमध्ये वाचलं होतं, 'आय ट्रीट, गॉड क्यूअर्स '. आज अशी परिस्थिती आहे घरून निघालेली व्यक्ती संध्याकाळी धडधाकट परतेपर्यंत जीवाला घोर लागलेला असतो."
मनुष्यप्राणी आशेवर आणि श्रद्धेवर जगतो.
समाप्त
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा