Login

श्रीमान योगी

श्रीमान योगी या कादंबरी विषयी माझे मत
श्रीमान योगी 
माझे मत

( हे समीक्षण नाही. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास मला स्वतःला कादंबरीत कुठल्याही त्रुटी, उणीवा आढळल्या नाही. )

कादंबरीचे नाव - श्रीमान योगी
लेखक - रणजित देसाई
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रकाशन - १९६८

     सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार रणजित देसाई यांनी आपल्या ' श्रीमान योगी ' या ऐतिहासिक कादंबरीतून अवघ्या महाराष्ट्राचे आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सादर केले आहे.
         श्रीमान योगी मध्ये आपल्याला कधीही न चुकणारा, प्रत्येक गोष्टीत मुळातच परफेक्ट असणारा कादंबरीचा टिपीकल नायक नाही तर कधीकधी चुकणारे, त्या चुकांतून शिकणारे, कधी खचलेले, निराश झालेले ; पण माता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने तर कधी कटू बोलांनी पुन्हा जिद्दीने उभे राहिलेले, परस्त्रीला मातेसमान मानणारे, कर्तव्याआड कधी नातीगोती न येऊ देणारे, सर्व धर्मांचा आदर करणारे ( महाराजांच्या सैन्यात, अगदी अष्टप्रधानमंडळात देखील इतर धर्मातील व्यक्तींचा समावेश होता, हे याचे उत्तम उदाहरण आहे. ), सहकाऱ्यांना सन्मान देणारे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे महाराष्ट्राचे खरेखुरे नायक 'आपले महाराज' दिसतात. आणि महाराजांबद्दल आपल्या मनातील प्रेम व आदर कित्येक पटीने वाढतो. हे कादंबरीचे पहिले मोठे यश.
           दुसरं म्हणजे महाराजांना आयुष्यात अनेक दु:खद घटनांना, स्वत:वर आणि स्वराज्यावर कोसळलेल्या अनेक संकटांशी सामना द्यावा लागला. सर्व दु:खांना महाराजांनी नेहमीच धैर्याने तोंड देऊन, संकटांवर माता जिजाऊंच्या, समर्थांच्या मार्गदर्शनाने, निष्ठावान मावळ्यांच्या सोबतीने शौर्याने व चातुर्याने मात करून महाराजांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. महाराजांची शिकवण लेखकांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून अत्यंत साध्या सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवली आहे.
     अशी ' श्रीमान योगी ' ही महाराजांच्या जीवनावर आधारित, रणजित देसाई लिखित कादंबरी एकदा नक्कीच वाचावी

@ प्रथमेश काटे

असेच उत्तमोत्तम मराठी लेख वाचण्यासाठी ग्रुपला भेट द्या -https://www.facebook.com/groups/758165158061766/permalink/993360487875564/?app=fbl