Login

श्री संतराम (भाग ४)

स्वेच्छा गेल्यावर नगरात एक दवंडी पिटवण्यात आली......


                                    स्वेच्छा गेल्यावर नगरात एक दवंडी पिटवण्यात आली. ती अर्थातच सुदेश पंडिताकडून होती. आणि ती राजधानी मध्ये पिटण्यात पंडिताचा विशिष्ट हेतू होता. प्रजाजन आणि राज महालातील महाराज धरून सर्वच राजकारणी पंडिताच्या लग्नाच्या विचारामध्ये मग्न राहतील आणि मग आपल्याला आपला गुप्त हेतू साध्य करता येईल. तसेच दुसऱ्याच दिवशी स्वेच्छेचे अपहरण झाल्याची भुमका उठवली की झालं. म्हणजे आणखी एक चर्चेला विषय निर्माण होईल. एकामागे एक अश्या दोन घटना घडवल्यावर लोकांना विचार करून कृती करण्याची संधीच मिळणार नाही ही त्याची योजना होती. त्या अवधीत परकीय मुद्रा आपल्याकडे जमा होतील आणि राज महालातल्या लोभी राजकारणी लोकांकडून त्या मुद्रा व्यवहारात एकदा का आणल्या गेल्या की जनांचा गोंधळ चालू होईल . हे सर्व करीत असताना , ते आचार्यांच्या आज्ञेनुसार होत असल्याचे भासवले की झाले. मग फक्त आपल्याला राज्याच्या ढासळणाऱ्या आर्थिक स्थिती कडे कसं गंमत म्हणून पाहता येईल. आणि सगळे एकदा ढासळल्यावर आचार्यांना पदावरून खाली ओढणेही सोपे जाईल. अर्थातच त्यांच्यावर राज्याच्या अर्थनीतीमध्ये बेदिली माजवल्याचा आरोप ठेवणे जरूर आहे. तेही मुख्य न्यायाधीश वितंडराज याला वश करून सोपे होईल. वितंडराज मुख्य न्यायाधीश असला तरी एखाद्या प्रकरणात वितंडवाद निर्माण करून स्वतःचे महत्त्व प्रस्थापित करण्यात प्रविण होता. त्यामुळे काय होई की महत्त्वाचे असे राजद्रोहाचे खटले सुनावणीला आल्यावर तो ते इतके क्लिष्ट करून सोडी की महाराज त्याच्या तर्कटाला नाही म्हणणार नाहीत. पण असा अजून एकही खटला महाराजांकडे पाठवण्याचे धाडस त्याला झालेले नव्हते. त्याला कारण " आ चा र्य ". हे आचार्य सगळ्याच प्रकरणात नाक खुपशीत असं सुदेश पंडिताला वाटत असे. थोडक्यात आचार्यांना एकदा का पदभ्रष्ट केले की बाकी सगळं सोपं होईल असे त्याचे नियोजन सांप्रत काळी होते. आणि त्याला आणखी एक हेतू साध्य करायचा होता तो म्हणजे कामातुर सम्राज्ञी कामिनी देवींना आपल्या ताब्यात आणणं. असली रतीची मूर्ती आपली शेज साजरी करण्यास योग्य आहे आणि निष्कारण राजर्षी म्हणवून घेणाऱ्या महाराजांना शह देण्यासही ती उपयोगी पडेल.


दवंडी ऐकून प्रजाजन अचंबित झाले. असल्या उतरत्या वयात पंडिताला विवाह करून काय साधायचे असावे असा विचार जो तो करू लागला. हळू हळू बातमी महाराजांच्या आणि आचार्यांच्या कानावर गेली. किंबहुना ती त्यांच्या कानावर पडावी म्हणून तर हे उपद्व्याप केले होते. महत्त्वाचे राजकारणी पण आवासून विचार करू लागले. अर्थात त्यांना पंडिताची काहीतरी चाल असावी असा संशय आलाच. ज्या कन्येशी विवाह होणार होता तिच्या नावा पलिकडे कोणतीही माहिती दिली गेली नाही. या गुप्ततेची मात्र काय आवश्यकता होती त्यांना कळेना. त्यांचेही प्रयत्न चालू झाले. एकूण काय सर्वांनाच दोलायमान अवस्थेत ठेवण्यात सध्यातरी पंडित यशस्वी होताना दिसत होता. हळू हळू वार्ता कामिनीदेवींनाही समजली. पंडीताचे एकूण इरादे अनुचित असल्याचे त्यांनी पहिल्यापासूनच ताडले होते. जेव्हा त्यांचा महाराजांशी विवाह मुक्रर झाला. विवाहानंतर भरलेल्या दरबारात आदराने खास व्यक्तींचा सत्कार करताना त्यांना लक्षात आले होते. प्रत्येक विशेष व्यक्तीची महाराजांनी ओळख करून देताना (त्यावेळी पंडिताला महाराज एक मुत्सद्दी म्हणून मान देत असत ) पंडित दरबारात हजर होता. सर्वच मुत्सद्दी विशिष्ट अंतर ठेवून देवींना अभिवादन करीत होते आणि आणलेला नजराणा देत होते. पंडीताने मात्र योग्य अंतर न राखता अगदी जवळून नजराणा त्यांच्या हातात दिला होता आणि त्यांना स्पर्शही केला होता. खरंतर हा प्रमाद होता. पण कामिनी देवींनी विवेक केला म्हणून गंभीर प्रसंग टळला होता अन्यथा पंडित दंडास पात्र ठरला असता. मात्र महाराजांना हे कळल्यावर पंडीताचे दरबारात येणे महाराजांनी काही काळा पुरते स्थगित केले होते. याचा त्याला आलेला क्रोध त्याने कामिनीदेवींच्या डोळ्यातील काम आर्तता पाहून आवरता घेतला होता आणि मी हिला मिळवीनच अशी मनोमन प्रतिज्ञा देखील केली होती. ........... अखेर विवाहाचा दिवस उजाडला.

ब्राह्म मुहूर्ताची सनई वाजली. राजवाड्याला जाग आली. सर्व सरदार दरकदार मंडळी , ज्यांना ज्यांना म्हणून आग्रहाची निमंत्रणे होती , ते आस्ते आस्ते पंडिताच्या महालाकडे जाताना दिसू लागले. सर्वच रस्ते वेगवेगळ्या दरबारी आणि राजकीय अधिकाऱ्यांच्या रथांनी आणि इतर जनांच्या छोट्या छोट्या मेण्यांनी फुलून गेले. काही पौर जनांना ज्यांना दवंडीची माहिती नव्हती , ते आपापल्या निवासस्थांनांच्या प्रवेशद्वारांशी मुखमार्जन करीत पाहत होते. आचार्यांच्या आश्रमामधील काही जणही त्यात सामिल झाले होते. संतराम आपल्या दिनचर्येत मग्न असल्याने म्हणा किंवा आजकाल ते सगळ्याच बाबतीत उदासीन असल्याने आश्रमाजवळून जाणाऱ्या महामार्गावरील हालचालीकडे तेवढेसे लक्ष देत नव्हते. आचार्य तेवढे दरबारी जाण्याच्या तयारीत असल्याने आणि पंडिताविषयीच्या वास्तवाची माहिती असल्याने तिकडे लक्ष देत नव्हते. महाराजांबरोबर सदर घटनेवर उहापोह करून पुढच्या कृतीची तयारी करण्यासाठी दरबारी रथावर आरूढ झाले. सारथ्याने त्यांचा निर्देश होताच रथ राजवाड्याकडे हाकण्यास सुरुवात केली. आज ते संतरामास दरबारात नेणार नव्हते. खरेतर संतरामाना नेहमी आपल्या सन्निध ठेवण्याचा आणि दरबारी कामकाजात रुळवून घेण्याचा महाराजांचा आदेश होता. पण त्यांच्या बुद्धीला ते पटत नव्हते. मार्गावरची वाहतूक वाढल्याने आचार्यांना दरबारी जाण्यास थोडा विलंब झाला होता. अचानक रथ थांबल्याने त्यांनी बाहेर डोकावून पाहिले. तो त्यांच्या समोरच एका शिबिकेत स्वेच्छेचे माता पिता बसलेले दिसले. मार्ग थोडा चिंचोळा असल्याने एकाच वेळी शिबिका आणि आचार्यांचा रथ मार्गक्रमण करू शकत नव्हता. परंतु राज्याच्या नियमाप्रमाणे आचार्यांसारख्या अथवा दरवारी अधिकारी व्यक्तिचा रथ प्रथम जाउ देण्याची प्रथा होती. तरीही शिबिकेचा सारथी शिबिका पुढे दामटीत होता. त्यावर आचार्यांच्या सारथ्याने त्यास पृच्छा केली, " नियम माहित असतानाही शिबिका पुढे नेण्याचे धाडस तू करून शिक्षेस पात्र का ठरत आहेस ? " त्यावर शिबिकेचा सारथी म्हणाला, "विवाहासाठीचा
मुहूर्त साधणे आवश्यक आहे व कन्येचे मातापिता शिबिकेत असल्याने मी हे धाडस करीत आहे. आपण थोडी सवड करून द्याल तर बरे. " आचार्यांच्या सारथ्याने त्यांच्याकडे पाहिले आणि नजरेनेच विचारले तेव्हा आचार्य म्हणाले, " रथ थोडा मागे घे, त्यास मार्ग दे. विवाहाची घडी टाळणे अयोग्य ठरेल. " शेवटी अनिच्छेनेच सारथ्याने रथ बाजूला घेऊन शिबिकेस सवड दिली. शिबिका पंडिताच्या महालाकडे मार्गक्रमण
करती झाली. मंगल वाद्ये वाजत होती............
लवकरच शिबिकेत बसलेले आजोबा आजी राजेशाही वस्त्रे सावरीत ( त्यांना या वस्त्रांची सवय नव्हती ) पंडिताच्या महालाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हजर झाले. प्रत्येक गोष्ट आखलेली असल्याने स्वतः पंडित अंगावरचे सुवर्णालंकार आणि उंची वस्रे सांभाळित स्वेच्छेच्या तथाकथित माता पित्यांचे स्वागत करण्यास सन्मुख आला. त्याने अशा आपुलकीने स्वागत केले की जणूकाही त्याचे स्वतःचेच माता पिता आहेत. प्रथम त्याने प्रवासातल्या काही अडचणी आल्या किंवा काय ते विचारले. नंतर त्यांच्या अंगावर वेगवेगळे सुवासिक फवारे मारून , हार तुरे देऊन आदबीने तो त्यांना महालाच्या मोठ्या शृंगारलेल्या बारा खणी दिवाणखान्यात घेऊन आला . मग त्यांच्या वापरासाठी जे दासदासी दिले होते त्यांना त्यांची हरेक आज्ञा पाळण्याची सक्त ताकीद देऊन आणि त्यांच्या भाली नुसती नापसंतीची छटा जरी आली तरी ते शासनास पात्र होतील याची जाणीव त्याने करून दिली. मग त्याने दास दासींना स्वेच्छेच्या निवासस्थानी त्यांना नेण्याच्या सुचना दिल्या. ते गेल्यावर दुसऱ्या येणाऱ्या राजकीय आधिकारी आणि सरदार दरकदारांच्या स्वातगामध्ये पंडित व्यग्र झाला. पंडिताच्या महाल परिसरात एकूण वेगवेगळे उपमहाल आणि एक तुरुंगही होता. त्या तुरुंगातील काही अधिकारी ज्यांचे पंडिताने पक्षांत रुपांतर केले होते ते मोकळ्या भागातल्या वृक्षांवर बसले होते. तेही वेगवेगळे आवाज काढून वऱ्हाडी लोकांचे मनोरंजन करीत होते.एक उपमहाल जिथे वधुपक्षाचे वऱ्हाडी होते. दुसऱ्या एका उपमहालात वेगवेगळे लग्नविधी सुरू होते. पंडित आता त्यात मिसळून गेला होता. त्याला आचार्य आणि महाराज येणार नाहीत याची कल्पना होती. तसेच त्याच्या विषयात पारंगत असलेले म्हणजे अमानवी विद्या ज्यांना वश होत्या असे अनेक चेटके तिथल्या एका उपमहालात उतरले होते. वधुपक्षाच्या महालात मात्र अगदी मोजकेच दहा पंधरा पाहुणे होते. त्यात स्वेच्छेचे माता पिता, तिच्या काही सख्या, तसेच तिच्या गुप्तवार्ता विषयात प्रवीण असलेले काही राजकारणी पण होते. आणि तेही या राज्यातले. खरंतर त्यांनी यायला नको होतं, पण तिच्या बाजूने कोण उभे राहणार म्हणून तिने आग्रह करून त्यांना बोलावले होते.

स्वतः स्वेच्छा तिच्या महालातल्या एका विशेष कक्षात शृंगार करवून घेण्यात मश्गुल होती . ती तर नखशिखांत सुवर्णालंकाराने सजलेली होती. तिचा महाल तर स्वर्गीय सुगंधाने भरून गेला होता. राज्यातली सर्व प्रकारची सुगंधी द्रव्ये तिथे हजर होती. फार काय पण काही ठिकाणी तर सुगंधांनी भरलेली दगडी कुंडे वऱ्हाड्यांसाठी उपलब्ध करून दिलेली होती. सजवलेल्या हत्ती , अश्वांची तर रेलचेल होती. भोजन आणि इतर पेय्य पदार्थ , तर इतके मुबलक होते की प्रत्येक वऱ्हाड्याला बरोबर घेऊन जाण्यासाठी दिले असते तरी बरेच उरले असते. खास षोकिनांसाठी तर मदिरेचे स्वतंत्र कक्ष , सुवर्णाचे व इतर धातूंचे मद्य चषक व भांडीही उपलब्ध करून देण्यात आली होती. अर्थातच मदिरा कक्ष फक्त खास राजकीय निमंत्रितांसाठीच होते. कारण ते पंडीताला गुप्त वार्ता पुरवीत असत. ..... असो सर्व हत्ती वेगवेगळ्या अंबाऱ्यांनी सजलेले होते. पंडिताचा विवाहोत्तर वरातीचा हत्ती इतका सजलेला होता की तो हालत असल्याने जिवंत होता असे वाटत होते, अन्यथा तो एक हत्तीचा पुतळा वाटला असता. म्हणजे एवढा तामझाम होता की हे राजपुरोहितांच्या घरचे तर कार्य नाही ना असेच कुणासही वाटावे. पंडिताने हे सगळे मुद्दाम केले होते , कारण राजकीय वर्तुळात आपल्याला पंडिताशी वैर घेणं सोपं जाणार नाही याची जाणीव व्हावी. पंडिताच्या महालामधून वधूचा महाल अगदी स्वच्छपणे दिसत होता. पंडित कुणा एका राजकारणी पुरुषाबरोबर वार्तालाप करीत असताना , त्या पुरुषाचे सहज लक्ष गेले आणि स्वेच्छेला पाहून म्हणाला, " ही कन्या कोण आहे बरे ? ही आमच्या महाली पाठवण्याची व्यवस्था केलीत तर चित्तवृत्ती अगदी प्रसन्न होतील. " हे ऐकून पंडिताने स्वत: त्या दिशेस पाहिले व तो गर्वाने म्हणाला," आपण जिला अभिलाषेने पाहिलीत ती तर आमची वाग्दत्त वधू आहे. स्वप्नच रंगवा बरे. आपणावर मद्याच अंमल किंचित जास्त झाला आहे म्हणूनच आपण हा प्रमाद करीत आहात , आपल्या जागी कोणी खालच्या दर्जाचा अधिकारी असता तर आत्ताच हत्तीच्या पायी देण्याचे शासन आम्ही अमलात आणले असते. " पंडिताला तर स्वेच्छेला पाहून आत्ताच कामज्वर चढला होता. विवाहानंतर लगेचच पहिल्या रात्रीची व्यवस्था करण्यास त्याने आदेश दिले होते, कारण स्वेच्छेसारखी चंचल व चतुर कन्या त्याच्या हातातून सुटू नये. पण तीही काही कमी नव्हती.

असो. हळू हळू श्रीपाल भिक्षुकाने पंडिताला मुख्य महालाच्या खास दिवाणखान्यात सेवकांकरवी पाचारण केले. पंडित तर गुडध्याला बाशिंग बांधून बसला होता. एका शृंगारलेल्या अश्वावर आरुढ होऊन लव्याजम्या सहित तो सत्त्वर निघाला आणि विवाह वेदी समीप प्रगट झाला. त्याचे स्वागत स्वेच्छेचे नवनिर्मित मातापिता करीत होते.एरवी त्यांच्या मुखकमलाकडे कुणी ढुंकुनही पाहिले नसते ते आज कुणी राजघराण्यातील असल्याचा भास होत होता. हे सर्व पाहणारी स्वेच्छा मनोमन हासत स्वतःशी म्हणाली, " पंडिता माझ्या स्पर्शासाठी कर जेवढे श्रम करता येतील तेवढे , पण मी तुझ्या हाती सापडणार नाही. " मग भिक्षुकाने कन्येस पाचारण केले. योग्य तेवढा समय घेऊन ती सावकाश पावले टाकीत विवाहवेदीसमीप येती झाली. मंगलाष्टकांची सुरुवात झाली. पंडिताचे अंग अंग रोमांचित होत होते. तश्या त्याने अनेक राजस्त्रिया वेगवेगळी प्रलोभने दाखवून भोगल्या होत्या. पण स्वेच्छेमध्ये जी मादकता भरली होती ती वेगळीच होती . ती पाहून त्याच्या वरचा उंची मद्याचा अंमल केव्हाच उतरला होता. आता कामिनीदेवींना शह देणारं सौंदर्य त्याच्या मालकीचे होणार होते. स्वेच्छे मार्फत कामिनीदेविंना मिळवणेही सुकर होऊ शकेल. तशी स्वेच्छेची क्षमता होतीच. त्याबद्दल पंडिताला अभिमान होता. श्रीपालाने आता मंगलाष्टके लवकर समाप्त करावीत असे त्याला वाटू लागले होते. पण त्याला तर जोर चढत होता. याला इतकी मंगलाष्टके कशी काय येतात हेच पंडिताला कळेना. ...... एवढ्या गर्दीतही एक कुब्जा ब्राह्मण वेष धारण करून उंदरासारखा वेदीवर चढला आणि पंडिताच्या कानाशी लागून म्हणाला, " अश्व प्रवेशले.. " पण पंडिताला सांकेतिक भाषा समजली. म्हणजे मुद्रा पोहोचल्या . कोणालाच काही कळले नाही. मग तेथून बाजूला होऊन कुब्जाने मंगलाष्टके म्हणण्यास सुरुवात केली. पंडिताला आता राग आला होता. श्रीपालाची पटावळ बंद झाली आता हा कुब्जा का म्हणतोय असे त्याच्या मनात आले, पण कुणासही संशय येऊ नये म्हणून तो विवाहाच्या वातावरणात सामिल झाल्याबद्दल पंडिताला कौतुक वाटले. मग त्याचीही मंगलाष्टके संपली. आता हार अंतरपाठ बाजूला झाला. पंडिताने अधीरपणे स्वेच्छेला माला घालण्यासाठी हात वर उचलले, पण श्रीपाल म्हणाला, " महाराज , आपण कन्येने वरमाला घातल्यानंतरच तिला माला घालावी. असाच प्रघात पूर्वापार प्रचलित आहे. " असे म्हंटल्यावर पंडीताने हात मागे घेतले. स्वेच्छेने वरमाला पंडीताच्या गळ्यात घातली. ठीक त्याच समयाला सोमू आणि त्याचे सहकारी सुंदरनाथाचे दर्शन घेऊन बाहेर आले. प्रत्येकाच्या कमरेला तिखट धारेची समशेर आणि एक एक खंजीर होता. ते साधू वेषामध्ये आणि रुद्र पठण करित असल्याने कुणालाच संशय आला नाही. मंदिराच्या मागच्या दिशेस येऊन कुणाचे लक्ष नाही असे पाहून , सोमूने आपल्या हाताने गोमुखी उजव्या बाजूस फिरवली , त्या बरोबर त्याखालची शिळा अर्धवतुळाकार फिरून खाली जाणारा मार्ग त्यांना दृग्गोचर होऊ लागला. सोमू आणि त्याचे दहा बारा सहकारी आत शिरले, त्यांनी परत गोमुखी आतल्या बाजूने फिरवली व आतला प्रवेशाचा मार्गावरील शिळा जागेवर बसली.
****************** ******************* *********************** ********************* ************** **************

कामिनीदेवी आपल्या कक्षात अस्वस्थपणे येरझारा घालीत होत्या. संतराम येऊन गेल्याला आता दोन चार दिवस उलटले होते. कामिनीदेवींना महाराजांसारख्या वृद्ध पुरुषाबरोबर केलेल्या प्रणयाची शिसारी येत होती. आतल्या आत त्या संतरामांसाठी तडफडत होत्या. पण संतराम येण्याची काहीच चिन्हे नसल्याने त्यांनी किस्त्रीला पाचारण केले. पाय घाशीत चालण्याची सवय असलेली किस्त्री त्यांच्या कक्षात उपस्थित झाली. तिला त्यांनी थोडक्यात योजना सांगितली, की संतरामांच्या कुटीमध्ये त्यांना कसे जाता येईल आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ होईल. अर्थातच तो रात्रीच्या समयी व्हावा हे ऐकून किस्त्री शहारली. पण तिला देवींची सेवा यापेक्षा कोणतेही कर्तव्य महत्त्वाचे नसल्याने तिने होकार दिला. लवकरच तिने त्या योजनेवर विचार करून ती योजना पक्की करावी व त्याप्रमाणे वागावे. किस्त्रीला मध्यान्हापर्यंत समय दिला होता. किस्त्री आली त्या पावली सावली प्रमाणे नाहिशी झाली. तिच्याकडे ती अपशकुनी म्हणून कुणिही पाहत नसे. फक्त महाराजांना , देवींना आणि सोमूला तिचे महत्त्व होते. आणि तिच्या कर्तुम अकर्तुम शक्तीची कल्पना होती. त्यामुळे ती जिथे जिथे दिसे , एक तर ती क्वचितच दिसत असे, तिथे तिथे महाराजांना देवी कोणत्यातरी गुप्त कारस्थानात गुंतल्या असल्याचा संशय येत असे. असो. किस्त्री आपल्या महालातील दुर्लक्षित भागात असलेल्या तिच्या कक्षात आली. तिने आधी विचार केला. मग काहीतरी ठरवून तिने स्वतःचे भोजन पूर्ण केले. थोडी फार विश्रांती घेऊन ती प्रथम संतरामांच्या आश्रमात गेली. ...........