Login

श्री संतराम ( भाग ५)

संतराम ची कुटी शोधणं किस्त्री साठी कठीण नव्हतं.......

संतरामांची कुटी शोधणं किस्त्रीसाठी कठीण नव्हतं. पण तिने ज्या कुणाला विचारले त्याला असे वाटले की समोर नक्की स्त्रीच उभी आहे, की एखादी कृत्या . त्यामुळे तिला पाहताक्षणी सेवक आणि सेविका व इतर विद्यार्थी बाजूला होऊ लागले. तरीही संतरामांची कुटी ज्या दिशेला होती तिथे खूण करून तिला त्या व्यक्तीने दाखवले. साधारण कुटी, जिच्या आजू बाजूला सुगंधी पुष्पांच्या लता वेली पसरल्या होत्या. त्यामुळे वातावरणाच्या पवित्रतेला एक प्रकारचा दैवी स्पर्श लाभला होता. किस्त्री कितीही जरी राजकारणाच्या खेळात धुरंधर असली तरी तिला असं पबित्र व दैवीवातावरण कोणत्याही संत माहात्म्याच्या भोवती अनुभवायला मिळाले नव्हते. नकळत तिचे हात जोडले गेले. संतराम त्यावेळी काही विद्यार्थ्यांबरोबर अध्यात्मित्क चर्विच्चरण करण्यात गुंतले होते. अचानक पडलेल्या सावलीमुळे आणि सावलीसारख्या वर्णाच्या स्त्रीच्या दर्शनाने ते किंचित विचलित झाले. किस्त्रीला पाहून त्यांनी मंद आणि मधुर आवाजात विचारले, " माते, आपण कोणत्या कार्यासाठी या कुटीत प्रवेशल्या आहात ? आमच्या क्षमतेप्रमाणे आम्ही आपणास साहाय्य अवश्य करू. " त्यातल्या त्यात दबक्या आवाजात तिने त्यांना विनंती केली, " माझ्या एकुलात्या एक पुत्रास आपल्या आश्रमात विद्यार्जनासाठी पाठवावयाचे आहे . " संतराम विचारात पडले. मग तिला म्हणाले, " आपणास काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, कारण सध्या विशिष्ट शास्त्रीय चर्चा सुरू आहे. आपण अभ्यागतांच्या कुटीमध्ये विश्राम करावा, आम्ही आपणास हा विषय संपल्यावर त्वरित पाचारण करु. एकदम देवींबाबत त्यांना निवेदन करणं तिला योग्य न वाटल्याने तिने असे सांगितले. ती मग तेथून अभ्यागतांसाठीच्या विश्रामस्थळामधे बसून प्रतीक्षा करू लागली. लवकरच तिला संतरामांनी बोलावले. तिला आत शिरल्या शिरल्या संतरामांच्या दर्शनाने पावित्र्याशिवाय कोणतिच भावना झाली नाही. मग देवींना दुसरी भावना कशी काय झाली याचं तिला आश्चर्य वाटलं. तिला दर्शवलेल्या आसनावर बसल्यावर संतराम म्हणाले, " जे कारण आपण सांगितले आहे ते प्रच्छन्न आहे असे आम्हांस वाटते, तेव्हा येण्याचं वास्तवीक प्रयोजन सांगितल्यास बरे होईल. " ........ किस्त्रीने थोडावेळ थांबून म्हंटले , " महाराजांचं म्हणणं खरं आहे. देवींना आपल्या दर्शनाची आस आहे . त्यासाठी त्या आपणास महालात येणे प्रशस्त नसल्यास स्वत: येथे येऊ इच्छितात "
संतरामांना अचानक सर्वांगाला हलकासा घाम फुटत असल्याचा भास होऊ लागला. यावर आपण मौन पाळलं तर जास्त बरे होईल असे त्यांना वाटल्याने त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मग ते बोलत नाहीत असे पाहून किस्त्री म्हणाली, " आपल्या मौनातच आपले उत्तर समाविष्ट आहे असे वाटते. " असे म्हणून ती निघून गेली. आता त्यांच्या म्हणण्याचा देवींना अपेक्षित अर्थ देवी काढतील असे वाटून संतराम अस्वस्थ झाले. त्यांनी आचार्यांना या बाबत विचारण्याचे ठरवले. तिला देवींच्या कक्षात येण्यास दोन घटिका लागल्याने संध्यासमयीचा चौघडा वाजू लागला. देवी तिची आतुरतेने प्रतीक्षा करीत होत्या. त्यांना कळेना ज्या कामाला एखाद घटका पुरेशी आहे ते इतके विलंबाने का होते आहे . त्या प्रतीक्षेचा कालावधी लांबल्याने उत्तेजित झाल्या होत्या . पण इतर दासींप्रमाणे किस्त्री काम करीत नसल्याने तिला त्यांनी काही अधिक उणे न बोलण्याचे ठरवले. किस्त्री आल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. किस्त्रीने त्यांना जे घडले ते सांगितल्यावर त्या म्हणाल्या " म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा ? " त्यांनी अधीरपणे किस्त्रीला विचारले. देवींचा वैषयिक हेतू पाहून तिला एक प्रकारची घृणा आली. एवढ्या मोठ्या संतमाहात्म्याबद्दल इतक्या खालच्या पातळीचे विचार करणं म्हणजे महापाप आहे. पण तिने त्यांना प्रिय असाच अर्थ काढून दाखवला. " याचा अर्थ आपणास रात्रीच्या समयी तेथे जाणे इष्ट ठरेल. " थोडा वेळ जाऊन देऊन देवी म्हणाल्या, " मग कधी जायचं ? आजचा रात्रीचा प्रहरच साधावा. " किस्त्रीला होकार देण्याशिवाय पर्याय दिसला नाही. ......... नगरात एकीकडे पंडिताच्या विवाहावर चर्चा चालू होती. आणि त्यातल्या चमत्कारिक घटना सामान्य जनांना आकर्षित करू लागल्या आणि पुरते नगर भारल्यासारखे होऊन गेले. त्यात त्यांना सूख वाटू लागले. ......

किस्त्री गेल्यावर देवींनी प्रज्ञेला पाचारण केले. ती लवकरच हजर झाली. तिने त्यांच्या देहाचे सौंदर्यवान भाग उठून दिसतील अशा रितीने वस्त्रांची निवड केली. चेहऱ्याला पण असे काही लेप तिने लावले, की मूळची देवींची चर्या अधिकाअधिक तजेलदार मुलायम आणि डोळ्यात भरणारी दिसेल. दोन एक घटिकांमध्ये तिने त्यांना आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्व बहाल केले. अर्थातच असे म्हणजे चुकीचे ठरेल. त्यांचे मूळचे व्यक्तिमत्व अधिक डौलदार केले असे म्हणणे योग्य ठरले असते. असो. संतरामांच्या दर्शनासाठी , किंबहुना त्यांच्या स्पर्शासाठी अधीर झालेल्या देवी रात्रीचे भोजन घेण्यासही विसरल्या. जरा वेळाने आलेल्या किस्त्रीने त्यांना त्याची आठवण करून दिली तेव्हा कुठे त्यांनी चार घास कसेतरी पोटात ढकलले. किस्त्रीला ही वैषयिक वासनेची परमावधी वाटली. संतरामांसारख्या सत्पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्याचे देवींना वेड का लागले आहे हेच तिला कळेना. त्यांना कितीतरी दुसरे राजपुरूषही मिळाले असते. फार कशाला आपल्याला सांगितलं असतं तर आपणही तशी योजना करू शकलो असतो. पण म्हणतात ना " कामातुराणाम न भयम न लज्जा " . एखाद्या सत्पुरुषाला नादी लावणं हे महापाप आहे याची किस्त्रीला जाणिव झाली. आपण त्याला सहकार्य करीत असल्याचं तिला दुःख झालं. पण कर्तव्य हे कर्तव्य असतं. या कामासाठी रात्र आणखीन होणं गरजेचं होतं. त्यात प्रच्छन्न पापं करता येतात. किंबहुना , त्यासाठीच तर मध्यरात्रीचा प्रहर असतो. निशाचरी कर्मांना जोर आणि यश पण येतं अशा वेळी. तिने त्यांना वंदन करून सांगितले, " देवींनी अजून एखाद घटिका तरी वाट पाहावी. म्हणजे चौकी पहारे बदलण्याच्या संधिकालात महालातून बाहेर पडणं सुरक्षित होईल. " असे म्हणताक्षणीच देवींचा पारा चढला. हिच्यासारख्या कुरूप स्त्रीला या सुखाची काय कल्पना असणार ? असे मनात येऊन क्रोधित न होता त्या म्हणाल्या, " किस्त्री , तू म्हणतेस ते खरे असले तरीही कालक्षय आम्हास सहन होत नाही. " ते ऐकून किस्त्री त्याला उत्तर न देता तिने स्वतः सोबत आणलेल्या खोट्या
चंदेरी केसांचा टोप आणि इतर सामान्य जनांच्या स्त्रिया जी वस्त्रे नेसतात ती दाखवून त्यांना म्हणाली, " देवींना राजवस्त्रे लेवून चालणार नाहीत , आता ही आणलेली वस्त्रेच चढवावी लागतील. त्यांना फारतर ही वस्त्रे राजवस्त्रांवर चढवायला हरकत नाहीत. म्हणजे त्यांची राजस्त्रीची ओळख कुणाच्याच लक्षात येणार नाही आणि आपला संतराम महाराजांकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल. चौक्या पहारे चुकवितच आपल्याला जावे लागेल. " तिचे म्हणणे रास्त असल्याने देवि काहीही बोलल्या नाहीत. लवकरच मध्यरात्रीचा समय झाला. दिनसमाप्तीची नौबत झडली. महालाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडणे असुरक्षित होते. किस्त्रीने देवींच्या कक्षातल्या कूपाकडे जाण्याची शिळा भिंतीतून सरकवली. आतला मिट्ट अंधार कमी व्हावा आणि मार्ग दृष्टीपंथात यावा यासाठी किस्त्रीने कक्षातला पलिता हाती घेतला. उतरणाऱ्या दगडी पायऱ्या पाहून देवींना सुलक्षणेची आठवण झाली. अर्थातच त्यांना दुःख झाले नाही. नीट पाहून चाललं नाही तर समोरचा कूप गिळायला बसलाच होता. पलित्याच्या उजेडात अरूंद पायऱ्या उतरून तिने उजवीकडा धरली आणि कूपाच्या विरुद्ध दिशेस पावले वळवली. आता मार्ग थोडा रुंद झाला होता. पायऱ्या संपल्या होत्या. पण पायाखालचा खडकाळपणा संपत नव्हता. मागून देवी येत होत्या. सध्या त्या एखाद्या जरा जर्जर झालेल्या चेटकिणीसारख्या दिसत होत्या. प्रज्ञेने कुशलतेने केलेल्या सौंदर्याला त्यांनी उतरवले होते. आणि त्या विरुद्ध चर्येवर खोट्या सुरकुत्यांचा मुखवटा चढवला होता. पण चालण्यातला राजेशाही डौल मात्र त्या बदलू शकल्या नाहीत. किस्त्रीने ही अशाच प्रकारची वस्त्रे आणि मुखवटा वापरल्याने ती वृद्ध दासीसारखी दिसत होती .अर्थातच , अंधारात हे दिसणं कठीण होतं. उजवीकडच्या भुयाराने त्यांना महालापासून दूर असलेल्या राजमार्गावर आणले होते. मार्गावर पाऊल ठेवण्या आधी किस्त्रीने कानोसा घेतला हातातला पलिता तिथल्याच एका कोनाड्यात ठेवला. आणि देवींना हात दिला . त्यांना वर ओढून घेतल्या. आता अंधारात दोन वृद्ध स्त्र्रिया अवतीर्ण झाल्या होत्या. एका काटेरी झुडुपात त्या भुयाराचे मुख उघडत होते. अर्थातच आतून बाहेर येणाऱ्या माणसाला काट्यांचा स्पर्श होऊ नये याची काळजी घेतली होती. त्या दोघींनी झुडुपातून राजमार्गावर पाहिले. राजमार्गाच्या बाजूने जाणारा एक अतिअरुंद मार्ग दाखवीत किस्त्री म्हणाली, " आपल्याला तिकडे दिसणारी शिळा आहे तिच्यामागेच असणाऱ्या दुसऱ्या झुडुपाकडे जायचे आहे. " ...... राजमार्ग आता निर्मनुष्य झाला होता. जे काही थोडेफार येत जात होते ते पंडिताच्या विवाहाच्या गारूडामुळे इतके प्रभावित झाले होते की त्यांना आपण स्वप्नात तर नाहीना अशी भावना झाली होती. समोरच असलेल्या चौकीमधले नगररक्षक पहारे बदलत असूनही डोळ्यात तेल घालून लक्ष देत होते. जाणारा येणारा, नक्की सामान्य जन असून उपद्रवी तर नाही याची ते खात्री करून घेत होते. त्यांची तपासणी अगदी लक्ष देऊन करीत होते. आता किस्त्री आणि देवी चौकी ओलांडणार होत्या. तशी किस्त्रीने गळा काढत रस्त्यावर ठाण मांडले आणि रडत म्हणाली, " वाचवा रे बाबांनो म्हातारीला. तीन घटिका झाल्या पण माझ्या बहिणीला घेऊन आश्रमाचा रस्ता शोधत्ये, पण सापडत नाही. मेल्या पंडिताने काही जादू तर नाही ना केली. " एक दोघे रक्षक तिच्या भोवती जमा झाले. देवींना कळेना आता काय करावे . मग दोघा रक्षकांनी त्या दोघींना चौकीच्या पलीकडे जाणाऱ्या एका मार्गाकडे अंगुलीनिर्देश करून तिकडे जाण्यास सांगितले. पण तत्पूर्वी त्यांनी त्यांचे नाम व उपनाम यांची नोंद केली. आश्रमात जाण्याच्या हेतूचीही नोंद केली. मग त्यांना जाऊन दिले.

किस्त्री जरी चाणाक्ष असली तरी तिला याची जाणीव झाली नाही , की त्या दोघी राजमार्गावर अवतीर्ण झाल्यापासून त्यांच्या मागावर एक व्यक्ती होती, ती म्हणजे " सृष्टार्क " हा सोमूचा हस्तक होता. खरंतर तो त्याचा मेहुणाच होता. पण त्याच्या इतका बुद्धिमान नव्हता. सोमूने किस्त्रीला देवींच्या महालात शिरल्याचे समजल्यापासून त्याने सृष्टार्काची तिच्या मागावर नेमणूक केली होती.
आणि जेव्हा तिच्याबरोबर कुणी वृद्ध स्त्री रात्रीच्या समयी गमन करीत असल्याचे समजल्या पासून तर तो देविंबद्दल सांशकच झाला होता. त्याला फक्त दुसरी स्त्री कोण आहे ते शोधून काढायचे होते. मागावर असलेल्या स्रूष्टार्काला गेल्या अर्ध्या पाऊण घटिकेपासून दुसऱ्या स्त्रीची चाल संशयास्पद वाटू लागली होती. तिची चाल त्याला का कोण जाणे राजघराण्यातल्या स्त्री प्रमाणे वाटत होती. पण खात्री करून घेण्याची गरज असल्याने त्याने त्या उभ्या असलेल्या दुसऱ्या स्त्रीच्या अगदी जवळून जात असताना तिच्या राजस अंगाचा सुगंध टिपला आणि असला सुगंध खास राजस्त्रीया वापरतात असे लक्षात आल्याने त्याने त्या दोघीनि मार्ग क्रमण केल्यावर रक्षकांना ती माहिती दिली. आणि सामान्य वस्त्रे ल्यायलेली ती कुणी राजस्त्रीच असली पाहिजे असा कयास त्यांना सांगून तिचा पाठलाग करण्यास सांगितले. त्याची स्वतःची खूणेची अंगठी पाहून रक्षकांनी त्याचा कयास ही आज्ञा मानून त्यांच्या मागे जाण्याची त्वरा केली. परंतू त्या दोघी सामान्य वेषातल्या स्त्रिया रक्षकांनी निर्देशित केलेला मार्ग त्याजून अतिअरुंद मार्गावरील शिळेच्या बाजूने जात नाहीश्या झाल्या. अर्थातच सृष्टार्क आणि रक्षक यांना तेथील भुयारी रस्ता , जो आश्रमाकडे जातो तो ज्ञात नसल्याने ते चडफडले. तेवढ्यात सृष्टार्काला पलित्याच्या उजेडात चमकणारी वस्तू दिसली. तो रक्षकांना तेथून जाण्यास सांगून ती वस्तू घेण्यासाठी खाली वाकला. ती होती देवींच्या अंगुलितली राजरत्न धारण केलेली अंगठी. त्याने ती सोमूला देण्याचे ठरवले. आणि तो मार्गस्थ झाला. त्या दोघींचा तर त्याला माग लागला नाही. आता एक नक्की होते की जाणारी दुसरी स्त्री कोण होती हे सोमू सांगू शकेल याची त्याला खात्री वाटून तो सोमूकडे जाण्यास निघाला. ...........

आत उतरल्यावर प्रवेशासाठी जे भगदाड होते तिथले गवत आणि झुडुपे परत जागेवर सरकवली. किस्त्रीच्या लक्षात आलं की , पलिता नाही. आता अंधारातून मार्ग काढणं भाग आहे. पलित्याची अडचण झाली असती म्हणून तर तो तिने घेतला नव्हता. पायऱ्या पुढे पुढे रुंद होत गेल्या होत्या. अंधारात सुद्धा त्यांना डोळे सरावल्यावर दिसू लागले. अगदी स्पष्ट जरी नाही तरी गडद अंधार म्हणजे समोर काहीतरी आहे आणि कमी अंधार म्हणजे अंधुक प्रकाशच होता. किस्त्री दिवसासुद्धा त्या मार्गाने गेल्याने तिला तो मार्ग ओळखीचा झाला होता. थोड्याच वेळात रुंद पायऱ्या संपल्यावर खाबड खुबड जमीन लागली. तिथून अर्धी घटिका चालल्यावर एक जुनाट आणि भंगलेली पुष्करणी लागली. तिथे पाणी फक्त नव्हते. त्याला उजवी घालून त्या परत चढावाचा भाग चढू लागल्या. देवी चकार शब्द सुद्धा बोलत नव्हत्या. त्यांना काही अडथळा तर येत नाही ना याची खात्री करण्यासाथी किस्त्रीने विचारले, " देवींना जास्त काळ भुयारात काढावा लागणार नाही. त्यांना होणाऱ्या कष्टांबद्दल क्षमा असावी. त्यावर देवींनी फक्त , " मार्ग क्रमण कर" एवढेच म्हंटले. आता त्या दोघींना भुयाराचे छत खाली येत असल्याने वाकून चालावे लागत होते. पण पाव घटकेनंतर पुन्हा पायऱ्या लागल्या. त्या चढून सरळ झालेल्या मार्गावर दोघी उभ्या राहिल्या. तिथे सर्वेश्वराची पिंडी बसवलेली होती. तिथे पुजाविधी होण्याचे कारण नव्हते. त्यातील प्राचीन साळुंकी थोडी भंग पावली होती . तिला जोर लावून किस्त्रीने पुढे ढकलल्यावर त्या दोघींचे पाय पन्हळीवर पडले. त्या दोघी अगदी छोटेखानी दरवाज्या नसलेल्या मंदिरात जेमतेम उभ्या राहिल्या. मग बाहेर डोकावून पाहिल्यावर तिथल्या पलित्याच्या उजेडात संतरामांचीच कुटी किस्त्रीला समोर दिसली. आता कुठे त्या दोघी स्वस्थपणे बाहेरील थंड हवा अनुभवू लागल्या. देवींना आनंद झाला . पण त्यांनी किस्त्रीला कोणतीही प्रतिक्रिया सांगितली नाही. सावकाश चालत पदरव न करता त्या दोघी कुटीच्या दरवाज्याबाहेर उभ्या राहिल्या. ...........

दुपारीच किस्त्री येऊन गेल्यावर संतराम आचार्यांशी देवींच्या आगमनाबाबत चर्चा करून आले होते. निशाचरी आचार आणि व्यभिचारी वृत्ती असलेल्या देवी राक्षसी मार्ग स्वीकारतील याची संतरामांना खात्री होती. फक्त त्या केव्हा येतील याचा अंदाज नसल्याने आचार्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपल्याला आत्मिक बळ यावे म्हणून ध्यानधारणा केल्याने पवित्र बुद्धीने त्यांच्या भोवती सात्त्विक वातावरण निर्माण केले होते. त्यांना निद्रा येणं शक्यच नव्हतं. पण अवेळी कर्माची पण एक वेळ असते ती टळून गेल्यासारखे वाटल्याने ते निद्राधीन होण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात कुटीच्या दारावर अत्यंत नाजुक हातांनी कुणीतरी निनाद करीत असल्याचे त्यांना जाणवले. त्यापाठोपाठ एकप्रकारचा सुगंध येऊ लागला त्यावरून त्यांनी ओळखले की देवी आलेल्या आहेत. किस्त्री बाहेरच थांबली. कुटीचा दरवाज्या उघडून संतरामांनी देवींना नाईलाजाने आत घेतले. आणि दरवाज्या हेतुपुरस्सर उघडा ठेवला. देवी आत आल्या आल्या आतल्या समया देवींनी मोठ्या केल्या. त्या मंद आणि शांत प्रकाशात देवी भारल्या सारख्या झाल्या. पण वासनेनी. त्यांनी संतरामांची अनुज्ञा न घेताच दरवाज्या लावून घेतला. त्या आता बिछान्यावर पद्मासन घालून बसलेल्या संतरामांकडे वळल्या. संतराम , आचार्यांनी सांगितलेल्या मार्गाने ध्यान धरून बसले होते. देवी आता त्यांच्या निकट आल्या . त्यांच्या अंगाला स्पर्श करून त्यांनी त्यांच्या गळ्यात हात टाकले. आणि त्यांचे चुंबन घेण्यासाठी त्यांनी आपले ओठ टेकवले. पण संतरामांना सांगितल्या प्रमाणे त्यांनी स्वतःची कायाच पाषाणरुपी मूर्तीस्वरूपात बदलली होती. श्वास तेवढा सुरू होता. संतरामांचे अंग देवींना कोणतेही वैषयिक प्रोत्साहन देत नव्हते. पण देवींना अग्निस्वरूप श्वासाचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांचे मुखकमलाचा दाह एवढा वाढला कि त्या झटकन मागे सरकल्या. तरीही देवींच्या मनात तो अनुभव कोरला गेला. त्यातही त्यांना वैषयिक समाधान मिळाले. मात्र देवींच्या श्वासांनी डागाळलेल्या साधनेतून ते खडबडून जागे झाले. आता मात्र त्यांचा तोल जात असल्याचे त्यांना जाणवले. क्रोधाने त्याची जागा घेतली. पण विवेक न करतिल तर ते संतराम कसले. त्याही विचलित अवस्थेत ते देवींना म्हणाले, " आपण येथून त्वरित गमन करावे हे बरे, अन्यथा आमच्या चित्तवृत्तींच्या क्रोधाग्नीत आपले दहन होईल. एका वैराग्याला त्याच्या अटल अवस्थेपासून दूर करण्याचा प्रमाद आपण केला आहे त्याचे फार मोठे शासन भोगण्यास या क्षणापासून तयार राहा. आम्हाला तर पदच्यत केलेतच, पण एका विशेष पदावर आरूढ होऊनही आपण मानवीय धर्माचे नीतिनियम उल्लंघन करण्याचे पाप केले आहे , हे ध्यानात ठेवा. आपण येथून त्वरित निघणे योग्य . आम्ही आपल्या अधिकारात आपणास गमनाची अनुज्ञा देतो आहोत . " या सगळ्याचा परिणाम झाला असता तर त्या देवी कसल्या. परत त्या आसुसलेपणाने म्हणाल्या, " आपण एका प्रणय सारिकेस दुखावलेले आहे हे ध्यानात ठेवावे. महालात यावं , म्हणजे याही पुढचे सुख आम्हास देऊन उपकृत करावं हे योग्य. अन्यथा न्यायनिष्ठुर महाराज कसे आहेत ते वेगळे सांगण्याची आवश्यकता आम्हास वाटत नाही. येतो आम्ही " ..... असे म्हणून त्या जाण्यासाठी वळल्या . पण दरवाज्याबाहेरून आचार्यांची , " बेटा संतराम , " अशी साद ऐकून देवींच्या ललाटी हलकासा स्वेदाचा थर जमा झाल्याचे त्यांन जाणवले. " आता लपण्यात अर्थ नाही आणि या कुटीत लपणार तरी कसं , असा विचार करून त्या मान ताठ करून , जसे आपल्या हातून काही प्रमाद घडलाच नाही अशा आविर्भावात त्या उभ्या राहिल्या. संतरामांनी दरवाज्या उघडला. आचार्य आत आले तेव्हा त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवीत अश्रूंना वाट करून देत ते म्हणाले, " आम्ही अपरधी आहोत, आपल्या आदेशाप्रमाणे आम्ही साधना पुरी करू
शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. " त्यांना उठवीत आणि जवळ घेत आचार्यांनी देवींच्या उर्मट मुद्रेकडे पाहिले व त्यांना जाण्याचा संकेत दिला. पडत्या फळाची आज्ञा मानून देवी त्यांना वंदन न करताच बाहेर पडल्या किस्त्री खाली मान घालून उभी होती. तीस चलण्याची आज्ञा देऊन त्या तिच्या मागोमाग निघाल्या. परतीच्या मार्गावर देवींनी ब्र सुद्धा काढला नाही. .........

(क्र म शः भाग६ वा)

विषय: साहित्यगद्यलेखन
शब्दखुणा: संतरामांची कुटी शोधणं ........
Groups audience:
गुलमोहर - कथा/कादंबरी
Group content visibility:
Public - accessible to all site users
मिरिंडा
Author profile »
मायबोलीकर चाहते : 43
निवडक १० त नोंदवा
हम्म... चांगली रंगवली आहे राणी. कथा उत्कंठा वाढवनारी असणारे असे वाटते. Happy

Submitted by अनघा. on 12 July, 2016 - 07:01
अनघा. +१
लवकर पुढचा भाग येऊ दे.

Submitted by चैत्रगंधा on 12 July, 2016 - 07:54
प्रतिसादाबद्दल अनघा आणि चैत्रगंधा यांचे आभार.

Submitted by मिरिंडा on 14 July, 2016 - 00:23
अनघा +1

मस्त चालली आहे कथा

Submitted by जाई. on 14 July, 2016 - 00:35
मस्त ,लवकर पुढचा भाग येऊ दे.

Submitted by क्रिश्नन्त on 14 July, 2016 - 03:29
लवकर पुढचा भाग येऊ दे

Submitted by सूगध on 22 July, 2016 - 03:29
नवीन प्रतिसाद लिहा
Group details
गुलमोहर - कथा/कादंबरी
सुरुवात : Aug 01 2012
व्यवस्थापक
admin
या ग्रूपमधे नवीन लेखन करा
कार्यक्रम
प्रश्न
लेखनाचा धागा
वाहते पान
Unsubscribe from group

मराठी

Ctrl + ने बदला
माझे सदस्यत्व
जाण्याची नोंद