Login

श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या निमित्त्याने

Short Story About Shri Krishna
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्याने

आजच्या सर्व समस्यांना उत्तरे कुठे आहेत? आज समाजासमोर अनेक गुंतागुंतीचे यक्ष प्रश्न उभे आहेत सर्वसामान्य माणूस चिंताग्रस्त आहे. कुठलीही स्त्री सुरक्षित नाही. अशा या भीतीदायक वातावरणात, खरोखर कृष्णानेच प्रत्येक घरी जन्माला यायला हवे.

आपल्या सामाजिक, व्यवसायिक, जीवनासाठी एक मूर्तिमंत उदाहरण, एक उत्तुंग आदर्श म्हणजे 'कृष्ण'. एक अलौकिक बुद्धीचा, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा मानदंड असावा असा माणूस म्हणजे 'श्रीकृष्ण'.
आज सगळीकडे जी सैतानी वृत्ती झपाट्याने वाढत आहे, भ्रष्टाचाराचा राक्षस सर्वांना गिळंकृत करण्यास 'आ' वासून उभा आहे. अशा भ्रष्टाचाराविरुद्ध बंड आणि भ्रष्टाचारास संपविण्याची अथक तयारी असणे, यासाठी कृष्णाचे नेतृत्व लक्षात घ्यायला हवे.

कृष्णाने वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक, अशा सातही भ्रष्टाचारांवर तीव्र प्रहार केले. कृष्णाने स्त्रियांना प्रचंड आदर दिला. व प्रत्येक प्रसंगी त्यांचे रक्षण केले. आज बहुतेक ठिकाणी स्त्री सुरक्षित नाही. ही भीषण परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक घरी कृष्ण असायलाच हवा.

दुष्ट प्रवृत्तींना संपविणे जेव्हा अनिवार्य झाले, तेव्हा त्याबाबत कृष्ण पूर्णपणे निष्ठूर झाला. दृष्टांचा विनाश तडीस नेताना, कोणत्याही भावना त्याने आड येऊ दिल्या नाहीत.
आज सर्व समाज, इतक्या अधोगतीला गेलेला आहे, की त्यात परिवर्तन घडवून, उन्नती होण्यासाठी प्रचंड चळवळ उभारल्या शिवाय तरुणोपाय नाही. त्यासाठी आपण सर्वसामान्य सुबुद्ध लोकांनी आपल्यातल्या कृष्णाला जागृत करायला हवे.

आपल्या सर्वांमध्ये सत्व आहे, हे कृष्णाने आपल्याला वारंवार सांगितलेले आहे. हे सत्य जाणून घेऊन त्यात चैतन्य आणायला हवे. आज आपल्याला सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. या प्रयत्नांमुळेच समाजाची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येईल.
परिवर्तनशील नेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'कृष्ण.' एक साधं सुधं गवळ्याचं पोर, गोकुळाहून मथुरेला येतो, जुलूम अत्याचाराची सारी परिस्थिती बदलून, सुख शांतीची परिस्थिती निर्माण करतो, हे कोणत्याही पूर्व योजने खेरीज एकट्याने परिवर्तन घडवून आणण्याचे सर्वोत्तम उदाहरण ठरावे.

कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्वाचे सूत्र आहे, निर्बलांना संरक्षण, सज्जनांचा आदर आणि दुर्जनांचा खात्मा. हे सूत्र अनुसरणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

आपले तत्वज्ञान प्रत्यक्ष जगणारा, एकमेव तत्त्वज्ञ म्हणजे 'कृष्ण'. कृष्णाचे तत्वज्ञान आणि त्याचं वर्तन, आचरण, यात संपूर्ण एक वाक्यता होती. आपल्या प्रत्येक भूमिकेला त्याने योग्य न्याय दिल्यामुळेच तो प्रत्येक व्यक्तीत सामाविल्या गेला. आजच्या स्त्रिया व तरुणांमध्ये परिवर्तनाची नैसर्गिक ऊर्जा आहे. या ऊर्जेला सशक्त बनविणे, ही काळाची गरज आहे.

आपण सर्वांनी कृष्णाला देवत्वाची पातळी बहाल करून फक्त त्याचे पूजन करणे, यातच धन्यता मानली. परंतु ही देवत्वाची पातळी बाजूला ठेवून एक माणूस म्हणून त्याच्या व्यक्तिमत्त्वापासून काही शिकायचं असेल, तर त्याच्या जीवनाचं तर्कशुद्ध आकलन होणं आवश्यक आहे.

कृष्णा एक चतुरास्त्र व्यक्तित्व असलेला महामानव होता परंतु आपण फक्त त्याचं गोपाळ कृष्णाचं रूप ध्यानात घेतो परंतु त्यात असलेल्या धुरंदर नेत्याचं नाही ही आपली शोकांतिका आहे.

धन्यवाद

छाया राऊत अमरावती
८३९००८६९१७