नवीनच लग्न झालं होतं अर्चनाच. आज ती लग्नानंतर पहिल्यांदा रक्षाबंधन साजरी करणार होती. एकुलता एक भाऊ विनोद गेल्याच महिन्यात पंधरा वर्षाचा झाला होता. माहेरी आई - वडील अन् भाऊ असे तिघेच असायचे. माहेरची परिस्थिती बेताची. झोपडीवजा घर, आहे म्हणायला शेती ती ही कधी पिकाऊ तर कधी पडीक असायची. अगदी याऊलट नशिबाने तिला, सासर सुशिक्षित आणि श्रीमंत मिळालं होतं. सुदैवाने अर्चनाने बारावी पर्यंतच शिक्षण कसंबसं पुर्ण केलं होत. अजूनही तिची शिकायची किंवा नौकरी करायची ईच्छा होती अन् तिने ते राजीव ला बोलूनही दाखवली होती. नवऱ्याचा, घरच्यांचा होकार कळताच तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कधी एकदा माहेरी जाऊन सांगतेय असच तिला झालं होतं. त्याचं खुशीत ती कपड्याची बॅग भरत होती.
"अर्चना..." राजीव आत येत तिला आवाज देतो.
"हम्म..." ती हळुच होकार देते.
"तुला बस मद्ये बसवतो, एकटी जाशील ना? मी आलो असतो पण ऑफिसला सुट्टी नाही शिवाय ताई पण येईल." नाराजीच्या सुरात राजीव तिला विचारतो.
"हो जाईन ना... तसंही दोन तासाचा तरी प्रश्न आहे. मद्ये स्टॉप वगेरे देखिल नाही... जाईन मी व्यवस्थित... तुम्ही काळजी घ्या." थोडीशी लाजून ती बाहेर निघून जाते...
***
"टिंग टिंग... चला चला उतरा.... भिडे वस्ती...." कंडक्टर जोरजोराने ओरडला अन् दोन तीन जण बस मधून खाली उतरले त्यात अर्चनाही होती. सायंकाळचे पाच वाजले होते. दोन महिन्यातच गावाकडचं हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तिचे डोळे तरसले होते. माहेरच्या मातीची ओढ वेगळीच असते. घराची वाट जणू तिलाच खुणावत होती. पंधरा वीस मिनिटांच अंतर पार करत ती तिच्या माहेरच्या घरी येऊन पोहोचली. आई झाडू मारण्यात दंग, बाबा तुटलेली चप्पल शिवण्यात तर भाऊ बाजेवर बसून नुसतीच पुस्तकं चाळत होता. त्यांना पाहून तिचे डोळे भरून आले.
"आई.... " तिने हाक मारली तशी गोकुळा बाई धावतच आली.
"आली ग आली माझी बाय... ये ये आत ये अशी... जावय बापू दिसत नाहीत?..." आई विचारते.
"अगं आत तर येऊ दे तिला " आण्णा
"बरं आहे का आण्णा" हातातली बॅग खाली टेकवत अर्चना विचारते.
" व्हय व्हय हाय बरा... वाटलं होत येशील तू अन् आलीच बघ... आताच तर नाव काढलं होतं" आण्णा
"तायडे... मी आलो असतो ना स्टँड वर तुला न्यायला... हणमा काकाचा फोन पण बंद पडलाय... तेवढा तर होता भावजीचा फोन यायला..." विनोद वैतागत म्हणाला पण बहिण आल्याचा आनंद डोळयात पुरेपूर दिसत होता...
"उद्या राखी पौर्णिमा आहे अन् मी येणारं नाही असं होईल का? तू तर माझा लाडका भाऊ आहेस..." अर्चना त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली.
"दमली असशील गं... चल चहा टाकते." म्हणून आई आत गेली. मागोमाग अर्चना ही गेली.
***
***
बऱ्याच दिवसांनी सगळे जेवून ओसरीवर बसले होते. शेजारी पण होतेच. नवी नवरी आहे...कसं आहे सासर, सासू, नवरा वगेरे या प्रश्नांनी तर बायकांनी अर्चनाला भंडावून सोडले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा अन् सासरचा नौकरी साठी मिळालेला होकार देखिल अर्चनाने छेडला होता. पण विनोद मात्र गप्प गप्पच बसला होता. कोणास ठाऊक त्याच्या डोक्यात काय चालू होतं. अर्चनाच्या नजरेतून त्याचं गप्प बसून राहणं सुटल नव्हत.
"विनोद?... काय झालं रे?" अर्चना विचारते.
"काय नाही झोप आलीय मला" म्हणून विनोद उठून आत निघून जातो. अर्चनाला जरा हे खटकतच. कारण नेहमी बडबड करणारा विनोद असा शांत का? हा यक्षप्रश्न तिला पडलेला असतो. नक्कीच काहितरी कारण असावं. नंतर विचारू म्हणून पुन्हा ती गप्पा मारण्यात दंग झाली.
***
***
"विनोद... ए विनोद... झोपलास काय?" अर्चना पाणी प्यायच्या निमित्ताने आत येऊन पाहते तर विनोद डोक्यावर गोधडी घेऊन पहुडला होता. पण तिला चांगलच ठाऊक होतं तो नक्कीच जागा असणारं. त्याची लहानपणापासूनची सवयच होती. गोधडी डोक्यावर असली की जागाच आहे म्हणून समजायचं कारण जेव्हां झोपलेला असेल तेव्हां कधीच तो पांघरून घ्यायचा नाही.
"झोपू दे ना ग तायडे..." कूस बदलून तो तसाच पडून राहिला.
"हे बघ... मी तुझ्यासाठी आलेय इथवर आणि तू असा फुगला आहेस. मी जाऊ का परत? हुं..." इमोशनल ब्लॅकमेल केल्या शिवाय तो तोंड उघडणारच नाही. ही युक्ती तिन वापरली.
"काय गं... झोपू पण देतं नाही. बोल काय बोलायचं आहे?" विनोद उठून बसला.
"हम्म... आता कसं बरं?... खरं खरं सांग... गप्प का आहेस?" अर्चना
"काय तू पण... आता शांत पण बसायचं नाही का?" विनोद
" विन्या... तुला मी चांगलच ओळखते हा... तुला माझी शप्पथ आहे... बोल लवकर." अर्चनाने आता दुसरा डाव टाकला.
"तायडे... कसं सांगू... अगं एवढा मोठा झालोय मी, पण उद्या तुला ओवाळणी द्यायला माझ्याकडे काहीच नाही." विनोद खाली मान घालून बोलतो
"अरे इतकंच? विनोद... अरे शिकतोय तू अजुन ,लहान आहेस. जेव्हां शिकून मोठा होशील, चार पैसे कमवशील तेव्हां तुला हवं ते गिफ्ट मला दे पण आता मी तुझ्याकडुन काहीही घेणार नाही. फक्तं आयुष्यात कीतीही मोठा झालास तर बहिणीला विसरू नकोस. हीच माझी ओवाळणी आहे असं मी समजेन." बोलता बोलता दोघांचे डोळे पाणावले होते....
***
***
दहा वर्षानंतर....
"अगं आवरलस का? विनोद आता येईल. चिऊ बाळ बघ कशी मस्त तयार झाली आहे." राजीव.
"हो हो झालंच... आणि चिऊला मीच तयार केलं आहे, म्हणून तर वेळ झाला ना मला आवरायला." अर्चना गाल फुगवून बडबड करत होती.
पों... पों....
"येह... मामा आले... मामा आले." चार वर्षाची चिऊ धावतच खाली गेली.
"आला वाटतं विनोद" अर्चना
बाहेर पांढऱ्या रंगाची कार येऊन उभी होती. सूट बुट घातलेला विनोद खाली उतरला तशी चिऊ त्याला जाऊन बिलगली.
"या या विनोद... म्हणजे आज स्वारी चक्क बहिणीला न्यायला इथवर आली आहे तर?" राजीव
"येणारच... लाडकी बहिण आहे ती. तिच्यामुळे तर आज इथपर्यंत पोहोचू शकलो." विनोद थोड गर्वाने म्हणाला.
चहा पाणी झाल्यावर विनोद, अर्चना आणि चिऊला घेऊन गेला.
"विनोद कसा आहेस? आणि आई बाबा?" अर्चना
"एकदम मस्त आहेत सगळे. गेल्यावर भेट आता." विनोद.
दहा वर्षात अगदी कमी वयातच विनोदने यशस्वीतेचा पल्ला गाठला होता. गाडी- बंगला, नोकर- चाकर शिवाय त्याने स्वतःचा बिझनेस देखिल सुरू केला होता. हाच विचार अर्चना करत होती, तोच गाडीला करकचून ब्रेक लागला तशी ती घाबरली.
"ए बाई मरायचं आहे का? का दिसत नाही डोळ्याला?" विनोद ओरडतच खाली उतरला. झोपलेल्या चिऊला व्यवस्थित ठेवून अर्चनाही खाली उतरली.
"काय झालं आहे विनोद? यांना का ओरडतो आहेस तू? " अर्चना
"बघ ना रस्त्याच्या बाजूने जाता येत नाही का? भिकरचोट... कुठून येतात काय माहित? केव्हाचा हॉर्न वाजवतो आहे, तर बाजूला सरायच नावच नाही." विनोद भलताच वैतागला होता. समोर एक फाटकी, मळकी साडी घातली बाई कडेवर लेकरू घेऊन खाली मान घालून उभी होती. बहुतेक भीक मागून खाणारी असावी. चेहरा घामाने भिजलेला.. लेकराची काय वेगळी अवस्था नव्हती. ना पायात चपला ना डोक्यावर कशाचा आसरा. तिला पाहून अर्चनाला कसंस झालं आणि विनोदचा राग देखिल आला.
"भूक लय लागून राहिली भाऊ... चार पैक मिळत्याल का? सकाळपस्न पाण्याचा थेंब नाय." ती बाई डोळ्यात पाणी आणून म्हणाली.
"तुला सकाळपासून मीच भेटलो का? इथं मी काय बोलतोय आणि तुझं वेगळचं चालु आहे." विनोद जास्तच चिढला. त्याच्या नजरेत तुच्छता दिसत होती, अहंकार, गर्व दिसत होता...
"विनोद बस्स झालं... अरे त्यांची अवस्था तर बघुन ओरड. इतका मोठा झालास का तू?" अर्चना जवळजवळ ओरडलीच. तिला प्रचंड चिढ आली होती त्याच्या वागण्याची.
"अगं ताई नाटकं करतात हे लोकं, तुला नाही माहित." विनोद
"विनोद..." अर्चनाने हातानेच त्याला गप्प राहण्याचा इशारा केला आणि कार कडे गेली. बॅग मधून पाण्याची बाटली काढून आणली.
"घे हे आणि बाळाला ही पाज" असं म्हणून अर्चनाने ती बाटली त्या बाईला सोपवली अन् सोबतच हातात पाचशेच्या दोन नोटा टेकवल्या.
"देव तुम्हाला लय सुखी ठेवलं बघा बाईसाहेब." असं म्हणून ती अर्चनाचे पाय धरू लागली.
"अहो काय करताय? पाय नका धरू... पोटभर खा आणि बाळालाही चारा. एका बहिणीकडून छोट्या बहिणीला दिलेत असं समजा." अर्चना तिचे हात धरत म्हणाली. चेहऱ्यावर आनंद घेऊन ती बाई निघून गेली. विनोद वर एक जळजळीत कटाक्ष टाकून अर्चना गाडीत जाऊन बसली. तसा विनोद ही वरमला...
***
***
आज रक्षाबंधनाचा सण होता. सकाळची संध्याकाळ होत आली होती, पण अजूनपर्यंत अर्चनाने विनोदला राखी बांधली नव्हती. काल घडलेला प्रकार विनोदच्या परस्पर अर्चनाने आईबाबांच्या कानावर घातला होता, त्यामुळे बहिण भावाच्या अबोल्यात ते दोघे पडणार नव्हते. न राहवून शेवटी विनोदच बोलला...
"तायडे राखी बांधते आहेस न?"
पण तिच्याकडून काहीच प्रत्युत्तर मिळालं नाही. विनोदला वाईट वाटतं होत आणि आश्चर्यही. एवढ्याश्या गोष्टीसाठी आपली बहीण अशी का वागते आहे त्याला समजत नव्हतं.
पण तिच्याकडून काहीच प्रत्युत्तर मिळालं नाही. विनोदला वाईट वाटतं होत आणि आश्चर्यही. एवढ्याश्या गोष्टीसाठी आपली बहीण अशी का वागते आहे त्याला समजत नव्हतं.
"तायडे काय चुकलं असेल तर माफ कर मला पण असा अबोला नको धरू." विनोद खरचं रडकुंडीला आला होता. मग काय, शेवटी बहिणच ती. पिघळलं काळीज..वेड्या बहिणीची वेडी माया म्हणतात ते काही खोटं नाही.
"विनोद नुसता वयाने अन् पैशाने मोठा झाला आहेस तू. तूझ्या पैशाचा गर्व चढलाय तुला. विसरू नकोस आपणही अशाच हलाखीच्या परिस्थितीतून वर आलोय. पैशाचं काय घेऊन बसलाय... तो फक्तं तूझ्या मृत्यू पर्यंत कामी येईल पण छोटया मोठया गोष्टीतून माणुसकी जपत राहिलास तर मरणोत्तर तुझं नाव निघेल. लहान होतास तेव्हां ओवाळणी देऊ शकत नव्हतास आणि आज हवं ते देऊ शकतोस पण मला तुझ्याकडून काहीच नको आहे. फक्तं एक वचन दे... भलेही आयुष्यात कीतीही श्रीमंत हो, पण तूझ्या मनाच्या श्रीमंतीला त्यापूढे कधीही फिकं पडू देऊ नको." बोलता बोलता तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं अन् सगळेच आज भावनेच्या महापुरात किंचित न्हाऊन निघाले होते.
"तायडे मला माफ कर गं... इथुन पूढे मी असा कधीही वागणार नाही. हे माझं वचन आहे." विनोद अर्चनाला घट्ट मिठी मारत म्हणाला... तिनेही हसत हसत त्याला राखी बांधली.
***
***
आज सगळेच आनंदी होते. अर्चनाच्या चेहऱ्यावरून तर आनंद ओसंडून वाहत होता. विनोदने गोर -गरीबांसाठी मोफत ट्रस्ट उभारली होती. त्या ट्रस्टच नावं होतं... ' बहिणाबाई '......
समाप्त!
सौ. प्रणाली निलेश चंदनशिवे.