Login

श्रीमंतीची गुर्मी

अफाट श्रीमंती असलेली मग्रूर बाई अंतसमयी एकटी पडते

लघुकथा -
श्रीमंतीची गुर्मी

आज सरूताई पलंगावर पडल्या पडल्या आपल्या आयुष्याचा लेखा जोखा मांडत होत्या. खरंच इतकी अगणित संपत्ती असून आजच्या घडीला आपण खूप कंगाल आहोत असं मनोमन त्यांना वाटत होतं. आज त्यांना गरज असताना त्यांच्या पाशी खऱ्या अर्थाने जवळचं असं कोणीच नव्हतं. इतकी वर्ष खूप घमेंडीत आयुष्य जगलेल्या सरूताई मनाने खचल्या होत्या. उन्मत्त स्वभावामुळे त्यांनी काय काय गमावलं हे त्यांच्या नजरे समोरून तरळून गेलं.

सरूचे म्हणजेच सरोजिनीचे बालपण ऐषोरामात गेले होते. एकुलती एक मुलगी असल्या मुळे त्यांना कशाचीच कमी नव्हती. तिच्या बाबांचा, सतीश राजे यांचा बिझनेस खूप जोरात चालायचा. घरी नोकर चाकर होते. छोट्या सरूला शाळेत ने आण करण्यासाठी चार चाकी गाडी होती. त्याकाळी चार चाकी गाडी अति श्रीमंतांकडेच असायची. गाडीचं कुतुहल वाटून शाळेतील एखादी मुलगी किंवा मुलगा गाडी जवळ आला तर सरू लगेच लगेच उद्दामपणे म्हणायची,

"ए चल दूर हो. माझ्या गाडीला हात लावू नको मळेल ती."

श्रीमंतीमुळे शाळेत असल्या पासूनच सरूच्या वागण्यात एक प्रकारची मग्रुरी होती. सर्व मुली तिच्यापासून चार हात लांबच रहायच्या. अभ्यासात पण शिकवणी असून तिला काही गती नव्हती. प्रत्येक वर्षी जेमतेम पास व्हायची. तीच्या आईला पण त्याचे काही विशेष वाटत नव्हते. कारण त्यांच्या मते पैशाच्या जोरावर एखादा श्रीमंत जावई शोधता येईल. सरू जेमतेम मॅट्रिक (पूर्वीची ११वी) झाली आणि तीने स्वतःच जाहीर करून टाकले की तिला आता शिक्षणात रस नाही. आईनेही जास्त आग्रह धरला नाही.

सरूच्या बाबांचे, सतीश रावांचे पाय मात्र विपुल संपत्ती असून सुद्धा जमिनीवर होते. ते गरिबीतून काबाडकष्ट करत इथपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ते नेहमी सर्वांशी प्रेमाने वागत. कुणालाही मदतीची गरज असेल तर सढळ हाताने मदत करत होते. त्यांची पत्नी सविता श्रीमंतीत वाढलेली होती त्यामुळे तिला गरीब लोकांचा तिटकारा होता. सतीशराव सविताला नेहमी म्हणायचे,

"अगं ह्या गरिबांनी स्वेच्छेने गरीबी स्वीकारली नाही. आज ती त्यांची परिस्थिती आहे. कदाचित उद्या त्यांना चांगले दिवस येतील. तसंच आज आपण खूप श्रीमंत आहोत पण परिस्थिती कधी बदलेल हे कुणालाही सांगता येत नाही. म्हणून सर्वांशी नेहमी प्रेमाने वागायला हवं."

"तुम्ही मला काही शिकवू नका मी श्रीमंतीत वाढले आणि श्रीमंतीतच जगणार." छोट्या सरूला सविताचा नेहमीच पाठिंबा असायचा. सतीशराव सरूला काही उपदेश करू लागले की दोघीही त्यांची खिल्ली उडवायच्या.

शाळा सोडल्यानंतर तर सरू खूपच मनमौजी असल्या प्रमाणे वागू लागली. मनात येईल तेव्हा गाडी घेऊन जायची. वाटेल तेव्हढी खरेदी करायची, हॉटेल मध्ये जायची. सरूच्या आईने पसंत केलेल्या एका श्रीमंत व्यावसायिकाशी तिचे लग्न झाले. आई बाबांच्या घराजवळच तिचे सासर होते. सरूच्या सासरची माणसं खूप प्रेमळ होती. ते तिला खूप सांभाळून घ्यायचे पण ही मात्र त्यांच्याशी फटकून वागायची. इतक्या चांगल्या माणसांना झिडकारून कालांतराने सरूने हट्टाने दुसरा संसार थाटला. सौंदर्याच्या जोरावर तीने नवऱ्याला मुठीत ठेवले होते. त्यांना दोन मुलं झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. तिने मुलं लहान असताना तरी त्यांना प्रेमाने सांभाळले. सरु खूपच आत्मकेंद्रित आणि आत्मप्रौढी मिरवणारी होती. मुलं मोठी झाल्यावर त्यांना आईचं इतरांशी असलेले वागणं खटकू लागलं. सरू मुलांशी पण अलिप्तपणे वागत होती. तीही आई पासून दुरावत गेली. कालांतराने मुलीचं लग्न झालं. मुलीचे सासर त्यांच्या घरापासून जवळच होते तरीही मुलगी फार क्वचित माहेरी यायची. सरूताई पण तिला कधी प्रेमाने बोलवत नसत. मुलगा मात्र नोकरी निमित्ताने दुसऱ्या शहरात राहत होता. लग्न झाल्यावर तो तिथेच स्थायिक झाला. घरापासून थोडे लांब राहण्यात त्याला शहाणपणा वाटला.

जसजशी वर्षे सरत होती तसतशी अथक परिश्रमा मुळे सरूताईंच्या यजमानांची शारीरिक स्थिती बिघडत गेली. मुलं त्यांना भेटायला अधून मधून येत असत. एक दिवस अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुलाने आईला आपल्या घरी राहायला बोलावले. पण सरूताईंनी ठाम नकार दिला . त्यांना कोणाचे बंधन नको होते. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती. घरी दोन बायका कामासाठी येत. सरूताई मनसोक्त पर्यटन करत होत्या. मनात आलं की नाटक सिनेमा, हॉटेल असं मजेत चाललं होतं. पण हे असं कुठवर चालणार. दहा बारा वर्षांनी त्यांना विविध व्याधींनी जखडले. हळूहळू त्यांना घरी चालणे फिरणे कठीण होऊ लागलं. तरीही त्यांच्या स्वभावात तसूभरही फरक पडला नाही. मुलं अधून मधून येऊन आईची चौकशी करत. पैसे देऊ करत. पण सरू ताईंना पैशाची काहीच कमी नव्हती. हळू हळू त्यांची तब्येत खूप खालावली. घरी कामाला येणाऱ्या बायका आणि एक नर्स त्यांचं सर्व नीट करत असत पण त्यांच्याशी सरू ताई फटकून वागत. भरपूर पैसा मिळतो म्हणून त्या येत होत्या. मुलाने त्यांची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये करायचं ठरवलं त्यालाही सरू ताईंनी नकार दिला. शेवटी घरीच सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या पुढे कोणाचेच काही चालत नव्हते.

अशा परिस्थितीत सर्व लोक नेहमी मुलांना दोषी ठरवतात. पण हे असे दुराग्रही, उर्मट आई अथवा बाबा असल्यास मुलांनी तरी काय करावं. काही व्यक्ती आयुष्यभर हेकटपणे वागल्या तरी आपला शेवट दिसायला लागल्यावर, आपण अगतिक आहोत कळल्यावर थोड्या नरमाईने वागतात. पण सरूताई आक्रस्ताळेपणा करत. त्यांनी प्रेमाने कोणालाच जोडून ठेवलं नव्हतं म्हणून शेवटच्या दिवसात त्यांच्या जवळ कोणीच नव्हतं. त्यांच्यातील आणि इतर सर्वांमधील अंतर तसेच अबाधित राहिलं. म्हणूनच कितीही पैसा असला तरी पैशाने माणसं विकत घेता येतात पण माणसं जोडण्यासाठी प्रेम, प्रेम आणि प्रेमच खूप महत्त्वाची भूमिका निभावतं. शेवटी काय पेरावे तसेच उगवते. एक वेळ आपल्याकडे भरपूर पैसा नसला तरी चालेल. पण जोडलेल्या माणसांची श्रीमंती हवी. अहंकाररुपी राक्षसाला आपल्या आयुष्यात स्थान देऊ नये. प्रत्येकाने हातात कात्री घेऊन फिरण्यापेक्षा सुई धागा घेऊन फिरावे.

आता सरुताईंना शेवट दिसू लागल्यावर प्रकर्षाने जाणवलं की शेवटच्या क्षणी तरी आपलं माणूस आपल्याजवळ असावं. त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला बोलावून घेतलं. दोघांना आपल्याजवळ बसवलं, आपले क्षीण हात त्यांच्या पाठीवरून फिरवले. त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्या म्हणाल्या,

"बाळांनो मी आयुष्यभर श्रीमंतीच्या गुर्मीत जगले. तुम्ही दोघं माझ्या पोटची लेकरं असूनसुद्धा तुम्हाला आईचं प्रेम कधीच दिलं नाही. माझ्या अंतसमयी माझी ही खूप मोठी चूक, माझा गुन्हाच पदरात घाला आणि मला माफ करा. तुम्ही दोघांनी सर्वांशी प्रेमाने वागा कारण आयुष्यात पैशापेक्षा माणसांचं मोल जास्त असतं हे मला आता पटलं आहे. मी आहे तोपर्यंत वेळात वेळ काढून मला नक्की भेटायला येत जा." दोन्ही लेकरं भावपूर्ण स्वरात एकदम बोलले,

"आई असं बोलू नकोस आम्हाला तू नेहमीच हवी होतीस आणि अजूनही हवी आहे." सरूताईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला तरी उपरती झाली हे महत्त्वाचं, नाही का !