Login

श्शू! आवाज कोणाचा? भाग ७

एक कथा
श्शू! आवाज कोणाचा? भाग ७

मागच्या भागात आपण बघीतलं की नयनाचे आईबाबा नयना कडे आले आहेत. आता पुढे काय होईल हे बघू.


दोन दिवस झाले नयनाच्या आईबाबांना येऊन. प्रतिक परवा घरीच थांबला.नजाणो नयनाने एकदम काही गडबड केली तर तिच्या आईबाबांना गोंधळलेल्या सारखं व्हायला नको म्हणून तो घरीच थांबला होता.

डाॅक्टरांच्या औषधांचा परिणाम म्हणून नयना बरीच शांत झाली होती. तिला झोपही चांगली लागत होती.
म्हणून काल प्रतिक ऑफीसला गेला आणि नेमकं नयनाचं काहीतरी बिनसलं म्हणजे तिची बडबड ऐकून तिचे आईबाबा धास्तावले आणि त्यांनी प्रतिकला फोन केला.

प्रतिक मिटींग मध्ये होता.त्याचा फोन सायलेंटवर होता पण फोनच्या स्क्रीनवर नयनाच्या बाबांच्या नंबर दिसल्यावर त्याने परवानगी घेऊन फोन उचलला आणि केबीनबाहेर आला.

" हॅलो,बाबा काय झालं?"

" अरे नयना काहीबाही बडबडतेय. तिच्या समोर कोणीच दिसत नाही मग समोर कोणीतरी उभं आहे असं समजून ती कशी काय बोलतेय कळत नाही."
प्रतिकच्या लक्षात आलं.

" बाबा तुम्ही घाबरू नका."

" अरे घाबरू नको काय म्हणतोस!घाबरलोय आम्ही दोघं."

" नका घाबरू.आईंना सांगा नयनाला हळूच जवळ घेऊन थोपटा ती शांत होईल."

" अरे ती इतक्या आवेशाने बोलतेय की आम्हाला तिच्या जवळ जायला भिती वाटतेय."

" नका घाबरू.ती तुम्हाला काही करणार नाही. तिला जवळ घेऊन थोपटलं की ती शांत होईल. आईंना सांगा. डाॅक्टरांनी औषधं दिली आहे ती जेवणानंतर नयनाला दिली का?" प्रतिकने औषधांची आठवण करून देत विचारलं.

" मला माहित नाही."

" आईंना विचारून मला सांगा. मी फोन होल्ड करतोय. मी मिटींग मध्ये आहे."

प्रतिकने नयनाच्या बाबांना कल्पना दिली.

" हो विचारतो."
नयनाच्या बाबांच्या आवाजातील भीती प्रतिकला जाणवली.

प्रतिक बाबांच्या उत्तराची वाट बघत केबीनबाहेर उभा होता.

" हॅलो प्रतिक नयनाला तिच्या आईने जेवणानंतरची औषधं दिली आहे."

" ठीक आहे. मग घाबरू नका. आईंनी तिला जवळ घेऊन थोपटलं की नयना शांत होईल. ती बोलून थकल्यामुळे लगेच तिला झोप येईल तर तिला फार प्रश्न विचारू नका तिला झोपू द्या. नयना झोपली की मला मेसेज करा. ठीक आहे. ठेवतो फोन."

प्रतिकने फोन ठेवला. नयनाचे बाबा कितीतरी वेळ फोन हातात घेऊन विचारात हरवले.

इकडे प्रतिकला कळेना ऊद्या ऑफीसमध्ये येण गरजेचं आहे तर आपण ऑफीसमध्ये येऊ शकू की नाही. या विचारात त्याचं मिटींग मध्ये लक्ष लागेना.

****
नयनाचे बाबा नयनाकडे बघत होते नयनाची आई एकदा नयनाकडे आणि एकदा तिच्या बाबांकडे बघत होती. त्या गोंधळलेल्या होत्या. त्यांना मघापासून काय घडलं ते आठवलं.

" नको ग माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू. "
नयना म्हणाली.

" मी तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. तू मला समजून घे. ज्या चुका मी केल्या त्या तू करू नकोस. तुला कस्पटासमान मानणा-या लोकांना तिथल्या तिथे उत्तर दे."
आवाज म्हणाला.

" मी बघीन कसं उत्तर द्यायचं ते. तू सतत बडबड करून माझा गोंधळ करतेय. मला धड झोप लागत नाही. जेवण सुचत नाही. तू जा"

नयनाचा आवाज वरच्या पट्टीत पोचला तसं ते ऐकून नयनाचे आईबाबा धावत पळत नयनाच्या बेडरूम पर्यंत आले. ते आत शिरणार तोच त्यांना नयना जोरजोरात हातवारे करत बडबड करताना दिसली. तिच्या बोलण्याची पद्धत बघता ती कोणिशीतरी बोलतेय हे लक्षात आलं. पण नयनाच्या समोर कोणीच नव्हतं हे बघीतल्यामुळे ते दोघही घाबरले. त्यांना कळेना हा काय प्रकार आहे. त्यांची खोलीत जाण्याची हिम्मत होत नव्हती.

" तू आत्ता झोपलीस तर संपलीस समज."
आवाज ठामपणे म्हणाला.

" हे काय बोलतेय तू? संपली म्हणजे? काय म्हणायचं काय तुला?"

नयनाने ओरडून विचारलं. आता बोलता बोलता नयनाला रडायला यायला लागलं.

" रडू नकोस. डोळे उघडे ठेवून वावर मी जशी गप्प बसले तशी गप्प बसू नकोस. मी काहीच बोलले नाही त्याचा गैरफायदा घेतला ऑफीसमधल्या लोकांनी."

" तुझ्या ऑफीसमधल्या लोकांनी तुझा गैरफायदा घेतला म्हणजे माझ्या ऑफीसमधले घेतील असं आहे का? तू प्लीज तुझी स्टोरी मला सांगू नको. माझं आयुष्य तुझ्या आयुष्यापेक्षा वेगळं आहे.जा तू निघून "

" मी गप्प बसले म्हणून संपले आणि आता भटकतेय."

" तू भटक जिथे भटकायचं तिथे . माझ्या कानाशी येऊ नकोस."

नयना डोकं धरून रडायला लागली.

" जा तू नयनाजवळ."
नयनाचे बाबा नयनाच्या आईला म्हणाले.

" नाही.मला भीती वाटते. मी तिच्या जवळ गेले आणि रागाच्या भरात तिने मला मारलं तर?"

नयनाची आई चांगलीच घाबरली होती.

" प्रतिक म्हणाला ती तुम्हाला काही करणार नाही.तिला जवळ घेऊन थोपटलं की ती शांत होईल."

" मग जा न तुम्ही.‌मला कशाला म्हणताय?"
नयनाच्या आईचा आवाज हे बोलताना रागाने चिरकला कारण त्या घाबरल्या होत्या.

" अगं तू तिची आई आहेस. असं काय बोलते. मुलं घाबरली की आईजवळच शांत होतात.जा तू."

" मुलं घाबरली की बाबांजवळ पण शांत होतात."

" जाते की नाही की प्रतिकला फोन करू?"

" नको जाते."

नयनाची आई नयनाच्या बाबांकडे रागाने बघत सगळा धीर एकवटून हळूहळू नयनाच्या जवळ गेली.

नयना डोकं दाबून रडत आणि बडबडत होती. नयनाच्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत घाबरतच हाक मारली.
" नयना "

आवाजाने नयनाचं लक्ष गेलं. आई दिसताच तिने आईच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. नयनाची आई तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागली. हळुहळू नयनांचे बाबापण सगळा धीर एकवटून नयनाजवळ आले.

बराच वेळाने नयनाचा उमाळा शांत झाला. नयना खूप थकून गेली. प्रतिक काय म्हणाला ते नयनाच्या बाबांना आठवलं तसं ते पटकन म्हणाले.

" नयना बेटा झालीस का शांत?"

नयनाने हळूहळू मरगळल्यासारखी मान हलवली.

" तू झोप जरावेळ. तुला बरं वाटेल."

हे वाक्य नयनाच्या आईकडे बघत फोनवर प्रतिक असं म्हणाला हे खुणेनेच सांगितलं. ते लक्षात येताच नयनाच्या आईने पण तिला म्हटलं,

" बाळा थकली असशील. फार विचार करू नकोस."

" मी नाही विचार करत.तो आवाज मला सारखा विचार करायला लावतो. "

पुन्हा हिची बडबड चालू होते की काय अशी भिती नयनाच्या आईबाबांना वाटली. लगेच बाबांनी विषय बदलला.

" तू झोप जरावेळ. तू झोपलीस की तुला जरा बरं वाटेल."

नयनाला पलंगावर झोपव असं त्यांनी नयनाच्या आईला खुणेनेच सांगितलं.

नयनाच्या आईने बाबांनी केलेली खूण लक्षात येऊन मान डोलावली. हळुच त्यांनी त्यांच्या कमरेला असलेली नयनाची मिठी सैल केली आणि अलगद तिला पलंगावर झोपवलं. नयनाने थकल्यामुळे डोळे मिटून घेतले. आई नयनाच्या कपाळावर थोपटू लागली तशी नयना म्हणाली,

" आई तू बस नं माझ्या जवळ."

" हो बसते हं बाळा. झोप तू."

डोळ्यात जमा झालेले अश्रू दुस-या हाताने पुसत नयनाची आई नयना जवळ पलंगावर बसली. नयनाने चटकन तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवून थोपट असं पुटपुटली.

" हो.थोपटते"

नयनाची आई केविलवाण्या नजरेने नयनाच्या बाबांकडे बघायला लागली. बाबांचा चेहरा पण हे सगळं बघून वेदनेने झाकोळला. त्यांनी नाईलाजाने मान हलवली.

बराच वेळाने नयनाच्या आईच्या लक्षात आलं की नयना गाढ झोपली आहे. त्यांनी तिच्या डोक्यावरुन आपला हात बाजूला करून, तिच्या अंगावर पांघरूण घालून हळूच अगदी आवाज न करता पलंगावरून उठली. दोघंही दबक्या पावलांनी खोलीबाहेर आले.

बाहेरच्या खोलीत आल्यावर, सोफ्यावर बसल्यावर दोघांनी नि: श्वास सोडला. ते अजूनही थोडे घाबरलेलेच होते.

" अहो" नयनाच्या आईने नयनाच्या बाबांना हाक मारली.

" काय?"

" आपल्या नयनाला हे असं काय झालं असेल? तिला काही बाहेरची बाधा नसेल नं झाली?"

हे बोलतानाही नयनाच्या आईच्या डोळ्यात भीती दिसत होती.

" नाही.असं काही तरी बडबडू नको."

" अहो सकाळी ती स्वयंपाक करायला येते ना ती मला असं म्हणाली."
नयनाच्या आईने स्पष्टीकरण दिलं.

" हे बघ.तुला काही शंका असली तरी प्रतिकसमोर बोलू नकोस. त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही.कळलं?"

नयनाच्या आईने मान हलवली.

दोघेही कितीतरी वेळ त्याच सोफ्यावर आपल्या विचारात हरवून गेले. किती वेळ ते तसेच बसून होते यांचा त्यांना अंदाज आला नाही.

प्रतिक स्वतः जवळ असलेल्या किल्लीने दार उघडून घरात शिरला तर त्याला नयनाचे आईबाबा एखाद्या पुतळ्यासारखे बसलेले दिसले. त्यांना प्रतिक घरात आलेलाही कळलं नाही.

प्रतिकच्या लक्षात आलं की हे दोघंही नयनाचं हे रूप बघून घाबरले आहेत. प्रतिक पायातले बूट काढून जागेवर ठेवून त्यांच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला.

" आई बाबा "

त्याने हाक मारताच दोघेही दचकले. प्रतिककडे बघू लागले पण त्यांची नजर निर्विकार होती. प्रतिककडे अनोळखी नजरेने बघत होते.

" आई" प्रतिकने पुन्हा एकदा हाक मारली तेव्हा ते भानावर आले.

" तू कधी आलास?"

एकेक शब्द गोळा करत कसंबसं नयनाच्या बाबांनी प्रतिकला विचारलं.

" आत्ताच आलो.पण तुम्ही एवढे घाबरला का?"

प्रतिकच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं दोघांनाही कळलं नाही.

" मी आलोय.आता घाबरू नका. नयना झोपली नं. उठल्यावर फ्रेश होईल."

कसंनुसं हसत दोघांनी मान डोलावली.

प्रतिक फ्रेश होण्यासाठी आत गेल्यावर नयनाची आई नयनाच्या बाबांकडे बघत म्हणाली,
" अहो."
नयनाच्या आईच्या मनातील प्रश्न बाबांना कळला. हे असंच असेल का? या प्रश्नाच्या आवर्तनात दोघेही पुन्हा हरवून गेले.
_________________________________
नयनाच्या आईच्या मनात आलेली शंका खरी असेल का? बघू पुढील भागात.


0

🎭 Series Post

View all