Login

श्शू! आवाज कोणाचा? भाग १०

एक कथा
श्शू! आवाज कोणाचा? भाग १०

मागील भागात आपण बघीतलं की स्वामीजींना नयनाच्या कानात कोण बोलतं हे कळलं आहे. आज बघू तो आत्मा स्वामीजींशी बोलेल का?


स्वामीजी ध्यान लावून बसले होते. प्रतिक एकदा त्यांच्याकडे बघायचा एकदा नयनाकडे बघायचा. त्याच्या जीवाची फार घालमेल होत होती.नयना मात्र या कुठल्याच विश्वात नव्हती.

***
बराच वेळाने स्वामीजींच्या डोळ्यासमोर एक आकृती उमटली. खूप स्पष्ट नव्हती. ती आकृती दिसताच स्वामीजींनी विचारलं,

"कोण आहेस तू का या मुलीला छळते आहे?"

"मी तिला छळत नाही. मी तिला मदत करायला आले आहे." आकृती म्हणाली.

"कोणती मदत आणि तुला कसं कळलं की हिला मदत हवी आहे?"

"मी भटकत असताना हिच्या ऑफीसमध्ये चुकून गेले तर हिच्या बाबतीत काही लोक चेष्टा करून बोलत होते. तिथेच बाजूला एकजण बसली होती तिला या लोकांचा राग आला आणि ती म्हणाली ही एवढी हुशार आहे म्हणून तिला लवकर प्रमोशन मिळालं तुम्ही हिच्या एवढी मेहनत करा तुम्हाला पण लवकर प्रमोशन मिळेल. तेव्हा ती दोन मुलं आणि ती मुलगी खदखद हसली.
ते बघून मला माझी गोष्ट आठवली."

"तुझी कसली गोष्ट आहे?"

मी यांच्यासारखी हुशार होते. कामात प्रामाणिक होते. माझ्या हुशारी मुळे मला लवकर प्रमोशन मिळाले. ते बाकीच्या लोकांना पटलं नाही. त्यांनी माझ्या पाठीमागे साहेबांचे कान भरायला सुरुवात केली. हेडऑफीसमध्ये माझ्या बद्दल चुकीची माहिती दिली.

सतत मला हेडऑफीसमधून रागवणारे आणि स्पष्टीकरण मागणारे मेल का येतात आहे हे मला कळेना. माझे साहेब पण त्यांच्यात सामील होते. एकदिवस असह्य झालं आणि मी माझा जीव संपवला."

एवढं बोलून तो आवाज थांबला पण त्याचे हुंदके ऐकू येत होते.

"तू एवढ्या चटकन का हार मानली? कोण तुझ्या विषयी या वेड्या वाकड्या गोष्टी हेड ऑफीसला सांगतंय यांचा शोध का घेतला नाही?"

"मला काहीच सुचत नव्हतं.माझ्या घरची परिस्थिती खूपच बेताची होती. मी एकटीच कमावणारी होते. माझ्या वरचा ताण कोणाला सांगू कळत नव्हतं. कारण तो ताण समजण्यासारखी पात्रता माझ्या आजूबाजूला कोणातच नव्हती. मला एवढ्या लवकर मारायचं नव्हतं.मला करीयरमध्ये खूप पुढे जायचं होतं म्हणून मी खूप मनापासून कष्ट करत होते.मला माझ्या आईवडिलांना,भाऊ बहिण यांना खूप सुखात ठेवायचं होतं.भावाला आणि बहिणीला पण खूप शिकायचं होतं पण मी हे काही करू शकले नाही."

"कोणत्या मोठ्या व्यक्तीची मदत घ्यायची."
स्वामीजी म्हणाले.

"मला काहीच कळत नव्हतं. तरी मी शांत राह्यचा प्रयत्न करत होते. रोजचा दिवस माझ्या अंगावर धावून आल्यासारखा उगवायचा. कधी कधी ही नोकरी सोडून द्यावी असं वाटायचं पण कशाच्या भरवशावर ही हातात असलेली नौकरी सोडू? आई टोपलं घेऊन भाजी विकायला जायची माझा बाप हमालाचं काम करायचा. त्यांना मी ऑफीसमध्ये काम करते याचं अप्रूप होतं
माझ्या पगारात महिनाभर कसंबसं निभायचं"
पुन्हा एक हुंदका स्वामीजींच्या कानावर पडला.

" इतकी तुझी परिस्थिती वाईट असताना तू तुझ्या जीवनाचा अंत केलस हे चुकीचे नाही झाले का? तुझ्या मृत्यू नंतर तर ते कसे जगत असतील हे बघीतलं कधी?"

"हो. खूप थकले.माझा मृत्यू त्यांना अजून पचवता आला नाही."

"कोणत्याच आईवडिलांना आपल्या मुलांच्या मृत्यूचं दु:ख पचवता येत नाही. किती वर्ष झाली तुला जाऊन?"

"तीन वर्षे."

"या तीन वर्षात तुझ्या घरच्यांचे काय हालत झाली ते बघीतलं?"

"हो. मी खूप मोठी चूक केली. पण मला आता असं भटकत राहण्याचा कंटाळा आलाय. मी हिला मदत केली तर माझा जीव शांत होईल मग मी पुढे जाऊ शकेन म्हणून मी हिच्या कानात बोलते.पण ही माझं काहीच ऐकून घेत नाही."

"तू तुझ्या जीवनाचा अंत केलास पण तुझा शेवट असाच ठरलेला होता. त्यामुळे तो तसाही झालाच असता."
स्वामीजींना तिचा अंत तसाच होणार होता ध्यानातून त्यांच्या शक्ती मुळे कळलं


"माझ्या नशीबी एवढंच आयुष्य होतं का?

"हो तु अल्पायुषी होतीस. आता तू या मुलीचा नाद सोड. ही मुलगी तुझ्या सारखी कमकुवत नाही. तू जर अशीच तिच्या कानाशी बोलत राहिलीस तर ती वेडी होईल. तिचा पिच्छा तू सोडावे हेच योग्य.

" मला कधीच मुक्ती मिळणार नाही? मी किती दिवस याच योनीत भटकत राहू?"

"तुला मुक्ती मिळवण्यासाठी आणखी संधी मिळेल. तुझ्या त्रासामुळे ही मुलगी जर वेडी झाली तर तुझा पुढचा मार्ग आणखी कठीण होईल."

"मला पुन्हा कधी संधी मिळेल?"

"मिळेल. ज्याने तुझं आयुष्य ठरवलं त्यानेच तुझ्या आयुष्याचा शेवटही कसा करायचा ते ठरवलं आणि तुला या फे-यात अडकवलं आता पुन्हा तोच तुला चांगलं कर्म करण्याची संधी देईल. ती संधी ओळख आणि सत्कर्म कर आता तिला त्रास देणं सोड."
स्वामीजी म्हणाले.

त्या आकृतीच्या हुंदक्यांचा आवाज स्वामीजींना ऐकू आला. ‍

स्वामीजींना त्या आकृतीच्या पूर्ण आयुष्याची झलक डोळ्यासमोर दिसली.

स्वामीजींना दिसलं की ही आकृती अतिशय वाईट परिस्थितीत जगत होती. परमेश्वराने त्याही परिस्थितीत तिला चांगलं शिक्षण घेण्याची संधी एका दयाळू माणसाकडून उपलब्ध करून दिली. या मुलीच्या गतजन्मातील काही चांगल्या कर्मामुळे तिला या आयुष्यात ही शिक्षणाची संधी दिली. शिकून चांगली नोकरी तिला मिळाली. ही चांगली नोकरी सुद्धा गतजन्मातील चांगल्या कर्मामुळे मिळाली.

या मुलीला आयुष्य मात्र कमी मिळालं. तिने स्वतःचा जीव संपवावा हे विधिलिखित आधीच लिहीलं गेल्याने तिने आत्महत्या केली पण मरण्यापूर्वी तिच्या इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे, तिची जगण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे ती या भूत योनीत आली. तिला लव‌कर या फे-यातून सुटका मिळणार नसल्याचे स्वामीजींना लक्षात आलं.

"तू या मुलीचा नाद सोड. तुला अजून काही वर्ष याच योनीत फिरायच आहे. तू या मुलीकडे बघीतलस का? किती त्रास होतो आहे तिला. तुला मुक्ती मिळावी म्हणून तू या मुलीला त्रास देऊ शकत नाही. तुला उलट अशा वागण्याने मुक्ती मिळणार नाही. वेळीच सावध हो ऐक. आजपासुन या मुलीच्या कानात बोलणं बंद कर."

स्वामीजी म्हणाले.

"तिला माहिती नाही तिच्या ऑफीसमध्ये लोक कसे आहेत मला कळलय." आकृती म्हणाली.

"तू घाबरट होतीस तशी ही मुलगी घाबरट नाही. ती अजिबात स्वतःचं बरं वाईट करून घेणार नाही. तुला मी हुकूम करतो की तू आजपासून तिच्या आसपासही फिरकायचं नाही. ऐकलस का?"

स्वामीजींचा आवाज कठोर झाला. त्या आवाजाने ती आकृती बिचकली.

"नाही बोलणार मी तिच्या कानात."

"तू आता इथून निघून जा. या मुलीच्या आयुष्यातून कायमची निघून जा."

"हो.मी निघून जाते. आता तिला त्रास देणार नाही."
" मला कबूल करून नंतर तिला तू त्रास दिला तर ते मला कळेल.माझं लक्षणं आहे हे ध्यानात ठेव."
स्वामीजी कठोर शब्दांत म्हणाले.

" नाही देणार त्रास.मी जाते."

ती आकृती स्वामीजींच्या डोळ्यासमोरून धूसर झाली.

स्वामीजी बराच वेळ ध्यानस्थ होते. ते त्या आकृतीची बोलले हे प्रतिकला कळलं नाही कारण आपल्या शक्तीच्या बळावर स्वामीजी ध्यानात असताना मौनातून त्या आकृतीशी बोलले.

स्वामीजी कितीतरी वेळ डोळे ऊघडेना म्हणून प्रतिकची चुळबूळ सुरू झाली. तेवढ्यात स्वामीजींनी डोळे उघडले.

त्यांच्या चेहऱ्यावर मघाशी होतं तसंच स्मितहास्य होतं.
स्वामीजी धीरगंभीर आवाजात बोलू लागले.

" तो आवाज आता या मुलीच्या कानात ऐकू येणार नाही. तो आवाज स्वतःला मुक्ती मिळवण्यासाठी या मुलीची मदत करणार होता. पण मी सांगीतलं आहे की या मुलीचा नाद सोड. ती व्यक्ती अल्पायुषी होती. तिच्या आयुष्याचा असाच अंत होणार हे निश्चित होतं पण तिच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे ती या भूत योनीत भटकतेय आहे.

तुम्ही विज्ञाननिष्ठ आहात. तुमचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही हे मला माहीत आहे. निसर्गात या गोष्टी घडतात. ही व्यक्ती भूत योनीत भटकताना तिला तिच्या स्वभावाशी मिळत्याजुळत्या स्वभावाची ही मुलगी म्हणजे तुमची बायको भेटली. या मुलीच्या आयुष्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी जशाच्या तशा घडताना बघितल्या मुळे या व्यक्तीचा आत्मा हिला पुढे होणा-या संभाव्य घटनांपासून वाचवण्यासाठी धडपडू लागला.
तुम्ही आता काळजी करू नका. आता तो आवाज या मुलीला त्रास देणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सगळंच एकदम सारखं काहीच घडत नाही. त्या व्यक्तीच्या आत्म्याला ती भीती वाटत होती म्हणून तो धडपडला मदत करण्यासाठी पण तसं या मुलीच्या आयुष्यात घडणारे नाही. ही कणखर मुलगी आहे. सगळ्या प्रसंगाला धीटपणे सामोरं जाईल.

काही दिवस त्यांना घरीच आराम करू द्या. त्यांच्या समोर आता त्या आवाजाबद्दल सतत चर्चा करू नका. त्यांनी स्वतः विषय काढला तरी तो बाजूला सारून वेगळं बोला. त्यांना भरपूर झोप घेऊ द्या."

एवढं बोलून स्वामीजी थांबले.

प्रतिक हे सगळं ऐकून स्तंभित झाला. तरी त्याला शंका होती तो प्रश्न त्याने स्वामीजींना विचारला,

"तो आवाज नक्की कधीच आता नयनाला त्रास नाही नं देणार? तिला आता पर्यंत जो त्रास झाला तो तिला नंतर आठवणार नाही असा काही उपाय नाही का करू शकणार?"

"त्याची काही गरज नाही. तो भटकता आत्मा शांत स्वभावाच्या व्यक्तिचा असल्याने तुमच्या बायकोला तसा काहीच त्रास झालेला नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा. त्यांच्या समोर झाल्या प्रसंगासाठी बोलू नका."

"ठीक आहे स्वामीजी. तुमचे खूप उपकार आहेत. नयना स्वामीजींना नमस्कार कर."

प्रतिक नयनाकडे बघून म्हणाला.

नयनाने यंत्रवत स्वामीजींना नमस्कार केला. स्वामीजींनी नयनाला आशिर्वाद देत म्हटलं,

"मुली आता तू अजिबात घाबरू नकोस. तुला आता कोणीही त्रास देणार नाही."

सध्या नयनाची बुद्धी इतकी तीव्र नसल्याने तिला स्वामीजी कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलतात आहे तेच कळलं नाही.

प्रतिक हळूहळू नयनाला घेऊन स्वामीजींच्या खोलीबाहेर पडला.

****

नयना आणि प्रतिकला स्वामीजींच्या खोलीतून बाहेर पडताना बघताच नयनांचे आई बाबा खुर्चीवरून उठून त्यांच्या कडे आले.

"काय म्हणाले स्वामीजी?"
नयनाच्या आईने विचारलं.

"सांगतो घरी गेल्यावर."
प्रतिक हळु आवाजात म्हणाला.

"काहीतरी सांग"
नयनाची आई पुन्हा म्हणाली.

"स्वामीजी म्हणाले सगळं ठीक होईल आता घाबरण्याचे कारण नाही. बाकी घरी गेल्यावर सांगतो."

प्रतिकच्या निर्वाणीच्या बोलण्याने नयनांचे आईबाबा शांत बसले.

सगळेजण घरीच जायला निघाले
__________________________________
प्रतिक काय सांगेल नयनाच्या आईबाबांना? स्वामीजी म्हणाले ते सगळं सांगेल? बघू पुढील भागात.

0

🎭 Series Post

View all