Login

श्शू! आवाज कोणाचा ? भाग 1

एक भितीदायक कथा
श्शू…! आवाज कोणाचा…? भाग १


अचानक पावसाळी वातावरण निर्माण झालं. रस्त्यावर सगळीकडे धावपळ सुरू झाली. नयनाही घाई घाईने ऑफीस मधून बाहेर पडली.आज तिने आठवणीने छत्री आणली.

काल अशीच पावसाची मोठी सर अचानक आली आणि नयनाला रस्ता क्रॉस करणं कठीण झालं. छत्री नव्हती आणली त्यामुळे नयना जवळ जवळ धावल्यासारखीच चालत रस्ता क्रॉस करून लागली. धावता धावता तिच्या चपलेनी पण धोका दिला.

" अरे देवा! या चपलेला पण आत्ताच तुटायचं होतं."

स्वतःशीच चीडचीड करत चप्पल ठीक करायला नयना खाली वाकली तसा मागून कर्कश्श हाॅर्न वाजला.
नयना ने मागे वळून बघितलं तसा तो गाडीवाला ओरडून म्हणाला,

" ओ मॅडम रस्त्यात खाली वाकून काय करताय? बाजूला व्हा"

त्या माणसाच्या ओरडण्याने नयना अजून चिडली.

" जातेय. इथच बसून राहणार नाही. माझी चप्पल तुटली म्हणून खाली वाकले. जास्त शहाणपणा शिकवू नका मला."

एवढं बोलून रागारागाने नयनाने तुटलेली चप्पल हातात घेतली. एकाच पायात चप्पल असल्याने तिचा चालताना तोल जायला लागला. कशीबशी ती रस्ता क्रॉस करून दुसऱ्या फूटपाथ वर चढली.

नयना बाजूला झाल्या बरोबर त्या माणसाने जोरात गाडी दामटली. तशी त्या गाडीच्या दिशेने नयनाने रागाने बघीतलं. त्याच्या मागे इतरही गाड्या भरधाव वेगाने गेल्या.

नयना चरफडत एकदा त्या गाडीकडे एकदा हातातील तुटलेल्या चपलेकडे बघत कंटाळलेल्या चेह-याने उभी होती. इतक्यात

" माझी पण तुझ्या सारखीच अवस्था झाली होती त्यादिवशी"

एवढं बोलून कोणीतरी हसलं.आपल्या वर कोण हसलं त्याला एक मुस्काटात मारावी म्हणून नयना रागाने मागे वळली पण मागे कोणीच नव्हतं.

आपल्या मागून कोणी गेल्याचं तिला जाणवलं नाही.ती विचारात पडली. त्याचं वेळी तिच्या दुसऱ्या कानाजवळ कोणीतरी बोललं,

" अग घाबरु नको. मीच बोलले तुझ्या कानाशी"

नायनाने दचकून पुन्हा वळून बघितलं. तिला कोणीच दिसलं नाही. आतामात्र नयना घाबरली.

ती झप झप चालत बस स्टॉप पाशी उभ्या असलेल्या लोकांजवळ जाऊन उभी राहिली.

"ओ मॅडम तुम्ही मागे उभ्या रहा. आम्ही रांगेत आहोत."

" हो मागेच उभी राहते आहे. चुकून ऊभी राहिले."

" रागावता कशाला? चुकीचे बोललो का मी?"

तो माणूस मोठ्याने ओरडल्या सारखं बोलला.

नयना रागारागाने मागे जाऊ लागली तशी पुन्हा कोणीतरी तिच्या कानाशी बोललं,

" अग एवढी रागावू नको."

" कोण आहे? कोण बोललं माझ्या कानाशी?"

नयना ने चिडून विचारलं आणि इकडे तिकडे बघू लागली तसे सगळे लोक चकित झाले. ही काय बडबडते आहे कोणाला कळेना. एकटीच तर चालते आहे हिच्या आजूबाजूला तर कोणी दिसत नाही मग कोण बोललं हिच्या कानाशी?

आजूबाजूचे लोक नयनाकडे विचित्र नजरेने बघू लागले. सगळे आपल्याकडे विचित्र नजरेने बघताहेत हे नयनाच्या लक्षात आलं तशी ती पुन्हा स्वतःवरच चिडली.

तिच्या कानात कोणीतरी बोललं पण तिला कोणीच दिसलं नसल्याने ती खूपच गोंधळली. त्यात लोकांच्या विचित्र बघण्यामुळे तिला तिथून पळून जावेसे वाटले. पण कुठे पळून जाणार? तिच्या घराकडे जाणारी बस याच बस स्टॉप वरून जात असल्याने तिला लोकांच्या विचित्र नजरा सहन करत तिथेच थांबावं लागणार होतं. काय करणार नाईलाज होता तिचा.

स्वतःशीच चरफडत ती रांगेत सगळ्यात शेवटी जाऊन उभी राहिली. ती विचारात असतानाच बस आली आणि बस स्टॉप वर उभे असलेले सगळे चढून गेले. ती बस स्टॉप वरच थांबली. कंडक्टरने तिच्याकडे बघून आवाज दिला कारण ती रोजच या बस मध्ये असायची. तिने मान हलवून नाही सांगितल्यावर कंडक्टरने बेल वाजवली तशी बस निघून गेली.

बस गेल्यावर नयना एकटीच स्टॉप वर उभी होती. संध्याकाळ झाली त्यात पुन्हा आभाळ भरून आलं.
तेवढ्यात पुन्हा नयनाशी तोच आवाज बोलला,

" ए ती बस का सोडली? आता तुझ्या घरापाशी जाणारी सरळ बस नाही. आभाळ किती भरून आलंय. रात्र होत आली. केव्हाही मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. घरी कशी जाशील?"

हे ऐकल्यावर नयनाला भीतीने कापरं भरलं. त्या भीतीने तिच्या हातातील पर्स आणि टिफिनाची बॅग धाडकन खाली पडली आणि हातातील छत्री दूर उडून रस्त्यावर पडली. नयनाने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले.
तेवढ्यात एका बाईचा ओरडण्याचा आवाज आला,

" ए बाई लक्ष कुठे आहे तुझं? तुझी छत्री रस्त्यावर पडली. आत्ता ती माझ्या पायात आली. मी पडणार होते.नशिबाने वाचले. "

नयना भीतीने अजुनही डोळे गच्च मिटून उभी होती.

रस्त्यावरची बाई तरातरा चालत नयना उभी होती तिथे आली आणि तिने खसकन नयनाचा दंड ओढला. त्या हिसक्याने नयनाने घाबरतच डोळे उघडले. समोर अनोळखी बाई बघून नयना गोंधळली.

" ओ. बाई स्वतःच्या वस्तू सांभाळता नाही येत का?"

नयना त्या बाईकडे मठ्ठपणे बघायला लागली तसा त्या बाईच्या रागाचा पारा आसमंताला जाऊन पोचला.

" अहो तुमच्याशी बोलतेय. ऐकू येतं नं? की बहिऱ्या आहात? ही तुमची छत्री वाऱ्याने उडून माझ्या पायात आली. नशीब माझं लक्ष होतं नाहीतर रस्त्यावर मी साष्टांग नमस्कार घातला असता. मागून गाड्या आल्या असत्या आणि त्यांनी मला उडवलं असतं तर झालेले नुकसान तुम्ही भरून दिलं असतं का? समजा माझं जीवच गेला असता तर !"

त्या बाईच्या तोफखान्यापुढे नयना आणखीनच भेदरली.

" मला माफ करा.मी हे जाणून बुजून केलं नाही.माझ्या हातून छत्री कधी उडाली ते कळलं नाही."

.नयनाच्या डोळ्यातून आता गंगा यमुना वाहू लागल्या.ते बघून ती बाई आणखीन चिडली.

" घ्या सुरू करा रडणं. चूक आपणच करायची बोललं कोणी तर रडणं लगेच सुरू करायचं. तुमच्या सारख्या लोकांना हुकमी रडायला येतं. आता स्वतःची छत्री तरी पकडाल की नाही? का घेऊन जाऊ घरी?"
ती बाई प्रचंड चिडलेली होती.

" नाही. द्या माझी छत्री." नयनाने घाबरतच पण लगेच आपला हात छत्री घ्यायला पुढे केला.

" घ्या.आणि यापुढे जपून राहत जा रस्त्याने."

एवढं बोलून रागाने ती बई जायला निघाली तोच नयानाच्या कानात पुन्हा आवाज आला,

" काय तू वेडी आहेस. कशाला त्या बाईचं एवढं ऐकून घेतलं?"

" बास्स. आता पुढे बोलू नको माझं डोकं सटकेल."

आणि ताडकन नायानाने स्वतःच्याच डोक्यावर मारून घेतलं.
पुढे जाता जाता त्या बाईने सहज मागे वळून बघितलं तर तिला नयना एकटीच बडबड करताना दिसली ते बघून त्या बाईने आपल्या कपाळाला हात मारला आणि स्वतःशीच पुटपुटली ,

" अरे देवा ! हे असं प्रकरण आहे. उगीच मी तिला शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. कितपत टाळक्यात शिरलं असेल कुणास ठाऊक?"

मानेला झटका देऊन ती बाई पुढे निघून गेली.

कितीतरी वेळ नयना तिथेच बस स्टॉप वर थरथरत उभी होती. पुन्हा तोच आवाज तिच्या कानाशी बोलला,

" किती वेळ अशीच इथे उभी राहणार आहेस? टॅक्सी कर आणि घरी जा."

" कोण आहेस तू? का माझ्या मागे लागली आहेस? या एक तासातच मला जीव नकोस करून सोडला आहेस. जा आता तू."

नयना चिडून बोलली. तेवढ्यात तिथून एक कुटुंब जात होतं. छत्री आणि कडेवरचं लहान बाळ सांभाळत चालताना त्या बाईची कसरत होत होती. त्यात तिने नयनाला एकटीच बडबडतांना बघितलं. तिला आधी वाटलं नयना फोन वर बोलतेय पण तिला नयनाच्या हातात काही फोन दिसला नाही तेव्हा खात्री पटून स्वतःशी च बोलली,

" या बायेचं टकुर फिरलेले दिसतंय."

नयनाच्या हे गावीही नव्हतं. ती विमनस्क मनस्थितीत टॅक्सी बघू लागली.

एवढ्यात तिला एक टॅक्सी येताना दिसली. घाईने तिने स्टॉपच्या बाहेर येत टॅक्सीला हात दाखवला.

" कुठे जायचे?"

टॅक्सी च मीटर डाऊन करत टॅक्सी ड्रायव्हर ने नयनाला विचारलं.

नयनाने आपल्या घराचा पत्ता सांगितला. ड्रायव्हरने तिला आत बसण्याची खूण केली.

टॅक्सीत बसता बसता नयना स्वतःशीचं बडबडली,

" आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही.गप्प बस."
ड्रायव्हरला वाटलं नयना त्याला काही तरी म्हणाली. त्याने समोरच्या आरशात बघून विचारलं

" मॅडम काय झालं? मला काही बोललात का?"
ड्रायव्हर च्या बोलण्याने नयना भानावर आली.

" नाही ,तुम्हाला काही म्हटलं नाही.चला तुम्ही"

ड्रायव्हरने टॅक्सी सुरु केली. टॅक्सी निघाली. ड्रायव्हर मधून मधून आरशातून नयनाकडे बघत होता.या मॅडमचं काहीतरी बिनसलंय हे त्याच्या लक्षात आलं.नयना भेदरलेल्या अवस्थेत बसली होती.
__________________________________
नयनाच्या कानाशी कोण बोलत होतं? हे कळेल का?
बघू पुढील भागात.

0

🎭 Series Post

View all