Login

श्शू...! आवाज कोणाचा? भाग२

एक भितीदायक कथा
श्शू…! आवाज कोणाचा? भाग २

मागच्या भागात आपण बघीतलं की नयनाच्या कानात कोणीतरी बोललं. पुढे काय झालं बघू.

नयनाचं घर आलं तरी नयना टॅक्सीतच बसून होती. तिचा चेहरा विमनस्क झालेला होता. टॅक्सी ड्रायव्हरने मागे वळून बघितलं तर त्याला नयना कुठल्यातरी विचारात गुंतलेली दिसली. क्षणभर वाट बघून ड्रायव्हर नयनाला म्हणाला,

" मॅडम तुमचं घर आलं."

तरी नयना तटस्थ बसलेली बघून ड्रायव्हरने सीटवर जोराने थापड मारली.त्या आवाजाने दचकून नयनाने आवाजाच्या दिशेने बघितलं तर ड्रायव्हर तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता.

" काय झालं? टॅक्सी का थांबवली?" नयनाने ड्रायव्हरला विचारलं.

" मॅडम तुमचं घर आलं म्हणून टॅक्सी थांबवली. तुम्हाला काही प्रॉब्लेम झालाय का?"

" नाही.किती पैसे झाले?"

नयना पर्सशी झटापट करू लागली. पैसे कुठे ठेवले हेच तिला आत्ता आठवेना तसा तिचा चेहेरा रडवेला झाला.

" आत्ता यावेळी पैसे पण पटकन सापडत नाही.वैताग सगळा"

पर्सशी झटापट करताना ती बोललेलं ड्रायव्हरला ऐकू गेलं.

" मॅडम शांतपणे शोधा पैसे कुठे जाणार आहे?"

त्याला तिची दया आली. पाच मिनिटांनी तिला पैसे सापडले. टॅक्सीचे पैसे देऊन पर्स,टिफीनची बॅग आणि छत्री सांभाळत नयना टॅक्सीच्या बाहेर पडली आणि घराच्या दिशेने चालू लागली.

नयना टॅक्सीतून उतरल्यावर ड्रायव्हर खांदे उडवत स्वतःशीचं बोलला,

" कसे कसे प्रवासी मिळतात! आपल्याला काय करायचंय. आपण भाड घ्यावं आणि मोकळं व्हावं " स्वतःशीच हसत त्याने टॅक्सी सुरू केली.

****

घराचं दार उघडायला म्हणून नयना पर्स मध्ये किल्ली शोधत होती. तीही लवकर सापडेना तशी नयना रडकुंडीला आली.

" आज काय होतंय माझ्याबरोबर .एक गोष्ट धड होत नाही."

" तूच धांदरट आहेस."

तिच्या कानाशी पुन्हा तोच आवाज बोलला.

" ए तू गप्प बस. तुझ्यामुळेच ही सगळी गडबड होतेय. का माझ्या कानाशी सारखी बड बड करतेय. निघून जा."

नयना खूप जोरात ओरडुन बोलली तेव्हाच नेमकी बाजूच्या घराचा दरवाजा उघडून बाहेर आलेल्या रूपाला तिच्या शेजारणीला कळेना नयना एवढ्यांदी कोणावर ओरडते आहे? तिच्या समोर तर कोणी दिसत नाही.

" नयना" रूपाने हाक मारली तशी नयना पाठीमागे वळली.

" काय ग काय झालं? कोणाच्या अंगावर ओरडलीस?"
रूपाचा हा प्रश्न ऐकून नयना क्षणभर गडबडली. लगेच स्वतःला सावरुन नयनाने रूपाला उत्तर दिलं.

" अग कोणाच्या नाही. स्वतःवरच चिडले.या पर्स मध्ये एक गोष्ट सापडत नाही.घराची किल्ली शोधतेय ती सापडत नाही म्हणून चिडले."

" असं होय. दे पर्स इकडे मी शोधते. तसही सगळे पुरुष बायकांच्या पर्सवर विनोद करतात. सगळं जग बायकांच्या पर्स मध्ये असतं आणि वेळेवर एक गोष्ट सापडत नाही असं म्हणतात. हे घे किल्ली सापडली."

मस्त रूपाने नयनाला पर्स आणि किल्ली दिली.

" खूप थकलेली दिसतेय.येतेस का माझ्याकडे? आपण दोघी चहा घेऊ. पावसाळी वातावरण आहे आलं घालून चहा करते."

" असू दे. तू पण किती धावपळ करशील?"

" ए वेडा बाई चहा करण्याने कसली एवढी धावपळ होणार आहे ? आणि कसली दमणूक होणार आहे? चल मुकाट्याने."

रूपाने हसतच नयनाचा हात धरून तिला घरात नेलं.

***

रूपा चहा करता करता नयानाशी बोलत होती पण नयनाचं तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. रूपाने चहा करताना सहज मागे वळून बघितलं तर नयना कुठे तरी तंद्री लागल्यासारखी बघत होती. रूपाला हे विचीत्र वाटलं. ती गॅस कमी करून नयना जवळ आली. रूपा आपल्या बाजूला येऊन उभी आहे हे सुद्धा नयनाच्या लक्षात आलं नाही. रूपाच्या मनात नयनाची स्थिती बघून कालवा कालव झाली. नयनाला रूपाने एवढी अस्वस्थ कधी बघीतलं नव्हतं. रूपाने नयनाच्या खांद्यावर हळूच हात ठेवला तशी नयना दचकून रूपाकडे बघायला लागली.

" नयना काय झालं आहे? अशी भेदरलेली का दिसतेय?" रूपाने विचारलं.

"अगं मलाच कळत नाही काय झालं आहे.घरी येताना कोण माझ्या कानाशी बोलतंय तेच कळत नाही."

रूपा काहीच न कळून नयनाच्या समोरच्या खूर्चीत बसली. नयनाचा हात हातात घेऊन हळुवारपणे रूपाने नयनाला विचारलं,

" नयना कोण तुझ्या कानाशी बोलतंय? ऑफीसमध्ये काही झालं का? मला काही तर सांग."

नयनाला रूपा हे बोलतच होती की दुस-या क्षणाला नयनाने आपले हात रूपाच्या हातून सोडवून घेतले आणि घाईने उठली. आपली पर्स, छत्री, टिफीनची बॅग घेत म्हणाली,

" निघायला हवं मला"

" अगं नयना चहा केलाय.तो तर पिऊन जा."

"नको"

असं बोलून नयना घाई घाईत रुपाच्या घरून निघाली.
आपल्या घराचं दार उघडून आत शिरली आणि लगेच दार दनकन लावलं. नयनाने एवढ्या जोराने दार आपटलं त्या आवाजाने रूपा दचकली. रूपा तिच्या घराच्या दारात उभी होती. नयनाने दार बंद केल्यावर रूपा नयनाबद्दल विचार करत होती.

नयनाचं हे विचित्र वागणं बघून रूपा बुचकळ्यात पडली. नयनाला काय झालं असेल आज? नयना अशी कधी वागत नाही. ऊद्या सकाळी प्रतिकला विचारायला हवं हे मनात ठरवून रूपानेही तिच्या घराचं दार बंद केलं.

****

स्वयंपाक घरात नयना काम करताना बडबड करायला लागली. तेवढ्यात तिच्या कानाशी तो आवाज पुन्हा बोलला त्यावर नयना भडकली,

" कोण कुठली बाई आहेस तू मला माहिती नाही.पण का माझ्याच मागे लागली आहेस?"

हे बोलून नयनाने रागारागाने हातातील गंज दनकन ओट्यावर आपटला.

" आपटू नको. गंजाला पोचे येतील." आवाज म्हणाला.

" येऊ दे पोचे. तुझ्या घरचा गंज आहे का? चार तास झाले माझ्या कानाशी एखाद्या डासासारखी गुणगुण करतेय. माझा नको जीव केलाय."

कुठेतरी दृष्टी लावून नयना तारसप्तकात बडबडत होती.

" माझा जीव पण कोणीतरी असाच नकोसा करून टाकला होता." आवाजाने आपलं दुःख सांगितलं.

" अगं ज्याने तुझा जीव नकोसा केला त्याच्या कानात बडबड कर. माझा कान का पकडला आहेस?"

नयनाची जोर जोरात बडबड चालू असताना प्रतिक तिचा नवरा दार उघडून घरात शिरला आणि नयनाच्या चढलेल्या आवाजाने चमकला. घाईने प्रतिकने आपली बॅग सोफ्यावर ठेवली. तो स्वयंपाक घराकडे वळला. कारण त्याला नयनाचा आवाज त्या दिशेनेच आला.

प्रतिक विचारात पडला हिला काय झालं? कारण ही फोनवर बोलत नाही किंवा तिच्या समोर पण कोणी नाही.

" नयना अगं कोणावर एवढी चिडचिड करतेय? फोनवर बोलत होतीस का?'

नयनाचं लक्ष गेलं तिने प्रतिकला बघीतलं तशी ती वेगाने धावत आली आणि तिने प्रतिकला मिठी मारली. नयना ओक्साबोक्शी रडायला लागली.
प्रतिकने हळुवारपणे नयनाच्या पाठीवर थोपटत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हटलं.

" नयना काय झालं? "

नयना काही न बोलता प्रतिकला बिलगून हमसाहमशी रडू लागली. यावर अधिक काही न बोलता प्रतिक इतकंच बोलला,

" नयना जरा बाहेरच्या खोलीत चल. सोफ्यावर बस मग बोल."

प्रतिकने हळूहळू तिला बाहेरच्या खोलीत आणलं आणि हळुच तिला सोफ्यावर बसवलं.

नयना पुन्हा रडायला लागली.

" नयना काय झालं? अशी बडबड तू कधी करत नाहीस. एवढी रडत तर नाहीच. वेळ पडली तर मला रडवते."

असं म्हणून प्रतिक हसला. प्रतिक हसला तेही नयनाच्या ध्यानात आलं नाही. एरवी प्रतिकच्या या मस्करीवर तिने नक्कीच त्याला दोन बुक्के मारले असते. नयना त्याच्याकडे न बघता बोलली,

" आज मला कोणी तरी रडवलय. चार तासांपासून त्या आवाजाने माझा नुसता छळ मांडला आहे."

नयना सोफ्यावर मागे डोकं टेकवून डोळे मिटून बसली.

नयनाला असं बघताच प्रतिकच्या मनात आलं नयना कधीच कशाला न घाबरणारे, कशानेही न चिडणारी आज काय झालं असेल ज्यामुळे हिची ही अवस्था झाली आहे.

प्रतिकने नयनाच्या डोक्यावरून हळूच हात फिरवत तिला विचारलं,

" नयना चहा करतो तुझ्यासाठी. तुला आवडतो तसा गवती चहा घालून. थोडासा घे बरं वाटेल."

नयनाने काहीच उत्तर दिलं नाही.
प्रतिकने पायातले बूट,मोजे काढले. मघाशी तो बॅग खाली ठेऊन तसाच धावत आत गेला होता.
हातपाय धुवून मग नयना साठी चहा करायला स्वयंपाक घरात शिरताना एकदा प्रतिकने नयना कडे बघितलं.

नयनाचा खूपच थकलेला चेहरा दिसत होता. प्रतिकला मनातून गलबलून आलं.त्याला वाटलं आज आपण जरा लवकर घरी आलो फार बरं झालं नाही तर नयनाचं काय झालं असतं कुणास ठाऊक!

***

स्वयंपाक घरात चहा करताना प्रतिकचं वारंवार बाहेरच्या खोलीत लक्ष जात होतं.त्याने लक्ष देऊन आणि मन लावून नयनाला आवडतो तसा चहा केला. नयनाचं सगळं काम शिस्तबद्ध असायचं.चहाच्या पाण्याला किती वेळ उकळी येऊ द्यायची याचंसुद्धा तिचं गणित ठरलेलं होतं.आत्ता प्रतिक घड्याळ बघून चहा करत होता आणि याचं त्यालाच हसायला आलं.

सगळं रितसर झाल्यामुळे नयनाला आवडतो तसाच रंग चहाला आल्यामुळे प्रतिक खूष झाला.

प्रतिकने हळुच नयनाच्या आवडत्या कपात चहा ओतला, बशीत तिच्या आवडीचे टोस्ट घेतले. दोन्ही गोष्टी ट्रेमध्ये ठेवून तो ट्रे घेऊन बाहेरच्या खोलीत आला. ट्रे स्टुलावर ठेवला.

नयना उठतेस. चहा करून आणलाय. चहा घेतला की बरं वाटेल."

नयनाला हळुवारपणे जागं करतं प्रतिक म्हणाला.

नयनाने खूप कष्टाने डोळे उघडले. ती नीट उठून बसली. प्रतिकने चहाचा कप तिच्या हातात दिला. अचानक नयनाला रडू आलं तिचा रडण्याचा आवेग बघून प्रतिकने तिच्या हातातील चहाचा कप घेऊन स्टुलावर ठेवला आणि तो तिच्या जवळ जाऊन बसला. क्षणात नयना त्याला बिलगली आणि मुसमुसत बोलायला लागली,

" प्रतिक संध्याकाळपासून काय झालय मलाच कळत नाही."

" हे बघ आत्ता आधी चहा घे.तू खूप थकली आहेस.चहा घेऊन आराम कर. आज तू स्वयंपाक करू नकोस मी बाहेरून जेवण ऑर्डर करतो. ऐकलं नं. चल चहा घे.अग तुझ्या नव-याने चहा केलाय बघ तरी कसा झालाय."

हे बोलून प्रतिक नयना कडे बघून हसला तसं नयनाच्या चेह-यावरही स्मितहास्य आलं.ते बघून प्रतिकला मनातून बरं वाटलं.

नयनाने हातात चहाचा कप घेतला. प्रतिकने एक टोस्ट तिच्या समोर केला. तो घेऊन नयनाने चहात बुडवला.
प्रतिक तिच्याचकडे बघत बसला.नंतर त्याच्या लक्षात आलं नयनाच्या काळजीपोटी त्याने फक्त नयनासाठीच चहा केला होता. हेलक्षात आल्यावर तो स्वतःशीच हसला आणि कनवाळू नजरेने चहा पिणा-या नयना कडे बघत बसला.
__________________________________
तो आवाज प्रतिकला ऐकू येईल का?
बघू पुढील भागात

0

🎭 Series Post

View all