Login

श्शू...! आवाज कोणाचा? भाग ३

एक भीतीदायक कथा
श्शू…! आवाज कोणाचा? भाग ३

मागच्या भागात आपण बघीतलं की काल प्रतिक घरी आला तेव्हा त्याला नयनाचं विचित्र वागणं दिसलं.त्याने तो भांबावला. पुढे काय झालं ते आता बघू.

प्रतिक आज सकाळी नेहमीप्रमाणे उठला पण आज जीमला न जाता घरीच थोडा व्यायाम करावा असं त्याने ठरवलं. नयना अजून झोपलेली होती.तिच्या अंगावरचं पांघरूण नीट करून प्रतिक फ्रेश व्हायला गेला.

प्रतिकला कालची रात्र आठवली.

कालची रात्र नयनासाठी जरा जड गेली. अंथरुणात कितीतरी वेळ ती या कुशीवरून त्या कुशीवर करत होती. प्रतिकला तिची चुळबूळ जाणवली तशी तो तिला म्हणाला,

"नयना सगळं डोक्यातून काढून टाक. कुठला अनोळखी आवाज तुझ्या कानात बोलत नाही. तू गेले महिनाभर कामाच्या स्ट्रेसने थकली आहेस. झोप शांत."
प्रतिक नयनाला थोपटत म्हणाला.

" प्रतिक या आधी मी कितीदा तरी कामाच्या स्ट्रेसने थकले आहे तेव्हा कधी नाही असा आवाज माझ्या कानात आला. कानात कोणी बोललं असं नाही घडलं. आत्ताच कसं घडतंय?"

"आधी नाही घडलं. कदाचित या वेळी तू जास्त थकली असशील. नको फार विचार करूस. झोप. ऊद्या एक दिवस आराम कर. ऑफीसला नको जाऊस."

नाईलाजाने नयनाने डोळे मिटले. लगेच डोळे क्षणभर उघडून नयना प्रतिकला म्हणाली,

" प्रतिक ऊद्या तू नको ना जाऊस ऑफीसमधे.प्लीज."

नयनाच्या डोळ्यातील भेदरलेला भाव अजून गेला नव्हता. तिला थोपटत प्रतिक म्हणाला,

" विचारून बघतो. वर्क फ्रॉम होम मिळालं तर घेईन. काळजी करू नकोस झोप आता."

नयना एखाद्या लहान बाळासारखी प्रतिकला बिलगून झोपली.

नयनाच्या अस्वस्थ चेहे-याकडे बघून प्रतिकच्या पोटात गोळा आला. हे काय झालं असेल नयनाच्या बाबतीत. स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी वाटेल ते करण्याचा नयनाचा स्वभाव नाही. नयना स्वभावाने शांत, कामसू, अतिशय नीटनेटकी आणि काटेकोर आहे. नयनाच्या स्वभावातील हे गूण प्रतिकला या तीन वर्षात कळले होते. त्यांच्या लग्नाला जवळजवळ तीन वर्ष होतील पुढल्या महिन्यात.

हे लक्षात येताच प्रतिकच्या मनात आलं की लग्नवाढदिवसाच्या निमीत्ताने नयनाला घेऊन दोनदिवस तरी कुठेतरी बाहेर जावं. तिला ताणापासून मुक्त ठेवेल असं ठिकाण निवडायला हवं.

"हं" स्वतःशीच हुंकार भरून प्रतिकने नयनाकडे बघितलं. नयना शांत झोपली होती. प्रतिकने हळूच तिचं डोकं आपल्या मांडीवरून बाजूला करून तिचं डोकं अलगद उशीवर ठेवलं. हळुच तिच्या केसांवरून हात फिरवत तिला थोपटलं. तिच्या अंगावर पांघरूण घालून नयनाच्या मोबाईलचा आवाज कमी करून तो बाजुच्या स्टुलावर ठेवला.

प्रतिक ही झोपायचा प्रयत्न करायला लागला. बराच वेळ त्याला झोप लागली नाही कारण त्याच्या डोक्यात नयनाचं विचार चालू होता. बराच वेळाने त्याला झोप लागली.

***

आज सकाळी प्रतिकला कालच्या रात्रीचं सगळं आठवलं. त्याने नयनाला कुठे तरी फिरायला घेऊन जायचं नक्की केलं. थोड्यावेळाने तो त्याच्या बाॅसशी वर्क फ्रॉम होम बद्दल बोलणार होता.वर्क फ्राॅम होम मिळालं तर त्याला नयनाकडे बघता येईल.

प्रतिकला नयनाचा फोन वाजल्यासारखा वाटला.त्याने बघीतलं तर शेजारच्या रूपाचा फोन आला होता. प्रतिकने मघाशी आठवणीने स्वतःच्या मोबाईल बरोबर नयनाचा मोबाईल पण बाहेरच्या खोलीत आणला होता. कोणाचा फोन येऊन नयनाची झोप मोडू नये हाच त्याचा उद्देश होता. प्रतिकने फोन घेतला.

" हॅलो"

" कोण प्रतिक बोलताय?" रूपाने विचारलं.

" हो.

"नयना कशी आहे?" हे विचारताना रूपाच्या आवाजात प्रतिकला नयनाबद्दल काळजी जाणवली.

"ठीक आहे कां?" प्रतिकने विचारलं.

"काल संध्याकाळी ती जेव्हा ऑफीसमधून घरी आली तेव्हा तिचं वागणं मला जरा विचित्र वाटलं म्हणून आत्ता फोन केला हेच विचारायला की तिला बरं आहे नं?"

"तिला कामाचा स्ट्रेस आलेला आहे असं वाटतंय. खरच तिचं वागणं काल नेहमीपेक्षा ‌विचीत्र होतं. मलाही हे जाणवलं. आत्ता ती झोपली आहे. तिचा फोन मुद्दाम मी बाहेर आणून ठेवला. उगीच तिची झोपमोड नको व्हायला."

" बरं केलंत. आज जाणार आहे का नयना ऑफीसला? तिला म्हणावं आज विश्रांती घे."

" आज मी पण तिला जाऊ नको म्हटलय. थोड्यावेळाने तिला उठवीन मग ती ऑफीसमध्ये कळवेल."

" घरी एकटीच असेल नं. मी थांबीन तिच्या जवळ."

" मी वर्क फ्रॉम होम घेतोय.नयना जरा घाबरली आहे त्यामुळे मी ऑफिसला जाऊ नये असं ती काल मला म्हणाली. मला घरून काम करण्याची परवानगी मिळाली तर मी असेनच तिच्या जवळ पण जर मला ऑफिसला जावं लागलं तर तुम्हाला सांगतो."

" हो चालेल. हरकत नाही. जेवणाचं काय करणार आहे? स्वयंपाकाची बाई येणार आहे का?"

" हो. रोजच्या वेळी येईल."

" ठीक आहे. ठेवते फोन."

" हो." प्रतिकने ही फोन ठेवला.

फोन ठेवून प्रतिक स्वयंपाक घरात चहा करण्यासाठी गेला.थोड्याच वेळात स्वयंपाकाला बाई आल्या की चहा करायला गॅस रिकामा मिळणार नाही हे लक्षात घेऊन तो चहा करायला लागला.

***

प्रतिकने नयनाला आवडतो तसा चहा केला. आत्ता मात्र लक्षात ठेऊन स्वत साठी पण केला.

चहा करून स्वतःचा कप घेऊन प्रतिक बाहेरच्या खोलीत आला.

प्रतिकचं चहा आणि पेपर असं चालू असतं. त्याने मघाशीच त्यांच्या बाॅसला आज कामावर येणार नाही वर्क फ्रॉम होम हवंय असा मेसेज टाकला होता.त्याच्या उत्तराची वाट बघत प्रतिकचं उगीच पेपर मागेपुढे करणं चालू होतं.

प्रतिकच्या फोन वर मेसेज टोन वाजला. प्रतिकने घाईने पेपर बाजूला ठेवून मेसेज वाचला. त्याला घरून काम करण्याची परवानगी मिळाली होती.

प्रतिकने लाॅगीन करून लगेच कामाला सुरुवात केली.

थोड्याच वेळात स्वयंपाकाच्या बाई आल्या. प्रतिकला घरून काम करताना बघून त्यांनी विचारलं,

" आज हापिसात नाय जायचं?"

" नाही.नयनाला जरा बरं नाही म्हणून घरी थांबतोय.

" काय झालं?"

" कामाचा ताण आला." प्रतिक म्हणाला.

" बाईंना बी गमत नाही कामाबिगर. करावं की निवांत काम. कशापायी एवढी धावपळ करायची? ताप हाय का" बाईंनी विचारलं.

" नाही ताप नाही पण खूप थकली आहे.

" करू दे आराम. भाजी काय करायची?"

"हे मी कसं सांगू? तुम्ही बघा कोणती भाजी आहे घरात आणि ती करा."

प्रतिकने डोक्याला फार ताप करून न घेता स्वतःची सुटका करून घेतली. तो पुन्हा काम करू लागला.

बाईंनी फ्रिजमधील भाज्या बघून कोणती भाजी करायची ते स्वतः ठरवून मोकळ्या झाल्या.

***

प्रतिक लॅपटाॅपवर काम करत होता आणि बाई स्वयंपाक करत होत्या.एवढ्यात नयनाचा तारसप्तकात पोचलेला आवाज ऐकून प्रतिक दचकला. घाईने त्याने लॅपटाॅप खाली ठेवला आणि बेडरूमकडे धावला.
बेडरूम पाशी पोचताच प्रतिक नयनाचा अवतार बघून जागीच थबकला.

नयना प्रचंड चिडलेली होती.ती तावातावाने कोणाशी तरी भांडत होती पण तिच्या समोर कोणीच नव्हतं.हे नेमकं काय चाललंय हेच प्रतिकला कळत नव्हतं.


" तू का पुन्हा पुन्हा मला त्रास देतेय? मला काही ऐकायचं नाही तुझं.जा "

" मी का जाऊ. मीपण तुझ्या सारखी शांत आहे. तुला जो त्रास होतो तो मला बघवत नाही" आवाज म्हणाला.

" मला होणारा त्रास तुला सहन न व्हायला तू कोण आहे माझी? तू एक आवाज आहेस जो मला कालपासून त्रास देतोय. तू जा."

जोरात ओरडून नयनाने स्वतःचं डोकं बडवायला लागली आणि रडायला लागली.

नयनाचं वागणं बघून प्रतिक दि्गमूढ झाला. त्याला नयनासमोर कोणीही दिसत नाही मग ही ओरडतेय कोणावर? हे त्याला कळलं नाही.

" तू अजिबात चिंता करू नकोस.‌ तुला काम चांगलं करूनही बोलत असतील त्यांना ठणकावून उत्तर दे. तू मुळुमुळू रडत बसू नकोस"

" मी बघीन काय करायचं ते. तू का कलमडलीस माझ्या आयुष्यात."

नयनाच्या आवाजाची पट्टी जराही कमी झालेली नव्हती.

" मी अशीच तुझ्या सारखी नेहमी शांत राहिले म्हणून माझं असं झालं. तू नको राहू शांत तू बोल."

आवाज पुन्हा नयनाला म्हणाला.

" तू बोलणं थांबवलं तर मी शांत राहीन."

नयना स्वतःचं डोकं दाबून धरत पलंगावर बसली आणि रडायला लागली.

प्रतिकला हे काय चाललंय तेच कळत नव्हतं.

थोडा वेळ काही न कळून प्रतिक बेडरूमच्या दारातच उभा राहिला. तोपर्यंत नयनाचा आवाज ऐकून स्वयंपाक करणा-या बाई प्रतिकच्या मागे येऊन उभ्या राहिल्या होत्या. हे प्रतिकला कळलं नाही.नयनाची अवस्था बघून बाईंचे डोळे भीतीने विस्फारले.

प्रतिकने स्वतःला सावरले आणि नयना जवळ गेला.

प्रतिकने नयनाच्या खांद्यावर हात ठेवला तशी नयना दचकली.

" ओ…" असं नयना ओरडली.

" नयना घाबरू नकोस.मी आहे."

प्रतिक आपल्या आवाजात घाबरलेपणाची छटा न येऊ देता शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

नयनाने डोकं वर करून बघीतलं आणि प्रतिकच्या कमरेला मिठी मारली.

" प्रतिक तो आवाज पुन्हा माझ्या कानात बोलला. मला कंटाळा आलाय तो आवाज ऐकून.माझं डोकं दुखायला लागलं आहे."

हे बोलून नयना ढसाढसा रडायला लागली. तिच्या डोक्यावरुन अलगद हात फिरवत प्रतिक बोलण्याचा प्रयत्न करत होता पण काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं.

खोलीच्या दारात उभ्या असलेल्या बाईंच्या डोळ्यात पण झाल्या प्रकाराने भीती उमटलेली दिसली. त्यांनी प्रतिकला विचारलं,

" साहेब काय झालं नयना ताईंना?"

त्यांच्या प्रश्नाने प्रतिक तंद्रीतून बाहेर आला. त्यांच्या कडे बघत प्रतिक म्हणाला,

" काही नाही.कामाचा खूप ताण पडल्यामुळे असं होतंय."

" नाही साहेब मला वेगळंच काहीतरी वाटून राहिलं."
आपले भीतीने विस्फारलेले डोळे आणखी मोठे करत,मान हलवत हातवारे करत म्हणाल्या.

" काय वाटतंय तुम्हाला? भलता सलता विचार करू नका."
त्यांचा आविर्भाव बघून प्रतिकला अंदाज आला बाईंना काय म्हणायचं आहे ते म्हणून त्याने लगेच त्यांना हटकलं.

" नाही साहेब भलता नाही बरोबर विचार करत आहे.ताईंना काय झालं माझ्या लक्षात आलं आहे.पण तुम्ही घाबरू नका यावर मला काय करायचं ते ठाव हाय"

बाई आपलं बेअरिंग जराही न सोडता बोलल्या.


" झाला का तुमचा स्वयंपाक? झाला असेल तर निघा."

प्रतिकने एवढं ताडकन तोडून टाकल्यासारखं केल्यामुळे बाईंचा मूड गेला. तोंडाने काही तरी पुटपुटत त्या निघून गेल्या.

प्रतिकने हळूच नयनाला पलंगावर झोपवलं जरा वेळ तिला थोपटलं. रडल्यामुळे नयनाच्या गालावर अश्रू वाहून शेवटी सुकले. नयनाच्या अंगावर हळूच पांघरूण टाकत प्रतिक पलंगापासून बाजूला होणार तोच नयनाने प्रतिकचा हात पकडला आणि डोळे मिटूनच नयना पुटपुटली,

" नको जाऊस.मला भीती वाटते.तू गेला आणि तो आवाज पुन्हा माझ्या कानात बोलला तर…"

नयनाचा स्वर रडवेला झालेला बघून प्रतिक तिथेच तिच्या बाजूला पलंगावर बसला आणि तिला थोपटत म्हणाला,

" मी आहे इथेच तुझ्या जवळ.झोप शांतपणे."
नयनाने प्रतिकचा हात न सोडता डोळे मिटले.प्रतिक जवळ असताना तिला त्या आवाजाची अजिबात भीती वाटत नव्हती हे तिच्या चेहऱ्यावरून प्रतिकच्या लक्षात आलं.

प्रतिकची झाल्या प्रकाराने मती गुंग झाली. नयनाने कामाचा एवढा कसा काय ताण घेतला ज्यामुळे हिची अशी अवस्था झाली.नयनाकडे बघत त्याच्या मनात विचारांची आंदोलन सुरू झाली.
यावर लवकरात लवकर उपाय शोधायला हवा हे त्यांच्या लक्षात आलं.
__________________________________
प्रतिकला लवकर उपाय सापडेल? स्वयंपाक वाल्या बाईंना कसली वेगळीच शंका आली? बघू पुढील भागात.

0

🎭 Series Post

View all