ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
" का... काय करताय तुम्ही आई?" सुविधा काकूंच्या हातात भली मोठी सूरी बघून कावेरी घाबरली.
" तुला धाक दाखवते ना माझा, म्हणजे पुन्हा मला असं उलट बोलण्याची हिंमतच करणार नाहीस तू." सुविधा काकूने रागात तिचा उजवा हात स्वतःच्या हाताने घट्ट पकडला आणि तिला काही कळायच्या आत तिच्या हातावर सुरीचा जोरदार वार केला.
कावेरीची किंकाळी आणि रक्ताची चिरकांडी संपूर्ण घरात पसरली. तेवढ्यातच घराची बेल वाजली. सुविधा काकूने पटकन तिला किचनमध्ये नेले. सूरी धुवून ती परत जागेवर ठेवली. कावेरी रक्तबंबाळ झालेल्या हाताला पकडून तिथेच कोपऱ्यात बसून रडत होती.
" ये... ऐक... खबरदार जर ही गोष्ट आरवला किंवा कोणाला सांगितलीस तर. नाहीतर... आता फक्त हात कापला आहे तुझा, जर आरव किंवा इतर कोणाला सांगितलेस तर हिच सूरी तुझ्या गळ्यावर फिरवेन. समजलं ना... आणि हो... लवकरात लवकर तुझ्या बापाकडून पैसे मागवायचे. ते पण... एक लाख रुपये. जर त्यांनी नाही दिले तर मग तुझं जगणं मुश्किल करेन मी. कळलं का?" सुविधा काकू तिला तिथेच तसंच रडत सोडून बाहेर दरवाजा उघडायला निघून गेल्या.
" काय गं आई हे? घरात रक्त कसले हे? कोणाचं? कोणाला लागले आहे?" आरव जसा घरात आला तसं त्याने फरशीवर पडलेले रक्त पाहिले.
" कोणाचं म्हणून काय विचारत आहेस, तुझ्याच बायकोच आहे ते रक्त. हात कापून घेतला तिने काम करत असताना. वेंधळेपणा तिचा दुसरं काय." कावेरीचा हात कापला हे ऐकूनच आरव आईचे पुढचे ऐकून न घेताच लगबगीने किचनमध्ये पळाला.
" काय गं कावेरी, इतकं कसं काय कापलं तुला? चल तू... चल, आधी डॉक्टरकडे जाऊ या आपण. उठ..." आरव तिच्या कापलेल्या हाताला अलगद हातात धरून तिला बाहेर घेऊन आला.
" अहो, नको. मी... मी ठीक आहे." सुविधा काकूंना बाहेर हॉलमध्ये रागात तिच्याकडे बघताना पाहून कावेरीने तिचा हात आरवच्या हातून पटकन सोडवत बेडरूममध्ये पळ काढला.
" अरे! अशी काय ही? केवढं लागले आहे तिला तरी देखील डॉक्टरकडे जायला नाही म्हणतेय." आरव वैतागून स्वतःच्या केसामधून हात फिरवत बोलला.
" आता जर तिला नाहीच जायचं आहे डॉक्टरकडे तर राहू दे ना. जा बरं तू... तुझं आवरून घे जा." सुविधा काकूने त्याला त्याच्या बेडरूममध्ये हलकेच धक्का देऊन पाठवले.
तो जेव्हा बेडरूममध्ये आला तेव्हा कावेरी लागलेल्या हाताला बँडेज लावत होती. उजवाच हात जखमी असल्यामुळे डाव्या हाताने तिला नीट पट्टी बांधता येतच नव्हती. त्यात जखम थोडी खोलवर असल्याने रक्त अजूनही थांबत नव्हते. तो काही न बोलता तिच्या जवळ आला. त्याने तिच्या हातून बँडेज घेतले आणि स्वतःचं तिला पट्टी बांधू लागला.
" कसं लागले हाताला?" त्याने तिला शांतपणे विचारले. तरी देखील ती मौन होती.
" सांगू का याना आईने मारलं. नाही नको... यांचे देखील आई सारखेच मत असेल तर. आईचे नाव ऐकून हे भडकले आणि मला अजूनच मारले तर? त्यापेक्षा बाबांकडून पैसेच घेते." कावेरी मनातल्या मनात विचार करत शून्यात नजर खिळवून बसली होती. आरवने पट्टी बांधली आणि एकवार तिच्याकडे पाहिले. ती काहीच बोलत नाही बघून तो फ्रेश व्हायला निघून गेला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा