ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
दुसऱ्याच दिवशी कावेरीने बाबांकडे पैसे मागितले. त्यांनी देखील लगेचच त्यांच्या कामातल्या माणसाकरवी पैसे तिला पाठवून दिले. त्यांना जरा देखील कल्पना नव्हती की त्यांची लेक त्यांच्याकडे कशासाठी पैसे मागत आहे. तिलाच हवे असतील असा समज करून त्यांनी काहीच प्रश्न न विचारता पैसे दिले होते. कावेरीने ते पैसे लगेच सासूच्या म्हणजेच सुविधा काकूंच्या हवाली केले.
त्या दिवसानंतर सुविधा काकूंना अजूनच चटक लागली पैशाची. त्या कावेरीला धमकी देऊन बाबांकडे पैसे मागायला सांगायचे. आणि कावेरी देखील स्वतःच्या जिवाच्या भीतीपोटी बाबा जवळ खोटेनाटे कारणं देऊन पैसे मागू लागली. आरव कामाला निघून गेला की घरी सुविधा काकू तिच्या सोबत भांडण उकरून काढायच्या. स्वतःचं भांडण विकोपाला नेऊन तिला मारहाण करायच्या. आजूबाजूचे लोक त्यांचा हा रोजचा कालवा ऐकून कावेरीबद्दल हळहळ व्यक्त करत असायचे. इतक्या दिवसात तिने खूप वेळा विचार केला की आरवच्या कानावर त्याच्या आईचा प्रताप घालवा. परंतु, तिला अजिबात त्याच्यावर विश्वास नव्हता. तो देखील तिला कधीच काही विचारत नव्हता. रोज कावेरीच्या अंगावर छोट्या मोठ्या जखमा झालेल्या दिसायच्या परंतु, त्याने कधीच तिला त्याबद्दल विचारले नाही की कसं लागतं तुला रोज म्हणून तिला एकदाही प्रश्न केला नाही. त्यामुळे हळूहळू तिला खात्री झाली की सुविधा काकू सोबत आरव देखील या सगळ्यात सामील आहे. घरात ती सतत घाबरून राहू लागली. रोज रडत ती आतून हळूहळू तुटू लागली. रोज अंगावर होणारे आघात आणि मनावर घाव घालणारे टोमणे ऐकून ती नैराश्याच्या गतेत जाऊ लागली.
असेच रडत कढत सहा महिने सरून गेले. शेवटी आरवला तिची झालेली अवस्था बघवली नाही. त्याने त्याच्या सासऱ्यांना म्हणजेच कावेरीच्या बाबांना, राघव शिंदे यांना स्वतःच्या घरी बोलवून घेतले. बाबांना घरी आलेले पाहून कावेरी प्रचंड सुखावली. परंतु, तिची आताची अवस्था पाहून शिंदे मात्र कोलमडले. त्यांची आधीची हसरी, देखणी कन्या आता पार कोमेजून गेली होती. चेहऱ्यावरचा रंग उडाला होता तिच्या. शरीर अतिशय कृश झाले होते तिचे. डोळे तर अगदी खोल गेले होते.
तिला पाहून शिंदे यांना अश्रू अनावर झाले. ते तिला मिठीत घेऊन रडू लागले. सुविधा काकू मात्र मनातून घाबरल्या होत्या. जर का कावेरीने तिच्या बाबांना खरं काय ते सांगितले तर आपलं काय खरं नाही याचा अंदाज त्यांना आला. राघव शिंदे घरात आल्यापासून त्या जरा देखील कावेरी पासून दूर गेल्या नाही. आरव देखील तिथेच उभा राहिला.
" बेटा कावेरी... काय गं अवस्था झाली ही तुझी? काय... काय होतंय बाळा तुला? बोल ना... आपल्या बाबांना नाही का गं सांगणार तू? बोल बाळा..." त्यांनी कावेरीच्या गालाला हात लावत तिला प्रेमाने, मायेने विचारले.
" बाबाss बाबा..." कावेरीचा बाबांना पाहताच, त्यांचा मायेचा स्पर्श होताच बांध फुटला. ती रडत सांगणारच होती की तिचे लक्ष समोर उभ्या असणाऱ्या सुविधा काकू वर गेले आणि ती एकाएकी गप्प झाली.
" हा बोल ना बाळा. बोल ना काय झाले." ती बोलत नाही पाहून त्यांनी तिला पुन्हा विचारले. ती नेमकी कुठे बघतेय हे पाहण्यासाठी त्यांनी देखील तिची नजर फॉलो केली. सुविधा काकू समोर आहेत ते लक्षात येताच ते कावेरीला घेऊन तिच्या खोलीत गेले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा