ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
" आरवsss समजतोस कोण तू स्वतःला? माझ्या मुलीला त्रास देण्याची हिंमत कशी झाली तुझी?" शिंदे खोली बाहेर आले ते प्रचंड रागातच. त्यांनी आरवची कॉलर पकडली.
" काय बोलताय तुम्ही बाबा. मी नाही दिला त्रास कधीच तिला. हवंतर... तुम्ही विचारा ना तिला. उलट मला तिची काळजी वाटत होती. म्हणून तर तुम्हाला इथे बोलावून घेतले ना मी बाबा. ती काही बोलली का तुम्हाला? तिने काही सांगितले का?" आरव हात जोडून त्यांना विचारू लागला.
" नाही... ती काहीच बोलत नाही. परंतू, मी तिचा बाप आहे आणि मला तिचा अबोला देखील समजतो. तिच्या अंगावर इतक्या जखमा कशा झाल्या आरव? आणि ती माझ्याकडे सारखी पैसे मागायची ते कशासाठी?" शिंदे यांनी त्याला जाब विचारला.
" कायsss ती तुमच्याकडे पैसे मागायची? का पण?" आरवला काहीच समजत नव्हते. तो स्वतःच गोंधळून गेला. अचानक त्याचं लक्ष सुविधा काकूकडे गेले.
" तू असा का बघत आहेस माझ्याकडे?" तो बारीक नजर करून आपल्याकडे पाहतोय बघून सुविधा काकू अस्वस्थ झाल्या.
" खरं खरं सांग आई. नक्की काय प्रकार आहे हा? इतक्या दिवस मला वाटले कावेरी घरापासून दूर आहे, घरच्यांना मिस करतेय म्हणून तिचे कामात लक्ष लागत नसावे आणि त्याच गडबडीत तिला सतत काही ना काही लागत असावं. तू देखील हेच बोलली होतीस ना मला. त्यावेळी मी तुझ्यावर विश्वास ठेवला. त्यासाठीच मी कावेरीला तिचा तिचा वेळ देत काहीच बोललो अथवा विचारले नाही. परंतु, आता असं वाटतंय काही तरी चुकतंय. सांग आई, काय आहे हे?" पहिल्यांदाच आरव त्याच्या आईवर चिडला होता. घाबरून सुविधा काकूंनी त्याला सर्व काही सांगितले. तेवढ्यात तिथे कावेरी देखील आली.
" कावेरीss बाळा... का नाही बोललीस हे तू आधी? इतकं का गं एकटीच सहन करत राहिलीस? गायकवाड बाईsss तुम्ही अजिबात हे चांगलं केले नाही." कावेरीला जवळ घेत शिंदे सुविधा काकूवर ओरडले.
" आई, कसं इतकं कठोर वागू शकतेस गं तू? अगं, तू पण एक बाई आहेस ना. मग... पैशासाठी कोणी इतकं अमानुष वागणूक देत का? ते पण स्वतःच्याच सुनेला? काय कमी पडत होतं गं तुला? माझ्यावर विश्वास नव्हता तुझा की माझ्या क्षमतेवर शंका होती?" आरव स्वतःचा राग नियंत्रणात ठेवत बोलला.
" अरे तुझ्यासाठीच केले ना मी हे आरव. तू प्रायव्हेटमध्ये कामाला आहेस आज. उद्या जर तुझी नोकरी गेली किंवा आपल्याला अडचणीच्या काळात पैसे लागले तर... म्हणून मी..." आपला मुलगा आपल्यावर रागावला म्हणून सुविधा काकू सारवासारव करायला लागल्या.
" काहीही बोलू नकोस तू आई. माझ्या मनातून उतरलीस तू. तुझ्या अशा वागणुकीमुळे कावेरीच्या, तिच्या घरच्यांच्या नजरेत मी किती पडलो याची जरा देखील जाणीव आहे का तुला? मला... बाबा, मला माफ करा. मी नाही काळजी घेऊ शकलो कावेरीची नीट. पण हे शेवटचे बाबा. यापुढे तिला काहीच त्रास होणार नाही हे वचन आहे बाबा माझे." आरव त्यांचा हात हातात घेऊन आश्वासन देऊ लागला.
" त्याची काहीच गरज नाही आरव. खरं तर तुझी चुक नाही. चुक आमच्या सारख्या मुलीच्या बापाचीच आहे. आम्ही नेहमीच मुलीचे लग्न झाल्यावर त्यांना आर्शिवाद देतो, 'दिल्या घरी सुखी रहा' म्हणून. आणि याच आमच्या अपेक्षेमुळे मुली सगळा त्रास सहन करत मुकपणे त्यांच्या सासरी राहतात. पण... आता हे चालणार नाही. कावेरी बाळा, आता हा आर्शिवाद नाही चालणार उलट आता मुलीच्या बापाला माझे हेच सांगणे असेल 'दिल्या घरी सुखी रहा' हा आर्शिवाद न देता 'जर दिल्या घरी सुखी नसशील तर परत माहेरी निघून ये तुझं हक्काचे घर आहे' हे आश्वासन द्या. आरव, मी आता माझ्या मुलीला इथे नाही ठेवू शकत. मी तिला इथून घेऊन जातोय." शिंदे यांनी लागलीच कावेरीला घेऊन घराबाहेर पडले.
आरव काहीच बोलू शकला नाही. रागात फक्त आपल्या आईकडे पाहत असाच हताश होऊन मटकन खाली बसला.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा