शुभविवाह भाग १०
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारां श: आसावरीने गौरीला जयची बाजू समजावून सांगितली. गौरीलाही तिचे म्हणणे पटले होते. गौरीची चौकशी करायला जाण्याची इच्छा जयला झाली होती, पण ती या सगळ्याचा वेगळाच अर्थ काढेल म्हणून तो गेला नाही.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारां श: आसावरीने गौरीला जयची बाजू समजावून सांगितली. गौरीलाही तिचे म्हणणे पटले होते. गौरीची चौकशी करायला जाण्याची इच्छा जयला झाली होती, पण ती या सगळ्याचा वेगळाच अर्थ काढेल म्हणून तो गेला नाही.
आता बघूया पुढे…..
दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी लवकर आवरून तयार झाली. जय व गौरीचा हळद उतरवण्याचा कार्यक्रम पार पडला. दुपारी लगेच पुजा ठेवली होती. सत्यनारायण पुजेला गौरीचे माहेरचे लोकं आले होते.
पुजा झाल्यावर गौरीला माहेरी घेऊन जाण्यात आलं. गौरी दुसऱ्या दिवशी परत सासरी येणार होती, हे आधीच ठरलेले होते. सत्यनारायण पुजा म्हणजे लग्नातील शेवटचे कार्य असते, ते झाले की पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून जातात.
संध्याकाळ पर्यंत देशमुखांचे घर रिकामे झाले होते. आता घरात फक्त घरातील लोकच होते. सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते.
“दादा, मी उद्या दुपारनंतर निघेल.” साधनाने दादासाहेबांना सांगितले.
“अजून दोन दिवस थांबली असतीस.” दादासाहेब.
“उद्याची सुट्टी मिळाली तेच खूप झालं. अचानक सुट्ट्या मिळत नाहीत.” साधना.
“साधना, तुला नोकरी करण्याची खरच गरज आहे का? दुसऱ्याची चाकरी करण्यात तुला काय मजा वाटते काय माहित?” दादासाहेब.
“दादा, नोकरी ही फक्त पैशांसाठी मी करत नाही आणि याबद्दल आपलं अनेकदा बोलणं झालं. पुन्हा पुन्हा तोच विषय नको. जय, तुला किती दिवस सुट्टी मिळाली?” साधनाने विषय बदलण्यासाठी जयकडे बघितले.
“उद्या दुपारी मी पण निघेल. मी वर्क फ्रॉम होम मागितलं, पण सध्या ज्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे, त्यासाठी ऑफिसला जावंच लागणार आहे.” जयने उत्तर दिले.
“आणि गौरीचं काय करणार? तिला तुझ्यासोबत कधी घेऊन जाणार?” दादासाहेबांनी विचारले.
“जस लग्नाच तुम्ही परस्पर ठरवलं, तसं हेही तुम्ही ठरवलं असेलच ना.” जयच्या मनातील खदखद बाहेर पडलीच.
“जय, तुला म्हणायचं काय आहे?” दादासाहेबांचा आवाज वाढला होता.
“मला जे म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. तुमचा मान ठेवून तुमच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करत आलो आहे. आजही माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर तसाच आहे, पण माझं मन तुमच्याबाबत नाराज झाल आहे.
बाबा, मी या लग्नासाठी तयार आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला विचारावं वाटलं नाही. सरळसरळ माझ्यावर तुमचा निर्णय लादून टाकला. तुम्ही माझं वाईट केलं अस मी म्हणणार नाही, पण माणसाच्या आयुष्यात लग्न हे एकदाच होत. माझ्या लग्नाच्या वेळी मी फक्त तिथे मेकॅनिकली हजर होतो.
असो, तुम्हाला हे कधी समजणार नाही. जेव्हा तुम्हाला माझ्या भावना समजतील तेव्हा आपण यावर बोलूयात. आता राहिला प्रश्न गौरीचा तर आज संध्याकाळी तिच्या घरी जाऊन मी तिची भेट घेणार आहे. तिला पुढे काय करायचं हे मी तिला विचारून ठरवेल.
मी तिच्याशी लग्न केलं आहे. माझ्यावर तिची जबाबदारी आहे, म्हणून मी तिच्यावर काहीही लादणार नाहीये. इथून पुढं आमच्याबाबतीत जो काही निर्णय घेण्याची वेळ येईल तो आमच्या दोघांचा मिळून असेल.” जय रूममध्ये निघून गेला.
“अनिकेत, ह्याला काय झालंय? ह्याला कोणी काय भरवलं आहे? तो कोणाची भाषा बोलायला लागला आहे?” दादासाहेब चिडले होते.
“दादासाहेब, जरा शांत व्हा. त्याला काय वाटलं तो ते बोलला आणि हे चांगलं आहे. जय इतक्या लवकर मनातील बोलला, हे चांगलं झालं, नाहीतर त्याच्या मनात हे विष तसच साचून राहील असत.” साधनाने दादासाहेबांना शांत केलं.
“साधना, पण वडिलांशी बोलण्याची ही कुठली पद्धत आहे?” दादासाहेब शांततेने बोलत असले तरी त्यांना जयचं बोलणं पटलेलं नव्हतं.
“दादासाहेब, तो तुमचा आदर राखूनच बोलला आहे, त्याने तुमचा अपमान केला नाहीये. त्याच लग्न परस्पर तुम्ही जमवल्याचा राग त्याच्या मनात होता, तो त्याने बोलून दाखवला आणि यात चुकीचं काही होत अस मला वाटत नाही.
दादासाहेब, मी हल्लीची मुलं कॉलेजला बघत असते. मुलं अतिशय वाईट आणि उर्मट झालेली आहेत. आपला जय त्यामानाने खूप संयमाने वागतो, बोलतो. त्याच्या डोक्यातील रागाला समजून घ्या. तो रागावला आहे, तर तुम्ही समजदारी घ्या, तरच तुमच्या दोघांमधील असलेलं नातं चांगलं राहील. बाकी तुमची मर्जी. तसही तुम्हाला नेहमी स्वतःचच खरं वाटत, दुसऱ्या व्यक्तीच्या मताची तुम्हाला कधी किंमतच नसते.” साधना एवढं बोलून तेथून निघून गेली.
दादासाहेबांचा राग बघून आसावरी व शीतल आधीच तेथून निघून गेल्या होत्या. आता हॉलमध्ये फक्त अनिकेत, शंतनू, दादासाहेब व शालिनीताई होत्या.
“ बाबा, जयचं नाराज होणं साहजिक आहे. पण त्याच्यातील एक गोष्ट मला आवडली, त्याने गौरीची जबाबदारी स्वीकारली आहे. जयला गौरी कशी आहे हे जेव्हा कळेल ना, तेव्हा तुमच्याबद्दल जो राग त्याच्या मनात आहे तो आपोआप निवळेल. बाबा, जयला थोडा वेळ द्या.
जय आपल्या घरातील शेंडेफळ आहे. सगळ्यांचा तो खूप लाडका आहे. यावेळी त्याला आपण थोडा वेळ देऊ, त्याला समजून घेऊ.” अनिकेत दादासाहेबांच्या मनस्थितीचा अंदाज घेत म्हणाला.
“तुम्ही सगळे म्हणत आहात, तर जयला वेळ देऊयात.” एवढं बोलून दादासाहेब तोऱ्यात त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
“आई, जयचं नाराज होणं कळलं, पण साधना आत्त्याच्या बोलण्याचा रोख काही कळला नाही.” शंतनूला प्रश्न पडला होता.
“मलाही तोच प्रश्न पडला आहे. त्या आधी कधी या भाषेत ह्यांच्याशी बोलल्या नव्हत्या. आता विचारायला गेलं तर त्याही काही लगेच सांगणार नाहीत. काही दिवसांनी सगळं कळेलच.” शालिनीताई.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
