Login

शुभविवाह भाग ११

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग ११

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026

मागील भागाचा सारांश: जयच्या मनात जे काही साचलं होत ते त्याने दादासाहेबांसमोर मोकळं केलं. दादासाहेबांना जयचं बोलणं पटलं नव्हतं. साधना त्याच्या बाजूने बोलली. त्याला समजून घेऊया, हे अनिकेतने दादासाहेबांना सांगितले.

आता बघूया पुढे….

संध्याकाळी चारच्या दरम्यान जय त्याच आवरून रूममधून खाली आला. हॉलमध्ये दादासाहेब व शालिनीताई बसलेल्या होत्या. जयने दादासाहेबांकडे बघून न बघितल्यासारखे केले.

“आई, मी गौरीच्या घरी जाऊन येतो.” जय शालिनीताई समोर जाऊन म्हणाला.

“जय, त्यांच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नकोस. काहीतरी स्वीट घेऊन जा.” शालिनीताईनी सांगितले.

“हो. मी गावातील स्वीट मार्ट मधून काहीतरी घेऊन जातो.” जय घराबाहेर पडला.

कार घेऊन न जाता जयने अनिकेत कडून बुलेटची चावी घेतली. स्वीट मार्ट मध्ये जाऊन जयने पेढे घेतले व तो गौरीच्या घराच्या दिशेने मार्गस्थ झाला. गौरीचं घर त्याच्या घरापासून पंधरा किलोमीटरवर होते.

आजूबाजूचा परिसर बघत जय पुढे चालला होता. गावी आल्यावर बुलेटवर गावात फेरफटका मारायचा हे जयचे ठरलेले होते. गौरीच्या घराबाहेर जयने गाडी लावली. गौरीचे बाबा म्हणजेच मोहनराव घराबाहेर ओट्यावर खुर्चीत बसलेले होते. जयला बघून ते उठून पुढे आले.

“जावईबापू, तुम्ही असे अचानक कसे आलात?” मोहनरावांना आश्चर्य वाटले.

“काका, तुम्ही मला जय म्हणा. ते जावईबापू खूप वेगळं वाटत.” जय व मोहनराव खुर्चीत जाऊन बसले.

“बरं, मी जय म्हणत जाईल, पण आज इकडे येणं कसं केलं?” मोहनरावांनी पुन्हा विचारले.

मोहनरावांच्या घरात काम करणाऱ्या स्त्रीने जयला पाणी आणून दिले.

“लग्न अचानक झाल्याने मला आधी सुट्टी घेता आली नाही. आता लगेच सुट्टी मिळत नाहीये. मला परवा ऑफिस जॉईन करावं लागणार आहे, त्यासाठी मला उद्याच पुण्याला जावं लागेल.

लग्नाच्या विधींमध्येही गौरी सोबत काहीच बोलण झालं नाही. तिचे पुढचे काय प्लॅन्स आहेत याबद्दल मला काहीच कल्पना नाहीये. उद्या गौरी घरी येईल, पण माझी त्यावेळी निघण्याची तयारी सुरू असेल. जो काही माझ्याकडे मोकळा वेळ होता, तो आत्ताच होता, तर म्हटलं चला गौरीला भेटून येऊयात.” जयने सविस्तरपणे सांगितले.

“तुमचं लग्न अचानक झाल्याने तुम्हाला काहीच पूर्वतयारी करायला वेळ मिळाला नाही. गौरी तिच्या रूममध्ये आहे. तुम्ही तिच्याशी जाऊन बोला. तुम्ही जेवण करूनच जाल ना?” मोहनरावांनी विचारले.

“नाही, नको. जेवण करण्यासाठी मी नंतर येईल. मी चहा किंवा कॉफी घेईल. बाकी मला आत्ता काहीच नको.” जयने उत्तर दिले.

“मी कॉफी गौरीच्या रूममध्ये पाठवून देतो. तुम्हाला मी गौरीची रूम दाखवतो.” मोहनरावांनी जयला गौरीची रूम दाखवली.

गौरीच्या रुमबाहेर जाऊन जयने दरवाजावर नॉक केले. गौरीने दरवाजा उघडला. जयला बघून तिला आश्चर्य वाटले. गौरीच्या चेहऱ्याकडे बघून ती रडलेली असावी असं जयला वाटलं.

“मी आत येऊ का?” जयने विचारल्यावर गौरी दरवाजातून बाजूला झाली.

रूममध्ये जाऊन जय एका खुर्चीत बसला.

“मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते.” गौरी रूममधून जायला निघणार तोच जय म्हणाला,

“मी पाणी घेतलय आणि कॉफी काका इथे पाठवून देणार आहेत.”

गौरीचे पाय जागीच थबकले. तेवढ्यात एक नोकर दोन कॉफीचे कप घेऊन आला. गौरीने त्याच्या हातातून कॉफीचे कप घेतले, एक कप जयच्या हातात दिला.

कॉफी पिता पिता जय म्हणाला,

“दरवाजा लावून घेतेस का? मला तुझ्याशी थोडं बोलायच आहे.”

गौरीने रूमचा दरवाजा बंद केला व ती त्याच्या समोर बेडवर जाऊन बसली.

“गौरी, आपलं लग्न एक अशा वळणावर झालं आहे की, लग्न होऊनही आपण एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी आहोत. मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेलं आहे. एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मला आहे.

आपलं लग्न अचानक झाल्याने मला सुट्ट्या मिळत नाहीये. मला पुण्याला उद्याच जावं लागेल. परवा पासून मला कंपनी जॉईन करायची आहे. मी तिथे एका मित्रासोबत फ्लॅटवर राहतो. मी जिथे राहतो, त्याच बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट कालच रिकामा झालाय.

1 बीएचके फ्लॅट आहे, फ्लॅटला गॅलरी व ड्राय बाल्कनी आहे. तुला फ्लॅट नक्कीच आवडेल. मी फ्लॅटच्या मालकासोबत रेंट व ऍग्रिमेंट बद्दल बोललो आहे. त्या एरियात सगळंच जवळ जवळ आहे. भाजीपाला, किराणा दुकान, हॉस्पिटल सगळंच जवळ आहे.

उद्या जर तू माझ्यासोबत येणार असेल तर येऊ शकते, फक्त दोन दिवस आपल्याला हॉटेलमध्ये रहावं लागेल. मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तुझे भविष्याबद्दलचे प्लॅन्स काय आहेत? तू उद्या माझ्यासोबत येशील का?” जय ज्यासाठी आला होता ते त्याने भरभर बोलून दाखवले.

गौरी त्याच्यासोबत पुण्याला जाईल का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.