शुभविवाह भाग १२
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: गौरीसोबत बोलण्यासाठी जय तिच्या घरी गेला होता.
आता बघूया पुढे….
“तू माझ्यासोबत येशील का?” जयने गौरीला पुन्हा विचारले.
“ह्या प्रश्नांच उत्तर काय द्यावं हेच मला कळत नाही. गेल्या तीन ते चार दिवसांत माझ्यासोबत जे घडलं त्याचा विचार करता मला वाटतंय की, काही दिवस या सगळ्यापासून दूर निघून जावं. नातेवाईक तोंडावर बोलत नसतील तरी त्यांच्या नजरा खूप काही सांगून जातात, पण परत तुमच्याबद्दल विचार केला तर तुमच्या सोबत लगेच येऊन त्रास देण्याची इच्छा होत नाहीये.” गौरीने उत्तर दिले. गौरीचे डोळे भरून आले होते.
“गौरी, बाकी सगळा विचार सोड. आपलं आता लग्न झालं आहे. आता ते कोणत्या परिस्थितीत झालं ही वेगळी गोष्ट आहे. तू माझी जबाबदारी आहेस. तू माझ्या सोबत आल्याने मला काही त्रास होणार नाहीये. तुलाच थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल.
मला तुझ्याशी आणि तुला माझ्याशी भरपूर काही बोलायचं आहे, पण ही जागा आणि वेळ योग्य नाहीये. आता फक्त मला एकच सांग, तू डॉक्टर आहेस एवढंच मला माहित आहे. तू जॉब करत होतीस का? तुझा पुढचा काय प्लॅन आहे?” जयने विचारले.
यावर गौरी म्हणाली,
“माझं बी ए एम एस झालं आहे, पुढे मी सी जी ओ केलेलं आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होते. लग्न झाल्यावर पुण्याला शिफ्ट व्हायचं असल्याने मी जॉब सोडला.”
“माझं बी ए एम एस झालं आहे, पुढे मी सी जी ओ केलेलं आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होते. लग्न झाल्यावर पुण्याला शिफ्ट व्हायचं असल्याने मी जॉब सोडला.”
“ओके. नो प्रॉब्लेम. तू तुझे कागदपत्र सोबत घेऊन ठेव. पुण्याला सगळं सेटल झाल्यावर तू हॉस्पिटलमध्ये जाऊन नोकरी शोधू शकतेस. आता मी निघतो. तुला जे कपडे आणि वस्तू लागतील ते पॅक करून ठेव. उद्या जे कोणी तुला घ्यायला येईल ते मोठी गाडी घेऊनच येतील अशी मी व्यवस्था करतो. उद्या दुपारी आपल्याला निघावं लागेल.” जयने सांगितले.
“चालेल, मी सगळी पॅकिंग आजच करून ठेवते.” गौरी म्हणाली.
जयने गौरीचा निरोप घेतला. खाली गेल्यावर जयला मोहनराव दिसले. जय त्यांच्याजवळ गेला.
“काका, मी निघतो. गौरीला उद्या मी माझ्यासोबत पुण्याला घेऊन जाईल. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तिला भेटायला पुण्याला येत जा.”
“तिकडे सगळी व्यवस्था झाली का?” मोहनरावांनी विचारले.
“मी तसं फोनवर सगळं मॅनेज केलं आहे. जे काही असेल ते उद्या गेल्यावर बघतो. तुम्ही गौरीची काही काळजी करू नका. ती आता माझी जबाबदारी आहे. मी निघतो.” जय बुलेटवर बसून घराच्या दिशेने मार्गस्थ झाला.
जय गेल्यानंतर गौरीने भाग्यश्रीला फोन करून जय व तिच्यामध्ये झालेलं संभाषण सांगितलं.
“गौरी, जय खरच खूप चांगला मुलगा आहे. त्याच आणि तुझं लग्न अचानक झालेलं असलं तरी त्याने तुझा स्वीकार अगदी सहजपणे केला आहे. त्याने तुझी जबाबदारी स्वीकारली आहे.
आशिषने आत्महत्या केल्यावर मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटले होते, पण आता वाटतंय की जय आशिषपेक्षा कितीतरी पटीने बेटर आहे.
आता तू पण सगळं मागे सोड आणि जयसोबत नव्याने आयुष्याची सुरुवात कर.” भाग्यश्री.
“भागश्री, जय सगळ्या बाबतीत किती क्लिअर आहेत. बोलताना पॉईंट टू पॉईंट ते बोलत होते. त्यांच्या मनात एक आणि तोंडात एक अस कुठेच वाटलं नाही. जय आणि माझं नात कस असेल हे मी आत्ता काहीच सांगू शकणार नाही, पण जय माणूस म्हणून छान आहेत.
आसावरी ताई एकदम खरं बोलल्या होत्या. जय जेम ऑफ अ पर्सन आहेत.” गौरी खुश होती.
“हो. नोकरी जॉईन करण्याच्या आधी एकदा गावाला घेऊन जा म्हणजे तुझी सगळ्यांशी भेट होईल. आपली पण भेट होईल. एकदा का तुझी नोकरी सुरू झाली की तुला जास्त सुट्ट्या मिळणार नाहीत.” भाग्यश्री.
“हो. मला गावाची, तुम्हा सर्वांची खूप आठवण येईल. पुण्याला रुळायला मला वेळच लागेल. चल, मी पटकन बॅग पॅक करते. तुझ्याशी बोलत बसले तर पॅकिंग राहून जाईल. बाय.” गौरीने फोन कट केला.
—--------------------------------------------------
—--------------------------------------------------
जय घरी पोहोचला तेव्हा दादासाहेब, शालिनीताई व अनिकेत तिघेजण हॉलमध्ये बसलेले होते. जय त्यांच्या सोबत जाऊन बसला.
“बाबा, उद्या दुपारनंतर मी व गौरीला पुण्याला जाण्यासाठी निघू. मी गौरीशी बोलून आलोय. तिला माझ्यासोबत यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. दोन-तीन दिवस हॉटेलमध्ये राहू. फ्लॅटच ऍग्रिमेंट झालं की तिकडे शिफ्ट होऊ. गौरी तिकडे जाऊन हॉस्पिटलमध्ये जॉब शोधणार आहे.” जयने माहिती दिली.
जय आपल्या सोबत बोलला हे बघून दादासाहेबांना आश्चर्य वाटले.
“जय, पण अस नवीन सुनेला हॉटेलमध्ये ठेवण बर दिसणार नाही. तू तिला रमेश मामाकडे ठेव ना. मी वहिनी सोबत बोलते.” शालिनीताई म्हणाल्या.
“आई, गौरीला त्यांच्याकडे कम्फर्टेबल वाटणार नाही. शिवाय मी जिथे राहतो तिथून मामाचं घर लांब आहे. तसही आई पुण्यात आम्हाला कोण ओळखत. आमचं नवीन लग्न झालं आहे, हे तिकडे कोणाला माहिती नसेल. ऍग्रिमेंटच काम परवा झालं तर फक्त एक रात्रच हॉटेलमध्ये काढावी लागेल.
तू बाकी गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. मी सगळं गौरीसोबत बोलूनच ठरवलं आहे.” जयने सांगितले.
“जय, नवीन फ्लॅट बुक करणार होतास, त्याच काय झालं?” दादासाहेबांनी विचारले.
“बाबा, पुढच्या महिन्यात एक नवीन साईट ओपन होणार आहे. मला पाहिजे तसा फ्लॅट तिथे असणार आहे. साईट ओपन झाल्यावर फ्लॅट बुक करण्याबद्दल सगळी चौकशी करतो आणि तुम्हाला कळवतो. “ जयने उत्तर दिले.
“जय, काही मदत लागली तर हक्काने सांगत जा.” अनिकेत म्हणाला.
“यस बडे भय्या.” जय स्माईल देऊन म्हणाला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
