शुभविवाह भाग १३
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: गौरी जयसोबत पुण्याला जाण्यास तयार झाली होती. जयच्या बोलण्यातून तो जबाबदार माणूस असल्याचे गौरीला जाणवले. घरी येऊन जयने दादासाहेबांना गौरी व तो दुसऱ्या दिवशी पुण्याला जाणार असल्याचे सांगितले.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: गौरी जयसोबत पुण्याला जाण्यास तयार झाली होती. जयच्या बोलण्यातून तो जबाबदार माणूस असल्याचे गौरीला जाणवले. घरी येऊन जयने दादासाहेबांना गौरी व तो दुसऱ्या दिवशी पुण्याला जाणार असल्याचे सांगितले.
आता बघूया पुढे….
जेवण झाल्यावर दादासाहेब त्यांच्या रूममध्ये पुस्तक वाचत बसले होते. शालिनीताई दोन्ही सुनांशी गप्पा मारून झाल्यावर रूममध्ये गेल्या.
“हे काय तुम्ही अजून झोपला नाहीत.” शालिनीताई दादासाहेबांकडे बघून म्हणाल्या.
“मी तुझीच येण्याची वाट बघत होतो. तुझ्याशी जरा बोलायचं होत.” दादासाहेबांनी आपल्या हातातील पुस्तक बाजूला ठेवलं.
दादासाहेब त्यांच्या आराम खुर्चीत बसलेले होते. शालिनीताई बेडवर जाऊन बसल्या.
“बोला.”
“माझं काही चुकतंय का?” दादासाहेबांनी विचारले.
“आज तुम्हाला हा प्रश्न का पडला? तुम्हाला नेमकं कोणत्या बाबतीत तुम्ही चुकत आहात अस वाटतय?” शालिनीताईंनी प्रतिप्रश्न केला.
“साधना व जयच्या बाबतीत मी चुकलो अस मला वाटतय. जयने सगळं जरी स्विकारलं असलं तरी त्याने बोलून दाखवलच ना. शिवाय साधनाच्या डोळ्यात नाराजी दिसते आहेच.” दादासाहेब.
“जयचं लग्न त्याला न विचारता ठरवल्याने तो नाराज होणे स्वाभाविक आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही चुकलात अस मी म्हणणार नाही. त्याला साजेशा मुलीसोबतच तुम्ही त्याचं लग्न लावलं, पण एकदा त्याच्यासोबत बोलायला हवं होतं. त्याच्या मनाची तयारी व्हायला तुम्ही वेळ द्यायला हवा होता.
साधना ताईंचं लग्न मोडल्यावर पुन्हा लग्न करायचं नाही हा त्यांचा निर्णय होता, तर मग या सगळ्यात तुमची चूक कुठे झाली?” शालिनीताई.
“मी तुम्हाला कोणालाच एक गोष्ट सांगितली नव्हती. साधनाला एक मुलगा आवडत होता, तो तिच्याच वयाचा होता. माझी व त्याची तिने भेट घालून दिली होती. साधनाला त्याच्यासोबत लग्न करायचे होते.
मी तिला तो मुलगा व मी यातून एकाची निवड करायला सांगितली होती. तिने माझी निवड केली. साधनाने त्यावेळी तो निर्णय स्विकारला जरी असला तरी तिच्या डोळ्यात उदासीनता दिसून येते.” दादासाहेब.
“अच्छा, म्हणून सकाळी त्या अस बोलल्या तर…. त्यांच्या बोलण्याचा रोख मला समजलाच नव्हता. तो मुलगा जर त्यांना योग्य वाटत होता, तर तुम्ही त्यांचं लग्न लावून दयायला हवं होतं.
साधना ताईंना एकटेपणा जाणवत असेल यात वादच नाहीये. आपण जरी त्यांना एकटे पडू देत नसलो, तरी त्यांना ते रीतेपण जाणवत असेलच ना. आता हेच बघा ना, तुम्ही माझ्याकडे हक्काने मन मोकळं करत आहात. तसं त्या कोणाकडे व्यक्त होतील?
गेल्या काही दिवसांत साधना ताईंसोबत माझ्या मोकळ्या गप्पा झाल्याच नाहीयेत. त्या घरी आल्या तरी दोन दिवस येतात आणि निघून जातात. पहिल्यासारख्या त्या जास्त काही बोलत नाहीत.” शालिनीताई.
“मी जर साधनाला त्या मुलासोबत लग्न करण्याची परवानगी दिली असती तर त्याचा परिणाम आपल्या प्रेस्टीजवर पडला असता. गावात आपल्या कुटुंबाबद्दल वाईट साईट बोललं गेलं असतं. देशमुखांच्या इभ्रतीला कोणी बोल लावू नये एवढीच माझी इच्छा होती.” दादासाहेबांनी त्यांचं मत मांडल.
“तुम्हाला तुमच वागणं योग्य वाटत आहे, तर मग तुम्ही चुकलात हा विचारच करू नका.” शालिनीताई.
“तू एकदा साधना सोबत बोलून तिच्या मनात जर माझ्याबद्दल काही साचलेलं असेल तर ते प्लिज दूर कर ना.” दादासाहेब.
“मी आता लगेच जाऊन त्यांच्या सोबत बोलते, पण आमच्यात जे बोलणं होईल ते मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही झोपा मी आलेच.” शालिनीताई रूममधून बाहेर गेल्या.
शालिनीताई थेट साधनाच्या रूमकडे गेल्या. दरवाजावर नॉक केल्यावर साधनाने दरवाजा उघडला. शालिनीताईंना दरवाजात बघून साधनाला आश्चर्य वाटलं.
“वहिनी, तुम्ही यावेळी कश्या?” साधना.
“तुम्ही झोपल्या नव्हत्या ना?” शालिनीताई रूममध्ये गेल्या.
“नाही. झोप येत नव्हती म्हणून पुस्तक वाचत बसले होते.” साधना म्हणाली.
“बऱ्याच दिवसांपासून आपल्यात निवांत गप्पा झाल्या नाहीत म्हणून आले होते. दरवाजा लावून घ्या.” शालिनीताई.
साधनाने दरवाजा लावून घेतला व ती बेडवर जाऊन बसली. शालिनीताई उभ्याच होत्या.
“पुस्तकं वाचण्याची सवय तुम्हा भाऊ बहिणींना सारखीच आहे. त्यांनाही झोप येत नव्हती तर तेही पुस्तक वाचत बसले आहेत.” शालिनीताई टेबलवरील पुस्तकं चाळत होत्या.
“आमच्या गुरुजींमुळे आम्हाला वाचनाची गोडी लागली.” साधना.
“हे मला सगळं सांगत नाहीत ते मला माहित होतं, पण तुम्ही सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा मला सांगत नाहीत. साधनाताई, पहिले तुम्ही घरी आल्यावर माझ्याशी खूप गप्पा मारायच्या, पण हल्ली अजिबात बोलत नाहीत.” शालिनीताई साधनाकडे बघून म्हणाल्या.
“वहिनी, आता माझ्याकडे बोलायला काही राहीलच नाहीये.” साधना.
“तुमच्या आयुष्यात कोणीतरी आलं होतं हे तुम्ही मला का सांगितलं नाही?” शालिनीताई थेट मुद्द्यावर आल्या.
“मला वाटलं ते तुम्हाला दादासाहेबांनी सांगितलं असेल. उलट तुम्ही माझ्याशी त्या विषयावर बोलल्या नाहीत म्हणून मलाच वाईट वाटलं होतं.” साधना.
“त्यांनी ही गोष्ट मला आज सांगितली.” शालिनीताई.
“तसही सांगून काय फरक पडणार होता.” साधना.
“साधनाताई, त्या व्यक्तीमुळेच तुमच्यात हा बदल घडला आहे का?” शालिनीताई.
“वहिनी, त्याच्यामुळे मी जगायला शिकले. मला अलीकडे जी काही बक्षिसे मिळत आहेत ती त्याच्या मोटिव्हेशन मुळेच. माझं मन मोकळं करायला मला हक्काची जागा मिळाली आहे.” साधना.
“म्हणजे अजूनही तो तुमच्या आयुष्यात आहे का?” शालिनीताईंना प्रश्न पडला होता.
“हो, पण एक मित्र म्हणून. पाच वर्षांपासून दररोज आम्ही फोनवर टचमध्ये आहोत. दादासाहेबांनी लग्नाला परवानगी दिली नाही म्हणून आम्ही आयुष्यभर मित्र रहायचं ठरवलं.
वहिनी, मी पण एक माणूस आहे. मलाही सोबतीची गरज आहे, पण हे दादासाहेबांना कधी समजणार नाही. त्यांना वाटत की, ते म्हणतील ती पूर्वदिशा म्हणायची. वहिनी, तो आपल्याच जातीतील होता, फक्त त्याची निवड मी केली म्हणून आमच्या लग्नाला दादासाहेबांनी नकार दिला.
वहिनी, घराणेशाही जपण्याच्या नावाखाली आपलीच माणसे मनातून किती दुःखी होत आहेत हे दादासाहेबांना कसं समजत नाहीये. तो बिचारा जय सगळ्याने भांबावून गेला आहे. मी त्याला किती समजावल हे माझं मला माहित.
हल्लीच्या पिढीतील तो मुलगा आहे. लग्नाबद्दल त्याचंही काही स्वप्न असेलच ना. दादासाहेबांनी त्याच वाईट केलं हे मी म्हणणार नाही, पण त्याच्या मनाचा थोडातरी विचार त्यांनी करायला हवा होता.
असो, तुम्हीपण दादासाहेबांच्या प्रत्येक कृतीला मम म्हणणाऱ्या आहात.” साधनाने तिचं मन मोकळं केलं.
“तुमच्या मनात ह्यांच्याबद्दल खूप राग आहे.” शालिनीताई.
“रागापेक्षा आदर जास्त आहे, म्हणून तर त्यांचं बोलणं पटत नसलं तरी ऐकावं लागतंय.” साधना.
“साधनाताई, ह्यांना मम म्हटले नसते, तर आपलं हे गोकुळ असे फुलले नसते. आपल्या घरात दररोज कटकटी राहिल्या नसत्या. मला ह्यांचं प्रत्येक वागणं पटत अस नाहीये, पण बोलून फक्त भांडण होईल. घरातील वातावरण दूषित होईल.
जयच्या डोळ्यातील भाव बघून माझ्या मनाला यातना होत नसतील का? तुमच्या भावाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरील रेघ असते. मी स्वतःच्या खूप इच्छा मारल्या आहेत, पण काय करू, पर्याय नव्हता.
साधनाताई, आमच्या लग्नाला इतकी वर्षे झालीत, पण ह्यांनी आजवर मला कुठेच फिरायला नेलं नाहीये. माहेरी फक्त डिलिव्हरी झाल्यावर राहिली असेल. आता सकाळी जायचं आणि संध्याकाळी मागे फिरायचं.
माझे बहीण भाऊ आलेले असतात, त्यांच्यासोबत काही क्षण घालवावे अस मलाही वाटत ना, पण हे कधीच मला माहेरी राहण्याची परवानगी देत नाहीत. घरात सोन्याचा धूर निघतो आहे, पण मानसिक समाधान खूप काही नाहीये. आता हा सगळ्याची सवय झाल्याने मी कसलंच वाईट वाटून घेत नाही.
नवरा दारुडा, संशयी, व्यसनी भेटला नाही यातच मी समाधान मानते. दादासाहेब एक माणूस म्हणून तरी चांगले आहेत हेच ते माझं सुख.
दादासाहेब कडक स्वभावाचे असल्याने एकाही मुलाची हिंमत वाकड्या वाटेने जायची झाली नाही.” शालिनीताईंनी त्यांचं मन मोकळं केलं.
“वहिनी, आज बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी बोलल्यासारखं वाटलं. तुम्ही संगमनेरला येत जा ना. मस्त गप्पा मारू, बाहेर खाऊ.” साधना.
“मी येईल, पण त्यावेळी तुमच्या मित्राला बोलावून घ्या. मला त्यांना एकदा भेटायचं.” साधनाने शालिनीताईंना मिठी मारली.
“चला, तुम्ही झोपा. मी पण झोपते. उद्या सगळेजण ज्याच्या त्याच्या मार्गाला जाणार आहे.” शालिनीताई निघून गेल्या.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
