शुभविवाह भाग १५
मागील भागाचा सारांश: गौरी पुण्याला जाणार असल्याने मोहनराव हळवे झाले होते. जयने गौरीला लगेच स्विकारले याबद्दल साधनाला त्याचे कौतुक वाटले.
आता बघूया पुढे….
अनिकेत व शंतनू गौरीला आपल्या घरी घेऊन आले. घरी आल्यावर घरातील सगळ्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या गौरी पाया पडली.
“आपण सगळे जेवण करूयात म्हणजे आम्हाला लगेच निघता येईल.” जय म्हणाला.
“हो, शालिनी सगळ्यांसाठी ताटं करा. पुण्याला जायला ह्यांना सहा-सात तास लागतील. ट्राफिक असेल तर अजून वेळ लागेल.” दादासाहेब म्हणाले.
घरातील सगळे जेन्ट्स आधी जेवायला बसले, मग घरातील लेडीज जेवायला बसल्या.
“गौरी बाळा, पोटभर जेवण कर. संकोच करू नकोस.” शालिनीताई म्हणाल्या.
“काकू, आपल्या घरी जेवायला मी संकोच कशाला करेल.” गौरी.
“काकू नाही आता आई म्हणत जा. ह्या दोघीजणी मला आईच म्हणतात.” शालिनीताई.
“हो, चालेल. काकू म्हणण्याची सवय लागली होती तर तेच तोंडात आलं.” गौरी हसून म्हणाली.
सगळ्यांनी गप्पा मारता मारता जेवण केले.
“गौरी, तू प्रवासात साडीत कम्फर्टेबल असशील का? नाहीतर ड्रेस घाल.” जय सगळ्यांसमोर गौरीला म्हणाला.
गौरीने शालिनीताईंकडे बघितले.
“तू ड्रेस घाल. आपल्याकडे साडीच्या बाबतीत कम्पलशन नाहीये. आसावरी व शीतल दोघीजणी एरवी ड्रेसच घालतात. फक्त घरात काही कार्यक्रम असेल, सण असेल तर साडी नेसतात.” शालिनीताई अस बोलल्यावर गौरी ड्रेस घालून आली.
जय व गौरीने जोडीने सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. साधना, गौरी व जय हे तिघेजण गाडीत बसून रवाना झाले. दुपारी १२ वाजता ते नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी निघाले होते
“गौरी, तशी आपली आधीपासूनच ओळख आहेच. पण आता आपल्यात जवळच नातं निर्माण झालं आहे. तुला जयची तक्रार करायची असेल तर बिनधास्त माझ्याकडे कर.
मी त्याचा कान चांगलाच पिरगळेल. तुला कधीही काहीही वाटलं तरी हक्काने मला फोन करत जा. अगदी तुझ्या सासूबाई बद्दल बोलायच असेल तरी..” साधना मिश्किल हसून म्हणाली.
यावर गौरी फक्त हसली.
“आत्या, तू तर लगेच टीम बदलली.” जय हसून म्हणाला.
“गौरीच्या बाजूने कोणी हवं की नको. मी आजपासून गौरीच्या बाजूने आहे. तसा तू तिला त्रास देणार नाहीच, पण दिलास तर गाठ माझ्याशी आहे.” साधना.
गौरी शांतच होती. तिच्या मनात दुसरेच वादळ सुरू होते. गौरीच्या मनात काय सुरू असेल याचा अंदाज साधनाला आला होता, म्हणून ती गौरीसोबत पुढे जास्त काही बोलली नाही.
दीड तासात ते संगमनेरला पोहोचले होते. साधनाला सोडून जय व गौरी पुण्याच्या दिशेने निघाले होते. ड्रायव्हर सीटवर जय होता, तर त्याच्याच बाजूला गौरी बसली होती.
“गौरी, गाडी थांबवायची असेल तर सांग.” जय.
“लगेच नको. थोडं पुढे गेल्यावर चहा घेण्यासाठी गाडी थांबवा. चहा पिल्यावर तुम्हालाही फ्रेश वाटेल.” गौरी.
जयने होकारार्थी मान हलवली.
“तुला झोपायचं असेल तर सीट मागे करून झोप.” जय.
“आतातरी मला झोप आली नाहीये. शिवाय तुम्हाला कंपनी कोण देईल?” गौरी.
“कंपनी दयायला तुला माझ्याशी गप्पा माराव्या लागतील. एकंदरीत तुला बघून अस वाटतय की, तुला जास्त बोलायला आवडत नाही.” जय.
“अगदीच तसं नाहीये. मला बोलायला आवडतं, पण सध्या इतकं काही घडलं आहे की, मनस्थिती बिघडली आहे. बोलण्याची इच्छाच होत नाही.” गौरी.
“गौरी, इथून पुढे जर आपल्याला सोबत रहायचं आहे, तर बोलावं तर लागेल ना. तुला बोलायची इच्छा नसेल पण मला खूप काही बोलायच आहे.” जय.
“आपण घरी जाऊन बोलूयात ना. आता तुम्ही तुमचे लक्ष गाडी चालवण्यावर केंद्रीत करा. आपण बोलणार अश्या विषयावर आहोत ज्याने दोघेही डिस्टर्ब होणार आहोत.” गौरी.
“ओके चालेल. आपण घरी गेल्यावरच बोलूयात. इथे पुढे एका ठिकाणी मस्त चहा मिळतो. मी तिथे गाडी थांबवतो.” जयने पुढे जाऊन गाडी थांबवली.
गाडीतून खाली उतरून जय व गौरी टपरीच्या इथे जाऊन बसले. चहाचा एक घोट पिऊन गौरी म्हणाली,
“चहा एकच नंबर आहे.”
“मी दरवेळी इथे चहा पिण्यासाठी थांबत असतोच.” जय म्हणाला.
‘मला काय माहित होतं. मागच्या वेळी इथून ज्या आशिषला लिफ्ट दिली, त्याच्या होणाऱ्या बायकोशी माझं लग्न होईल आणि पुण्याला जाताना तिच्यासोबत मी इथे चहा पिल. नशीबाचा खेळ काहीतरी वेगळाच असतो. आपण त्याचा अंदाज लावूच शकत नाही.’
चहा पिऊन झाल्यावर जय व गौरी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
