Login

शुभविवाह भाग १६

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग १६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जय व गौरी घरातील लोकांचा आशीर्वाद घेऊन पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. साधनाला त्यांनी संगमनेरला सोडले. जयला गौरीसोबत त्यांच्या विषयावर बोलायचं होत, पण गौरीचं म्हणणं होतं की, या विषयावर घरी गेल्यावर बोलूयात.

आता बघूया पुढे….

रस्त्यात ट्रॅफिक लागल्याने जय वैतागला होता.

“या पट्ट्यात नेहमीच ट्रॅफिक असते. येथून बायपास कधी होईल काय माहित?” जय चिडचिड करत होता.

“तुम्ही कितीही चिडला तरी ही ट्रॅफिक कमी होणार नाहीये. एक खोल श्वास घेऊन शांत व्हा.” गौरी म्हणाली.

“तू पुण्याला नेहमी येतेस का?” जयने विचारले.

“नाही. काही काम असेल तरच पुण्याला येणं होत होतं. माझं सगळं शिक्षण नाशिकमध्येच झालं. कोर्स मुंबईला केला, त्यामुळे पुण्याशी माझा काही संबंध आला नाही.” गौरीने उत्तर दिले.

“म्हणूनच तुला इथल्या ट्रॅफिकबद्दल काही वाटत नाही. नेहमी प्रवास केल्यावर तुझीपण माझ्यासारखी ट्रॅफिक बघितल्यावर चिडचिड होत जाईल.” जय.

“ट्रॅफिक मुळे तुम्ही वैतागलात हे बरोबर आहे, पण चिडचिड करून स्वतःचा बीपी का म्हणून वाढवून घ्यायचा. तुमच्या चिडचिड करण्याने ट्रॅफिक मोकळी झाली असती तर मग ठीक होत.” गौरी.

“तुझ्यातील डॉक्टर बोलायला लागली.” जय.

ट्रॅफिक मोकळी होत असल्याने गाडी पुढे जात होती. जयची गाडी पुण्याच्या हद्दीत दाखल झाली होती. गौरी आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करत होती.

“गौरी, आज आपल्याला हॉटेलमध्ये रहावं लागेल. उद्या सकाळी फ्लॅटची चावी मिळेल. माझ्या एका मित्राने बाईची मदत घेऊन फ्लॅट स्वच्छ करून ठेवला आहे. उद्या मार्केटमध्ये फिरून आपल्याला जे काही सामान आवश्यक आहे ते घेऊयात.” जय गौरीला त्यांचं प्लॅनिंग सांगत होता.

जयने गाडी एका हॉटेलच्या समोर नेऊन थांबवली. हॉटेल बाहेरून एकदम भारी दिसत होते. हॉटेल महागड असणार याचा अंदाज गौरीला बाहेरूनच आला होता.

“गौरी, जेवढ सामान आवश्यक आहे तेवढंच घे. बाकीच्या बॅग्स गाडीतच राहूदेत.” जयने अस सांगितल्यावर गौरीने एक हँडबॅग घेतली.

सिक्युरिटी गार्डकडे गाडी पार्किंग करण्यासाठी जयने गाडीची चावी दिली. जय व गौरीने हॉटेलमध्ये प्रवेश केला. रिसेप्शन काऊंटरवर जाऊन जयने रूमची चावी घेतली. गौरी लांब उभी राहून हॉटेलचे निरीक्षण करत होती व जयची वाट बघत होती.

जय गौरी जवळ गेला,

“गौरी, मी शेजारच्या दोन रूम्स बुक केल्या आहेत. एक तुझ्यासाठी व एक माझ्यासाठी. रूममध्ये जाऊन फ्रेश होऊयात. जरावेळ आराम करूयात. मग जेवायला खाली रेस्टॉरंट मध्ये येऊयात.”

जयने दोन सेपरेट रूम बुक केल्याचं ऐकून गौरीला आश्चर्य वाटले होते. जयचा स्वभाव इतर मुलांपेक्षा किती वेगळा आहे हे तिला त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होते.

“रूममध्ये जाण्याआधी आपण कॉफी पिऊयात का? तेवढंच फ्रेश वाटेल.” गौरी म्हणाली.

“चालेल, आपण कॅफेटेरियात जाऊयात.” जय पुढे व ती मागे असे दोघेजण कॅफेटेरियात गेले. जयने गौरीच्या आवडीने कॉफीची ऑर्डर दिली.

घरी फोन करून जयने ते पुण्यात पोहोचल्याचे सांगितले. गौरीनेही तिच्या वडिलांना फोन करून ते सुखरूप पोहोचल्याचे सांगितले.

“सलग इतक्या तास गाडी चालवून तुम्ही दमून जात असाल ना?” कॉफी पिता पिता गौरीने जयला विचारले.

“सुरुवातीला खूप दमून जायचो. आता बऱ्यापैकी प्रवासाची सवय झाली आहे. शिवाय यावेळी मोठी गाडी घेऊन आलो होतो, म्हणून थोडा त्रास झाला. माझी गाडी छोटी आहे. ट्रॅफिक मधून बाहेर पडायला सोपं जातं.” जयने सांगितले.

“हो ते आहेच. फ्रेश झाल्यावर आपण गप्पा मारण्यासाठी माझ्या रूममध्ये भेटुयात. गप्पा खूपच लांबल्या तर जेवण तिथेच मागवू.” गौरी म्हणाली.

“ चालेल. मी फ्रेश होऊन तुझ्या रूममध्ये येतो.” कॉफी पिऊन झाल्यावर जय व गौरी आपापल्या रूममध्ये निघून गेले.

जय व गौरीमध्ये काय बोलणं होईल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.