Login

शुभविवाह भाग १७

गोष्ट एका लग्नाची
शुभविवाह भाग १७
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी 2025-2026
मागील भागाचा सारांश: जय ट्रॅफिकने वैतागला होता, गौरीने त्याला चिडचिड न करण्याचा सल्ला दिला. जयने दोघांसाठी वेगवेगळ्या रूम्स बुक केल्या होत्या.

आता बघूया पुढे…..

गौरी तिच्या रूममध्ये गेली. एक रात्रच काढायची होती, तरीही जयने आलिशान हॉटेलमध्ये आलिशान रूम बुक केली होती. गौरीने रूम बघितली, ती खुश झाली होती, तिला रूम आवडली होती.

रूममध्ये एक कींग साईज बेड होता. ड्रेसिंग टेबल होता. एक छोटा टेबल व दोन खुर्च्या होत्या. टॉयलेट, बाथरूम एकदम स्वच्छ होते. रूमला मोठी खिडकी होती, त्यामुळे हवा खेळती राहत होती.

‘जय खरंच किती चांगले आहेत. मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीये. मी कुठेही अवघडली जाणार नाही याची ते काळजी घेत आहेत. आसावरी ताई जयबद्दल अगदी बरोबर बोलल्या होत्या. जय हे जेम ऑफ अ पर्सन आहेत.’

जयचा विचार करत करत गौरी फ्रेश झाली. तिने कपडे बदलले. जयला फोन करून तिचं आवरल्याचे तिने सांगितले.

गौरीचा फोन आला तेव्हा जय बेडवर पडलेला होता.

‘गौरीला मी आज माझ्या भूतकाळाबद्दल सगळं सांगणार आहे. तिला अंधारात ठेवून जमणार नाही.’ जय त्याचं आवरून गौरीच्या रूममध्ये गेला.

जय खुर्चीत जाऊन बसला, मग गौरीही दुसरी खुर्ची घेऊन त्याच्या समोर बसली.

“गौरी, कोणत्याही नात्यात पारदर्शकता हवी. या मताचा मी आहे. त्यातल्या त्यात आपलं तर लग्न झालं आहे. आयुष्यभर सोबत रहायचं असेल तर एकमेकांबद्दल सगळी माहीती असायला हवी.

एकमेकांबद्दल मनात अढी असायला नको. स्वभाव आणि सवयी तर हळूहळू समजतीलच. आपण असे नवरा बायको आहोत की, लग्न झाल्यावर आपण एकमेकांबद्दल जाणून घेणार आहोत. आपली गोष्टच निराळी आहे.” जयने बोलायला सुरुवात केली.

“मलाही सगळंच बोलायचं आहे पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाही.” गौरी.

“मी जे विचारतो त्याच उत्तर दे, आपोआप तू सगळं बोलशील. आशिषला तुझ्यासोबत बोलायचं होत, मग तू त्याच्याशी बोलत का नव्हती?” जय थेट मुद्द्यावर आला होता.

“तुम्हाला हे कसं माहीत?” गौरीला प्रश्न पडला होता.

“आपण ज्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो होतो ना तिथेच मी नाशिकला जाताना थांबलो होतो. आशिष तिथेच बसलेला होता. त्याला बसस्टँडवर जाण्यासाठी मी लिफ्ट दिली होती. तो खूपच उदास दिसत असल्याने मी त्याला त्यामागील कारण विचारलं, तेव्हा बोलताना त्याने हे सांगितलं होतं.” जय.

“आशिष त्याच्या फॅमिलीसोबत आमच्या घरी मला बघायला आले. ते तुमच्यासारखे बोलण्यात इतके क्लिअर कट नव्हतेच. आम्हाला दोघांना बोलायला एकट्यात वेळ दिला तेव्हा ते बोलले होते की, “मला तुझ्यासोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मला बाहेर भेटशील का?”

आता एका अनोळखी मुलाने मला हा प्रश्न विचारल्यावर मी लगेच हो कशी म्हणेल? मी त्यांना सांगितलं की, “तुम्ही माझ्या बाबांना विचारा, त्यांनी परवानगी दिली तरच मी तुम्हाला बाहेर भेटेल.” माझे बाबा या सगळ्याला परवानगी देणार नाहीत हे मला ठाऊक होतंच.

मी अस बोलल्यावर ते पुढे काहीच बोलले नाही. मी रूममध्ये थांबले व ते तेथून निघून गेले. काही वेळाने बाबा माझ्या रूममध्ये आले व त्यांचा ह्या लग्नासाठी होकार असल्याचे सांगितले. आशिषच्या घरचे लोकं किती खानदानी आहेत याबद्दल बाबांनी मला सांगितले.

मी बाबांना सांगितलं होतं की, त्यांना योग्य वाटत असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. आमच्या दोघांचं लग्न त्याच दिवशी ठरलं होतं. माझ्या फॅमिलीत ही अशीच लग्न जमत असल्याने मी या सगळ्यासाठी आधीपासूनच तयार होते.

दोन तीन दिवसांनी लग्नाची बैठक पार पडली. बाबांनी मला ठणकावून सांगितलं होतं की, “आशिषचा फोन आला तरी त्यांच्याशी बोलायचं नाही. आपला खानदानी पणा दिसला पाहिजे.”

दोन दिवसांनी आशिषचा मॅसेज आला होता. ते सतत भेटुया असंच म्हणत होते. मी त्यांना बाबांची परवानगी घ्यायला सांगितली होती. मी त्यांना भेटायला गेल्याचे बाबांना कळलं असत तर आमच्या घरात काय झालं असत याची कल्पना सुद्धा मी करू शकत नव्हते.

लग्नाच्या आधी मुला मुलीने एकमेकांशी बोलणं, भेटणं हे बाबांना पटतच नव्हते. मी त्यांना न सांगता आशिषला भेटायला जाणं शक्यच नव्हतं. मी त्यांना एकदा बोलले होते की, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते फोनवर बोला, पण फोनवर बोलायला तयार नव्हते.” गौरीने सगळं सविस्तरपणे सांगितले.

“तुमच्यात जर आधी बोलणं झालं असत, तर कदाचित आशिष आज या जगात असता.” जय.

“म्हणजे मला कळलं नाही.” गौरी.

“आशिषला तुला जे सांगायचं होत ते ऐकून तू लग्नाला नकार दिला असता. लग्न कॅन्सल झालं असत, तर तो ज्या परिस्थितीत अडकला होता, तेथून तो निसटू शकला असता.” जय.

“तुम्ही थोडं क्लिअर बोला ना. मला काहीच समजत नाहीये.” गौरी.

जयच्या तोंडून आशिषची खरी व्यथा ऐकल्यावर गौरीची काय प्रतिक्रिया असेल? बघूया पुढील भागात…

©®Dr Supriya Dighe
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटींग मध्ये जाऊन "favourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.